स्वागतकक्ष arrow सय arrow जगावेगळी मैत्रीण
जगावेगळी मैत्रीण पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

डॉक्टर म्हणतात, हा बहुधा पाठीच्या कण्याचा कॅन्सर असावा. कोणी का असेना बापडा ! पण मालती मधुमेहाने मुक्काम केलेल्या या ‘गोड’ शरीरांत आता एक नवा पाहुणा राहायला येणारसं दिसतं. त्या पाहुण्याची वेळींच हकालपट्टी केली म्हणजे बरं, म्हणून मी मुंबईस जात आहे... तू उगाच काळजी करशील म्हणून इतके कळवलं नव्हत... तूं मात्र प्रकृतीस जपून अस तुझ्या, - माझ्या मैत्रिणीच्या- सौ. सुमित्राबाईच्या पत्राचा हा उत्तरार्ध होता.  यथेच्छ जेवण झाल्यानंतर जितक्या सहजपणें एखाद्या स्नेह्याने "बरं आहे, येतो मंडळी"  असे म्हणून आपला निरोप घ्यावा ना, तसं मला त्यांचे शब्द वाचून वाटले. पत्र वाचून मी दिड्गमूढच झाले. ‘कॅन्सर’, ‘कॅन्सर’ ही अक्षरे अतिशय वेगवान गतीने माझ्या मस्तकात गरगर, गरगर फिरु लागलीं.

सुमित्राबाईंचा नि माझा स्नेह आज उण्यापुर्‍या वीस वर्षाचा तरी सहजच आहे. त्या स्नेहाची टवटवी अन्‌ सुगंध कधीच मावळला नाही. मग तुम्ही म्हणाल, "तुम्ही त्याना अजून ‘अहो’ कसे म्हणता हो?  त्याला स्पेशल असे. काहीच कारण नाही. त्यांच्या वागण्याचा सारा ठसका अन्‌ रुबाबच असा आहे की, मोठ्या लाडाने ‘ए सुमित्रा’  म्हणायला कसली धजावते मी? "सुमित्राबाई ऽ अहो,  सुमित्राबाई," करीतच मी गेली इतकी वर्षे त्यांच्या घरी जाते आहे.

माझ्यापेक्षा वयाने नाहीत फारशा मोठ्या त्या, पण त्यांचा सारा पोशाखाचा, बोलण्यावागण्याचा वाण बराच पोक्तपणाचा नि बाळबोध. स्वभाव अगदी रोखठोक, उघडा-वाघडा. सरळसोट. पण अतिशय निर्मळ. इतका, की त्या आम्हा मैत्रिणींवर करीत असलेले ‘बॉसिंग’ देखील आम्हाला मनापासून आवडते.

स्टेजवर येण्याचे पहिले धाडस

मी विलिग्डन कॉलेजात इंटरच्या वर्गात शिकत होते तेंव्हा एका गमतीदार प्रसंगानेच त्याची व माझी ओळख झाली. तो प्रसंग आठवूनसुद्धा आज मला खो खो हसायला येते. झाली काय मजा-दरवर्षीप्रमाणे त्या वेळीही मिश्र पात्रांचे एक नाटक गॅदरिंगमध्ये विद्यार्थिनींनी बसवले होते. पुरुषांच्या भूमिकाही त्याच करीत होत्या. नाटक सुरु झाले. पहिले दोन प्रवेश ठीकपणे पार पडले. नव्या प्रवेशासाठी पडदा वर गेला आणि एका विद्यार्थिनीने रंगभूमीवर प्रवेश केला. ती आपल्या भाषणाला प्रारंभ करते न करते तोच विद्यार्थ्यांनी एकदमच टाळ्याहशाचा असा काही गडबडाट की केला सांगून सोय नाही. शिट्ट्यांची, कागदी विमान व बाणांची रासच स्टेजवर येऊन पडली. गडद गुलाबी रंगाची पांचवारी साडी, त्यावर लालभडक ब्लाऊज घालून तोंडाला भरपूर  रंगसफेती केलेली, लिप्‌स्टिक लावलेली ‘साधना’ (तिचे नाटकातले नाव) समोर उभी होती. तिच्या पाठीवर दोन वेण्या रुळत होत्या. सोनेरी काडीचा एक नाजूक चष्मा डोळ्याला लावून हातातली ‘पर्स’ ती मागेपुढे करीत उभी होती ! तिच्या त्या ‘सोंगा’ कडे पाहून मुलांना पुनःपुन्हा हशाची उकळी येत होती.

माझ्या शेजारी कॉलेजातल्या पहिल्या वर्षातली वासंती वैद्य बसली होती. तिला मी म्हटले, "काय गडबड आहे ग तुझ्या वर्गातल्या पोरांची ही?" त्यावर तिने जी हकिकत सांगितली ती ऐकण्यासारखीच होती. "अग, या किनई आमच्या वर्गातल्या आगरकरबाई. आमच्या वर्गातली मुलं यांना म्हणतात ‘काकू’. त्यांचा रंग आहे अस्सल दक्षिण हिंदुस्थानी. स्वारी वामनमूर्ति कशी आहे ते तू पाहतेसच आहेस. शरीरप्रकृति चांगली ठणठणीत आहे. रोज नऊवारी लुगडं नेसून येतात हं या कॉलेजला. पण रंग तपकिरी नाहीतर उदी असतो त्याचा. त्यावर प्रिंटेड चिटाचं पोलकं असतं. डोळ्यांना लावलेला चष्मा म्हणजे पुराणवस्तु संशोधन खात्यातलाच असावसं वाटतं, लिंबाएवढ्या आंबाड्याला ‘सप्लिमेंट’ करणारं गंगावन त्या निःसंकोचपणे लावणार आणि सांगलीतून चालत यायचं असो की गाडीनं यायचं असो, पुरुषांची, भल्या रुंद तोंडाची, घोळाची, मजबूत मुठीची छत्री घेऊन हिरव्या गडद रंगाच्या चपला घालून या डुलतडुलत कॉलेजला येणार. वस्तूंच्या सौदर्यापेक्षा त्यांच्या उपयुक्त्तेवरच याचा भर दिसतो"- तिने केलेल्या या वर्णनाने मौज वाटून मीही मुलांच्या हसण्यात सामील झाले-

