स्वागतकक्ष arrow इ-प्रकाशन arrow मी पाहिलेल्या सौ. उषाताई
मी पाहिलेल्या सौ. उषाताई पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

मी पाहिलेल्या सौ. उषाताई

‘कोल्हापूर’ मला खूप आवडते. तिथले प्रशस्त, देखणे ‘महालक्ष्मी’ चे देवालय, तिथली बहुरंगी बाजारपेठ. तिथली अभिजात कलासंपन्नता, तिथला रम्य निसर्ग या आणि अशाच कितीतरी गोष्टी कुणालाही आवडाव्यात अशाच आहेत. त्यांत मोठीच भर पडली ती तीर्थरुप भाऊसाहेब खांडेकर तिथेच रहायला आल्यामुळे! भाऊंच्या भेटीसाठी माझे मन फार उत्सुक असे. अनेक विषयांवरचे भाऊंचे मूलगामी, भावोत्कट आणि सखोल असे चिंतन ऐकणे, हा एक अपूर्व आनंदाचा अनुभव असे. त्यांचा वत्सल हात पाठीवरुन फिरला की जणू सार्‍या दु:खाचा विसर पडे. भाऊंच्या नावातच आमच्या प्रिय सौ. उषाताईही सामावलेल्या होत्या!

आमचे ‘विलिंग्डन’ महाविद्यालय येते शिवाजी विद्यापीठाच्या कक्षेत. मी ‘विलिंग्डन’ मध्ये शिकवीत असे. स्वाभाविकच विद्यापीठाच्या कामांनिमित्त वर्षातून अनेकवेळा कोल्हापूरला जाणे घडे. मी  बहुधा तीर्थरुप भाऊ-उषाताईच्या कडेच उतरत असे. आमच्या काकींकडून ‘खांडेकर’ घराशी नातेही होते.

दरवाजावरची घंटी मी वाजवली की मंदा-लता किंवा त्या बहिणीपैकीच आणखी कुणीतरी दार उघडायला येत असे. कधीकधी तीर्थरुप भाऊंचीही तिथेच गाठ पडायची. ते हसतमुखाने म्हणायचे, "याऽ याऽ मालूताई." मग घरांत जाऊन हातपाय धुऊन मी त्यांना नमस्कार करते तेवढ्यात सौ. उषाताईंची स्वयंपाक घरांतून हांक यायची, "मालूताई, कॉफी झाली आहे हं तयार. आंतच या ना, ती घ्यायला!" कॉफी घेतां मग, आमच्या दोघींच्या गप्पा सुरु व्हायच्या. उषाताईंचा पहिला प्रश्न असायचा, "कशी आहे हो आमची विमल?" - म्हणजे उषाताईंची सख्खी भाची. त्यांची विमल म्हणजे आमच्या सौ. वीणाताई कानेटकर ‘कवि गिरीशां’च्या मोठ्या सूनबाई! मग क्रमाने माई, गिरीश, नातवंडे सर्वांची खुशाली त्यांना सांगितली की त्या आपल्या कामाला लागत. त्यांच्याशी बोलतना माझी नजर त्यांच्या स्वयंपाकघरावरुन फिरत असायची! तिथल्या दुभत्याच्या कपाटापासून शेल्फावरच्या स्टील-पितळेच्या भांड्याकुंड्यांपर्यन्त सगळ्या वस्तु कमालीच्या व्यवस्थितपणे तिथे मांडलेल्या असायच्या. सगळ्या अगदी चकचकीत नि लखलखीत! घरात नव्याने येणार्‍याला वाटावे की जणू काही कालपरवाच या वस्तुंची खरेदी झाली असावी! पांढर्‍या शुभ्र मातीने सारवलेली पेटत्या निखार्‍याने छान लाल झालेली त्यांची सुबक आकाराची शेगडी आणि घाटदार स्टीलच्या भांड्यात तापत असलेले तिच्यावरचे दूध यांच्याकडे एखाद्या सुंदर चित्राकडे पहावे तशी मी पहातच रहायची! उषाताई बटाट्याच्या फोडी करोत की गोवारीच्या शेंगा निवडोत, सगळे अगदी एका आकाराचे असायचे! स्वयंपाकघराच्या भिंतीवर ना कधी हळदीचा किंवा तेलाचा डाग दिसायचा की नाही कधी दूधबीध जमिनीवर सांडले लवंडलेले आढळायचे! उषाताई साधी भाजी आणायला निघाल्या तरी त्यांच्या हातात पिशवी असायची ती सुरेख रंगाची, छान डिझाइनची नि चांगल्या पोताच्या कापडाची! जेवताना काय की एरवी काय कसे तरी पाय पसरुन कोणी बसले आहे, कुठेतरी वेडेविद्रे झोपले आहे असले काही त्यांना खपायचे नाही. मी पुष्कळदा हॉलमध्ये बसून भाऊंशी बोलत असायची. मध्येच कुठेतरी माझी खुर्ची असायची ! मग मी उषाताईंना गंमतीने विचारायची. "मी अशी मध्येच ठाण मांडून बसले आहे म्हणून तुमच्या घराची शोभा सगळी बिघडून गेली असणार ना? म्हणून रागावून,  खुर्चीसकट तुम्ही मला कोठीच्या खोलीतबिलीत नाही ना टाकून देणार?" त्यावर "काय बाई. तुमचे बोलणे तरी!" अशा अविर्भावाने त्या मनापासून हसायच्या. नीटनेटकेपणा, टापटीप, स्वच्छ्ता याचे त्यांना अतोनात वेडच होते! सौ. वीणाताई एकदा सांगत होत्या."मालूताई, मावशीच्या शिरोड्याच्या  घरी वाळवीचा फार त्रास होता. तेव्हा तिने काय केले तर नारळाच्या करंवट्या घासून त्यांना चांगला आकार दिला आणि त्या ट्रंकेच्या सगळ्या बाजूंना ठेवल्या. मग एकावर दुसरी त्याच्यावर तिसरी अशा ट्रंका तिने रचल्या." ही हकिकत ऐकताना माझ्या मनात आले भाऊंसारख्या प्रतिभावंत साहित्यिकाला अशी चतुर आणि कल्पक पत्नी मिळाली हा मोठाच योगायोग म्हणायचा!

