देवाघरचा जीव पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

महिन्या दोन महिन्यानी घरातल्या सामानाची नवी मांडामांड करायला मला खूप आवडते. त्या दिवशी अशीच मी या कामात गुंतले होते. इकडचे कपाट तिकडे हलव. तिकडची कॅलेंडरे इकडे लाव. तेवढ्यात माझ्या कानावर शब्द आले, सकाळीच उठून कसला पसारा काढला आहे आवरायला? काय हो बाईसाहेब? मी मागे वळून पाहते तर हातात सूटकेस घेऊन, मनोरमा उभी! ही माझी मुंबईला असलेली एक ‘विदुषी’ मैत्रीण! कोल्हापूरला स्वारी निघाली असावी बहुधा. वाटेत टपकली होती माझ्याकडे.

चहापाणी आणि इतर आन्हिक आवरल्यावर तीही माझ्या मदतीला आली. देव्हार्‍याजवळच मी एक सोनेरी चौकटीचा फोटो अडकवीत होते. तो फोटो हातात घेऊन तिने मला विचारले, "कुणाचा गं हा फोटो? किती गोड आहे ही तरुण मुलगी. ठेंगणीठुसकी, अट्कर बांध्याची आणि पोशाख बघ हिचा. भरजरी बुट्ट्यांचा शालु, रुंद जरीकाठी चोळी, दागिने तर खूपच दिसताहेत अंगावर. नाकात नथ गळ्यात मंगळसूत्र आणि पेट्या, हातात घसघशीत गोठपाटल्या, पायात तोडे आणि हातात चांदीची परडी घेतली आहेत वाटतं ! कपाळावरच ठसठशीत कुंकू छान शोभतंय हं हिला. पण या सर्वापेक्षा मला हिचे मायाळू आणि बोलके डोळे फार आवडले बाई. कोण गं ही?" मनोरमेची उत्सुकता तिच्या स्वरातून जाणवत होती.

ही माझ्या सोलापूरच्या मैत्रिणीची आई. माझी आई! मी उत्तर दिले. माझ्या नकळतच ‘माझी’ या शब्दावर भर दिला गेला असावा. त्यामुळे तिचे कुतूहल आणखीनच जागे झाले.

सुमारे पन्नासपंचावन्न वर्षापूर्वीचा माईचा तो फोटो पाहताना एखाद्या मंगलकार्याहून परतताना अंगावर शिंपडलेल्या गुलाबपाण्याच्या थेंबानी शरीर आणि मन कसे प्रफुल्ल होते ना, तसे माझे झाले. पारिजाताचे झाड हलक्या हातांनी हलवले तरी त्याच्या चिमण्या सुगंधी फुलांचा पायांशी सडा पडतो, त्यांनी आसमंत दरवळून जातो. ‘मनोरमे’ च्या प्रश्नाने माईच्या आठवणींनी माझे मन तसेच घमघमले.

मी एम्‌.ए. च्या वर्गात शिकत होते. त्याची एक आठवण सांगते. ती अभ्यास करीत असताना मला विद्यार्थिनीच्या वसतिगृहाची ‘मेट्रन’ म्हणून काम पाहावे लागे. आमचे ‘फर्ग्युसन’ कॉलेज त्यावेळी सकाळी भरत असे. एक दिवस पावणेबाराच्या सुमाराला मी तास संपवून रेंगाळत रेंगाळत खोलीकडे निघले होते. पोटांत कडकडून भूक लागली होती. पण म्हणूनच पावले लवकर उचलत नव्हती . जिना चढून मी खोलीत पुस्तकांचा भार टेबलावर टाकते न टाकते तेवढ्यात देवडीवरच्या भैय्याची हाक आली, "लष्करबाई( किर्लोस्कर चा उच्चार तो असा करी) इदर कोई मेहमान आपको बुलाते है" मला उठून खाली जाण्याचा इतका कंटाळा आला होता खरे म्हणजे, पण करते काय! मनातल्यामनात मी म्हणत होते, या पाहुण्यांना काळ वेळ काही कळतो की नाही? ही भेटायला यायची का वेळ आहे? तेवढ्यात, "हा, हा, आप  इदर बैठिये, मै बुलावूंगा लष्कर बाईको"....असे म्हणत भैयाच वर येऊ लागलेला दिसला. मग मात्र झरझर जिना ऊतरुन मी खाली आले आणि... आणि काय? आनंदाने आणि आश्चर्याने थक्कच झाले. समोर, माझी आई उभी होती! लौकिकात सांगायला ती होती माझ्या मैत्रिणीची आई, पण खरे म्हणाल तर ती माझी जिवलग मैत्रीण होती, आईइतकीच मला जवळची होती. ती चाळिशीची अन्‌ मी विशीएकविशीची !

