स्वागतकक्ष arrow सय arrow माझे कांही ख्रिश्चन सुहृद
माझे कांही ख्रिश्चन सुहृद पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

मिरजेच्या ख्रिश्चन मिशन हॉस्पिटलशी आमच्या किर्लोस्करवाडीचा ऋणानुबंध फार वर्षाचा आहे. कारण आमच्या  कारखान्यात व वसाहतीत कुणालाही गंभीर दुखणे झाले की उपचारासाठी त्याला इथेच आणले जाते. इथले सेवाभावी व निष्णात डॉ. व्हेल व डॉ. वानलेस यांची नावे तर मी अगदी लहानपणापासून कितीतरी वेळा ऎकलेली आहेत. पण ख्रिस्ती बाईंना मी प्रथम पाहिले ते आमच्या सोलापूरच्या शाळेत. मी किंडरगार्डनमध्ये असताना! मला आता नीट आठवत नाही पण वाटते की त्यांचे नाव ’कृपा’ बाई होते. स्वभाव तर शंभरटक्के त्या नावाला शोभणारा असा मायाळू-कृपाळू! त्या नऊवारी लुगडे  पांचवारीसारखे नेसत नि लांब हाताचे पोलके नेहमी घालत. आपल्या दाट लांब केसांचा त्या सुरेख आंबाडा बांधत. त्यांना गर्द रंग जास्त आवडत असत. त्यांचे कुंकुम विरहित कपाळ, कानाला थोडी वेगळी पण मधुर वाटणारी त्यांची मराठी भाषा ही आजही मला अगदी ताजेपणाने आठवतात.