अडचणीत वेळ मारुन नेईन

"काय साधना, एवढा थाटमाट करुन निघली आहे कुठं तुझी स्वारी?" लतिकेने तिला विचारलें, उत्तराच्या अपेक्षेने प्रेक्षक साधनेकडे पाहू लागले, पण उत्तर देण्याचे कांही तिला साधेना आणि कावर्‍याबावर्‍या नजरेने ती लागली विंगकडे पाहायला. प्रेक्षकांना ऐकू येऊ लागले ते प्रॉम्पटरचे भाषण-बसक्या, घोगर्‍या, पुरुषी आवाजातले. पुन्हा एकवार हशाटाळ्यांना ऊत आला. सार्‍या संकटातून स्वतःला बचावण्यासाठी साधना सारवासारव करायला गेली आणि पुढच्या प्रवेशातले भलतेच भाषण तिने या ठिकाणी म्हटले, बिचारी लतिका मग फारच भांबावली आणि आपली ही चूक लक्षात येताच ‘साधने’ने  हीऽ लांबलचक जीभ बाहेर काढली -

मग मुलांनी काय केले असेल ते वेगळे कशाला सांगूं? सगळ्या नाटकातली दहापंधरा वाक्ये असलेली आपली भूमिका सुमित्राबाईंनी या रीतीने पार पाडली. पण या सार्‍या प्रसंगाने सुमित्राबाईंबद्दल एक प्रकारचे कुतूहल, ओढ माझ्या मनांत निर्माण झाली आणि त्यांची ओळख करुन घ्यायला म्हणून मी जेव्हा त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांच्या सरळ बोलण्यावागण्याने आमची गट्टीच जमली, नाटकाच्या ‘त्या प्रसंगाचा’ मी उल्लेख करताच स्वतःची फजिती आठवून हसत त्या म्हणाल्या, "मुलींच्यातली एक पार्टी पडली ऐनवेळी आजारी, अन्‌ सेक्रेटरी बसली कपाळाला हात लावून! मला त्यांची अडचण समजताच मी होऊन गेले त्यांच्याकडे आणि त्यांना म्हटलं, "मी नाही कधीसुध्दा नाटकांत काम केलेलं, पण या तुमच्या अडचणीत वेळ मारुन नेईन कशीतरी, अगदी नाउमेद होऊ नका ग तुम्ही"- मग दोन दिवस होईल तेवढे पाठांतर करुन सर्वस्वी अभिनव पोषाख करुन राहिल्या की बाई स्टेजवर उभ्या!  बालवयांत विधवा झालेली वीसएक वर्षाची ही मुलगी, पण प्रौढ गृहिणीला शोभेलशा जबाबदारीने निर्भयपणे हिने काम अंगावर घ्यावे, इतरांना धीर द्यावा,- ही सगळीच गोष्ट मला सहज न पाहायला मिळणार्‍या भलेपणाचीच वाटली.

वाईच्या एका सुसंस्कृत, विद्याप्रेमी, मध्यमवर्गीय, जुन्या वळणाच्या घरात यांचे बालपण गेले. लहानपणीच वडिलांचे छत्र दुरावले, पण यांची आई मोठी कर्तबगार व समंजस बाई. आलेल्या प्रसंगाला तोंड देऊन आपल्या मुलांचे व या एकुलत्या एक मुलीचे तिने मोठ्या काळजीपूर्वक संगोपन केले. त्या काळाप्रमाणे इंग्रजी चारपांच इयत्ता होतांच मुंबईच्या एका शाळा शिक्षकाशी सुमित्राबाईंचा विवाह झाला. पण संसारसुख त्यांच्या नशिबी नव्हते. चारसहा महिन्यात माहेरी आल्या त्या तेथेच राहिल्या. पण मुळूमुळू रडत नाही बसल्या या. "तुझा पाचवा मुलगाच आहे असे समज" असे सांगून यांनी आईला धीर दिला आणि दीड महिन्यातच लोकापवादाची बूज न बाळगता, आपल्या शिक्षणाचे अपुरे राहिलेले सूत्र हाती घेतलेले, घरात पडेल ते काम अंग मोडून करावे, रात्री पहाटे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचावे, लिहावे आणि जमेल त्या तासाला शाळेत पोहोचावे असा प्रवास करीत त्यांची गाडी कॉलेजपर्यंत आली होती -

जीवनात धीटपणा हवाच !

