स्वागतकक्ष arrow इ-प्रकाशन arrow तीर्थरूप शंतनुकाका
तीर्थरूप शंतनुकाका पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

तीर्थरूप शंतनुकाका - चैतन्याचा एक निखळ झरा

पुण्याला मी गेले म्हणजे शंतनुकाकांच्या ‘लकाकि’ बंगल्यावर माझी एक तरी फेरी व्हायचीच! पुणे विद्यापीठाकडे जाणार्‍या रस्त्यालगतचा त्यांचा हा प्रशस्त, देखणा, बैठा बंगला, त्याच्या भोवतीचे विस्तृत आवार, नाना रंगाच्या झाडाफुलांनी आणि हिरव्यागार ‘लॉन’ने नटलेली त्यांची बाग हे सगळेच मला खूप आवडायचे. शंतनुकाकांच्या तरल सौंदर्यदृष्टीचा आणि रसिकतेचा त्यातून प्रत्यय येई.

फाटकातून येताना मला पाहिले की, ते यमुनाकाकूला हाक मारून म्हणत, "यमुताई, कोण आलंय पाहिलंत का? प्रोफेसर मालूताई आली आहे आपली." मी जवळ जाऊन त्या उभयतांना वाकून नमस्कार करी. मग ते प्रेमाने आपल्याजवळ मला बसवून घेत विचारीत, "बोला प्रोफेसर, काय घेणार, चहा की कॉफी?" मी उत्तर दिल्यावर भरपूर खाद्यपदार्थ आणि कॉफी घेऊन नोकर उभा राही. मग गप्पा सुरू होत. "मजा आहे अन्‌ काय तुम्हा प्रोफेसर लोकांची! वर्षातून सहा महिने सुट्टीच सुट्टी!" त्यावर रागावल्याचा अभिनय करीत मी त्यांना म्हणे, "अहो थोर उद्योगपती, आमची अशी चेष्टा करता काय? आम्ही नसलो तर तुमचे कारखाने चालवायला इंजिनिअर कुठून मिळणर हो तुम्हाला?" त्यावर ते खो खो करून हसत आणि मग तास दीड तास वेळ गप्पात कधी जायचा ते कळायचे नाही.

शंतनुकाकांचे व्यक्तिमत्व असे मोठे विलोभनीय आणि रुबाबदार होते. गोरापान गुलाबी वर्ण, भव्य कपाळ, प्रसन्न हसरे बोलके डोळे, त्यावर सुरेख रंगाचा जाड फ्रेमचा चष्मा, अतिशय काळजीपूर्वक निवड करून कमालीच्या टापटिपीने अंगावर चढवलेला सूट, सुटावर बांधलेला ‘बो’, पायात चकचकीत बूट आणि मोजे या सार्‍यांमुळे त्यांना पाहणारा, भेटणारा माणूस एकदम खूष होऊन जाई. नात्याने ते माझे सख्खे चुलतकाका. पण आमच्या कुटुंबात सख्खा-चुलत असला कसलाच भेद नसायचा. त्यामुळे शंकरभाऊंसारखेच ते मला वाटायचे.

मी मराठी पहिलीत किंव दुसरीत असेन त्यावेळची ही गोष्ट! हिंगण्याच्या महर्षि कर्व्यांच्या शाळेतून सुट्टीसाठी मी तेव्हा किर्लोस्करवाडीला आलेली होते. कारखान्यातून शंतनुकाका घरी येत होते. मला पाहिल्यावर माझ्या गळ्याभोवती हात टाकून ते म्हणाले, "मालती, ‘उमाठ्यावर’ या शब्दाचा अर्थ काय सांग बघू ?" मी म्हटले, "अय्या त्यात काय अवघड, उमाठ्यावर म्हणजे क्षितिजावर, कळलं!" त्यावर त्यांनी ज्या कौतुकाने माझ्या पाठीवर शाबासकी दिली, ती मी आजही विसरले नाही. कारण त्या प्रसंगाने त्यांच्या गुणग्राहक वृत्तीची मला ओळख झाली. कुणाजवळच्याही, लहानमोठ्या, गुणकौशल्याचे ते मनपासून कौतुक करीत. त्यामुळेच देशविदेशातील अनेकांना ते ‘आपले’ वाटत, जवळचे वाटत.