मला ख्रिश्र्चन मैत्रीण भेटली ती मी १९४२ साली ’विलिंग्डन’ महाविद्यालयात शिकायला आले तेव्हा. तीही वसतिगृहातच राहण्यासाठी आली होती. ती वर्णाने सावळी पण हसरी आणि मोहक होती. अंगाने मात्र अगदी कृश! तिचे अक्षर फार छान होते, ती सुंदर चित्रं काढी आणि मराठी निबंध लिहिण्यात तर तिचा हातखंडाच होता! तिचे प्रत्येक काम कमालीचे स्वच्छ आणि टापटिपीचे असायचे. ती बोलायची हळू, मृदु आवाजात, त्यामुळे तिची माझी जी गट्टी जमली ती अगदी आजतागायत कायम आहे. तिचे नांव होते ज्यूलिया चव्हाण, तीच पुढे नामवंत धन्वंतरी डॉ. मनोहर रणभिसे यांची पत्नी झाली. ज्यूलियाशी माझ्या असलेल्या दृढ मैत्रीमुळे मला ते सारे कुटुंबच आप्तवत् वाटू लागले. डॉ. साहेबांनी पन्नासवर्षे अचूक औषधोपचार करुन मला अनेकवेळा जीवदान दिले, त्याबद्दल वाटणारी कृतज्ञता कशी व्यक्त करता येणार शब्दात? ’रुग्णांना देव’ मानून काम करणारा अखंड आणि निस्सीम अशी श्रद्धा येशू ख्रिस्तावर ठेवणारा ध्येयवादी डॉक्टर त्यांच्यामध्ये मला पहायला मिळाला. गायन, वादन, अभिनय या कलात डॉ. साहेबांना उत्तम गती होती. त्यांचे वक्तृत्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे होते. आपल्या मधुरवाणीने त्यांनी फार मोठा लोकसंग्रह केला होता. पण ध्यानीमनी नसताना अर्धांगाचा झटका त्यांना आला व ते विकलांग झाले. तरीही रुग्णांचा हट्ट म्हणून तशाही स्थितीत त्यांनी रुग्णांना तपासले. पैशांसाठी तर कधीच कुणाला आडवले नाही, उलट हजारो रुग्णांना फुकट तपासले. आपल्या व्यवसायाच्या प्रारंभापासून आपल्या मिळकतीचा ठराविक वाटा गोरगरिबांच्यासाठी व चर्चच्या कामासाठी अव्याहतपणे दिला. त्यांच्या ’ख्रिस्त सदनात’ मी काही वर्षे जागा घेऊन रहात असे. तिथे मी एकदा माझ्या जागेत सत्यनारायणाची पूजा केली, पण त्याबद्दल त्यांनी कधीही अनुदार उद्गार काढले नाहीत. ही त्यांची परमत-सहिष्णुता मला खूप काही शिकवून गेली. त्यांना मी नारळी पौर्णिमेला ’राखी’ बांधत असे. कारण ज्यूलियाप्रमाणेच तेही सख्ख्या भावाच्या इतक्या आपुलकीने सर्व सुखदुःखात मला धीर देत असत. प्रार्थनेने मनाला किती शांतता व समाधान लाभते हे त्यांच्या घरात दिवसाकाठी तीन-चार वेळा होणार्‍या प्रार्थनेमधून अधिक चांगल्या रीतीने शिकता आले. विकलांग परिस्थितीतही ते येशूच्या जीवनावरील एका पुस्तकाचे भाषांतर करण्यात गढले होते. विश्रामबागवासीयांना त्यांचा फार मोठा आधार होता. त्यांच्या अंत्ययात्रेला सर्व धर्मांची मंडळी जमली, ती त्यांच्या जाण्याने आपला आप्त-मार्गदर्शक गेला या दुःखाने! कवि कलावंतांप्रमाणेच असा जातिवंत धन्वतरीही जन्मजातच असावा लागतो. आमच्या ज्यूलियाने त्यांना फार चांगली साथ दिली! आज त्यांचा मुलगा चि. डॉ. अविनाशकुमार ’मिशन’ मध्येच मोठा अधिकारी आहे. आपल्या आईवडिलांच्या हुशारीचा, सद्गुणांचा, कर्तव्यबुद्धीचा, सेवा परायणतेचा आणि सश्रद्धवृत्तीचा वारसा तो द्विगुणित करतो आहे याचा मला फार संतोष व अभिमान वाटतो. रणभिसे कुटुंबीयांमुळेच डॉ. व सौ. फ़्लेचर, डॉ. आनंदराव व माणिकताई गायकवाड अशा अत्यंत ख्यातनाम डॉ. कुटुंबांशी माझा परिचय झाला. ती सुसंस्कृत व सदभिरुचिसंपन्न मंडळी अखंड कामात असत. केवळ निष्णात धन्वंतरी म्हणूनच नव्हे तर उत्तम समाजसेवक म्हणूनही या कुटुंबांना समाजांत मोठीच मानमान्यता होती. डॉ. व सौ.  फ्लेचर इथला मुक्काम संपवून त्यांच्या देशाला परत गेले तेव्हा मी त्यांना माझ्या घरी चहाफराळास बोलाविले होते. अनेक व्याप मागे असताही ती दोघे माझ्या घरी आली, मनमोकळेपणाने बोलली, हसली, याचा मला फार आनंद वाटला. अशी निगर्वी माणसे किती भेटतात आपल्याला जीवनात? रणभिसे कुटुंबाप्रमाणेच ज्यूलियाचे माहेरचे ’चव्हाण’ कुटुंबही माझ्याशी आपुलकीने वागत असे. ज्यूलिया आपल्या वडिलांना ’बाप्पा’ म्हणत असे. मलाही ते पितृवत् वाटत. त्यांच्या इतका कष्टाळू देवमाणूस मला क्वचितच पुन्हा पहायला मिळेल. ऐन तारुण्यांत त्यांना विधूर व्हावे लागले. ज्यूलियाला सावत्र आईचा जाच होऊ नये म्हणून ते आयुष्यभर एकटे राहिले. आपली शिक्षकाची नोकरी संपवून सेवानिवृत्त झाल्यावर ते ज्यूलियाकडेच अखेरपर्यंत राहिले. रणभिसे दांपत्य त्यांना फार मानाने वागवी. त्यांचे निष्कलंक चारित्र्य, सततोद्योग, आणि अतिशय शांत स्वभाव व मृदु बोलणे यामुळे त्यांच्याविषयी मला फार आदर वाटे. कुठलेही काम त्यांनी कधी कमीपणाचे मानले नाही. स्वस्थतेने कधीच बसले नाहीत. कधी बघावे तेव्हा डॉ. च्या दवाखान्याचा हिशोब सुंदर अक्षरांत लिहितांना ते दिसायचे नाहीतर कपड्यांना इस्त्री करायचे, कधी कपडे वाळत घालू लागायचे तर कधी ज्यूलियाला कोथिंबीर, पालेभाजी निवडायलाही लागायचे! आपला कसलाही भार त्यांनी कोणावर कधी टाकला नाही. वृद्धावस्थेत माणसाने कसे जगावे-रहावे हे त्यांच्याकडून शिकावे, इतके त्यांचे वागणे नमुनेदार असायचे. चर्चला जायचे असो की कुणाच्या मंगल कार्याला जायचे असो, सर्वांच्या आधी ते तयार होऊन बसायचे! किडकिडीत, उंच, नितांत करुणाबुद्धीने जगणारी त्यांची प्रेमळ मूर्ती पुन्हा आता कधी दिसणार नाही, ज्यूलियाला अतिव प्रेमाने मारलेली त्यांची ’बाऽ‌ऽळ’ अशी हांक पुन्हा ऐकायला मिळणार नाही या जाणिवेने माझे मन व्याकुळते.