उषाताई सुस्वरुप होत्या, उंच, भव्य, सुदृढ होत्या. गोर्‍या रंगाच्या होत्या. त्यांचे डोळे पाणीदार, नाक तरतरीत आणि चेहरा घवघवीत होता. आपल्या केसांचा त्या सुरेख आंबाडा घालायच्या! चापून चोपून नेसलेले नऊवारी लुगडे आणि त्यावर उत्तम शिलाईचा पोलका असा पोशाख त्या करीत. त्यांची कपड्याची निवड दर्जेदार असायची! कपड्याच्या रंगसंगतीने त्यांच्या उपजत रुपाची खुलावट व्हायची! गळ्यात मंगळसूत्र, हातात सोन्याचे बिलवर, त्यात मध्ये काचेच्या बांगड्या व कानात टपोर्‍या मोत्यांच्या कुड्या असे मोजके अलंकार घालीत.(मला आत्ता नीट आठवत नाही पण त्यांच्या हातात अंगठीही असायची असे वाटते!) त्या चष्मा सोनेरी काडीचा वापरत. अशा सगळ्या पेहरावाने त्यांचे व्यक्तिमत्व – काहीसे गंभीर, मनात थोडा दरारा निर्माण करणारे असे वाटे. भाऊंचा स्वभाव खूपच बोलका होता त्या मानाने त्या अबोल भासत. अनेकांचा अभिप्राय त्या रागीट किंवा उग्र प्रकृतीच्या होत्या असा आहे. हे मला माहिती आहे. पण त्याची लहानशीही झळ माझ्या कधीच अनुभवाला आली नाही.

