स्वागतकक्ष arrow इ-प्रकाशन arrow देवाघरचा सोनचाफा
देवाघरचा सोनचाफा पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

देवाघरचा सोनचाफा

‘अंबु’ आमच्या घरी स्वयंपाक आणि त्याच्याशी संबंधित इतर वरकाम करीत असे. लहानपणीची कृश गव्हाळ वर्णाची अशी! तिच्या कपाळावरचे लहानसे हिरवे गोंदवण आणि दोन भुवयांमध्ये लावलेली ठिपक्यासारखी दिसणारी विभूती ही सुद्धा मला अजून चांगली आठवतात. चेहरा किंचित उभट, केसाचे वळण कुरळे, त्यातच ती लहानसा आंबाडा मानेलगत असा घालायची. तिचे लुगडे इरकली वाणाचे असे. रंग अंजिरी, राखी किंवा असाच थोडा गडदपणाकडे झुकणारा! लुगडे नेसायचे ते पाचवारीसारखे! त्याच्या पुष्कळ निर्‍या कमरेवर पुढच्या बाजूस खोचल्यासारखे होई. पायात चपला एखाद्या पट्टीच्या आणि वापरून वापरून झिजलेल्या अशा! जन्माने लिंगायत आणि बालवयातच वैधव्याचा शाप माथी लागलेली.

‘अंबु’ म्हणजे आम्हा भावंडांचे, घरातल्या शाळकरी मुलांचे विश्वासाचे, हक्काचे, भरपूर लाड करून घेण्याचे स्थान! भावंडांचे रुसवे-फुगवे झाले, हट्टी-कट्टी झाली म्हणजे अंबु हे आमचे एकमुखाने मान्य केलेले कोर्ट असायचे. तिच्या ममताळु, प्रेमळ शब्दाने प्रत्येकाला ती आपली ती फक्त आपली एकट्याचीच आहे असे वाटायचे आणि म्हणूनच ती आपल्या बाजूनेच न्याय देईल अशी खात्री असायची! अंबु निरक्षर, बालविधवा, आईवडील तर तिला आठवतही नव्हते. माहेरी परतल्यावर भावाच्याच घरी राहून तिने आपले आयुष्य काढले. तिच्या कष्टाळू स्वभावामुळे आणि गोड वाणीने त्या घरी सर्वजण तिला फार आदराने, मानाने वागवीत.

माझे आजोबा सोलापुरातले प्रख्यात डॉक्टर! आमचे तीन मजली प्रशस्त दगडी घर मेनरोडवर होते. तेथून आठदहा मिनिटांच्या  पायी अंतरावर मंडईकडे जाणारा रस्ता होता. त्या रस्त्यालगतच्या एका बोळात अंबुच्या भावाचे घर होते दोन खोल्यांचे. तिची भाची पद्मा फार गोड स्वभावाची आणि देखणी. अंबु फार शिकलेली नसली तरी तिला शिक्षाणाचे महत्व व मोल समजण्याची बुद्धी होती. तिने भावाला आग्रह करुन पद्माला शाळेत पाठवायला लावले. ‘सरस्वती मंदीर’ ही सोलापुरातली पहिली शाळा माझ्या आजीनेच स्थापन केलेली! ती आम्हा दोघींच्याही घरापासून जवळच असल्याने मी आणि पद्मा मिळूनच शाळेला जाऊ लागलो. दप्तरे गळ्यात घालून आम्ही निघलो की अंबु घराच्या दरवाजापर्यंत रोज पोहोचवायला यायची. "सांभाळून जा गं बाळांनो," असे म्हणायची. आम्हाला वाटे आम्ही मराठी दुसरीत आहे म्हणजे आम्ही मोठे नाही का झालो? आता कशाला एवढी काळजी करते ही? एखाद्या दिवशी घरातल्या कामामुळे तिला दरवाजापर्यंत यायला जमले नाहीतर मी रस्त्यावरून ओरडून तिला म्हणायचे, "अंबु, सांभाळून जातो गं दोघी शाळेला!" त्यावर ‘हां हां’ असा तिचा आवाज ऎकू आला म्हणजे बरे वाटायचे! एक दोन वर्षच मी तिथे शिकले असेन पण अंबुची पद्मा आणि तिचे घरकुल आता जवळजवळ चाळीस वर्षात दृष्टीस पडले नसले तरीही माझ्या मनात त्यांच्या आठवणी बत्ताशासारख्या विरघाळून अधिकच मधुर झाल्या आहेत.