तिला बघताच, नेहमीप्रमाणे तिला वाकून नमस्कार करण्याचेही भान मला राहिले नाही. मी तिला कडकडून मिठीच मारली. तशी, "अगं पण, अगं पण, हा काय वेडेपणा तुझा?" असे लटक्या रागाने म्हणत, लाडानेच तिने माझी मिठी सोडवली. माझे चक्क गालगुच्चे घेतले. माझ्या पाठीवरुन हात फिरवला आणि आपल्या टाचा किंचित्‌ उंच करुन माझ्या मस्तकावर थोपटले. मार्च महिन्याचा दुसरा आठ्वडा संपत आलेला. बाहेर टळटळीत ऊन पडलेले !

त्या उन्हात चालून आल्याने माई घामाघूम झाली होती. त्याने कपाळावरचा पिंजर- कुंकू टिळा वेडावाकडा झाला होता. लुगड्याच्या निर्‍यांच्या केळ्याजवळचा रेशमी घोतर फाडून केलेला हातरुमाल (हातरुमाल म्हणजे काय एक वीतभर लांबीरुंदीचा हातटीप मारलेला फडका) हाताने ओढून कपाळावरचा घाम ती टिपू लागली. चारदोन शब्द बोलून झाले की ती एक दीर्घ नि:श्वास टाकी त्यावरुन ती बर्‍याच दूर अंतरावरुन चालत आली होती हे उघडच होते. तिच्या हाताला बळेच ओढून मी म्हटले. "आधी माडीवर चल बघू. जरा विसावा घे. हातपाय, तोंड धू. थंड पाणी पी, थोडी ताजीतवानी झालीस  की जाऊया दोघीजणी आमच्या ‘मेस’ वर जेवायला." खोलीवर आली पण खुर्चीवर टेकण्यापूर्वीच मला म्हणाली, ’हं हा डबा घे बघू आधी तुझ्या ताब्यात" व आपल्या पोटाशी पदराने झाकलेला पेढेघाटी पितळी डबा तिने बाहेर काढला. तो  माझ्या हाती दिला. त्याचे पिवळे लखलखीतपण तेव्हाच डोळ्यात भरत होते.  त्या वरुन तो नुकताच घासून घेतलेला आहे हे कळत होते. ती बोलत होती तेव्हा सहज मी तिच्या पायांकडे पाहते तर ही पठ्ठी अनवाणी चालत आलेली. काहीशा रागाने मी तिला म्हटले, "बाहेर ऊन कोण मी म्हणतंय आणि चपलांना काय म्हणून तू रजा दिलीस गं?" त्यावर जरासुध्दा अस्वस्थ न होता तिने सांगितले. "ह्यांनी म्हणाले, साडेपाचच्या गाडीने सोलापूरला परत जायचंय. तुमची तुळशीबाग, बेलबाग आणि इतर काय कामे असतील ती लवकर आटोपून घ्या तुझी भेट घेऊन वर्ष होऊन गेल होतं. इकडे पुण्याला यायचं परवा एकाएकीच ठरलं मग तुला कळवणार तरी कसं? म्हटलं तुला पट्‌दिशी भेटून यावं. आज ओक काकूंनी पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या. घरांत आम्ही आलो म्हणून.. मी त्यांना म्हटले, "कार्टीला पोळ्या भारी आवडतात या. (‘कार्टी’ हा माईचा खास आवडता शब्द. माझ्या बाबतीत हा शब्द ती बहुधा विशेषनामासारखाच वापरत असे) द्या थोड्या डब्यात घालून!" मग घेतला डबा आणि निघाले. त्या घाईत चपलाच विसरले बघ घालायला." आणि ती खुदकन हसली. तिचे मधले दोन दात पडले होते. तिथल्या मोकळ्या जागेमुळे तिचे हसणे एखाद्या लहान मुलाच्या हसण्यासारखे वाटे. निरागस, भाबडे! तिचे ते हसणे मला फार आवडे.