उषाताईंचे माहेर बेळगांव जवळ ‘असोगा’ गावचे! ‘मणेरीकरांकड’चे! ती मणेरीकर मंडळी कामाला वाघ, प्रकृतीने बळकट आणि कमालीची आतिथ्यशील म्हणून प्रसिध्द होती. उषाताईंनी हा वारसा समृध्द केला. त्यांच्या शालेय शिक्षणाची मला काही कल्पना नाही पण पाकशास्त्रात मात्र त्या अगदी पारंगत होत्या. फर्स्ट क्लास वुईथ्‌ डिस्टिंग्शनच म्हणायला हवे! खोबर्‍याच्या वड्या असोत की मटारचे सामोसे असोत सर्व पदार्थ एकदम फर्मास चवीचे असायचे. ‘ट्रे’मध्ये वड्या ठेवलेल्या असल्या, तर त्या  अगदी सारख्या कापलेल्या असायच्या. एकच वडी खाल्ली तर ट्रे मधले डिझाईन मोडेल म्हणून खाणारा दुसरीही वडी मटकावून टाकायचा! भाऊ शिरोड्याला असोत की कोल्हापूरला! त्यांच्याकडे अखंडच माणसांचा राबता चालायचा! शाळेच्या पुस्तकात भाऊंचा धडा आहे म्हणून त्यांना पहायला-येणार्‍या शाळकरी विद्यार्थ्यापासून, तामिळी, हिंदीत भाषांतरित झालेल्या कादंबर्‍या वाचून खूष झालेल्या वाचकांपर्यंत सार्‍यांची तिथे ये-जा चालायची! स्थानिक कार्यकर्ते, साहित्यिक हे आणखी वेगळ्वच! भाऊंप्रमाणेच उषाताईही येणार्‍या सर्वांचे हसतमुखाने स्वागत करीत. माझ्यासारखे सामान्य माणूस गेले तरी उषाताई त्याची आवडनिवड आवर्जून लक्षात ठेवायच्या. मी पानवर बसले की माझ्याजवळ येऊन म्हणायच्या, "तुमच्या आवडीचे डाळमेथ्याचे वरण केले आहे - मुद्दाम आज. झणझणीत मिरची नि लसूण यांची फोडणी दिली आहे त्याला. भाकरीपण केली आहे. आतां पोटभऽऽभर जेवा हं." मी सांगलीत नोकरीच्या निमित्ताने एकटीच राहते, प्रसंगी मला खाणावळीचे अन्न जेवावे लागते हे त्या विसरायच्या नाहीत. खूप आग्रह करुन खाऊपिऊ घालायच्या! माझी आईही उषाताईंसारखीच देखणी, सुगरण  आणि आग्रह करणारी होती! उषाताईंच्या हातचे जेवण जेवताना तिची मला पुन्हापुन्हा आठवण यायची! आतां दोघीही नाहीत उरली फक्त त्यांची आठवण! ती मात्र अगदी ताजी आहे मनात!.

