स्वागतकक्ष arrow इ-प्रकाशन arrow चांदणे शिंपित गेलेली संजीवनी
चांदणे शिंपित गेलेली संजीवनी पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

चांदणे शिंपित गेलेली ...

संजीवनीला देवाघरी जाऊन पाहता पाहता सव्वा महिना होईल. एक एप्रिलला वर्तमनपत्रातून ती दुःखद वार्ता कळली तेव्हा मी मनाशी म्हटले, "मृत्यूने गेली काही वर्षे संजीवनीचा जणू पाठलाग चालविला होता. त्यात यावेळी त्याची सरशी झालेली दिसते." मृत्यूच्या या पाठलागाकडे संजीवनी एखादा खेळ पाहावा तशी पाहात होती. अगदी प्रसन्न, शांत मनाने आणि सहजपणे! तिच्या लोभसवाण्या, ऋजू आणि ममताळू व्यक्तिमत्वाने मृत्यूही काही काळ भारावून गेला असावा आणि पळभर आपले कामही विसरला असावा. चैतन्याने सदैव फुललेले तिचे बोलणे-वागणे, लिहिणे-हसणे, गाणे सारेच मला भारी आवडायचे आणि  म्हणूनच मी तिच्या पत्राचा प्रारंभ नेहमी, ‘प्रिय चिरसंजीवनीस...’ अशा शब्दांनी करायची.

तिच्या हृदयात पेसमेकर बसविल्यापासून तिला बराच वेळ बिछान्यातच पडून राहायला लागायचे. पण तशा स्थितीतही तिचे हात काही ना काही काम करीत राहायचेच. ती खरे सांगायचे तर आमची ‘कुटुंब मैत्रिण’च होती कै. शंकरभाऊ-नन्नींपासून तो आमची नात प्राजक्तापर्यंत सार्‍यांनाच तिच्या सहवासाचा आनंद लुटायला मनापासून आवडायचे. बर्‍याच दिवसात तिची प्रत्यक्ष भेट झाली नाही, की तिचे पत्र येणारच. दोन ओळींचे किंवा दोन शब्दांचेही! त्या कार्डावर डाव्या बाजूला शाई-रंगीत पेन्सिल अशा कशाने तरी एखादी नाजुक वेलबुट्टी-फुले-फुलपाखरू असले काहीतरी छान चित्र काढलेले असायचे. कधी मुकुंद-शांताला त्यांच्या लेखनाबद्दल शाबासकी दिलेली असायची. तर कधी त्यांचे नवे लेखन कुठवर आले आहे त्याची विचारणा असायची. अक्षर धावते , डौलदार आणि ठसठशीत.

अलीकडेच म्हणजे त्याला झाले असतील चार एक महिने. तिच्यासाठी माझ्या दिल्लीच्या मैत्रिणिकडून मी एक सुरेख रजई मागवून गेतली. ती द्यायला तिच्या घरी गेले तेव्हा नेहमीप्रमाणे गोड हसून तिने मला खुणेनेच
बसायला सांगितले. मी कधी आले ते विचारले आणि हातातली सफरचंदाची फोड मला देत खुणेनेच म्हणाली, "खाऊन टाक पटकन. मग दुसरी देते." तिला रजई देऊन मी वाकून नमस्कार केल्यावर तिच्या चेहर्‍यावर बालकासारखे निरागस हसू चमकले. 

मी सांगलीला आल्यावर तिने आवर्जून लिहिले, "प्रिय मालूताई, अनेक सप्रेम आशीर्वाद. तू परवा आमच्याकडे येऊन एक ऊबदार भेट देऊन गेलीस. त्याचे मला फार कौतुक वाटले. या नव्या वर्षानिमित्त तुला शुभकामना पाठवीत आहे. आनंदात राहा. ... तुझी, संजीवनी."

मी दिलेल्या रजईपेक्षा संजीवनीच्या वत्सल पत्राची ऊब निःसंशय अधिक सुखाची होती. गेल्या फेब्रुवारीत चौदा तारखेला तिचा वाढदिवस होता. त्या पत्राचीही तिने अशीच तत्परतेने पोच दिली होती. पण मला काय कल्पना की तिच्या नितळ, लडिवाळ मनाचा आरसा असलेले ते पत्र अखेरचेच असेल म्हणून!