"अगं, पण ती ओक मंडळी राहतात शनिवार पेठेत आमचे कॉलेज इथे जिमखान्यावर. कितीतरी दूर तिथून मग टांगा तरी करुन यायचं नाही का? कमाल आहे बाई तुझी!" माझा पारा अजून फारसा उतरला नव्हता म्हणून त्याच आवाजात माझे बोलणे चालले होते. त्याकडे शांतपणे दुर्लक्ष करुन ती म्हणते काय "अग, हे तुमचे पुण्याचे टांगेवाले (त्यावेळी माझ्या आठवणीप्रमाणे पुण्यात रिक्षा जवळजवळ नव्हत्याच) ह्यांचा काय गं नेम सांगायचा?  मी आशिक्षित, पुण्याबाहेरची बाईमाणूस नेऊन घातलेन कुठंतरी मला म्हणजे काय करायचं? म्हणून रस्त्यावरच्या जरा बर्‍या वाटणार्‍या म्हातार्‍या बाई-बुवांना मी विचारी, फर्ग्युसन कॉलीज कुठं आहे हो? नाही, आमच्या मालीला डबा पोहोचवायचाय एवढा! तिची माली -( तिला आडनाव, पत्ता काही लावत नाही अशीच हिची समजूत असावी!) शनिवारातून त्या नदीतल्या पुलावरुन आले झालं" आणि पुन्हा एकदा थंडीतल्या कोवळ्या प्रसन्न उन्हासारखी ती खळखळत हसली. तिच्या फुगर्‍या गालांना हसताना उजव्या बाजूला कळत न कळत खळी पडे. बीजेच्या चंद्रकोरी सारखी ती मन वेधून घेई आणि मग  मला प्रश्न विचारायला अवसरच न देता, खाकी जाड पिशवीतून एकेक पदार्थ काढत ती सांगू लागली. "हं हे रव्याचे लाडू. तुझ्या आवडीचे हा आमटीचा ताजा केलेला मसाला आणि हे पोह्याचे पापड (सोवळ्यात नेसून केलेत मी) सगळं नीट सांभाळ. स्वत: खा. नाहीतर टाकशील सगळे तुझ्या सख्यापार्वतींना वाटून.’ ती सांगण्याच्या ओघात होती माझे लक्ष खाद्यापेक्षा तिच्या निस्सीम वात्सल्याचा विचार करण्यातच गुंतले होते. आणि शाळेतल्या जीवनाच्या काळात सणासुदीला मी फार क्वचित स्वत:च्या घरात जेवायची त्याची आठवण येत होती. सरलाकाकी म्हणायची, "अगं दर सणावाराला कसली मैत्रिणीकडे जेवायला जातेस? असं लोकाकडे सारखं जेवण बरं दिसत का?" पण या अशा माईला लोक तरी कसं म्हणावे?  सण चार-आठ दिवसांवर आला की हिचे फर्मान सुटायचे "अहो म्हटले नारळीपौर्णिमेला इथं जेवायला यायचंय. विसराल नाही तर." तिचा प्रेमाचा घस्सा झालेला असला म्हणजे ती मुद्दाम मला ‘अहो जाहो’ करायची. तिच्या स्वरातला तो रुसवा, तिचे निष्कपट हसणे, एखाद्या कंपासने काढावा तसा वाट्टोळा गोल चेहरा, तिच्या तोंडातून बाबांना उद्देशून येणारे ‘ह्यांनी’, ‘मंडळी’ असे बेलबुट्टीदार उखाण्यासारखे शब्द व "कार्टी अजून कशी उगवली नाही," अशी वाक्ये ऐकण्यासाठी माझे मन, कान ही आतुर असायचे. गाण्यांत जसे ध्रुपद, तसे तिच्या बोलण्यात हे शब्द येत. या संगीताला प्रसंगी पाठीवर झणझणून वाजणारा धपाट्याचा तालही साथ करी.

