स्वागतकक्ष arrow सय arrow आत्म्याचा संदेश
आत्म्याचा संदेश पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

आत्म्याचा संदेश

वृत्तीने मी तशी फारशी धार्मिक वा आस्तिक नाही. पण अवाढ्व्य अशा या विश्वाचे नियंत्रण करणारी एक शाश्वत शक्ती अस्तित्वात आहे अशी मात्र माझी दृढ श्रद्धा आहे. ही शक्ती आणि मानवी आत्मा यांचा दृढ भावबंध आहे असे मला मनापासून वाटते. या भावबंधाचा एक अविस्मरणीय प्रत्यय मला योगायोगाने आला.

आमचे पप्पा गेले तेव्हाची ही आठवण आहे. पप्पा म्हणजे माझे चुलतआजोबा, उद्योगमहर्षि ती. लक्ष्मणराव किर्लोस्कर. एकोणीसशे छप्पन्न साली सव्वीस सप्टेंबरला ते गेले. त्याच्या आदल्याच दिवशी ते प्रभाकरकाकाला म्हणाले, ‘हे बघ प्रभाकर, पुण्यातल्या आपल्या सार्‍या किर्लोस्कर आणि संबंधित  मंडळींना मी उद्या सकाळी बोलावले आहे म्हणून सांग बरं! मला तुम्हा सर्वांशी काही बोलायचे आहे. तुम्हाला मला काही सांगयचं आहे.’

प्रभाकरकाकाने तशी व्यवस्थाही केली. पण आम्ही घरी जमण्यापूर्वीच पप्पा देवाघरी निघून गेले होते. त्या उद्यमयोग्याची चिरयात्रा आमच्या भेटीपूर्वीच सुरू झाल्याचे पाहून आम्हाला फार दुःख झाले. माझ्या मनात पुन्हा पुन्हा येऊ लागले, ‘काय सांगायचे असेल पप्पांना आपल्याला?’

आणि या प्रश्नाचे उत्तर अकस्मात एके दिवशी मला मिळाले. पप्पांच्या निर्वाणा नंतर त्यांचा पार्थिवदेह पुण्याहून मोटारने किर्लोस्करवाडीत आणण्यात आला. किर्लोस्करवाडीत - त्यांच्या कर्मभूमीत - त्यांचे दहन झाले. दहाव्या दिवशी पुढील संस्कारासाठी वाडीच्या स्मशानभूमीत आम्ही सर्व आप्त मंडळी जमलो. कारखान्यातील शेकडो कामगार आणि अनेक क्षेत्रातील नामवंत प्रतिष्टित मंडळीही जमली. आवश्यक ते मंत्र म्हणून उपाध्यायांनी अन्नोदकाचा पिंड केळीच्या पानावर ठेवला. आणि ज्या कावळ्यासाठी तो ठेवला होतात्यांची वाट पाहात आम्ही सारेजण बसलो. कारण पूर्वापार आपल्यापैकी अनेकांचा असा विश्वास असतो की, हा अन्नोदकच पिंड पक्ष्यांनी झटकन‌ उचलून नेला कि मृत व्यक्तीची इहलोकात काही आशा गुंतलेली नाही. आणि त्या व्यक्तीला आता निश्चित सद्गती लाभणार! पप्पांचे जीवित सर्वार्थाने कृतार्थ, तृप्त झालेले आम्ही पाहात होतोच. मग आता त्यांचे मन कशात गुंतणार? असा आपला अमचा समज. पिंड लवकरात लवकर नेला जाणार याची म्हणूनच आम्हाला पूर्ण खात्री. पण पाच मिनिटे झाली, दहा मिनिटे झाली. पक्ष्यांकडून काहीच हालचाल दिसेना. कावळे त्या अन्नोदकाच्या पिंडाभोवती जमत, नाचत आणि पुन्हा उडून जात. पिंडाला स्पर्श करण्याचे नावच नाही.

स्मशानभूमीत जमलेल्या लोकसमुदायात अनेक श्रद्धाळू, धार्मिक वृत्तीची माणसे बसलेली! जसजसा अधिकाधिक वेळ जाऊ लागला तसतशी त्यांची उत्कंठा वाढू लागली. अनेक शंकाकुशंकांनी ती मंडळी बेचैन होऊन आपापसात कुजबुजू लागली. उपाध्यायांनाही काय करावे ते समजेना. सार्‍या वातावरणात एक प्रकारचा ताण निर्माण झाला. शेवटी न राहवून आमच्यातील काही वृद्ध आप्तमंडळी उठली. समोरच्या पिंडाला त्यांनी वंदन केले. त्यांच्यापैकी एकजण म्हणाले, ‘पप्पा, शंतनु कारखान्याच्या कामासाठी परदेशात, अमेरिकेत गेला आहे, येईल तो सुखरूप परत. तुम्ही काही काळजी करू नका..’ तरीही शांतता. पक्ष्यांचा तोच असहकार कायम! 