लेडीज असोसिएशन नावाची, मुलीना इंग्रजीतून बोलण्याची सवय व्हावी म्हणून एक संस्था आम्ही काही मैत्रिणींनी कॉलेजात सुरु केली होती. सेक्रेटरीचे काम त्यांनी घातले माझ्या गळ्यात, त्याच्या उद्‌घटनाच्या समारंभाच्या दिवशी परिसंवादाचा विषय ठेवला होता, “Hindu Society should introduce easy divorce- "कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने कार्यक्रमाला हजर होते. मुली आणि इंग्रजीत बोलणार मग मुलांना चेष्टा करायला पर्वणीच होती ती! कार्यक्रमाला प्रारंभ झाला. कार्यक्रमात भाग घेणार्‍या मुली होत्या तिघीचौघीच. त्याही विनंत्या, आर्जवे पुष्कळ केल्यावर, मी अबोल्याच्या धमक्या दिल्यावर मेटाकुटीने तयार झालेल्या. बाचकत बिचकत व्यासपीठावर येऊन, प्रथम लटपट लटपट करीत अन्‌ शेवटी एखादे वाक्य जरा धीराने वाचीत त्या भाषणे करुन म्हणजे ‘वाचून’ गेल्या, अध्यक्षांनी शिष्टाचार म्हणून नंतर विचारले, "आणखी कोणाला बोलायचे आहे का?"आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, "Yes Sir"  असे म्हणून सुमित्राबाई उभ्या राहिल्या की! गॅदरिंगचा प्रसंग नुकताच झालेला असल्याने त्यांना पाहताच सगळीचजणं हळूहळू आवाजात आपापसात कुजबुजू लागली, गालातल्या गालात हसू लागली - मलाही मोठा पेचच पडला आता काय होणार म्हणून ! तेवढ्यात नऊवारी लुगड्याचा घोळ सावरीत सुमित्राबाई उभ्या राहिल्या व्यासपीठावर. आणि, "Ladies and gentlemen " असे खणखणीत आवाजात म्हणून त्यांनी केली की भाषणाला सुरुवात ! सुरुवातीचा काही वेळ पाठांतराने त्यांना चांगला हात दिला आणि  मग  ‘अ – अ’  करीत त्यांची गाडी जी थांबली ती कांही केल्या सुरुच होईना. मुलांना निमित्तच हवे होते. त्यांनी घेतले सभागृह स्टॅपिंग करुन डोक्यावर. पण तिकडे संपूर्ण दुर्लक्ष करुन लुगड्याच्या निर्‍यात खोचलेले, पेन्सिलीने पुसटपुसट लिहिलेलं भाषण, सर्वांसमक्ष त्यांनी बाहेर काढले व वाचायला प्रारंभ केला. कागद गेला होता चुरगळून मरगळून. हवा तो मजकूर काही त्यांना सापडेना, मग, "As Mill in his book says"  म्हणत अडखळत अडखळत, त्या Mill  च्या क्रियापदाला एस्‌ प्रत्यय न लावता, त्याचा काळ न पाहता त्यांनी दिले ठोकून जे वाक्य सुचले ते. अन्‌ बसल्या लगबगीने आपल्या जागेवर जाऊन. समारोपाच्या भाषणात अध्यक्षांनी त्यांच्या प्रयत्नाचा खास गौरव केला.

आयुष्यांत आलेली संधि दवडू नये.

"माझ्यापासून हा ‘प्लॅन’ का लपवलात?" असे मी विचारल्यावर न लाजता त्या म्हणाल्या, "म्हटलं, तेवढीच होईल इंग्रजीची प्रॅक्टिस लिहायची अन्‌ बोलायची. वाजली तर वाजली, नाहीतर खाऊन टाकली गाजराची पुंगी!" तेव्हा मला उलगडा झाला आठवडाभर ह्या लायब्ररीत कशासाठी ठिय्या देऊन बसल्या होत्या त्याचा! जीवनाचा आनंद, रस मोकळेपणाने लुटण्याच्या त्यांच्या निरोगी प्रवृत्तीचे मला भारी कौतुक वाटले. अन्‌ मनाच्या एका कोपर्‍यात क्षणभर थोडा हेवाही वाटला. उगीच कशाला नाकारू!

त्या दिवशी सभा संपल्यावर आग्रहा-आग्रहाने त्यांनी, जुन्या सांगलीतल्या आपल्या घरी मला नेले, मी वसतिगृहात राहात असल्याने त्यांच्याकडे जाणे क्वचित्‌ घडे.  त्यांचे घर गाठेपर्यंत किती बोळ आणि गल्ल्या मला ओलांडायला लागल्या कोण जाणे!

"असल्या आंबट-कोंदट जागेत, मातीच्या घरांत राहायचा कंटाळा येत असेल तुम्हांला, नाही?" मी सहज प्रश्न केला. "अगं! असते कुठं जास्त वेळ मी इथं? दिवसभर कॉलेजच्या मोकळ्या हवेत अन्‌ तुमच्या प्रफुल्ल करणार्‍या सहवासात, तर असते मी. आणि पंचवीस तीस रुपयात आपलं घर व शिक्षण  संभाळायचे म्हणजे कुरकूर करुन कसं चालेल सांग?" त्यांच्या उत्तराने माझी मीच खजील झाले मनात. अशा अवघड परिस्थितीत स्वतंत्र बुद्धीने मार्ग काढणे साधले असते का स्वतःला? हा विचार मला अस्वस्थ करू लागला.

एकदीड खणाचे, मातीने सारवलेले त्यांचे सुबक घर मला मनापसून आवडले. ताटाळे, चहाले, चहासाखरेचे डबे, झारा, पळी, विळी आणि कितीतरी संसारोपयोगी सामान तिथे व्यवस्थितपणे उभे होते. जवळच एका शेल्फावर काही पातेली, वेळण्या, पाण्याची स्वच्छ घासलेली घागर दिसत होती. कोपर्‍यातल्या कोनाड्यात दत्ताची मूर्ति-फुलांच्या हाराने शोभिवंत झालेली-उठून दिसत होती. जवळच उदबत्तीच्या सोंगटीत उदबत्ती घमघमत होती. डाव्या हाताला एक लाकडी खाट होती. तीवर आवरुनसावरुन घातलेली सतरंजी, गादी-उशी या वस्तू होत्या.  आणि त्यांच्यावर पांढर्‍या लुगड्याची चौघडी अंथरली होती. उशाजवळच्या खुंटीवर एक स्वच्छ कंदील लटकत होता आणि त्याच्या शेजारीच एक जाड, जुनी फ्रेम असलेला फोटो अडकविलेला होता. फोटोतील गृहस्थ तरुण वयाचे, कृश प्रकृतीचे, चष्मेवाले दिसत होते. फोटो काहीसा आऊट ऑफ फोकस्‌ झाला असल्याने अंधुक अंधुक दिसत होता. ह्याच्यावर नाजूक, सुरेखसा पारिजातकाच्या कापडी फुलांचा हार घातलेला होता-मला वाटते, तो फोटो श्रीयुत आगरकरांचा असावा.  त्यांच्या घरचा गरमगरम चहा व लज्जतदार पोहे यांचा पाहुणचार घेऊन येताना माझे मन गहिवरुन आले, संसाराची किती हौस आहे त्यांना! सुग्रण तरी किती आहेत ! छानदार संसार करुन दाखवला असता यांनी एखाद्याचा. या विचारातच मी मग्न होते, आणि म्हणूनच त्या पदवीधर होऊन त्यांना नोकरी लागल्यावर मी आणि नंदिनीने (आमचे त्रिकूट कॉलेजपासूनचे होते) त्यांच्यामागे त्यांनी पुनर्विवाह करावा म्हणून भुणभुण सुरु केली, "यंदा काही झालं तरी आम्ही लाडू घेणारच तुमच्याकडून" अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. इतक्या वर्षाच्या स्नेहानंतर इतपत ‘लिबर्टी’ घेत असू आम्ही त्यांच्याकडे.