उषाताई बघावे तेव्हा काहीना काही प्रापंचिक, सांसारिक कामात गुंतलेल्या असायच्या! आपल्यासारखे इतरांनीही स्वच्छ व नीट काम केले पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असायची! (त्यांच्या सगळ्या कन्या त्यांच्या सारख्या गृह्कृत्यदक्ष आहेत म्हणून बरे!) पण आजकालच्या नोकरांपासून या अपेक्षा पुर्‍या होणेच अशक्य! हा अनुभव तर आपण सगळे कमी जास्त प्रमाणात घेत असतोच की! नऊ वाजताचा सकाळचा चहा झाला की कपबशा रोज साबणाने, राखेनेच घासायच्या. अंथरुणे पांघरुणे अमुक रीतीनंच रचायची, असले उषाताईंचे कायदेकानू त्या चाकरबाया काय पाळणार? त्या थोडे दिवस काम करायच्या नि मग परागंदा व्हायच्या! पण उषाताई काही कच्च्या गुरुच्या चेल्या नव्हत्या! त्या बिलकूल त्यांना धूप घालायच्या नाहीत. त्या स्वत: कंबर कसून अंग मोडून काम करायच्या! हे सारे पाहून माझ्या मनात येई, संसारातली प्रत्येक बारीकसारीक गोष्ट इतक्या कटाक्षाने, शिस्तीने करण्याच्या उषाताईंच्या स्वभावामुळे त्यांना भाऊंच्या कथा कादंबर्‍या वाचायला वेळ किती मिळाला असेल? कधी मिळाला असेल? माझी एक मैत्रीण एकदा म्हणाली, "उषाताई भाऊंना म्हणतात (म्हणे!) तुमची पुस्तके जशी तुम्हाला, तशी माझी भांडीकुंडी मला!"  आणखीही एक मला वाटते ते असे की सतत या पद्धतीने जगल्यानेच तर त्यांना रक्तदाबाचा विकार जडला असेल काय? (अखेरी त्या रक्तदाबानेच त्यांचा बळी घेतला!) पण मी काही वेळ हा विचार मनावेगळा करुन उषाताईंबद्दल विचार करते तेव्हा माझ्या लक्षात येते की उषाताईंसारखी खंबीर, प्रपंचकुशल, संसार खबरदारीने चालवणारी पत्नी भाऊंना लाभली ही देवाची कृपाच म्हणायला हवी. कारण भाऊंची प्रकृती आयुष्यभर तोळामासा अशीच होती! अधू डोळे, फ्ल्यू, फुरशांचे अंगात भिनलेले विष, यांचा त्रास तर सततच त्यांना व्हायचा! अशा स्थितीत एखादी सामान्य कुवतीची स्त्री भाऊंच्या नशिबी आली असती तर...? हे लिहितांना एक प्रसंग मला आठवला म्हणून सांगते. माझे आजोबा, किर्लोस्कर कारखान्यांचे संस्थापक ती. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या पहिल्या पुण्यतिथीला प्रमुख पाहुणे म्हणून तीर्थरुप भाऊ किर्लोस्करवाडीला आले होते. त्यांचे भाषण नेहमीप्रमाणेच विचारप्रवर्तक व हृदयस्पर्शी झाले. कार्यक्रम संध्याकाळी होता. तो आटोपल्यावर माझे वडील भाऊंना म्हणाले, "भाऊसाहेब आज रात्री आपण इथे, आमच्या वाडीतच मुक्काम करावा अशी आमची सर्वांची फार इच्छा आहे. रात्रभर विश्रांती घेऊन सकाळी आपण मोटारीने गेलात - ती सर्व व्यवस्था केलेली आहे. - तर प्रवासाचा फार शीण आपल्याला होणार नाही." त्यावर भाऊ मृदुपणाने म्हणाले, "शंकरराव, मी आनंदाने तुमच्या म्हणण्याला ‘हो’ म्हटले असते. पण मी आत्ता गेलो नाही तर घरी उषा रात्री मला सोडून जेवणार नाही. म्हणून मला आजच जायला हवे. राग मानू नका." भाऊ त्याप्रमाणे गेलेही. पण त्यांचे बोलणे ऐकताना माझ्या मनात येत होते. पतिपत्नींच्या नात्याचे हृदयंगमपण म्हणतात ते हेच! आणि माझे डोळे एकदम ओलावले!

उषाताईंच्या आणखी एका स्वभावविशेषाचा मला फार आदर करावासा वाटतो. तो हा की परिस्थिती कशीही येवो तीत त्या समाधानाने जगल्या, शिरोड्यासारख्या कोकणातल्या एका खेड्यात भाऊंप्रमाणेच त्यांनीही खडतर, कष्ट्मय जीवनाचे चटके बिनतक्रार सोसले. अविनाशने मला एकदा सांगितले, "आमच्या आईला, शिरोड्यात प्रसंगी गाडग्यामडक्यात स्वयंपाक करावा लागला आहे, मालूताई" पुढे परिस्थिती बदलली, अनेक प्रकाराचे वैभव त्यांना लाभले, सुबत्ता आली, तीर्थरुप भाऊंना अनेक उत्तम मानसन्मान लाभले पण त्यामुळे उषाताई बदलल्या नाहीत. मी एवढ्या थोर साहित्यिकाची पत्नी म्हणून त्या कधी मिरवल्या नाहीत. उतल्या नाहीत, मातल्या नाहीत की कुणाची अवहेलना त्यांनी केली नाही! ही काय सोपी गोष्ट आहे? खूपदा माझ्या मनाला वाटते, भले जागतिक कीर्तीचे देशभक्त, विद्वान, लोकमान्य टिळक असोत की भाऊंसारखे सरस्वतीचे निष्ठावंत थोर उपासक असोत, आपला समाज पुरुषांचा गौरव तोंड भरभरुन करतो पण अशा कर्तृत्वान पुरुषांमागे एक समर्थ स्त्री उभी असते याची आठवण आमच्या समाजाला कितीशी असते? या थोर मंडळींना सांभाळायचं, जपायचं, त्यांचा ध्येयवादाचा अंगार अथवा प्रतिभेचा नंदादीप फुलवत रहायचा, त्यांच्या अंगीकृत कार्याला आवश्यक ते बळ, उत्तेजन देण्यासाठी आपल्या अंगच्या अनेक गोष्टीचे समर्पण करायचे ही केवढी अवघड, केवढी मोलाची गोष्ट आहे! या स्त्रियांचे आपण सदैव ऋणी राहिले पाहिजे असे आमच्या समाजाच्या कधी मनात येते का?