ज्यूलियाचे चुलतभाऊ मधुराव चव्हाण हे डॉक्टर साहेबांचे उत्तम सहाय्यक! विश्र्वासू आप्त! त्यांचेही अक्षर देखणे. डॉक्टरसाहेबांच्या तालमीत मधुराव चांगले तयार झाले. ते निर्दोष असा ’क्ष किरण’ फोटो काढत. डॉ. साहेबांच्या हातासारखाच त्यांचा हात इंजेक्षनला अगदी हलका असे. त्यामुळे त्या दोघांनी दिलेली इंजेक्शने कधीच दुखली नाहीत. ज्यूलियाचे मामा श्री. चोपडे हे रत्नागिरीला असतात. विद्यार्थ्यांचे फार आवडते शिक्षक असा त्यांचा मोठाच लौकिक आहे. वय असेल नव्वदीच्या घरात, पण मुलाबाळांचा त्यांच्याकडे येण्याचा आग्रह असूनही ते एकटे राहतात. देशावर आले म्हणजे ज्यूलियासाठी जे आणतील तेच ते माझ्यासाठीही न विसरता आणणार! मग ते काजू किंवा फणसपोळी असो नाहीतर मोरी धुवायचा खराटा असो! अशा या ’कोकण-स्था’ ला चिक्कू कोण म्हणेल?

