प्राचार्य गोकाक पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

प्राचार्य गोकाक - विद्यार्थीदशेपासून अंतःकरणात सुवर्णाक्षरात कोरले गेलेले नाव

१९४२ च्या जूनमध्ये पहिल्या वर्षासाठी मी ‘विलिंग्डन’ महाविद्यालयात प्रवेश घेतला. उत्सुकता, संकोच, काहीशी भीती व बावरलेपण अशा संमिश्र भावनांनी त्यावेळी मनात एकच गर्दी केली होती. पहिल्या दिवशी प्राचर्यांच्या भाषणासाठी महाविद्यालयाच्या सर्वात प्रशस्त हॉलमध्ये आम्ही सुमारे तीनशे-साडेतीनशे नवे-जुने विद्यार्थी एकत्र जमलो होतो. दुसरी घंटा होताच छानशी उंची, भव्य भालप्रदेश अणि रुबाबदार व्यक्तिमत्व असलेले प्राचर्य लगबगीने आले. स्टेजवर चढून, डोळ्यावरचा चष्मा किंचित खाली सरकवून त्यांनी चौफेर नजर टाकली. विद्यार्थ्यांकडे पाहून मंदस्मित केले आणि आपल्या भाषणाला सुरुवात केली. बंदा रुपयासारखा त्यांचा खणखणीत आवाज, इंग्रजी भाषेवरचे त्यांचे असामान्य प्रभुत्व यांनी आम्ही विद्यार्थी जणू मंत्रमुग्धच झालो. त्यांना मी प्रथमच पाहात होते. पण ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी पहिला क्रमांक मिळविल्याची वार्ता पुष्कळ आधीपासून मला माहिती होती. संस्थेचा परिचय करून देऊन महाविद्यालयासंबंधी माहिती विस्ताराने त्यांनी सांगितली. विषय असा गद्य! पण आपण एखादी मधुर भावकविताच ऎकत आहोत, असे आम्हाला वाटत होते. गंमत ही की हे प्रास्ताविक भाषण ऎकण्यासाठी गावातील अनेक नामवंत मंडळी आवर्जून आली होती.

यथाकाल महाविद्यालयाचे तास व्यवस्थितपणे सुरू झाले. आमचे सर्वच गुरुजन म्हणजे ज्ञानाच्या क्षेत्रातील हिमालयाची उत्तुंग शिखरे म्हणावी असे होते. थोड्याच दिवसात ऑगस्टच्या प्रारंभी गांधीजींनी ‘करेंगे या मरेंगे’ असा आदेश देऊन अभूतपूर्व स्वातंत्र्यलढ्यास प्रारंभ केला. सारा देश पेटून उठला. महाविद्यालयातील आम्हा काही विद्यार्थी-विद्यार्थिनींचा एक गट विशेष चळवळ्या होता. ध्वजवंदन, बुलेटिन्स वाचणे/वाटणे, गुपचुपपणे सभा भरविणे अशा कामात आम्ही दंग होतो. गोकाक सरांना त्याची कल्पना असणारच! पण बाह्यतः तसे त्यांनी दिसू दिले नाही. कासवीच्या नजरेने ते आमची काळजी वाहात होते. चळवळ दिवसेंदिवस अधिक उग्र होत चालली होती. प्रतिसरकारचे नेते नाना पाटील व सहकारी त्याचे अग्रदूत होते. आगगाड्या पाडणे, सरकारी खजिना लुटणे, अशा त्यांच्या कृतींनी सरकारचे धाबे दणाणले होते. जनतेचा या चळवळीला अंतःस्फूर्त पाठिंबा होता.

अशा स्थितीत एक दिवस एक अघटितच घडले! पोलिसांची एक मोटार आमच्या महाविद्यालयाच्या दरवाजाशी येऊन उभी राहिली. सातारा-सांगली या जिल्ह्यात चळवळीची तीव्रता खूपच होती. आगगाडीचे रूळ उखडणे, गाड्या अडविणे असे प्रकार बर्‍याच वेळ सातारा-मिरज या मार्गावर होत. त्याला विद्यार्थ्यांचे सहाय्य असावे, या खात्रीने त्यांची धरपकड करण्यासाठी पोलिसांनी काही डाव रचला असावा. गोकाक सरांना पोलिसांच्या आगमनाची वार्ता कळताच, धोतर, सदरा अशा घरच्या पोशाखातच ते भराभरा ढांगा टाकत महाविद्यालयाच्या फाटकापाशी गेले आणि दोन्ही हात आडवे पसरून उभे राहिले. पोलिस अधिकर्‍यांना उद्देशून सर म्हणाले, "Look here. I am the principal of this college. You cannot get in unless I allow you. आणि पुढे इंग्रजीतच त्यांनी सांगितले, " आपणाला काय माहिती हवी ती मला ऑफिसात येऊन विचारा, मी ती देईन. पण कोणत्याही परिस्थितीत माझ्या विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावलेला मला चालणार नाही. माझे म्हणणे डावलून आत घुसण्याचा प्रयत्न झाला, तर तुम्हाला प्रथम माझ्या अंगावर गोळी घालावी लागेल, समजले?" सरांचा प्रक्षुब्ध स्वर, आवेश सगळे पाहून पाहून पोलिसांनी काही न बोलताच गाशा गुंडाळला. सरांची आपल्या विद्यार्थ्यांवरची अतूट माया व त्यांचा असीम निर्धार आणि अपूर्व धैर्य पाहून आम्ही स्तिमित झालो. आमच्या रक्षणासाठी त्यांनी आपल्या प्राणांची बाजी लवली. कृतज्ञतेने आमची मने उचंबळून आली. आम्ही मनोमन अनंतवेळा त्यांना वंदन केले. खरी देशभक्ती ही सुळावरची पोळी आहे. ती मिळवायची तर बलिदानाचीही तयारी पाहिजे. हा उदात्त, तेजस्वी, अविस्मरणीय धडा सरांनी त्यांच्या सत्कृतीने शिकविला. गुरूला साक्षात्‌ परब्रह्म का म्हणतात, ते सरांच्या धीरोदात्त वर्तनाने आम्हाला कळले. आजच्या दूषित शैक्षणिक वातावरणात सरांचे वर्तन खूपच मोठी शिकवण देणारे आहे.           

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color