स्वागतकक्ष arrow इ-प्रकाशन arrow संस्कारांचा मधुघट
संस्कारांचा मधुघट पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

संस्कारांचा मधुघट

जीवनातल्या काही घटना किंवा व्यक्ती यांना आपण कधी विसरूच शकत नाही. १ जानेवारी १९७५ हा माझ्या जीवनातला तसाच एक दिवस. उगवत्या सूर्याला वंदन करून मी नव्या वर्षाचे स्वागत केले. माझ्या हातात आदल्याच दिवशी आलेले तीर्थरूप शंकरभाऊंनी स्वतः काढलेले एक सुंदर चित्र होते. नव्या वर्षाच्या स्वागताचे आणि मला दिलेल्या आशीर्वादाचे! ८५व्या वर्षीही त्यांचे मन किती प्रसन्न, आशावादी होते त्याचेच ते एक प्रतीक होते. ते पाहताना त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंनी माझे मन भरून आले.

स्वभावाने शंकरभाऊ फार मनमिळावू, हाता-मनाने उदार, गुणग्राहक आणि अतिथ्यशील. अनेक कलांचे वरदान निसर्गाने त्यांना दिलेले. व्यक्तिमत्व रुबाबदार आणि विलोभनीय. त्यांनाही आयुष्यात अनेक दुःखांना, वादळांना तोंड द्यावे लागले, पण आपल्या चेहर्‍यावरचे हसू त्यांनी कधी मावळू दिले नाही. मुकुंद व माझे ते जसे वडील होते तसेच बालपणापासूनचे आमचे जिवलग सवंगडीही होते. ना कधी त्यांनी आम्हाला उपदेशाचे डोस पाजले, की कधी चापटपोळी दिली. आमच्या विकासाला सर्वतोपरी स्वातंत्र्य दिले, साह्य केले. आज्ञार्थी भाषा त्यांनी कधीच वापरली नाही. सायकलवरून ऑफिसला जाताना गोट्या खेळणार्‍या त्यांच्या दोस्तांपासून कारखान्यातल्या कामगारापर्यंत सार्‍यांना ते ‘आपले’ वाटत. त्याचे मर्म त्यांच्या जीवनदॄष्टीत होते, निकोप आणि ऋजू! दुसर्‍याच्या आनंदात गुंजेने भर घाला म्हणजे तुमचे सुख तोळ्याने वाढेल. हीच त्यांच्या यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली. त्यांचे सगळे वागणे, बोलणे इतरांना वागविणे हेच इतके नमुनेदार असे की, त्याचा आपोआपच मनावर सुसंस्कार होई. एकदा जेवणाच्यावेळी ते कुणा लेखिकेच्या भेटीचा वृत्तांत सांगत होते. मी मध्येच म्हटले, "माहिती आहे ती लंगडी तैमूरलंग मला." शंकरभाऊंच्या हातातला घास तसाच राहिला. शांतपणे मायेने माझ्या पाठीवरून हात फिरवत ते म्हणाले, "आपल्या टेबलावर जेवणारी मंडळी सगळी सुसंस्कृत असतात, असे मला वाटते. त्यात एखाद्याच्या व्यंगाचा असा उल्लेख करणे बरे असे तुला वाटते का?" मी एकदम ओशाळले, ती त्यांच्या सौजन्याने. त्यानंतर गेल्या ६५ वर्षात ती चूक मी पुन्हा कधीही केली नाही.

सेवानिवृत्तीनंतर घटप्रभेच्या ‘कर्नाटक आरोग्यधाम’ या ख्यातनाम संस्थेत ‘मधुघट’ नावाचा बंगला बांधून ते एकटे राहिले समाधानात, मुलेबाळे-पाहुणे सर्वांचे स्वागत करीत राहिले. रुग्णांना दिलासा दिला. चित्रे काढली, दिलरुबा वाजवला. त्यांच्या वाचन-लेखनाच्या खोलीत अतिशय अर्थपूर्ण छापील सुभाषित लावलेले होते. ते असे- I shall pass this way but once, any therefore that I can do, let me do it now. For I may not pass this way again. माणसाने कसे जगावे कशासाठी जगावे, विचार, उच्चार, आचार यातील सुसंगती म्हणजे काय, अशा अनेक गोष्टी शंकरभाऊंच्या समृद्ध, सुसंस्कृत जीवनातून आम्हा भावंडांना व असंख्यांना समजल्या. स्वतःच्या मृत्यूवुषयी ते म्हणत, "माझी बॅग हातात घेऊन मी स्टेशनवर उभा आहे. गार्डने हिरवे निशाण फडकवले आणि शिट्टी वाजवली की त्यात बसणार! तेच खरे झाले. एक जानेवारीला स्नेह्यांना फाटकाशी पोहोचवून ते घरात आले नि पळभरातच मेंदूतील रक्तस्रावाने बेशुद्ध झाले. आणि त्याच रात्री त्यानी या जगाचा निरोप घेतला, ‘संस्कारांचा मधुघट’ मागे ठेवून!         

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color