अंबु सकाळी साडेआठच्या सुमारास येई. हातपाय धुऊन सगळ्या वडील मंडळींना वाकून नमस्कार करी. शंकरभाऊं (माझे वडील) च्या आत्याबाई व आमच्या शाळेत शिक्षिका असलेल्या सरस्वती काकी घरची सारी व्यवस्था पाहात. त्यांनी आदल्या दिवशी तिला मंडईतून आणायला सांगितलेल्या भाजीपाला, फळे किंवा मंडईजवळच्या दुकानातल्या वस्तू ती टोपलीतून-पिशवीतून काढून त्यांना दाखवी. हिशोब चोख! तो सांगून झाल्यावर स्वयपाकघरची शेगडी सारवून त्यावर डाळ शिजत लावी. आत्याबाई वृद्ध होत्या. त्या व्हरांड्यात वेताच्या खुर्चीत बसलेल्या असत. त्यांच्या जवळ जाऊन भाजीपाला स्वछ धुऊन घेऊन ती चिरत बसे. दोघींच्या काहीबाही गप्पाही हळू आवाजात चालायच्या. त्याकरिता त्यादिवशी खमंग काकडीसाठी काकडी चिरायचे कामही चालायचे. काकडी ती इतकी बारीक व एकसारखी चिरायची की, बघत रहावे. मग एका मोठ्या ताटात भाजी, कोथिंबीर, मिरच्या, लिंबू असे चिरलेले सर्व साहित्य व्यवस्थित मांडून पटापट शिजवून - फोडण्या घालून - पोळ्या लाटून ती स्वयंपाक करून मोकळी व्हायची. चव अशी लज्जतदार की काय सांगू! मुकुंद माझा सख्खा आणि मनोहर माझा सख्खा चुलत भाऊ आम्हा तिघांची शाळेची पंगत, डॉ. आजोबांच्या पंगतीच्या आधी व्हायची. मुकुंदा हाडाचाच गरीब, मनोहर खेळकर - चेष्टा करणारा. त्याचे माझे तुझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना अशा जातीचे दृढ प्रेम. मग ती मुकुंदाला आमची भांडणे थांबवण्यासाठी आमच्या दोघांमध्ये बसवी. मला डोळ्यांनी दटावून गप्प करी. प्रत्येकाच्या आवडीचा एकतरी पदार्थ लक्षात ठेवून करायची. मुकुंदाला म्हणायची, "मुकुंदा, तुमास्नी भरली वांगी आवडत्यात म्हणून ती भाजी केलीय. डावभर घ्या आणि आणखी!" मन्याला म्हणायची,"मनहर, कोशिंबिरीत खोबरे आणि कोथिंबीर हाय ना भरपूर ? भातावर घ्यायला दुधाची वाटी पन ठेवलीय. सावकश होऊ द्या!" मला पोळीला गोड लागते अगदी आजही. "अंबु मुरांबा वाढ की", असे काही माझे फर्मान सुटले की, ती समजावणीच्या सुरात सांगायची, "मालन, रोज रोज गोड नग खाऊस. त्यापरिस पालेभाजी, कोशिंबीर, पचडी जरा जास्त खा. दहीताक खा. रोज गोड खाऊन तुझे पोट रुसून बसेल एखाद दिवशी!" त्यावर अस्मादिकांचे गाल फुगायचे आणि फणफणत मी तिला म्हणायची, "माझ्या जेवणात तेवढ्या खोड्या शोधतेस तू! मुकुंदा-मन्याला असले काही सांगत नाहीस तू? बरोबर आहे ते मुलगे आहेत ना म्हणून तुझे लाडके आहेत. मी मुलगी म्हणून दोडकी आहे." त्यावर इकडे तिकडे कोणी वडीलधारी माणूसही नाही असे बघून ती म्हणायची, "मालन, तू लई द्वाड मुलगी हैस बघ." आणि गालातल्या गालात हसत स्वयपाकघराकडे परतायची. पण हीच अंबु मॅट्रिकच्या वर्गात मला वर्षभर अंथरुणात झोपून रहावे लागले तेव्हा कळजीने खंगली! आजाराला निमित्त झाले ते मी मैत्रिणीकडे नाशिकला गेले असता, गोदवरी नदीत तासभर पोहल्याचे. सोलापूरला परतले, तर अंगभर पांढरे शुभ्र फोड आले. त्यातून पाणी बाहेर येई. ते म्हणजे जहाल असिड बरे म्हणावे इतकी अंगाची आग करणारे! घरचे दारचे सर्व डॉक्टर्स झाले, पण निश्चित निदान होईना. दिवसाला प्रसंगी दोन दोन इंजेक्शने घ्यायची! रोज काकी मला स्नान घालायच्या. पण काही कामानिमित्त त्या बाहेर गेलेल्या असल्या तर अंबु ते काम करी. फार निगुतीने करी. कपडे अलगद हाताने काढायला मदत करी. पाणी मला सोसवोल इतकेच गरम आहे ना हे घंगाळात पुन्हा पुन्हा हात घालून पाही, कोमल हाताने पुसून कपडे चढवी. चुकून फोडाला धक्का लागला, तर होणार्‍या आगीने मी ओरडून रडून घर डोक्यावर घेई. तिचा जीव कानकोंडा होई. मग ती काहीशा अपराधी स्वरात म्हणे, "होय गं बाई, माझंच काही तरी चुकलं बघ.! जरा सोस बाळा, वाटेल हं तुला आता बरं!" आणि आपल्या कानाजवळ बोटे नेऊन, मोडून माझे शुभचिंतन करी. एरवी धांगडधिंगा करून घर डोक्यवर घेणारी मी दुखण्याने इतकी केविलवाणी झालेली तिला मुळीच पाहवायचे नाही.