संजीवनीचे घर म्हणजे एक प्रफुल्ल, हसरे असे कलावंत कुटुंबियांचे गोकुळच होते म्हणाना. संजीवनी म्हणजे चालतीबोलती मधुर कविता. तिचे पती रामकाका हे फुलांचे व पुस्तकांचे फार शौकीन. मराठी-इंग्रजी पुस्तके ते सतत वाचीत व आपल्या मित्रमंडळींना आवर्जून त्या पुस्तकांची शिफारस करून ती वाचायलाही देत. तेही संजीवनीसारखे अगत्यशील, रसिक अणि निर्मळ मनाचे होते. त्या परस्परांच्या गाढ व अतूट प्रीतीचे हृदयंगम दर्शन लहानसहान गोष्टीतूनही होई. फिरून येताना संजीवनीला देण्यासाठी आणलेले सोनचाफ्याचे वा मोगर्‍याचे फूलही त्यांच्या उत्कट, अबोल प्रीतीचा शांत, मंद सुगंध आमच्यापर्यंत पोहोचवीत असे. अशा मधुर प्रीतीचे दर्शन दुर्मिळ तर खरेच पण म्हणून फार हृदयस्पर्शी वाटे. तिच्या तीनही कन्या - मिनी, भारती, अंजू - हुशार अन्‌ कलानिपुण. भारती सुरेऽऽख गाते. ती नृत्यात व लेखनातही पारंगत आणि अभिनयकुशल आहे. अंजूकडेही आईच्या लेखनाचा वारसा आला आहे. तिने हॉलंडमधून, आपल्या डच पतिबरोबरच्या संसाराची, जीवनाची, घराची तिथल्या वातावरणाची संजीवनी-रामकाकांना धाडलेली मनोवेधक व सुंदर विचारप्रवर्तक पत्रे त्यांनी ‘अंजूची पत्रे’ या नावाने अगत्याने प्रकशित केली. प्रताप हा त्यांचा देखणा, उचनिंच मुलगा - एकुलता एक. युद्धकाळात बॉंब टाकणारा ‘प्रतापी शूर वैमानिक’ ठरला. तो चित्रेही सुंदर काढतो. संजीवनीची सून म्हणजे अमची प्रिय सौ. ‘सुहास’. नावाप्रमाणेच हसरी व सासूबाईंप्रमणेच गोड गळा घेऊन आलेली. असे हे घर - सुखवस्तू मध्यमवर्गीय घर ‘सुखनिवास’ आहे. या घरात साहित्त्यिकांची, कलावंतांची ये-जा नेहमीच चालते. त्यांची आपुलकीने, अगत्याने विचारपूस होत असल्याने त्या घरातले प्रसन्नतेचे कारंजे आणखीच थुईथुई करून नाचते.

अंजूने डच मित्राशी विवाह केला. प्रताप वैमानिक झाला. या कशालाही संजीवनी व रामकाकांनी विरोध केला नाही. उलट आपल्या मुलांचे जिवलग मित्रमैत्रीण बनून त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना समंजसपणे समजावून घेऊन त्यांच्या इच्छा, आकांक्षांचा मान राखून त्यांना परोपरीने साह्य केले. असे सुजाण थोर मनाचे पालक किती मुलांना मिळत असतील? संजीवनी-रामकाकांची मुले-नातवंडे खरोखरीच भाग्यवान म्हणायला हवीत. तरीही संसार म्हटला की त्यात चढ उतार अटळपणे येतातच. कधीकधी ध्यानीमनी नसणार्‍या दुःखाला मन घट्ट करून सामोरे जावे लागते. अशा प्रसंगात तर घरातल्या सार्‍यांचेच हात दृढ प्रेमरज्जूंनी एकमेकांशी बांधलेले होते ही गोष्ट मला फार मोलाची वाटते.