माझ्या मैत्रिणीचे म्हणजे ‘मधुमती’चे घर माझ्या घरापासून शंभरदोनशे पावलांवर एका बोळाच्या तोंडापाशीच होते. इंग्रजी पाचवीत मी प्रथमच मुलांच्या शाळेत दाखल झाले होते. सोलापूरसारखे शहर, शाळा अपरिचित त्यामुळे एखादी जवळची सोबत शाळेला जाताना मिळाली तर मी बघतच होते. ती मधुमतीच्या रुपाने अनायसे मिळाली. शाळेला जाताना कधी तिची नऊवारी साडी नीट नेसून व्हायची असायची म्हणून तर कधी तिची अबोलीची वेणी आंब्याड्यावर बांधणे चाललेले असायचे म्हणून पाचचार मिनिटे तिच्या घरी थांबणे व्हायचे. या थांबाथांबीत मधुमतीपेक्षा माईची आणि माझीच गट्टी जास्त जमली. ‘माझी माई’ मधुमतीच्या बाबांची दुसरेपणची बायको. सोलापूरच्या जुन्या देशस्थ वळणाच्या घरातली. भावंडातली एकटीच बहीण! लाडकी! माईचा वर्ण तकतकीत काळा,  उंची बेताची, शिक्षण जेमतेम मराठी लिहिण्यावाचण्या इतपत, बाबांचा व्यवसाय वकिलीचा, भरभराटीत चाललेला, ऐसपैस तीन मजली भक्कम पण जुन्या वाणाचे घर, सोने - नाणे ऐवज भरपूर, कशाला काही कमी नाही हे पाहून त्या दोघांच्या वयातल्या फरकाकडे तिच्या पालकांनी कानाडोळा केला असावा आणि माईला तिथे दिली असावी. माझी आठवण बरोबर असेल तर तिच्या वयाच्या आगेमागे वयाची पहिली दोन मुलेही  बाबांना होती. पण आमचा हा राजा प्राणी या घरात सदैव आनंदात राहिला. बाबांचा स्वभाव - आपण बरे मी आपले कोर्ट बरे - असा असे. उरलेला बहुतेक वेळ दुसर्‍या मजल्यावरील आपल्या खोलीत ते देवदेव करण्यात घालवीत अन्‌ अगदी अखेरपर्यत माझी माई एखाद्या बालवयाच्या मुलाप्रमाणे कुतूहलाने आणि कौतुकाने, अभिमानाने त्यांच्या अवतीभवती भिरभिरत राही. आता काय त्यांना गंध उगाळून दे, मग काय फुलांचा हार करुन दे. बाबांचाही माईवर फार जीव असे. एखाद्या खटल्याची हकिकत असो की मुलांच्या अभ्यासाबद्दल बोलणे चाललेले असो. बाबा तिला शाळकरी मुलाला सांगावी तशी न कंटाळता तपशीलवारपणे ममतेने समजावत.

एक दिवस, संध्याकाळच्या ऐवजी मी दुपारी अडीचच्या सु्माराला मधुकडे गेले. पण तळमजल्यावर माईची कुठेच जाग दिसेना म्हणून मी तिला शोधायला माडीकडे वळणारा एवढ्यात तीच अरुंद जिन्याने घाईघाईने येताना दिसली. तांबड्या गडद रंगाची ठिपक्याठिपक्याची चोळी आणि हिरवेगार प्रिंटेड नऊवारी पातळ ती नेसली होती. अंगावर भरपूर सौभाग्यलंकार तिने घातलेले होते. मानेशीच घातलेल्या चिमुकल्या घट्ट आंबाड्यावर लाल कण्हेरीचे किंवा असलेच कोणतेतरी फारसे प्रसिध्द नसलेले फूल पानासकट खोवलेले दिसता होते. कपाळावर ठसठशीत कुंकवांचा गोल होता आणि पायात त्यातल्यात्यात फॅशनेबल अशा तपकिरी रंगाच्या चपला तिने घातल्या होत्या. हा सगळा गडद थाट आपल्या तकतकीत काळ्या वर्णाला शोभतो की नाही असला विचारही या    मनस्क जिवाला शिवला नसणार ! "मला आवडले - नेसले! हवेसे वाटले घातले" हा तिचा खाक्या!