मला बरे नसताना रविवारी डोक्याला चोळून हौशीने तेल लावून, नागरमोथा, गव्हलाकचरा घातलेल्या त्या सुगंधी शिकेकाईने मला न्हाऊ घाली. तिने हात अंगाला लावला की मला फार गुदगुल्या व्हायच्या नि फार हसू यायचे. मग थट्टेने अंबु म्हणायची, "उद्या दाल्ला आला म्हण्जे काय करशील गं?" त्यावर मी नाक उडवून म्हणायची, "इथे कोण बसलंय लग्न करायला? मी मुळीच करणार नाही लग्न!" त्यावर साईसारख्या मऊ स्वरात ती मला समजवायची, "मालन, बाईच्या जातीनं असं बोलू नये गं. जलमभर एकली कशी राहशील तू? आपलं एक घर हवं, घरात माया करणारा दाल्ला हवा. छोटुलं बाळ हवं." तिचे बोलणे ऎकताना माझ्या मनात पुन्हा पुन्हा येई, हिचे लग्न बालपणीच झालं. लग्नात नवरा पाहिला तेवढाच. जरा मोठी होऊन सासरी जायची तर कसल्याशा तापाने की कसल्याशा अपघाताने नवरा गेला. घरदार, नवरा, मुले ही तिची स्वप्ने फुलण्यापूर्वीच कोमेजली. ती स्वप्ने ती माझ्या जीवनात पाहात असेल का?

