स्वागतकक्ष arrow मराठी पुस्तके arrow मधुघट arrow स्मरण- श्रमदानाच्या प्रयोगाचे !
स्मरण- श्रमदानाच्या प्रयोगाचे ! पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

स्मरण- श्रमदानाच्या प्रयोगाचे !

जीवनाच्या संध्याकाळी मागे वळून जीवनाकडे पाहण्यात एक आगळाच आनंद असतो. कितीतरी साध्या-साध्या छोट्या-छोट्या गोष्टींनी, प्रसंगांनी आपल्याला रिझवलेले असते. चिरस्मरणीय आणि बहुमोल असे काही शिकवलेलेही असते. अशा सुखद क्षणांच्या सोनसाखळीतला हा एक आठवणीचा मणी!

हिंगण्याची आमची शाळा हे एक आदर्श गुरुकुल होते. भवतीचा निसर्गरम्य परिसर, जिव्हाळ्याचे, घरगुती वातावरण, व्रतस्थ वृत्तीने शिकवणारे शीलवंत गुरुजन, मातृभषा हे शिक्षणाचे माध्यम, आपली विद्यर्थिनी ही समाजातली एक सुजाण नागरिक बनावी, यथाशक्ती तिने समाजऋण फेडावे या भावनेने तिला जीवनभर पुरेल अशी शिदोरी देणारे विचारवंत, ही त्याची काही वैशिष्ट्ये!

मला वाटते मी पुढे सांगणार आहे ती घटना १९३७ मधील असावी. आमच्या शाळेला भेट देण्यासाठी त्यावेळचे राज्यपाल लॉर्ड ब्रेबोर्न सपत्निक येणार होते. स्वाभाविकच आमची एकच धांदल उडून गेली होती. त्यांच्या भेटीचा कार्यक्रम ठरवताना आमच्या शाळेकडे येणारा रस्ता म्हणजे एक मोठीच कटकटीची बाब ठरत होती. रसातळाला नेतो तो रस्ता ही व्याख्या त्याला लागू पडेल इतकी त्याची भयंकर दुर्दशा होती. त्यावर तोडगा सर्वानुमते असा निघाला की, आपण सगळ्यांनी मिळून आवश्यक तेवढा रस्ता श्रमदानाने चांगला करावा. झाऽऽले! बेत ठरला मात्र, आमच्या उत्साहाला जणू उधाणच आले. सगळ्याजणी झटून कामाला लागलो. खुरपे, कुदळ, पहार अशी काय काय रस्ता दुरुस्तीची साधने, घमेली, वाळू, खडी असे कितीतरी सामान येऊन पडले. शाळा सुटल्यावर संध्याकाळी प्राथमिक शाळेतल्या मुलींपासून गटागटाने आम्ही जमू लागलो. जिला जे जमेल ते काम ती मुलगी हौसेने करू लागली. नाका-तोंडात धूळ जाते आहे तरी कुणी जमीन झाडते आहे. कोण पाणी घालते आहे. कोण घमेल्यात वाळू भरते आहे. कुणी ते डोक्यावरून योग्य जागी नेऊन पोहोचवते आहे. मध्येच कुणी ठेचकाळते आहे. पण कुरकुर न करता काम चालूच आहे. अशी खूप मजा चालायची.

या कामात आमचे सर्व शिक्षक व शिक्षिका जातीने सहभागी झाले होते. तीर्थरूप आण्णा कर्वे यांचे चिरंजीव डॉ. भास्कर काका व त्यांच्या पत्नी सौ. कावेरीताई हेही पडेल ते काम करण्यात मागे नव्हते. कधी कधी गुरुवर्य आण्णाही येऊन जवळ खुर्चीवर बसून आपल्या कापर्‍या व अनुनासिक आवाजात कौतुक करून आमचा उत्साह वाढवीत. त्यामुळे आमची कॉलर आणखीच ताठ व्हायची! अशा धामधुमीत पंधरा-वीस दिवस गेले, आवश्यक तेवढा रस्ता तयार झाला. राज्यपाल दांपत्य आम्ही केलेल्या रस्त्यावरून सुखरूप संस्थेत आले. आमच्या ‘पराक्रमाला’ त्यांनीही भरघोस दाद दिली व ते परत गेले. या आमच्या श्रमदानाच्या प्रसंगाला सत्तर वर्षे झाली. पण आजही त्या रस्त्याने जाताना मन खूप सुखावते. या प्रयोगाने शरीरश्रमाची उपासना ही देखील ज्ञानोपासनेसारखीच एक पवित्र व मौल्यवान गोष्ट आहे हे लक्षात आले. मग शरीर श्रमाची लाज कशाला बाळगायची? उलट त्याचा अभिमान वाटावा हा सुंदर धडा आम्हाला मिळाला. संघटित प्रयत्नांची किंमत कळली. ‘ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही’ या सुभाषिताचा आनंददायी प्रत्यय आला. ढाळलेल्या घामाने नवनिर्मितीची ओळख झाली. श्रद्धेने केलेल्या सत्कर्माला सुयशाचे फळ लागतेच याची खात्री वाटली आणि त्या ध्रुवतार्‍यच्या दिशेने वाटचाल करायची प्रेरणा लाभली. आणखी काय हवे?      

 

 

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color