"कुठं निघाली हो बाईसाहेब, आपली स्वारी ? एवढी शान करुन?’  मी ( बहुदा तिला नको असावा तोच) प्रश्न अडमडत विचारला. "हे काय केलेनीस तू?  कार्टीने नको तो प्रश्न विचारला." बाहेर निघालेल्या माणसाला ‘कुठे जातोस’? हा प्रश्न विचरायचा नसतो हे शास्त्र (?) सुधारक घरात वाढलेल्या माझ्यासारखीच्या कुठले लक्षात रहायला? माईने उगीच पाच पावले मागे परतल्यासारखे केले. जेवण घरातल्या प्रशस्त, सुबक लाकडी झोपाळ्यावर ती जरा टेकली, मलाही आपल्या उजव्या हाताला तिने मला बसवून घेतले आणि हातातल्या गोठपाटल्या मागेपुढे सरकवत सांगू लागली. "शेजारची पोरं निघाली आहेत इंग्रजी सिनेमाला. ते लारील-हार्डी बये नाहीत का हसवणारे त्यांचा हा म्हणे सिनेमा. मी ह्यानला म्हटले मी ही जाते मुलां बरोबर,  ह्यांनी म्हणालं (ही खास माईची बाबांबद्दलची आदरार्थी खास रचना) तुला इंग्रजी कसे कळणार. तू कंटाळशील.  मी म्हटले नाही कळलं इंग्रजी तर न कळेना. सगळी पोरं हसली म्हणजे मीही हशीन!"  या तिच्या उत्तराने मात्र मला हसू अवरेना, त्यावर माझ्या पाठीत धपाटा घालून म्हणते कशी, "उगीच फिसफिस करीन हसतीस कशाला गं? तूही चल मग माझ्या बरोबर नि सांग मला सिनेमा समजावून." आणि मी होय नाही म्हणण्यापूर्वीच ‘आले रे आले’ अशी मुलांच्या हाकेला ‘ओ’ देत, त्यांच्यापेक्षा अधिक उत्साहाने सैल चपला रस्त्यावर कांहीशा फरपटवीत हौशीमौजीने ही निघाली. बाबा बाल्कनीत उभे राहून मोठ्या कौतुकाने तिच्याकडे पाहात होते आणि चालताना मागे वळून वळून ही तीन तीनदा त्यांना बजावत होती. "चुलीच्या कट्ट्यावर उपासाची खिचडी ठेवली आहे. दही घालून ती खायला विसरु नका बरे!"

माईच्या या सिनेमाला जाण्यावरुन सहज आठवले म्हणून सांगते. तिच्या बरोबर पत्ते खेळायचे म्हणजे एक मौजच असायची ! ब्रीज, नॉट अट होम इत्यादी वेळ आणि डोकेखाऊ खेळाच्या वाटेला ती कशाला जातेय? पण झब्बूचा डाव बरीक तिला आवडायचा. गड्डा झब्बू खेळताना ती खूपच रंगून जायची. गठ्ठाच्या गठ्ठा पाने प्रतिपक्षाला झब्बू म्हणून द्यायची संधी मिळाली की म्हणायची "हा मनीचा, घ्या म्हटलं हा अहेर..लग्नात द्यायचा तो दुसरा देऊ वेळ आली म्हणजे. पण तूर्त हाच घ्या!  आणि डोळ्यात पाणी येईतो खो खो हसायची.  पण पाच तीन दोन खेळताना मात्र हिची पाने ओढायची पाळी आली की ही हिरमुसली व्हायची. विशेषत: हुकमाचा एक्का आणि तोही चुकून मी म्हटला तर पळभर माझ्या भलेपणावरचा तिचा विश्वासच जणू संपून जायचा. ती एक सुस्कारा टाकी, तो सुचवी, "कार्टे ऽऽ तुला सुध्दा नाही, ना दया माझी?"