पुरुषाची जात मोठी पक्की असते हं!

त्या म्हणायच्या, "लाडू देऊ की, पण इतकी घाई का तुमची, पोरींनो? माझा रंग, वाण किती पक्का आहे तो बघतायना तुम्ही? तुम्ही आहात अननुभवी पण मी सांगते तुम्हाला, पुरुषाची जात मोठी पक्की असते हं. ते कस्सेही असले ना, तरी बायको हवी असते त्यांना चांऽगली गोरीपान अन्‌ भरपूर डबोल देणारी. ते कुठून ग आणणार मी?" आणि डबोले दर्शविणारा अभिनय करीत आपणच हसायच्या.

बरीच पायपीट त्यांच्या या लग्नाच्या खटाटोपीत मला व नंदिनीला करायला लागली. चेष्टेने त्या म्हणायच्या, "नाही तो उपद्‌व्याप कशाला करायचा? मला की नाही सड्या विजवरापेक्षा मुलंबाळे असलेला, निर्व्यसनी माणूस अधिक आवडेल बाई! मुलांना ‘आई’ मिळेल अन्‌ माझंही मन मुलात रमेल. पण गृहस्थ अंगापिंडानं (हा खास त्यांचा शब्द) मजबूत हवेत हं. मला नाही ते बायकी चेहर्‍यामोहर्‍याचे अन्‌ खिशात कंगवे घालून फिरणारे पुरुष आवडत मुळीच!  कष्टाची मीठभाकर प्रामाणिक मेहनतीनं करणारा जोडीदारच सुख देईल." त्यांची ती समंजस व व्यवहारी दृष्टी पाहून त्यांच्याबद्दलचा आमचा स्नेहभाव दुणावे.

ईश्वरकृपेनं एका सज्जन बॅंक मॅनेजरशी त्याचा विवाह झाला. अंगाखांद्यावर ठसठशीत दागिने, घसघशीत बिलवर, मोत्याच्या कुड्या, दाणेदार मण्यांचे मंगळसूत्र घालून त्या आपल्या ‘साहेबां’ जवळ मोठ्या अभिमानाने खुषीत उभ्या होत्या. आम्ही दोघी त्यांची भरपूर चेष्टा करायचो, ‘नाव घ्या, नाव घ्या’ म्हणून आग्रहदेखील करायचो. त्या या सार्‍याचे लाजूनलाजून स्वागत करायच्या.

पहिल्या नात्याविषयीही जिव्हाळा.

त्या दिवशी पानसुपारीला निवडक मंडळी बोलावली होती. पुण्यातल्या एका शाळेचा हॉल यासाठी घेतलेला होता. फुलांनी शोभिवंत केलेल्या एका सॅटीनच्या कोचावर सुमित्राबाई व श्री. भाऊसाहेब बसले होते. भेटायला येणार्‍यांचा परिचय हसतखेळत त्या भाऊसाहेबांना करुन देत होत्या. मी व नंदिनी त्यांच्या पाठीशीच उभ्या होतो. इतक्यांत एक वयस्कर असे दांपत्य समोरुन येताना दिसले, पगडी, लॉंग कोट, घोतर, पुणेरी जोडे इत्यादि पेहेरावावरुन गृहस्थ जुन्या वळणाचे वाटले. त्यांच्या बरोबरच्या पोक्त बाईंनी इरकली लफ्फेदार लुगडे-धारवाडी खणाची चोळी असा पोशाख केला होता. त्यांच्या केसांचा खोपा, नाकातली नथ अन्‌ गोठपाटल्या लक्षात येण्यासारख्या होत्या. ती दोघे जवळ येताच सुमित्राबाई, झट्‌दिशी उठल्या आणि त्यांनी खाली वाकून त्या जोडप्याला नमस्कार केला. ती दोघेही एकदमच म्हणालीं ‘सुखी भव’. मग आपल्या पतिराजांकडे वळून त्या म्हणाल्या, "अहो ऽ या आमच्या पहिल्या सासरच्या मामेसासूबाई व  हे मामंजी, बरं का!"  आणि पुन्हा तोंड वळवून म्हणाल्या, "हे आपले नवे भाचे, माझ नव आता बदललं असलं तरी आपल्याशी नातं जुनंच आहे बरं का सूनबाईचं.  चातुर्मासात यावं आपण दोघांनी आमच्याकडे राहायला. सारे सणवार, सोवळंओवळं संभाळीन मी, ‘हे’ करतीलच आपल्याला पुन्हा आमंत्रण. मी वाट बघीन हं शिरपूरला." ते त्याचे आश्वासन-आपुलकीने ओलावलेले डोळे पाहून ते दांपत्य गहिवरले, भाऊसाहेबांकडे वळून वृद्ध गृहस्थ म्हणाले, "फार भाग्यवान्‌ आहात, म्हणून अशी पत्नी आपल्याला मिळाली" आणि उपरण्याने डोळे पुसत ते माघारी वळले.