किर्लोस्कर कारखान्याच्या चिमुकल्या रोपाचे विस्तृत वटवृक्षात रूपांतर करण्यात शंतनुकाकांचा सिंहाचा वाटा आहे, हे निर्विवाद सत्य आहे. कारखान्याच्या कामानिमित्त जगभर त्यांची सतत भ्रमंती चालू असे. पण खरोखरीच मी त्यांना कधीसुद्धा, इतक्या वर्षाच्या माझ्या आयुष्यात, कुणावर रागावलेले, चिडलेले, कंटाळलेले असे पाहिल्याचे मला आठवत नाही. सदैव स्वारी हसतमुख, आनंदी, आशावादी आणि चैतन्याने रसरसलेली असायची. स्वाभाविकच तक्रारखोर, वायफळ बडबड करून इतरांचा वेळ खाणारी, भोंगळ, बेंगरूळ नि दांभिक माणसे त्यांना अजिबात रुचत नसत. असा एखादा त्यांच्याकडे आलाच तर ते कसलीच भीडभाड न मानता त्याला विचारीत, "तुमचे काय काम आहे माझ्याकडे?" जे बोलायचे स्पष्ट, सूत्रबद्ध, सडेतोड नि निःस्पृह हाच त्यांचा स्वभाव होता! मात्र त्यात कुणाचा द्वेष नसे की मत्सर! न्यूनगंड तर केव्हाच नाही. तसा त्या बोलण्याला अहंकाराचा स्पर्श नसे.

Duty is deity आणि Work is worship ही त्यांची जीवनभराची बैठक होती. "व्यवसाय, उद्योग ही क्षेत्रे चढाओढीची आहेत, त्यात यश मिळवायचे तर लायकीच सिद्ध करावी लागते, धोका पत्करावाच लागतो, यश मिळाले तरी डोके शांत ठेवलेच पाहिजे, श्रम केलेच पाहिजेत, अपयश पदरी पडले तरी निराशेला बळी पडायचे नाकारलेच पाहिजे, धडपडून पुन्हा उठायला पाहिजे प्रयत्न करायला पाहिजे. प्रगतीचा मार्ग हा असाच असतो. यशापर्यंत पोहोचायला हा एकच राजमार्ग आहे, इथे पळवाटांचा, आडवाटांचा उपयोग नाही." हा त्यांचा जीवनमंत्र त्यांच्या अखंड कर्मयोगातून त्यांनी प्राप्त केला आहे. यंत्रावर काम करणार्‍या कामगाराला ते म्हणत, "बाबा रे, इतर ठिकाणापेक्षा एक हजार रुपये सुद्धा तुला इथे जास्त मिळतील, पण यंत्राच्या निर्मितीत १/१००० इंचाच्या लांबीरुंदीचीही चूक रहता कामा नये." माणसाने गरिबीत राहवे, तसे राहणारा त्यागी असतो, निःस्वार्थी असतो. ही मते त्यांना साफ नामंजूर असत. "भरपूर काम करावे, भरपूर श्रीमंत व्हावे. त्यात गैर काय आहे?" असा त्यांचा रोखठोक सवाल असायचा!