यथाकाळ माझी शाळा संपली. कॉलेजसाठी सांगली-पुण्याकडे मी जाण्याच्या गोष्टी सुरु झाल्या. तशी हिची माया दिवसगतीने वाढूच लागली. मग कधी ती बाबांच्या फुलांच्या परडीतली चार टपोरी सुवासिक फुले माझ्या अंगावर जास्तीची फेकून म्हणे. "हं घे आहेस इथे तंवर. घे हो."

एक दिवसं तर गंमतच झाली. काही कामानिमित्ताने मी सोलापूर सोडून सुमारे आठवडाभर बाहेर गावी गेले होते. परत आल्यावर पाच मिनिटे तरी हिला भेटून यावे. उगीच काळ्जी करीत बसेल इतके दिवस का लागले म्हणून  या विचाराने मी हिच्याकडे गेले. वेळ संध्याकाळची दिवे लागणीची. स्वयंपाकघरात उजेड होता. पण जेमतेमच, चुलीच्या घराचा किंचित कडवट धुरकट वास बाहेर जाणवत होता, गेली असेल जवळच कुठंतरी कामानिमित्त म्हणून मी परत फिरण्याच्या विचारात होते तेवढ्यात हिचा आवाज ऐकू आल्याचा भास झाला म्हणून त्या धुरातूनच मी वाट काढत आत स्वयंपाकघरात जाते तो डाव्या हाताने पदराने डोळ्यांच्या कडा टिपत आणि हातात कडबू घेऊन ही बोलत होती, "माया मोठी वाईट असते बाई. आमच्याच मुलांसारखी वाटतेस तू. आता गेलीस बोर्डिंगात शिकायला म्हणजे कोण घालणार कडबू बिडबू तुला खायला?" मी जवळ जाऊन पाहते तो हिचे बोलणे चालले होते एका फोटो बरोबर. तो मधुमतीला मी दिलेला माझा झग्या-परकारातला फोटो होता. मी पाठीमागून जाऊन तिचे भिजलेले डोळे झाकले ते झाकतना माझेही डोळे भिजलेत हे तिला कसे कळणार? तिच्या कानाशी तोंड नेत मी म्हटले, "माई, किती किती वेडी आहेस तू" पण मनात मात्र म्हटले ही जन्मभर अशीच वेडी राहू दे.

