स्वागतकक्ष arrow इ-प्रकाशन arrow खरे सुख कशात असते?
खरे सुख कशात असते? पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

खरे सुख कशात असते?

इंग्लंड अमेरिकेत व अन्य देशात शिक्षणासाठी, नोकरीव्यवसायासाठी किंवा प्रवासासाठी काही काळ जाऊन राहणे यात आता फारसे नाविन्य उरलेले नाही. तशा जाण्याला कुणाचा विरोध असण्याचेही कारण नाही. पण तिथे गेलेल्या अनेक तरूण मुला-मुलींना अलिकडे तिकडेच स्थायिक होण्याची, तिथल्या नागरिकत्वाची खूण असलेले ‘ग्रीन कार्ड’ (अमेरिकेत) मिळवण्याची जी धडपड चालते, ते मिळेपर्यंत त्यांची जी तगमग होते ती पाहिली की माझे मन अस्वस्थ होते. अशासाठी की आपण आता ‘अमेरिकेचे नागरिक झालो’ असा आनंद-अभिमान त्या तरूण मुला-मुलींना वाटत असला तरी भारतात ‘भारतीय’ नागरिक म्हणून त्यांना जे स्थान असते, जी आपुलकीची, जिव्हाळ्याची वाहणूक सहजपणेच त्यांना मिळते त्याचा मर्यादित प्रमाणातच त्यांना तिकडे अनुभव येतो, हे तिथे राहून आलेल्या पालकांकडून, तसेच कायम वास्तव्य करून असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सांगण्यावरून मला कळले. त्यावर माझा प्रश्न आहे की असा दुय्यमपणाचा शिक्का असलेल्या जीवनात अभिमानास्पद असे काय आहे? परदेशात भारतापेक्षा कित्येक पटीने पगार जास्त मिळतो, चिक्कार पैसे मिळतात. खाद्यपदार्थांपासून वाहनांपर्यंत सगळीच चंगळ असते. हवा-पाणी रस्ते, सिनेमा थिएटरे सारे बघावे ते स्वच्छ असते. अनेक सुख-सोयी, सुविधा मिळतात. सगळीकडे चकाचक, लखलखीत! म्हणून आम्हाला तिकडेच राहावेसे वाटते ही सामान्यतः अमेरिकन भारतीयांची विचारसरणी असते, तिचे मला नवल वाटत नाही. पण दुःख मात्र मनापासून वाटते.

माझ्या मनात येते, उदंड भौतिक सुखे मिळवणे एवढेच मानवी जीवनाचचे उद्दिष्ट असते का? आपला देश गरीब आहे, अडाणी आहे, अस्वच्छ आहे प्रदूषणाने जर्जर आहे हे सर्व घटकाभर मान्य केले तरीही यात सुधारणा करण्याचे काम या बुद्धिमान, कर्तबगार तरूण पिढीनेच करायचे आहे ना? तेही कृतज्ञतेने करायला हवे, कारण त्यांच्या जीवनाची आवश्यक अशी पायाभरणी त्यांच्या मातापित्यांप्रमाणेच या देशानेच केली आहे. आपल्या ज्ञानाचा, पैशाचा, श्रमाचा उपयोग स्वदेशासाठी करण्यातच खरा पुरुषार्थ आहे. याचे त्यांनी स्मरण ठेवायला हवे. खूप दूरची, एखादी मानलेली ‘आजी’ आपल्या आईपेक्षा गोरी आहे म्हणून तिला तुच्छ लेखणे कितपत उचित ठरते? पण कर्तव्य जबाबदार्‍या यांच्यापेक्षा संपत्ती, उपभोग, क्षणभर टिकणार्‍या सुखाचा आनंद यांनाच जीवनात पहिले स्थान देणे इष्ट अशी ज्यांची जीवनदृष्टी असते, संकुचित व आत्ममग्न अशी वृत्ती असते त्यांना माझी ही विधाने कशी रुचतील?

माणसाला थोडीफार, करमणूक, हौसमौज जरूर हवी. जगण्यासाठी पैसा तर हवाच! पण किती पैसा मिळाला किंवा मिळवला म्हणजे माणूस सुखी होतो हे मोजण्याचे काही माप आस्तित्वात आहे काय? "न जातुः काम कामानाम्‌ उपभोग्येन शाम्यति" या सुवचनाप्रमाणेच होण्याची शक्यता अधिक! टॉलस्टॉय यांच्या गोष्टीतला माणूस अधिकाधिक जमीन आपल्या मालकीच व्हावी म्हणून धावधाव धावला. पण संध्यकाळ झाल्याने त्याला थांबावेच लागले! आणि मग अतिश्रमाने त्याला आपला प्राण गमवावा लागला. ही मार्मिक गोष्ट खूप काही सांगून जाते. म्हणून मला वाटते सुख कशात मानायचे? जीवनात आपण कुठे व केव्हा थांबायचे हे जर माणसाला कळत नसेल तर त्याला टॉलस्टॉय यांच्या गोष्टीतल्या माणसाचाच अनुभव येणे अधिक शक्य!

भौतिक सुखांना सर्वस्व मानणार्‍या माणसाच्या दृष्टीने हिवाळ्यातले छानदार ऊन, कडक उन्हानंतरच्या पावसाच्या धारेने आणलेला मृदू गंध, उत्तम पुस्तकांशी साधलेला संवाद, आपला नयनमनोहर पिसारा पसरून नाचणार्‍या मोराचे अनपेक्षितपणे झालेले दर्शन, गिरसप्पा-गोकाक या धबधब्यातून दिसणारी मनोरम इंद्रधनुष्ये, निशिगंधाच्या फुलांवरून रात्री आलेला गोड सुवास, सुदृढ देखण्या छकुल्याच्या अंगाकेसाचा सूक्ष्म पण हवाहवासा वाटणारा सुगंध आणि भीमसेनजींचा  मंत्रमुग्ध करणारा सुस्वर ही व अशीच ‘खरी’ बहुमोल सुखे नगण्यच ठरायची! कोण रसिक ते मान्य करणार हो?

 

 

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color