या कुटुंबवत् आप्तांप्रमाणे मला आज डॉ. अरवटगी यांचीही तीव्रतेने आठवण येते. त्यांचे धिप्पाड, देखणे, करारी, तेवढेच तापट असे व्यक्तित्व पाहणार्‍याचे लक्ष वेधून घेई. १९४९ मधली गोष्ट! माझ्या मोठया भावाचे मुकुंदाचे अपेंडिसायटीसचे ऑपरेशन त्यांनी केले. उत्तम केले उद्या किर्लोस्करवाडीला आम्ही परत जाणार तर मुकुंदाच्या पोटांत उजव्या बाजूला फार दुखू लागले. पुनः वेगळे ऑपरेशन करावे लागले. त्यांत बरीच गुंतागुंत होती. लाखात एखाद्यालाच वाट्याला येणारे असे ते ऑपरेशन ठरले! आठ दहा महिने आम्हांला दवाखान्यात रहावे लागले. डॉ. अरवटगींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांच्या पत्नी आम्हाला सांगत, "माझा नवरा रोज प्रभु येशूची प्रार्थना करतो, म्हणतो "काहीही कर पण या तरुण कुटुंबवत्सल मुलाला वाचव. माझ्या हाताला यश दे." त्यांच्या हाताला यश आले. तो माझा भाऊ आता पंचाहत्तर वर्षांचा आहे. डॉ. अरवटगींच्या स्मृतीस माझे कृतज्ञतापूर्वक अभिवादन! गेल्या काही वर्षांत आणखी एका भल्या माणसाशी माझा ऋणानुबंध निर्माण झाला आहे. ते म्हणजे सांगलीच्या मिशनच्या कंपाऊंडमध्ये राहणारे श्री. डी. जी. वाघमारेसाहेब! ते व्यवसायाने उत्तम कारपेंटर आहेत, रणभिसे व चव्हाण कुटुंबाशी त्यांचा चांगला परिचय! मी विश्रामबागला माझी चिमुकली बंगली बांधली व सेवा निवृत्तीनंतर तिथेच आता राहते आहे. मग कधी फर्निचरच्या दुरुस्तीचा प्रश्न येतो, कधी कपाटाची दुरुस्ती निघते, अशावेळी वाघमारेसाहेब या सर्व अडचणींतून रस्ता काढणारच! ते आपण स्वतः टेपने मापे घेणार, कागदावर चित्र काढणार, आपल्या विद्यार्थ्यांनाही आवश्यक तेव्हा घेऊन येणार, कामात अत्यल्प चूक झालेली त्यांना खपणार नाही. १०० टक्के मनासारखे काम होईपर्यंत त्यांना स्वस्थताच वाटत नाही. कामातली एकाग्रता व कुशलता, टापटिपीचा व्यवस्थित पोशाख व सदैव मदतीला तयारी ही त्यांच्या स्वाभावाची वैशिष्ट्ये! त्यांच्या कन्या सौ. सुधाताई चोपडे व त्यांच्या मुली प्रसन्न वृत्तीच्या व बुध्दिमान आहेत. त्यांच्याकडे वाघमारेसाहेब आले म्हणजे ’बराय ना?’ म्हणून आपलेपणाने माझी चौकशी करतात. हो, या सर्व गर्दीत आमच्या प्रा. स्वामीदासन् या ख्रिश्चन प्राध्यापकांबद्दल लिहायचे राहूनच गेले. सर अतिशय कृष्णवर्णाचे होते. उंच, काटकुळे तोंडात सदैव सिगारेट असायची! पण हुशार फार! वयाच्या एकविसाव्यावर्षी ते एम्.ए.एल्.एल्.बी. झालेले. लॉजिक छान शिकवायचे. ते विलिंग्डनमध्ये एकच वर्ष होते. जाताना आमच्या वर्गाला त्यांनी निरोपाचा चहाफराळ तर दिलाच पण आम्हां विद्यार्थिनींना निशिगंधाच्या वेण्याही दिल्या! असे मोठे रसिक होते.

ज्यांच्या प्रसादपूर्ण व मधुर पदांनी व कवितांनी मला विद्यार्थी दशेपासून फार मोहविले त्या कवि रेव्हरंड ना. वा. टिळकांचेही मला आज स्मरण करावेसे वाटते. त्यांच्या पत्नी श्री. लक्ष्मीबाई यांचे ’स्मृतिचित्रे’ हे आत्मचरित्र अव्याज मनोहर आहे. मराठी भाषेचे ते एक अम्लान सुंदर असे लेणे आहे. त्या उभयतांनाही पाहण्याचा योग मला लाभला नाही पण त्यांना मी माझे वाड्मयीन आप्तच मानते. त्यांचे चिरंजीव देवदत्त टिळक हे माझ्या वडिलांचे स्नेही होते. नाशिकला त्यांना मी आवर्जून भेटले तेव्हा ते म्हणाले, "तुम्ही माझ्या मित्राची मुलगी! तुम्हांला काय भेट देऊ मी?" मी म्हटले, "मला आपल्या वडिलांच्या हस्ताक्षरांतली एक कविता मिळाली तर फार बरे होईल." त्यांनी ती आनंदाने व तत्परतेने दिली. देवदत्तांच्या कन्या प्रा. मीराबाई भागवत आपला कौटुंबिक वाड्मयीन वारसा पुढे चालवीत आहेत. बाई व मी चांगल्या मैत्रिणी आहोत. मीराबाई म्हणजे निर्मळ आनंदाचा निखळ झरा. हुशार, कल्पक आणि शिस्तप्रिय! मला भेटलेली ही काही ख्रिश्चन व्यक्तिमत्वे! गुणी व लक्षांत राहणारी!