या प्रसंगाची स्मृति माझ्या मनावर कोरली गेली आहे. आणि अनेकदा त्याच्या पुनःस्मरणाने माझे डोळे पाणावले आहेत.

आपल्या नव्या घरात, मुलाबाळात पाहतापाहता सुमित्राबाई रमल्या, त्याच्या साहेबांची बदली झाली होती कोरेगांवला आणि त्या होत्या रिंमांड होम सुपरिंटेंडेंट म्हणून शिरपूरला. मुलेबाळे अर्थातच यांच्याजवळ होती. फार आग्रहाचे त्यांचे ‘पकड वॉरंट’ आल्याने कॉलेजातून रजा घेऊन मी आणि नंदिनी त्यांच्याकडे गेलो शिरपूरला. एस्‌.टी. मधून त्यांच्या संस्थेच्या प्रशस्त आवाराशी आम्ही उतरताच, "नमस्ते बाईसाहेब, नमस्ते" करीत किनर्‍या आवाजात यांच्या संस्थेतल्या मुलींनी आमचे स्वागत केले. अहमहमिकेने त्या आमचे सामानही उचलू लागल्या तशा सुमित्राबाई गरजल्या, खास अधिकारी माणसाच्या स्वरात आणि ठेक्यात, "ए, काय ग भंडावता उगीच. व्हा बघू पुढे अन्‌ रुक्मिणीला विचारा, यांच्यासाठी हातपाय धुवायला गरम पाणी ठेवलं आहे की नाही ते." त्याबरोबर अठरापगड जातीच्या, धर्माच्या, त्या अनाथ मुली भराभरा पांगल्या, आपल्या राज्याचा विस्तार पाहून एखाद्या सम्राटाने जशी अभिमानाने मान डोलवावी ना तशी सुमित्राबाईंनी आपल्याशीच मान डोलावली. आमच्याकडे दृष्टिक्षेप केला-तो विचारीत होता, "कसं आहे हे माझं साम्राज्य? ही बाग या इमारती, या पोरी-इथे माझ्या आज्ञेशिवाय पान नाही हालत म्हटलं." ‘Boss’ ची भूमिका त्या मोठ्या हौशीने व दक्षतेने पार पाडीत. "तुम्हा पोरींना ग त्यात काय कळतं? असे अनेक प्रश्नांवर चर्चा करताना यांनी आम्हा दोघींना वडिलकीच्या रुबाबाने म्हणावे आणि आम्हाला ते गोड लागावे असे वर्षानुवर्षे चालू आहे.

आतिथ्यशील सुमित्राबाई.

त्यांच्या स्वभावाप्रमाणे यथेच्छ आग्रह करुन चार दिवस त्यांनी आमचे आतिथ्य केले. त्या आग्रहातही त्यांची एक विचारसरणी असे - ती अशी, "या दोघी सड्याफटिंग राहतात- अन्‌ खानावळीचे जेवतात. यांना चांगले जेवण आम्ही प्रापंचिक बायकांनीच करुन घालायला हवे. तरण्या वयांत या ‘पोरी’ सुकल्या म्हणजे पुढे या प्रपंच कशा करणार? चार मुलेबाळे व्हायची म्हणजे धट्टेकट्टे नको राहायला?" मी जेवणाबाबत जरा चोखंदळ, तेव्हा मला चिडवून म्हणायच्या, "ए डॉक्टरच्या नाती, भिऊ नको हं! सगळं जेवण धुऊन घेऊन केलंय्‌, गूळ देखील धुऊन घातलाय्‌ आमटीत. आता नाही कसले ‘जर्म्स’ तुझ्या पोटांत जाणार ना?"

शिस्त म्हणजेच जीवन

आपल्या संस्थेतील कामात त्या मोठ्या शिस्तीच्या, तिथे असलेल्या मुलींच्या सतरा तर्‍हा असत. सगळ्या चमत्कारिक वयाच्या आणि चित्रविचित्र, कारणाने तिथे आलेल्या. कोणी अजाण वयात कुमारी माता झालेली, कोणी घरातून पळालेली, कोणी दारुच्या गुत्त्यात काम करताना सापडलेली अशा. यांच्यावर देखरेख करायची म्हणजे केवढी जोखीम! पण विलक्षण चतुराईने ती त्या पार पाडायच्या. त्यांच्या असामान्य धैर्याचा एक प्रसंग राहवतच नाही म्हणून सांगते तुम्हाला. गांधीवधोत्तर सर्वत्र जो दंगा उठला, त्या वेळची ही गोष्ट आहे, सर्वत्र वातावरण विलक्षण तापलेले अन्‌ तंग झालेले. एके दिवशी संध्याकाळी गावांतले एक सद्‌गृहस्थ घाईघाईने तिन्ही सांजच्या वेळी यांच्याकडे आले आणि घाबर्‍याघाबर्‍या यांना म्हणाले, "सुमित्राबाई, आज मध्यरात्री तुमच्या या शाळेवर, संस्थेवर काही गुंड मंडळी हल्ला करण्यासाठी येणार आहेत - अशी वदंता गावात ऐकली मी, मोठाच बाका प्रसंग आहे. काय करणार तुम्ही आता?" सुमित्राबाई कांही वेळ सचिंत बसल्या. पण मग धीराने म्हणाल्या, "ठीक आहे, इतक्या अगत्यानं तुम्ही संकटाची सूचना द्यायला आलांत त्याबद्द्ल मी फार ऋणी आहे. काढीन कांहीतरी मार्ग शोधून यांतूनही"- अन्‌ तातडीने गावांतल्या पोलीसचौकीकडे त्यांनी माणूस धाडला. वेळ थोडा उरला होता. सर्व महत्त्वाची कागदपत्रे त्यांनी सुरक्षित ठिकाणी हलवलीं, मुलींची जेवणे लवकर उरकून घेऊन त्यांना एका मोठ्या हॉलमध्येच एकत्र निजायला सांगितले त्यांनी. शिरपूर म्हणजे लहान तालुक्याचे गाव. ना तिथे वीज की टेलिफोन! वरिष्ठ अधिकार्‍याच्या कानावर बातमी घालायला साधन नाही जवळ, पण या मुळीच डगमगल्या नाहीत. रात्री साडेअकराच्या सुमारास हातत पेटलेले पलिते घेऊन आरडाओरडा करीत, धांगड्घिंगा घालीत कांही गुंड मंडळी यांच्या संस्थेच्या दिशेने येऊ लागली. संस्था थोडीशी गावाबाहेर असल्याने सुमित्राबाईच्या मदतीला फारसे येण्याजोगे कोणी नव्हते चटकन.  गुंडांचा हैदोसहुल्ला जवळ जवळ ऐकू येताच मुलींनी भीतीने आरडाओरडीला सुरुवात केली. क्षणभर सुमित्राबाईही हादरल्या असतीलच, पण तसाच मनाचा नेट धरुन त्यांनी मुलींना चापले - "खबरदार कोणी रडालभेकाल तर! मी आहे ना इथे उभी तुमचं संरक्षण करायला!"