योग्य वेळी मी माझ्या नोकरीच्या व्यापात पडले. मधुमती, तिची भावंडे यांची लग्ने होऊन माईही आजी झाली. तिची आठवण मनात सदैव असे, पण गाठभेट तशी दुर्मिळच होत चालली होती. माईशी माझा पत्रव्यवहार चाले, पण बहुश: तो एकतर्फीच. तिचे उत्तर यायचे, कधीतरी बाबा तिला जवळ बसवून अधून-मधून तिच्या लिहिण्यावाचण्याची रिहर्सल घेत. पण पत्रलेखन एकूण तिला कष्टदायकच होई. सक्रांतीचा तिळगूळ ती आवर्जून पाठवी. त्याबरोबर पत्रही येई. दोन ओळी पठ्ठीने कागदावर पेन्सिलीने आखलेल्या असत, त्यावर लिहिलेले असे "चि. बाले मालूस" त्यात ‘बा’ चे पोट सुटलेले तर ‘लू’ अगदी रोडलेला दिसे. इतरांकडून पत्र लिहवून घेणे तिला एकदम नामंजूर असे. अधून-मधून (बहुदा तोंडाला रबर लावून) मजकुराची खोडाखोड आढळे. त्यामुळे क्वचित कागद काळा झालेला तर क्वचित फाटलेलाही असे. पत्र लिहायला घेतल्याची तारीख आणि संपल्याची तारीख यात चार-आठ दिवसांचे अंतरही कघी कधी पडे पण तिच्या हाताचे ते पत्र यावे म्हणून मी वाट पाहत राही. गुरुचरित्र, सत्यनारायण कथा ती गोडीनं ऐकत असे. मासिकांतल्या मात्र फक्त कथांचीच पाने तिने वाचलेली असायची. इतर पाने फाडलेलीही नसायची. एखाद्या दिवशी आपण जावे तर ताज्या खाऊची वाटी समोर लगेच येई.  पण हिचा मूड गेलेला दिसे. मग मी विचारी, "माईय, तू आज गप्पगप्प का गं? बरं नाही का तुला?" की हिने सुस्कारा टाकत दोन मिनिटांनी म्हणावे, "काय तरी मी म्हणते एकेक आईबाप तरी असतात ! देऊ नये का त्यांनी आपल्या कुमुदचे त्या धनंजयाबरोबर लग्न लावून! म्हणजे पोरीनं विहीर तरी नसती जवळ केली!" मला वाटे हिच्या कोणी परिचित घरच्या मुलीने प्रेमभंगापोटी आत्महत्या केली असावी, त्याची हकिकत सांगते आहे वाटते ही! म्हणून मी खिन्नपणाने प्रश्न करी, "काय आडनाव तिचे?  ओळखीची होती का तुझ्या?" की ही उदासवाणेपणेच म्हणे, "आलीय की तुमच्या ‘स्त्री’  मासिकातच ही गोष्ट ! त्यातल्या ‘कुमुद’ बद्दल बोलतेय मी!" काल्पनिक पात्राच्या सुखदुखातही इतकी विरघळून जाणारी माई - माझं एक मन हसे आणि दुसरे - हिचे कसे होईल पुढे या विचारांनी कासावीसही होई-

सांगलीत बाबा माई मुद्दाम माझ्या कडे आले होते. कोल्हापूरच्या महालक्षीच्या दर्शनासाठी ते गेले होते, तेव्हा परतीच्या वाटेवर उतरले होते, नऊवारी साडी नेसून, सोवळ्यात स्वयंपाक तोही चटण्याकोशिंबिरीसह करुन मी वाढल्याने माईकडचा माझा भाव कितीतरी वधारला असल्यास काय नवल? मी कॉलेजला निघाले, बाबा म्हणाले, "मी पडतो घरीच", पण ही लफ्फेदार इरकली लुगडे नेसून तयार!  "मला बघायचे आहे तुझे कॉलेज" माई म्हणाली. यावर मी काय बोलणार? मी तास संपवून येईतो ही आमच्या कॉमनरुम मध्ये आराम करीत बसली होती, पुस्तकांची कपाटे, कॅलेंडरे बघत. परत येताना कॉलेजचा गडी (बहुदा त्याला माझ्याकडून उसने पैसे हवे असतील!) वह्यांचा गठ्ठा घेऊन घरापर्यंत येताना पाहून हिला वाटले असावे, "कार्टी चांगली अधिकारीण दिसतेय. मागे गडीबिडी येतोय तो काय उगीच?"  रस्त्याने हा बंगला कुणाचा, तो दवाखाना कुणाचा, असे हिचे प्रश्न चालू होतेच. घर जवळ येताच एका बाजूला मला बोलावून, आवाज बराच खाली आणून तिने मला विचारले, "ह्यांना आवडत नाही असलं काही विचारलेलं, म्हणून इथंच विचारते. पगार किती मिळतो तुला?" तिने हाताची चार बोटे खुणेसाठी पुढे धरली. मी सांगितलेला आकडा फारसा समाधानकारक वाटला नसावा. पण बाहेर तसे न दाखविता म्हणाली, "असेना, असेना, तितका का असेना, पण कय गं - नाही म्हणजे आता तुझं शिक्षण झालं, नौकरी लागली, आता जावईबापू कधी यायचे आम्हाला? का तुझी ती किरिस्तॉव मैत्रिण - घर-मालकीण – काय नाव तिचे? हं हं ज्यूलिया ना ? तिनंच बघितला ना एखादा किरिस्तॉव तुझ्यासाठी?" आणि दोन मिनिट स्वत:शीच विचार केल्यासारख दाखवून म्हणाली, "तसल कांही करु नको होऽऽ पण काय नेम सांगायचा तुम्हा तरुण मंडळींचा? तसले काही केलेसच तर तेही करुन घेईन गोड! काय करणार ? पण मग त्याला धोतर नेसून सत्यनारायण करायला लावीन हं. काय सांगते!" मी तिच्या या विषयाला पूर्ण बगलच  दिली. त्याने मात्र ती फार खट्टु झाली.