काही अपरिहार्य कारणांनी खानापूर-बेळगावकडचे वास्तव्य संपवून संजीवनी-रामकाकांनी सांगलीस येण्याचे ठरविले. आमच्या सांगलीत राममंदिराजवळच त्यांचा ‘रामकृपा’ नावाचा बंगला होता. संजीवनीने काही दिवस सांगलीच्या शाळेत शिक्षिकेचे काम केले. ती मराठी इतके सुरेख शिकवत असे, की मी तिला गमतीने म्हणे, "मला कॉलेजचा तास बुडवून तुझ्या तासाला येऊन बसायचा फार मोह होतो गं!" त्यावर माझ्या गालावर हलकीशी चापट मारून ती म्हणायची, "मालती, तू म्हणजे अगदी अश्शी आहेस..." तिच्या अशा वेल्हाळ व सहजसुंदर स्वभावाने तिने मोलाचा लोकसंग्रह केला असला तर काय आश्चर्य! त्याचे आणखी एक कारण म्हणजे तिची गुणग्राहकता ही होय. गुण मग तो कितीही छोटा वा कितीही छोट्या माणसाचा असो, संजीवनी त्याचे मनापासून कौतुक करी. तिची गुणग्रहकता अतिशय प्रांजल, पारदर्शक आणि प्रकट असायची. तिने आपल्या वागण्या-बोलण्या-लिहिण्यातली जाणीव कधीही मनाला टोचायची नाही उलट अंतर्मुख करायची.

फार वर्षे झाली. मला आता नक्की वर्ष आठवत नाही. पण त्यवेळी मी बहुधा ‘विलिंग्डन’मध्ये शिकत होते. संजीवनीची अंजू तेव्हा काही महिन्यांची असावी. तिला मांडीवर घेऊन (आणि मध्येच ती रडू लागली तर शांतपणे तिला सांभाळून) तिने आपल्या भावगीत गायनाचा कार्यक्रम उत्तम रीतीने पार पाडला. मला त्याचे फार कौतुक वाटले. आमच्या संस्थेच्या चालकांच्या विनंतीचा तिने आदर केला. तिच्या सार्‍या वृत्तीतच असे एक अतिशय कोमल, हळुवार, सर्वांना हवेहवेसे वाटणारे वात्सल्य, प्रेमळपणा भरून होते. माझी आई स्वतः छान गाणे म्हणायची. संजीवनी घरी आली की ती म्हणायची, "ते काही नाही चालायचं हं संजीवनीबाई, एक तरी गाणे तुम्ही म्हणायला हवेच." त्यावर ती कितीही घाईत असली तरी कसलेही आढेवेढे न घेता तिचे मखमलीसारखे रेशमी हसू हसून ती आमच्या सौ. नन्नी (आई) च्या आवडीचे गाणे-पद-कविता आवर्जून म्हणून दाखवायची. संजीवनी मोठी कलावंत. अनेक मानसन्मानांची धनीण. पण तिच्या अशा सरळ, निगर्वी स्वभावाने तिच्या स्नेहाबद्दल मला एक आगळाच अभिमान वाटे आणि त्याहीपेक्षा वडीलधार्‍या मंडळींची मान राखण्याची तिची अभिजात सुसंस्कृतता मला अधिक भुलवायची.

या अशा सुसंस्कृततेचाच एक पैलू म्हणजे तिच्या मनात दुसर्‍यांच्या दुःखाबद्दल असलेली गाढ करूणाबुद्धी. दुःखितांचे अश्रू पुसून त्यांच्या मनावर फुंकर घालण्यात ती सदैव पुढे असे. तिचा भाचा (नणंदेचा मुलगा) डॉ. चंद्रकांत आपटे हा माझा सोलापूरच्या शाळेतला वर्गबंधू व आज एक गुणी स्नेही. तो व्यवसायाने डोळ्यांचा डॉक्टर! पण त्याच्या डोळ्याला काहीही दुखणे झालेले नसतानाच अन्य निमित्ताने दुर्दैवाने त्याला जवळजवळ पूर्ण अंधत्व आले. त्या जबरदस्त अनपेक्षित आघाताने तो बुद्धिमान मित्र फार खचला! त्यावेळी संजीवनी वेळोवेळी पत्र लिहून त्याला धीर देई. त्याच्या कलागुणांना प्रोत्साहन देई. कालच त्याने पत्रात मला लिहिले आहे, "मालूताई, ती माझी फार आवडती होती. तिच्या अनंत आठवणी वारंवार येतात. माझ्यावर तिने एक कविता केली होती." सोलापुरला मी जेव्हा जेव्हा जाते तेव्हा तो तिच्याबद्दल भरभरून व कृतज्ञतेने बोलतो.