तोवर फाटकावर धक्के ऐकू येऊ लागले. गावातले चार पोलीस मदतीसाठी आलेले. त्यांचीही भीतीने गाळण उडाली. एकच आकान्त झाला. सुमित्राबाई संतापल्या होत्या, पण ती वेळ तो संताप दाखविण्याची नव्हती. सारे अवसान एकवटून त्या फाटकात उभ्या राहिल्या अन्‌ चढ्या आवाजात मोठ्याने ओरडल्या, "खबरदार, एक पाऊल पुढे टाकाल तर, ही सरकारी संस्था आहे. अन्‌ तुमच्याच अनाथ झालेल्या बहिणी इथे आसर्‍याला आल्या आहेत. त्यांची अब्रू ती तुमची अब्रू! हे पटत नसल तुम्हांला तर पहिली गोळी चालवा माझ्या अंगावर अन्‌ टाका छाती असली तर माझ्या प्रेतावरुन पाऊल आत!" त्यांचा तो उग्र अवतार, गरगर फिरणारे डोळे, ते प्रसंगावधान  पाहून आलेली गुंड मंडळी जरा चमकलीच. त्यांच्यातला पुढारी जरा पुढे होतो तेवढ्यांत त्याच्याकडे एक जळजळीत दृष्टिक्षेप टाकत त्या गरजल्या, "कोण कुशाबा? तुम्ही या मंडळींचे म्होरके? काय म्हणावं या दुर्दैवाला! आठवतंय तुम्हाला, तुमची बायको टायफॉईडने अत्यवस्थ होती तेव्हा मी अन्‌ माझी आईच तिच्या उशा-पायथ्याशी बसलो होतो ना?  औषधपाण्याला दादाकडूनच आमच्या पैसे नेले होतेत ना? विसरलात सारं एवढ्यांत?" कुशाबाच्या डोळ्यापुढे वीज चमकली. त्याने साष्टांग दंडवत घातले अन्‌ मग साराच ट्रान्स्फर सीन झाला.

खडकातले पाझर

कुटुंबातही हा त्यांचा दरारा असायचाच. अरुण मुलगा होता ना? त्यामुळे त्याला शंभर चुका माफ असायच्या, पण शरयूच्या बाबतीत मात्र त्यांचे कायदेकानून भिन्न असायचे. आम्ही तिथे असतांना एक दिवस शरयूला झाला खूप उशीर शाळेतून यायला. सुमित्राबाई कावर्‍याएबावर्‍या झाल्या. "मुलीची जात, तिचे वडीलही परगावी म्हणून माझा जीव अस्वस्थ होतो." असे त्या वरचेवर म्हणाल्या. रात्री साडेआठच्या सुमाराला आवारातला शिपाई येऊन सांगू लागला, "बाईसाहेब, शरुताई आल्या." तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला, पण शरयू समोर येऊन उभी राहिल्यावर मात्र त्यांनी चंडिकेचा अवतार घेतला. मैत्रिण व तिच्या भावाबरोबर त्यांनी फार आग्रह केल्यावरुन मळ्यात शेंगा खायला आपण गेलो होतो असे तिने सांगताच, "मुलीच्या जातीला हे शोभते का? फास लागला असता गळ्याला माझ्या म्हणजे?" असे म्हणून आमच्या देखत त्यांनी तिला धम्मकलाडू व चापट्पोळ्यांचा आहेर दिला. "मारलंत कशाला उगीच ? समजावून का नाही सांगितलंत जरा" असे मत आम्ही व्यक्त करतांच "तुम्ही बसा पुस्तकी पांडित्य करीत, मला व्यवहारी जगात राहायचे आहे. मुलांच्या आईने वेगळे काय केलं असतं आणखी?" असा फटकारा आम्हाला द्यायलाही त्या डरल्या नाहीत.

सकाळी आम्ही दोघी जाग्या झालो अन्‌ समोर पहातो तर, सुमित्राबाई शरयूच्या केसांना मायेने तेल लावीत होत्या. रविवार म्हणून तिला न्हाऊमाखू घालण्याच्या तयारीत होत्या. त्यांच्या पाठमोर्‍या मूर्तीकडे आम्ही बघतच राहिलो.