दुसरे कोणी म्हणाले, "बेबी तिकडे आफ्रिकेत आहे. तिचीही काळजी करू नका. आम्ही सर्व तिला सदैव जपू."

तरीही परिस्थितीत काही बदल नाही. कोणी काही कोणी काही म्हटले, असे करीत सुमारे तासभर गेला. शेवटी शंकरभाऊ - माझे वडील उठले आणि उपाध्यायांजवळ जाऊन म्हणाले, "हे पाहा गुरुजी, काकांचा असल्या कर्मकांडांवर कधी विश्वास नव्हता. तेव्हा आता शेकडो मंडळींना किती वेळ ताटकळत बसवायचे? त्यापेक्षा तुमच्या पद्धतीने दर्भाचा कावळा की काय तो करून पुढील क्रिया संपवून टाका ना".

उपाध्याय काहीशा आर्जवाने शंकरभाऊंना म्हणाले, "भाऊ, ‘मालकां’वर (पप्पांना वाडीतील कामगार ‘मालक’ म्हणत) तुम्ही आपल्या वडिलांसारखेच प्रेम केलेत. त्यांची सेवा केलीत. त्यांच्याजवळ तुम्ही लहानाचे मोठे झालात. त्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे तुमच्यावर माया केली. म्हणून म्हणतो, आपण दोन शब्द पाहाना बोलून."

शंकरभाऊ पटकन्‌ पुढे झाले. गुरुजींचा शब्द त्यांना मोडवेना. अत्यंत भक्तिभावाने त्यांनी पिंडाला नमस्कार केला. अपत्यनिर्विशेष अशी माया आपल्यावर करणार्‍या आपल्या काकांच्या आठवणींनी ते एकदम सद्‌गदित झाले, (त्यांचा परस्परांवरील लोभ खरोखरीच अपूर्व होता.) पण आपण एका जबाबदार संस्थेचे मालक आहोत, आपणच असे भावनावश जालो तर सार्‍यांच्याच मनाचा बांध फुटेल. हे बहुधा जाणून त्यांनी आपले मन आवरले. अन्‌ रुद्ध कंठाने ते म्हणाले, "काका, मी शंकर बोलतोय तुमचा. काका कारखान्याची कसलीही काळजी तुम्ही करू नका. माझ्या जिवात जीव आहे तोपर्यंत...." पण शंकरभाऊंचे वाक्य पुरे होण्यापूर्वीच कावळ्यांचा एक घोळका भर्रर्रदिशी झाडावरून खाली आला अन्‌ पाहता पाहता त्यांनी तो पिंड उचलूनही नेला. शेकडो लोकांच्या समक्ष घडलेली ही सत्यकथा आहे! सार्‍यांचे डोळे पाणावले आणि अभिमानानेही चमकले,  कारण या उद्यमतपस्व्याच्या अहर्निश चिंतनाचा विषय एकच होता तो म्हणजे आपला कारखाना. त्याचा विकास-त्याची समृद्धी आणि या सर्वांमुळे वाढणारे भारताचे वैभव!

अवाक्‌ होऊन मीही हा सारा प्रसंग पाहात होते. मग मला आठवले, प्रभाकरकाका सांगत होता, अगदी अलीकडेच म्हण्जे मृत्यूपूर्वी थोडे दिवसच माझे पप्पा म्हणाले होते, " हे बघा, आपल्या किर्लोस्कर कुटुंबातील तुम्ही सगळेजणच अत्यंत प्रेमाने वागा. कारखान्याला कधी विसरू नका. कारखाना हाच आपला देव समजून कामाला प्रारंभ करण्यापूर्वी त्याला नमस्कार करीत जा."

पप्पांचा पार्थिव देह अग्निनारायणाच्या स्वाधीन कधीच होऊन गेला होता, पण त्यांचा अपार्थिव देह-त्यांचा आत्मा-या संदेशाने अमर झाला आहे. याचाच हा साक्षात्कार नव्हे का? आपल्या निर्वाणाच्या दिवशी पप्पांना यापेक्षा दुसरे काय सांगायचे असणार आम्हाला?                          

 

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color