संजीवनीच्या आठवणीतली एक विशेष सतेज व तिच्या टवटवीत प्रतिभेची आठवण आता सांगते. आमच्या स्त्री मासिकाचा रौप्य महोत्सव किर्लोस्करवाडीत फार थाटात साजरा झाला. आमच्या ती. शंकरभाऊंनी साहित्यिक भगिनींना जणू भाऊबीजेसाठीच बोलावल्यासारखे अगत्य केले! ग्वाल्हेर-इंदूरपासून लेखिकांनी एकच गर्दी केली होती. ते एक हृद्य कौटुंबिक संमेलनच झाले होते. भाषणे, गप्पाटप्पा, समस्यापूर्ती अशा नानाविध कार्यक्रमात वेळ मोठा गमतीत चालला होता. तेवढ्यात जेवणापूर्वी खेळण्याची टूम निघाली. फुगड्यंचा खेळ रंगू लागला नि संजीवनीचा उत्साह दुथडीभरून वाहू लागला. ती खेळणार्‍या भगिनींना उखाणे घालू लागली. पद्मा गोळे व सुमती क्षेत्रमाडे फुगडी घालायला लागल्यावर संजीवनी म्हणाली, "गोव्याला निघाला सत्याग्रहींचा जथा। आणि फुगडी खेळतात कविता नि कथा।" थोड्या वेळाने आमच्या शांता किर्लोस्करचा हात पकडून संजीवनीने उखाणा घातला, "रुप्याच्या उत्सवाला सुवर्णाची कांती। संजीवनीच्या हातात संपादकांची ‘शांति’"। त्यावर हास्याचा जो काही कल्लोळ उडाला तो काही विचारू नका! तर अशी ही आमची संजीवनी, भारी लाघवी नि खेळकर. तिची आणि सुप्रसिद्ध कवयित्री पद्माताई गोळे यांची मैत्री फार जिव्हाळ्याची आणि विद्यार्थीदशेपासूनची. (माझी आठवण बरोबर असेल तर दोघींनी एकदमच एस. एन. डी. टी. विद्यापीठाची एम. ए. ची परीक्षा दिली.) पद्माताई तुलनेने गंभीर, मितभाषी! आणि संजीवनीचा सदैव मधुर स्वरातला चिवचिवाट! दोन्हीही आठवणीत राहणारे! त्यांची मैत्री पाहून डोळे आनंदाने भिजत.

एक अलीकडची आठवण! नुकतीच मी तिला भेटायला गेले होते. ती वेळ संध्याकाळची होती. सौ. सुहास कारखान्यात नोकरीवर गेली होती. चि. प्रताप (तो आता सेवानिवृत्त आहे.) तिच्या गैरहजेरीत अगद आनंदाने आणि सहजपणे गॅसवर कुकर वगैरे लावण्यात मग्न होता. आणि संजीवनी बिछान्यात पडल्या पडल्या कसल्याशा शेंगा मोडण्यात गुंतली होती. तिच्यातली संसारदक्ष, कष्टाळू गृहिणी, प्रेमळ आई, वत्सल सासूबाई या सगळ्यांचे ते मन वेधून घेणारे चित्र माझ्या मनावर अगदी कोरून राहिले आहे. संजीवनी गेल्यावर मी जे सांत्वनाचे पत्र पुण्याला टाकले त्याच्या उत्तरात सौ. सुहासने मला लिहिले आहे, "सौंदर्यासक्त व प्रेमासक्त अशा या गोड सासूची उणीव मला पदोपदी जाणवणार आहे. अशी सासू मिळणे नाही." खरेच नाही मिळणार!

ती. रामकाका अलीकडेच म्हणजे सहा-सात महिन्यापूर्वीच कालवश झाले. मी व माझी वहिनी सौ. शांता (संजीवनीची व तिची फार फार गट्टी) सांत्वनाप्रीत्यर्थ संजीवनीला भेटायला गेलो. ‘रामकाका’ हा शब्द तिने वा आम्ही दोघींनीही प्रत्यक्षात उच्चारला नाही. पण सारीच दुःखे बोलून कळतात असे थोडेच आहे? संजीवनीची व रामकाकांची अनेक तपांची सुदृढ प्रीती तिची किती अनंत चित्रे, स्मृती तिच्या मनात रेंगाळत असतील ना? पण तिने त्यांच्या चिरवियोगाचे दुःख अतिशय धीराने, संयमाने आणि विवेकाने घेतले ते पाहून मला वाटले, गाढ प्रीती आणि अध्यात्म ज्ञानाने मनःशांती यांचे स्वरूप असे एकरूपच असेल का? तिचा निरोप घेताना ज्या निःशब्दपणे ती आपले मानसिक व शारीरिक दुःख सोसत होती ते बघून माझे मन भरून आले.