जीवन जगण्याचे कौशल्य

अजिंठा-वेरुळची लेणी पाहायला गेलो होतो आम्ही सार्‍याजणी एकदा. सौ. नंदिनीचे श्रीयुत गोडबोलेही बरोबर होते हं! भला माणूस अन्‌ मोठा हुशार. औरंगाबादला एका प्रशस्त हॉटेलात आम्ही उतरलो. हमालाने आमचे सामान आत नेऊन ठेवले. तेवढ्यात काऊंटरजवळ बसलेल्या स्थूल देहाच्या, मॅनेजरकडे जाऊन या म्हणाल्या, "हे बघा, तुमच्या हॉटेलचं नाव ऐकून आम्ही इथं आलो आहो, बरोबर बडे सरकारी ऑफिसर असलेले आमचे मेहुणेही आहेत, तेव्हा सारी व्यवस्था चोख व्हायला हवी हं! त्यांचा मानपान नीट जपायला हवा, कळलं का?" जणू आपलेच घर आहे असे समजून अधिकारी वाणीने, सरबत्ती करणारी अशी बाई हॉटेलमालकाने प्रथमच पाहिली असावी. तो मुळी अ-वाक्‌ होऊन बघतच राहिला सुमित्राबाईकडे. सुमित्राबाईंचे कोष्टक असे आपल्याला बडा वाटणारा माणूस हा खरोखरच बडा असतो. अन्‌ आपण राखतो तशी इतरांनीही त्याची बडदास्त राखायलाच हवी. आहे की नाही नमुना स्वभावाचा!

प्रापंचिक जीवन, दागदागिने, व्रतवैकल्ये यात त्यांना मनापासून रस. आवडीने एखादी इंग्रजी कादंबरी वाचीत बसण्यापेक्षा संक्रांतीला नववधूला हरतर्‍हेचे दागिने करण्यात यांना फार इंटरेस्ट. एखाद्या लग्नकार्याला गेल्या की आल्यावर म्हणतील, "मुलीचा वाण आहे साधारणच, पण अंगावर दागिने  घातले होते पंचवीस तोळ्यांचे, तेव्हां घर ‘बरं’ दिसतंय म्हणायचं" अन्‌ मग सार्‍या समारंभाचे रसभरीत वर्णन हौसेने त्या करतील. परवा मी त्यांना म्हटले, "काय बाई आघाडी मारली स्त्रियांनी आता. व्हॅलेंटिनाबाई पृथ्वीला फेर्‍या घालू लागली." तशा भावनावेगाने त्या मला म्हणाल्या, ’आपल्या देशातल्या स्त्रियांनीही गाठायला हवी नाही का गं, ही मजल? ती पाहायला कर्वे-आगरकरही हवे होते, नाही?" मला वाटले, लहानपणी त्यांनी भोगलेली वैधव्याची अन्‌ हालापेष्टांची चित्रे त्यांच्या डोळ्यापुढे असतात की काय कोण जाणे, त्या असे बोलतात त्या वेळी!

सुमित्राबाईच्या अशा किती आंबटगोड आठवणी तुम्हाला सांगूं? गेल्या वीस वर्षातली त्यांची कितीतरी चित्रे माझ्या डोळ्यापुढे येतात. माझ्या आजारपणात माझ्या आवडीची जोंधळ्याची भाकरी करुन मला खाऊं घालण्यासाठी पावसात भिजत येणार्‍या सुमित्राबाई, स्वतःला एक मुलगी तरी हवीच, व त्याशिवाय संसाराला पूर्तता कोठून ? म्हणून कडक सूर्योपासना, उपासतापास करुन अतिशय ताप सोसून ‘मित्रा’ च्या आई होणार्‍या सुमित्राबाई, बी.ए.च्या परीक्षेच्या वेळी कांही मनस्ताप होऊन मी परीक्षा सोडून घरी निघाले त्या वेळी,  "आईबापाची एकुलती एक म्हणून लाडकी मुलगी तू. त्यांतून सुखवस्तु घरातली, म्हणून चालतात तुझी ही थेरं. म्हणे मला नर्व्हसनेस्‌ आलाय्‌. आग लाव त्याला. उद्याच्या जगात काय करणार तुझ्यासारखी रडत राऊत माणसं?" असे हडसून-खडसून मला विचारणार्‍या सुमित्राबाई मला सतत आठवतात.

मृत्यूलाही हरविले

त्या आमच्या सुमित्राबाई कॅन्सरने - आजच्या जगात सर्वात महाभयंकर  समजल्या जाणार्‍या रोगाने - पछाडल्या गेल्याचे कळताच मला अतिशय दुःख झाले, अनेक अशुभ कल्पनांनी मला बेचैन केले. मुंबईला जाताना, त्यांना पुण्याच्या स्टेशनवर मी भेटायला गेले ना, तेव्हा पाहणार्‍याला वाटले असेल, ऑपरेशन व्हायचे आहे जणू माझेच अन्‌ या निघाल्या आहेत वीक-एन्डला मुंबईला ट्रीपला! साडेतीन तास त्यांच्या ऑपरेशनसाठी लागले. तीनचार दिवस मृत्यूबरोबर जोरदार झुंजच केली त्यांनी. दोनतीन आठवडे मुंबईला हॉस्पिटलातच त्यांना काढावे लागले. आम्ही पुण्यास असलो तरी लक्ष सारखे त्यांच्या दुखाण्याकडेच होते. थोड्या बर्‍या होऊन त्या परत आल्यावर मी त्वरेने त्यांच्या समाचाराला गेले. बिछान्यावर त्या दिसत नव्हत्या इतक्या अशक्त झाल्या होत्या. मूळाच्या दणकट बाईची ही केविलवाणी अवस्था मला पाहवेना. पण बळेच हसून मीं म्हटले, "काय म्हणतो मुंबईकर पेशंट?"