शंतनुकाकांचा एक स्वभावविशेष दुर्मिळ असल्याने मला विशेषच आवर्जून सांगावासा वाटतो. भले ते कन्याकुमारीला जावोत, चीनला जावोत की इग्लंडला. कुठेही गेले तरी त्या समाजात, परिस्थितीत, वातावरणात ते अगदी सहजपणे मिसळून जात. सुमारे तीस एक वर्षापूर्वी मी, मुकुंद व सौ. शांता दक्षिणेकडे प्रवासाला गेलो होतो. ‘मद्रास’मधली ‘पॅरी आणि कंपनी’ हे आमच्या कारखान्याचेही एजंट होते. त्यांचे एक अधिकारी सांगत होते, "एस. एल. के.( शंतनुकाकां) ना काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमाच्या उद्‌घाटनाला आम्ही बोलावले होते, पण कार्यक्रमाच्या आदल्या रात्री मुसळधार पाऊस झाला आणि कार्यक्रमाच्या स्टेजजवळ मोटार नेणे आवघड झाले. एस. एल. केंच्या लक्षात येताच ते पटकन मोटारीतून उतरले, आपली पॅंट हाताने किंचित वर उचलून उड्या मारीत थोडे अंतर ते चालत गेले हो, एखाद्या तरुणासारखे! आम्ही हे बघून थक्कच झालो." कोणत्याही क्षेत्रातली खरी मोठी माणसे अशीच साधी आणि सरलमनस्क असतात, यावरचा माझा विश्वास त्यामुळे अधिकच दृढ झाला. शंतनुकाकांना बुद्धिवादाचे बाळकडूच मिळालेले! त्यामुळे पूर्ण विचारांती जे आपल्याला पटते त्याचे आचरण ते निर्भयपणे करीत. स्वतःच्या विवाहात वरात आणि तत्सम गोष्टींना त्यांनी पूर्ण फाटा दिल्याचे वडीलधारी माणसे आम्हाला सांगत. या निर्भयतेची एक आठवण महात्मा गांधींच्या सदर्भातली आहे. ती अशी - गोरगरिबांना परवडेल, विशिष्ट नंबरचे सूत ज्यातून कातता येईल आणि सर्व सोयींनी युक्त असा चरखा महात्मा गांधींना करून हवा होता. माझ्या आठवणीप्रमाणे तसे त्यांनी जाहीर निवेदनही केले होते. आमच्या औंधच्या राजेसाहेबांच्या शिफारशीवरून श्री. गणेशपंत काळे नावाच्या एका कल्पक सज्जन गृहस्थांनी तसा चरखा फार परिश्रम घेऊन, आवश्यक तेथे कारखान्याचे सहकार्य घेऊन तयार केला. तो दाखवण्यासाठी तीर्थरूप पप्पा (लक्ष्मणराव), शंतनुकाका, शंकरभाऊ आणि श्री. काळे वर्ध्याला गेले. महात्मा गांधींच्या सर्व कसोट्यांना फक्त तेवढा ‘एकच’ चरखा उतरला. मग गंधी म्हणाले, ‘या चरख्याचा आकार एखाद्या यंत्रासारखा दिसतो.’ त्यावर शंतनुकाकांनी धीटपणे त्यांना प्रश्न विचारला, "आपण वापरता ते पेन आणि ती सायकल ही यंत्रेच आहेत ना?" त्यावर गांधी निरुत्तर झाले. पप्पा त्यांना म्हणाले, "आपण य निर्दोष चरख्याला जाहीर केलेले पारितोषिक द्यावे, आम्ही ती रक्कम तत्काळ आपल्या हरिजन फंडाला इथल्या इथेच देऊ." पण ना त्या चरख्याचे नाव जाहीर झाले, ना त्याला परितोषिक मिळाले! यावर काय बोलावे?