आपला मुक्काम संपवून बाबा-माई निघाले. त्यांची गाडी दिसेनाशी होईतो मी त्यांच्याकडे पाहात होते. बाबा खूप थकले होते. सावलीसारखी त्यांच्या बरोबर असणारी माई - तिचा निरोप घेताना मला वाटले पुन: ही दोघे भेटतील का? कधी भेटतील? माईने कपाळाला लावलेला अंगारा चाचपीत मी तिला नमस्कार केला- आणि तिचा निरोप घेतला.

वर्षानेच पुढे बाबा गेले. माईसाठी माझा जीव फार कळवळला त्यानंतरच्या भेटीत ती पार बदलून गेलेली दिसली. खूप रोडावलेली, अंगावरचे पांढरे डाग वाढलेली, फुगरे - हसरे गाल आणि डोळे एकदम कोमेजलेले. मला पाहताच गळ्यांत हात टाकून म्हणाली, "बघ यांनी मला फशिवले नि म्हणायचे, मी तुला कधी अंतर देणार नाही."

त्यानंतर माईची प्रत्यक्ष भेट दिवसात झाली नव्हती. पण बर्‍याच एक दिवस मला ती स्वप्नात दिसली. आजारी, अशक्त अशी. पुन:पुन्हा मला म्हणत होती, "इतक्यांदा बोलावणी पाठवली पण आत्ता यायला फावलं होय तुला? फार उशीर झाला गं, कार्टे" मी दचकून जागी झाले. स्वप्नबिप्ने शकून - अपशकून असल्या गोष्टींवर विश्वास ठेवणार्‍यांपैकी मी नव्हे. पण माझे पुढेचे दोन दिवस मात्र अतिशय बेचैनीत गेले - आणि अकस्मात तिच्या मुलाचे पत्र आले. त्यात माई गेल्याचीच वार्ता होती. मी सुन्नपणे किती वेळ तरी ते पत्र घेऊन कपाळाला हात लावून बिछान्यात पडून राहिले. त्यानंतर कुठून कळले त्याचा मतितार्थ इतकाच की माईला तिचे वृध्द्पण अनेक दृष्टींनी मनस्तापाचे अन्‌ शारीरिक क्लेशांचेच झाले!

वर्षा दोन वर्षापूर्वी प्रवासाला मराठवाड्यात मी गेले होते. अकस्मात माईला ओळखणार्‍या, तिच्या विशेष स्नेहातील एक बाई प्रवासात भेटल्या. बोलता बोलता त्या म्हणाल्या, "तुम्हीच का त्या मालूताई? पाचशे वेळा की हो त्या म्हणाल्या, "मला कार्टीला - मालीला बघू वाटते एकदा!"  "कशा नाही आलात तुम्ही?" मला राहवले नाही. मी किंचित उत्सुकतेने म्हटले, "अहो, मला एका अक्षराने जर कळते की माझी माई आजारी आहे. अमूक ठिकाणी आहे, तर मी पंख लावून आले असते हो भेटायला" - मला भावनावेग आवरलाच नाही. मी आकाशाकडे हात जोडीत म्हटले, "माईय, तू रागावलीस माझ्यावर? खरं सांग, रागावलीस" आणि स्वत:शीच म्हटले, "एक देवाघरचा प्रेमळ जीव देवाघरी गेला!"

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color