रविवरी शाळेला सुट्टी असायची. दुपारच्या खाण्याच्या वेळी माझ्या नव्यानेच सुरू झालेल्या इंग्रजी भाषेच्या वापराला पूर यायचा. इंग्रजीत बोलण्याचा पहिला प्रयोग अर्थातच अंबूवर व्हायचा. "अंबु ऽऽ वॉटर आण. वॉटर म्हणजे पाणी आणि अंबु म्हणजे पण पाणीच .म्हणून मी तुला वॉटर वॉटर इकडे ये म्हटले की यायचं बरं का!" कधी मी म्हणायची, "अंबु सॉल्ट आणि बटरमिल्क वाढ!" ती प्रश्नार्थक चेहरा करून उभी राहिली की हसून मुरकुंडी वळायची! तिचे खाणे-पिणे अगदी माफक, साधे सुधे. सर्वांची जेवणे झाल्यावर एकटीच जेवायची. दात जरा त्रास द्यायचे म्हणून डाव्या दाढेत घास घालून मग खायची. भातावर आपण दूध-दही घालतो तसा ती आंबरस घालायची! मला ते चमत्कारिक वाटायचे म्हणून मी  ‘ईऽऽ’ करून तोंड वाकडे केले की म्हणायची, "खाऊन बघ कसं झ्याक लागतंय ते मग पुन्हा पुन्हा मागशील."

उन्हाळ्याचे दिवस आले की पापड, लोणची, मेतकूट, मसाले यात तिचा सारा दिवस गुंतायचा पण आळसाचे नाव नाही. कामाची टाळाटाळ केव्हाच नाही. भित्री मात्र मुलखाची. अगदी सशाच्या काळजाची! माझे आजोबा टिकेकरवाडीला प्रत्येक रविवारी जात व मंगळवारी सकाळी साडेनऊला परत येत.  तिथे ‘शिवाजी मेटल वर्कस’ हा आजोबांनीच सुरू केलेला गरम झर्‍यांचा (बंब) कारखाना आणि दोन्ही काकांची घरे आणि आजोबांना विश्रांतीसाठी छोटसं घर. ते सणसमारंभ किंवा काही विशेष कार्यक्रम असला तर मदतीला अंबूला घेऊन जात असत. सोलापूर -टिकेकरवाडी अंतर पाच मैलाचे! वीस-पंचवीस मिनिटात घरचीच मोटार होती ती पोहोचायची. पण अंबूला मोटारीत बसायची भीती वाटायची. ड्रायव्हर आणि पाठीमागची बसायची गादी यांच्या मधल्या चिंचोळ्या जागेत दोन्ही गुडघ्यात मान घालून बसायची! त्यावर आम्ही मुले तिला चिडवून-भंडावून पुरे करायचो. त्यावर कोणी मोठ्या माणसाने आम्हाला दटावले, तर ती आमचीच बाजू घेऊन त्यांना म्हणायची, "जाऊ द्या पोरांची जात हाय. मायेच्या पोटीच करत्यात तसं. उद्या मोठी झाली की, पाखरे उडून जातील. तेव्हा करू दे त्यांना मौज मजा!" आईच्या हातून काही मिळायची संधीच जिला नियतीने दिली नाहीतरी तिचं मन आईच्या वात्सल्याचच होतं. वात्सल्यानं चिंब भिजलेली ती अंबु बोलली की तिची चेष्टा केल्याबद्दल मल अपराधी वाटायचे! तिचे वजन अगदीच मामुली. तरी आम्ही तिच्या खांद्याला लोंबकाळायचो. तिचा तोल जायचा तरी ती म्हणायची, "अरे, पडाल बाबांनो." जीवनभर तिने काळजी वाहिली इतरांचीच!

 

दिवसामागून दिवस चालले होते. मध्यंतरी मी सहा-सात वर्षे हिंगण्याला कर्व्यांच्या शाळेत शिकत होते. पण ड्रॉइंग, शिवण हे माझे शिक्षणातले राहू, केतू म्हणून हिंगणे सोडून बॉम्बेत मॅट्रिक होण्यासाठी पुन्हा सोलापुरला आजोबांकडे आले. ‘हरिभाई देवकरण’ या मुलामुलींच्या शाळेत जाऊ लागले. मधल्या काळात अंबु थकू लागलेली जाणवत होती. पण आत्याबाई, बाबा सार्‍यांचेच दुखले, खुपले बघताना काकींचा उजवा हात म्हणजे अंबुच असे. पण पुढे पुढे तिचे अन्न कमी होऊ लागले. "घरी किंवा इथेच झोपून राहा" म्हणून सर्वांनी तिला सांगितले. पण तशीच ती काम रेटायची! पुढे थकवा वाढत चालला. तरीही दिवसभरात आमच्या घराकडे एक तरी फेरी ती टाकून जायचीच! असा तिला आमच्या घराचा लळा लागलेला!