ख्रिश्चन समाजाचा मला फारसा परिचय नाही, पण ज्यूलिया व डॊ. रणभिसे यांच्याबरोबर पांच-दहा वेळा मीही चर्चमध्ये गेलेली आहे. ख्रिश्चनांची स्मशानभूमीही मी पाहिली आहे. या सर्व ठिकाणी ख्रिश्चन समाज करीत असलेली प्रार्थना माझ्या मनात कायम घर करुन राहिली आहे. चर्चमध्ये प्रार्थनेच्यावेळी सर्व स्त्रिया गरीब श्रीमंत, आबालवृध्द डोक्यावरुन पदर घेतात, पुरुषांप्रमाणे डोळे मिटून एकाग्रतेने व सुरेलपणे प्रार्थना गीते म्हणतात. तो भक्तिभाव, चर्चमधली ती शांतता व शिस्त मला अंतर्मुख करते. विवाहप्रसंगी धर्मगुरु करीत असलेले वाचन, भोवतालचे गांभीर्य, ऑर्गनवर वाजणार्‍या सुरावटी मनाला फार सुखावतात. मृत व्यक्तीला निरोप देणारी घंटा फार सूचक आणि बोधक वाटते. माणसामाणसातला भेद हा कृत्रिम आहे. प्रभूच्याद्वारी आपण सारे एक आहोत ही उत्कट भावना ती घंटा माझ्या मनात जागी ठेवते.

मला भेटलेली ख्रिश्चन माणसे व मी प्रसंगवशात् पाहिलेला ख्रिश्चन समाज यांच्यात काही समान स्वभाव वैशिष्ट्ये मला आढळली. ती अशी की ही दोघेहिजण येशूवर पराकाष्ठेचा विश्वास, श्रध्दा ठेवणारी आहेत. मृदुवाणीची व सुसंस्कृत शिष्टाचार अगत्याने पाळणारी आहेत. स्वभावतः शांत, आपली उपजीविका यथोचितपणे करतांना समाजाच्या कल्याणासाठी, विकासासाठी धडपडणारी आहेत.

करुणा-प्रेम-शांति यांचा मौल्यवान संदेश देणार्‍या येशू ख्रिस्ताचे एक अतिशय हृद्य व भावपूर्ण सुंदर चित्र मला आमच्या ज्यूलियाने दिले आहे. माझ्या घरारांत मी ते लावतेही. तिने सुंदर चित्र काढून एक बायबलचे पुस्तकही मला भेट दिले आहे. येशूची अनेक सु-वचने मी वाचली आहेत. त्यांतले एक सुवचन मला जीवनभर मार्ग दाखवीत आलेले आहे. ते असे - "हे देवा, जेथे आमचे चुकत असेल तेथे आमच्यात बदल होण्याची वृत्ती निर्माण कर, आणि जेथे आमचे बरोबर असेल तेथे इतरांबरोबर जीवन कंठणे सुलभ कर."

आपल्या ख्रिश्चन चर्चच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त आपणां सर्वांचे मी अभिनंदन करते आणि प्रभु येशू ख्रिस्तांनाही अभिवादन करते कारण माझी अशी श्रध्दा आहे की जगातील सत्पुरुष ही कोणा एका धर्माची, जातीची संपत्ती नसून ती आखिल मानवजातीची संपत्ती आहे.

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color