त्यावर नेहमीच्या थाटातच, खेळकरपणे हसून क्षीण आवाजात म्हणाल्या. "पेशंट झालाय्‌ फार इंपेशंट आपल्या सख्या-पार्वत्यांबरोबर भटकायला!" त्यांचे बारीक झालेले हातपाय, ओठांचा पांढरेपणा व खोल गेलेले डोळे अन्‌ गालांची वर आलेली हाडे त्यांनी सोसलेल्या यातना स्पष्ट करीत होतीं.

मी आणलेला काजूचा पुडा व मुसुंबी हातात घेत त्या कळवळून म्हणाल्या, "कित्ती दिवसांनी भेटते आहेस गं?  आणि नंदिनी का नाही आली? संध्याकाळीं येईल ना नक्की? तू बरी आहेस ना?"

ऑपरेशन म्हणजे एक गमतीचा खेळ

माझा गळा एकदमच दाटून आला. स्वतः अत्यवस्थ असताना या माझीच चौकशी करताहेत! काय म्हणावे यांना? मी विचारलें “"क पार पडलं ना ऑपरेशन? बरं वाटतंय ना?" त्यावर त्यांनी उत्तर दिलें, "अग, मजाच झाली हे ऑपरेशन म्हणजे. केवढ भव्य ते हॉस्पिटल, काय तिथल्या डॉक्टरांची हातचलाखी ऑपरेशनची, चपळाइनं पळणार्‍या, किनर्‍या आवाजात बोलणार्‍या तिथल्या गोड नर्सेस्‌ - घेण्यासारखाच अनुभव आहे बाकी तो! अगं, डॉ. बोर्जीससारख्या कॅन्सर स्पेशालिस्टांच्या हाती मी सोपवली आपली पाठ आणि पूर्वतयारी म्हणून औषघं, इंजक्शनं घेऊन झाले तयार कॅन्सरशी लढाईला सज्ज तशी! ऑपरेशनच्या दिवशी मी तर ‘महाश्वेता’ च झाले होते म्हणेनास! पांढराशुभ्र पोशाख अन्‌ सर्वच पांढरंपांढरं लख्ख! कसलंसं टोपण डॉक्टरांनी नाकावर ठेवताच जी गुंगी आली गोऽड, की काही विचारू नको. भोवतालच्या जगाचा विसर पडतो आहे असं वाटू लागलं, पण मालती, एक क्षण मत्र मनात आलं. अगदी त्या क्षणीसुध्दा हं, की या झोपेतून आपण नाहीच पुनः उठलो तर आपली मालती नाही दिसायची परत डोळ्यांना. घाईघाईनं येताना, तिचा नीट निरोप घ्यायचाच राहिला, असं नको होतं व्हायला- या विचाराने माझे मन  चुटपुटले! चार दिवस चार डॉक्टरमंडळी अस्मादिकांच्या सेवेला सज्ज होती. अग, तुम्ही दोघी सारखं लिहीत होतात - प्रकृतीला जपा - पण मी काळजीच केली नाही मुळीच प्रकृतीची, कारण एक डॉक्टर माझ्या नाकात अन्नासाठी नळी लावून बसलेला, दुसरा ब्लडप्रेशरसाठी हातत यंत्र घेऊन बसलेला, तिसर्‍याने नाडीवर हात ठेवलेला तर चवथा माझ्या डोळ्यांच्या हालचालींवर पहारा करीत असलेला - एवढा कडेकोट डॉक्टर बंदोबस्त असतांना, माझ्या प्राणांनी जायचं तरी ग कुठून बाहेर? आणि एक मजा सांगायची राहिली. अग, उशापायथ्याशीं इंग्रजी मडमा - नर्सेस्‌ उभ्या सेवेला, अशी ऐट वाटली म्हणतेस! मी मनात म्हणे, "मडमांनो, आतां राज्य आहे आम्हा भारतीयांचं. आता आम्ही जेते आणि तुम्ही जित. तेव्हा आता पायाशी उभ्या राहा तुम्ही. दोनशे वर्षे आम्हाला पायाशी उभं केलं होतंत नाही का? अं?" आणि आपल्या विनोदावर आपणच खूष होऊन त्या हसल्या आणि  म्हणतात कशा, "असा राजयोग लाभलाय्‌ कधी तुला, सत्रांदा आजारी पडलीस तरी? त्यालाही भाग्य लागतं म्हटलं."

त्यांचे सारे बोलणे ऐकून माझ्या काळजात कालवाकालव झाली. मी डोळे पुसलेले त्यांच्या लक्षात येताच म्हणाल्या "अहा ग, रडूबाई! अग, कॅन्सर असला तरी आता ऑपरेशन झालंय्‌, काही काळजी करू नका तुम्ही, दहा वर्षे तरी माझा मुक्काम नाही हालत आता!"

संध्याकाळी त्यांचा निरोप घेऊन मी परतले तेव्हा माझी पावले जड पडत होती. मृत्यु साक्षात्‌ समोर येऊन समोर ठाकला होता तरी सुमित्राबाई पूर्ववत्‌च अचल होत्या. निर्भय होत्या. त्यांचा नेहमीचा ठसका तिथेही कमी झाला नव्हता. मृत्यूला देखील आपल्या कणखर व्यक्तिमत्वाने त्यांनी नमवले व आपले ‘सुमित्रा’ नांव खरे केले! अजब आहे सारेच!

रात्री झोपताना मी खोलीतल्या कृष्णाच्या मूर्तीला मनोभावे हात जोडून म्हटले, "देवा, या माझ्या मृत्युंजय मैत्रिणीला उदंड आयुष्य दे. मुलाबाळांची आई आहे ती, घराची स्वामिनी आहे ती. जगूं दे रे बाबा हिलाच. माझं उर्वरित आयुष्य हिलाच दे खुशाल" - प्रकृतीने अत्यवस्थ असतानाही हिनं "मालती, त्या क्षणीही मला वाटलं,  तुझी भेट व्हावी." असे मौल्यवान सर्टिफिकिट मला दिले. त्याला मी खरोखरीच पात्र आहे का?

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color