तिची कविता... त्याबद्दल विस्ताराने खूप बोलून झाले आहे. म्हणून अधिक मी इथे जास्त काही लिहीत नाही. तिची कविता तांबे कुळाशी जवळचे नाते सांगणारी त्यामुळे ती गेय होती. भावसंपन्न होती. तिच्या कवितेतली नितळ नि नीटस शब्दसंपदा मला अधिक प्रिय होती. शांत भक्ती, वत्सल हे तिच्या विशेष आवडीचे रस होते. कारण तो तिचा स्वतःचाच स्वभाव होता. प्रीतीच्या तिच्या मधुर भावगीतांनी मराठी कवितेचे दालन संपन्न केले आहे, यात शंका नाही. तिची कविता आणि ती जणू जुळ्या बहिणीच होत्या. तिच्या कितीतरी कवितांचे मुखडे मनापुढून आज झरझर जाताहेत. ‘शांत सागरी कशास उठवितोस वादळे’ या कवितेने एके काळी रसिकांना वेड लावले होते. आजही ती कविता ताजी वाटते. ‘तेवता तेवता वात मंदावली’, ‘पद टाकीन मी दयाघना, तू पाठीशी उभा असशील ना?’ ‘दैवगती एक कृपा भीक मला घाल। मम जीवन गतीची बदलू नको तू चाल।’, ‘स्त्री माझे नाव असे’, ‘जायचे असेल तरी नकळता निघून जा’  असे किती आठवावे? तिची बालकविता आबालवृद्धांना आवडायची. ‘बरं का गं आई, हे विसरायचे नाही’ या कवितेतली दिवसभर मी आई होईन पण रात्री मात्र बाळ बनून तुझ्या कुशीत झोपेन म्हणणारी चिमुरडी बालिका कोण विसरेल? आणि ती कविता लिहिणार्‍या संजीवनीला तरी कोण विसरेल?

ती. रामकाकांच्या पाठोपाठ सर्वार्थाने त्यांना शोभणारी त्यांची सहधर्मचारिणी संजीवनी आता गेली. तिने स्वतः जीवनावर भरभरून प्रेम केलेच पण इतरांनाही ते करायला शिकवले. जिथे जिथे ती गेली तिथे जणू चांदणे शिंपितच ती गेली! तिच्या जगण्या-वागण्या-लिहिण्यातून ‘सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे। चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे.’ या बालकवींच्या काव्यपंक्तींचा अर्थ मला चांगला कळला. सत्य-शिव-सुंदराची आराधना हेच जणू तिचे जीवनसूत्र होते.

मनात पुन्हा पुन्हा येते आता तिच्या सुंदर कवितांनी ती रसिकांच्या अंतःकरणात राहीलच, पण ती पुन्हा कधी कधीच आपल्याला दिसणार नाही. तिचे गर्भरेशमी, मृदु, मधुर गाणे ऎकायला मिळणार नही. तिच्या भेटीचा योग आता कायमचाच संपला म्हणयचा. आता तिची भेट वसंत ऋतूत गाणार्‍या कोकिळेच्या रसाळ, मधुर स्वरातून होईल का? मोगर्‍याच्या पांढर्‍याशुभ्र पाकळ्यांच्या मनोहारी सुगंधातून होईल का? कोजागिरी पौर्णिमेच्या शीतल चांदण्यातून ती भेटेल का? मनोरम इंद्रधनुष्यातून ती डोकावून पाहील का? निरागस बालकांच्या हास्यातून तिचे गोड हसू कानावर पडेल का? या सार्‍यावेळी मी अगदी मनापासून तिच्याशी हितगुज करीन आणि तिला सांगेन, "प्रिय चिरसंजीवनी, आम्ही तुला कधी विसरणार नाही गं!"   

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color