उषाताईची आणि माझी शेवटची भेट, तिला मी भेट तरी कसे म्हणू? मी त्यांना ‘पाहिले’ इतकेच म्हणणे यथार्थ होईल! झाले काय, एके दिवशी दुपारी मी जेवायला बसले असताना माझे एक स्नेही माझ्या घरी आले आणि घाबर्‍याघाबर्‍या मला सांगू लागले, "भाऊंच्याकडची वार्ता ऐकलीत का तुम्ही? भाऊसाहेब खांडेकर मंडईत गेले असता खाली पडले नि त्यांच्या डोक्याला टके बसले आहेत म्हणे! बातमी ऐकून माझ्या काळजात चर्रर्र झाले. मी तशीच उठले नि धावतच एस्‌.टी. स्टॅंड गाठला! कोल्हापूरला आपण कधी पोहोचतो नि तिथे कसले ताट आपल्यासाठी वाढून ठेवले आहे या विचारांनी मला चैन पडेना. भाऊंच्या घराची घंटी मी वाजवल्यावर भाऊच दरवाजांत उभे राहिले! माझ्या तोंडून प्रथम शब्दच फुटेना. कसेबसे स्वत:ला सावरुन मी म्हटले, "भाऊ... तुम्हाला...." पण मला पुढे बोलू न देता भाऊ म्हणाले, "मालूताई, आधी आत या, थोडा विसावा घ्या. हे बघा, मी नव्हे पण उषा फार आजारी आहे. दोन तीन दिवस झाले ती  बेशुध्दच आहे." मी तडक उषाताईंच्या खोलीत गेले त्यांच्या बिछान्याजवळ बसले. भाऊ व्याकुळ मनाने पण मोठ्यामोठ्यानें उषाताईना हांका मारीत होते. “उषाऽऽ, उषाऽऽ बघ इकडे, मालूताई आल्या आहेत. डोळे उघड उषा ऽ ऽ .... पण काही ऽ प्रतिसाद नाही. उषाताईंना कशानेही जाग आली नाही. संध्याकाळपर्यंत मी भाऊ व कुटुंबियासमवेत उषाताईंच्या जवळ बसले होते. नंतर मी भाऊंना विचारले, मी राहू का दोन दिवस, तुमच्या सगळ्यांच्या मदतीला? भाऊ उदासपणे म्हणाले, "नको, तशी गरज वाटली तर मी जरुर कळवीन तुम्हाला, तुम्ही मात्र लगेच निघा आता. अंधार होण्यापूर्वी सांगलीला पोचायला हवे तुम्ही." तसल्या सचिंत मन:स्थितीतही भाऊ माझ्या सुरक्षिततेची काळजी करीत होते. त्यांच्या या पितृवत्सल मनाने माझ्या घशात दाटून आले. मी भाऊंना नमस्कार केला, उषाताईंकडे एकवार पाहिले. "लवकर बर्‍या होऊ देत उषाताई" अशी मनोमन प्रार्थना करुन विषण्ण मनाने मी कोल्हापूर सोडले.

पुढे लवकरच उषाताईंनी या जगाचा निरोप घेतला. भाऊ, मुले सर्वांनी त्यांची अहोरात्र केलेली सारी सेवा नियतीने व्यर्थ ठरविली! भाऊंच्या कोमल हळव्या मनावर आपल्या सहचारिणीच्या चिरवियोगाने वज्राघा

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color