एके दिवशी संध्याकाळी मी शाळेतून परतले. तर डॉक्टर आजोबा - आम्ही त्यांना बाबा म्हणायचो - आत्याबाईंना, काकींना सांगत होते. "आपल्या अंबूला डॉक्टर मुळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवायचं म्हणतो आहे मी!" माझ्या मनात एकदम चर्रर्र झाले. दुसर्‍या दिवशी कुणाच्या तरी सोबतीने ती आमच्या घरी आली. स्वयंपाकाघराजवळच्या एका खोलीत सतरंजीवर आडवी झाली. किती काटकुळी झाली होती ती! चेहरा किती ओढला होता बिचारीचा! कमालीच्या क्षीण आवाजात तिने मला हाक मारली, "मालन, माझं काय खरं न्हाय बघ आता. हे बघ मी काय सांगते तिकडे जरा कान दे. मी मेल्यावर आत्याबाईंनी मला दिलेले पांढरे पातळ मला नेसवा बरं. अन्‌ सर्वांना म्हणावं, मला जाळू बिळू नका. माझं अंग विस्तवाने भाजेल की गं. मला तेच लय भ्या वाटतंय बघ. सांगशील ना?" मी असहायपणे मान हलवली. दम खाऊन पुन्हा म्हणाली, "तुला लई खोकला येतो. औषध पाण्याची हयगय नको करू. बाबा, आत्याबाई माझे देव आहेत. त्यांना वहिनीबाई सांभाळतातच. तूही सांभाळ. खूप शिक. शानी हो. माझी पद्मा आणि तू एकच आहेस मला." हे सगळे बोलताना तिचा आणि ऎकताना माझा कंठ दाटून आला. मी तिला थोपटत म्हटले, "अगं बरी होशील तू. काळजी नको करू." त्यावर नाही नाही अशा अर्थाने तिने मान फिरवली. दुसर्‍याच दिवशी अंब्युलन्समधून तिला मुळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेले. जाण्यापूर्वी घराच्या तळमजल्यावरच्या सगळ्या खोल्यातून कष्टानेच तिने एक फेरी मारली. बाबा, आत्याबाई, काकी यांच्या पाया पडली. ‘मालन’ अशी हाक मारून माझ्या गालावरून आपली थरथरती बोटे फिरवलीन.

अंबूला कॅन्सर झाला होता. मृत्यूच्या काठीची घंटा तिला ऎकू येत होती. दवाखान्यात आम्ही आळीपाळीने जात होतोच! पण दवाखान्याचे ओझे तिला फार दिवस सोसावेच लागले नाही. चारपाच दिवसात ती बातमी आली. अपेक्षित, पण तरीही अतीव दुःख देणारी! बाबांसकट घरात दोन दिवस कोणीही जेवलं नाही. तिच्या इच्छेप्रमाणे आत्याबाईंची पांढरी साडी अंत्यसमयी तिच्या अंगावर घातली होती.

अंबु गेली ती तारीख होती १९ मार्च! यंदा तिला जाऊन साठ वर्षे झाली! तरीही माझ्या मनात मनातली ती भाबडी, सेवाधर्म आनंदाने, निष्ठेने आयुष्यभर आचरणारी, आम्हा मुलांची मैत्रीण असलेली अंबु जिवंतच आहे. आम्ही तिला कधी विसरणार नाही! माझा विश्वास आहे माझे हे शब्द ती जिथे अणि ज्या रूपात असेल तिथवर खचित पोहोचत असतील. अंबु कधी नटलीथटली नाही. कसली हौस मौज कधी केली नाही. स्वप्नातही तिने कधी कुणाला दुखवले नाही. सर्वंना भरभरून प्रेमच दिले. जीवनाच्या बागेतले देवाघरचे सोनचाफ्याचे ते फूल आमचे जीवन सुगंधित करून पुन्हा देवाघरी गेले!!       

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color