शंतनुकाकांनी त्यांच्या हजार कामांच्या व्यापातून वेळ काढून कितीतरी छदांची जोपसना केली. जात्याच ते हौशी, उत्साही आणि नाविन्याची आवड असलेले, बागेवर त्यांचे फार प्रेम, कुठूनकुठून ते बिया-रोपे आणत, त्यांची अपत्यनिर्विशेष प्रेमाने निगा राखत. स्नेही मंडळींना रोपा-फुलांच्या भेटी देत. भारतीय, शास्त्रीय गाणे त्यांना आवडायचेच, पण माझ्या कल्पनेप्रमाणे पाश्चात्य संगीताचे ते विशेष शौकीन होते. ते पियानो अगदी रंगून वाजवीत. चित्रकलेत ते इतके निपुण होते की, त्यांची विशेषतः तैलचित्रे पाहताना माझ्या मनात अनेकदा येई की, शंतनुकाका कारखानदार नसते झाले तर त्यांनी चित्रकार म्हणून मोठेच नाव कमावले असते. चि. संजयने (त्यांचा नातू) शंतनुकाकांच्या जन्मशतब्दीच्या निमित्ताने नुकतेच किर्लोस्करवाडीत त्यांच्या सुरेख तैलचित्रांचे छानदार प्रदर्शन भरवले होते. विश्वविख्यात चित्रकार माधव सातवळेकर हे त्यांच्या खास पिढीतील चित्रकार! फोटोग्राफीचा छंद त्यांनी फार लहानपणपासून वाढवलेला. नाटककार किर्लोस्करांचेच हे आप्त त्यामुळे नाटकाचे प्रेम तर त्यांच्या रक्तातूनच आलेले. पुण्यात चांगले नाटक आले की, आमची यमुकाकू (ती स्वतः उत्तम गात असे) नि शंतनुकाका झकास पोशाखात पहिल्या रांगे हटकून भेटणारच! वाडीच्या आणि औंधच्या माळावर हुंदडण्यात त्यांचे बालपण गेल्याने क्रिकेट, टेनिस, गोल्फ हे खेळ मनसोक्त खेळत. मनाने ते कुटुंबवत्सल त्यामुळे सवड लाभली की नातवंडांबरोबर पतंग उडवणे, चेंडूमागे पळणे हा त्यांचा मोठाच आनंदाचा विषय! प्रवासाचा जंगी बेत अधूनमधून ठरायचा नि अगदी सहकुटुंब सहपरिवार त्याची मौज लुटली जायची. घरच्या मंगलकार्यात त्यांच्या खेळकर, थट्टेखोर स्वभावला उधाण यायचे. सर्वांच्या गप्पागोष्टी रंगात आलेल्या असायच्या तेवढ्यात, एखादे पुडके त्यावर ज्याचे लग्न असे त्यांच्या नावापत्त्यचा कागद असे ते घेऊन शंतनुकाका लगबगीने येत, नववधूला म्हणत, "अगं, हे बघ. तू नवर्‍याला लिहिलेल्या पत्रांचा हा गठ्ठा मला सापडलाय! दाखवू का यातले एखादे पत्र आत्ता वाचून!" त्यावर त्या काकींची लाजून लाजून पुरेवाट होई. मग तिला म्हणत, "बरं नाही दाखवत हं वाचून तुझे पत्र! आता एक छानसा उखाणा घे, नाहीतर गाणे तरी म्हण!" तो कार्यक्रम इतका साग्रसंगीत झाला की, ते पुडके काकीच्या हातात देत. ते असायचे रिकाम्या कोर्‍या कागदांचे! अशी मजा! कारखान्यात यंत्रावर जसे त्यांचे प्रयोग चालत तसे पाकशास्त्रातही चालायचे! उकडीचे कळीदार, भरगच्च सारण भरलेले मोदक करण्यात पाककुशल गृहिणींना ते मागे टाकत. हा सुगरण आईकडून मिळालेल वारसा! एकदा यमुकाकूंशी स्वेटर विणण्याबद्दल त्यांनी पैज लावली. अट एकच, दोघांनीही फक्त रिकाम्या वेळीच स्वेटर विणायचा आणि ती जिंकली शंतनुकाकांनीच! इंग्रजी ते छान बोलत, लिहित पण रूढ अर्थाने त्यांना मी वक्ता म्हणणार नाही, मात्र त्यांचे बोलणे काही नवा विचार देऊन जाई, हे निश्चित! आयुष्याच्या स्वयंपर्वात त्यांनी ‘जेटयुगातला माणूस’, कॅक्टस अंड रोजेस’ (आत्मचरित्र) अशी वाचनीय पुस्तके लिहिली. त्यांचे मोठ्‍ठे मोठ्‍ठे अक्षर (ते मात्र बेताचेच वळणदार) असलेले पत्र अधूनमधून यायचे. त्यात सही कधी इंग्रजी तर पुष्कळदा मोडीत केलेली असायची. त्याची मला गंमत वाटायची. सार्‍या जगभर ते अनेकदा फिरले, नाना पदार्थांच्या चवी पाहिल्या, कधी खळखळ केली नाही त्याबद्दल! पण ज्वारीची भाकरी, मटकीची उसळ, डाळ-मेथ्याचे खमंग वरण, मक्याची भाजलेली कणसे नि भुईमुगाच्या शेंगा असा साधा रुचकर मेवा त्याना अतिशय प्रिय असायचा! आंबरस हा सर्वच किर्लोस्करांचा ‘वीक पॉईंट.’ मात्र खाताना त्यांनी आपल्या आरोग्याकडे कधी दुर्लक्ष केले नाही. मला वाटतं त्यांच्या नव्वदाव्या वर्षाचा वाढदिवस होता तेव्हाची ही गोष्ट! ‘लकाकि’चे आवार माणसांनी फुलून गेलेले, रोषणाईने सजलेले आणि हाराफुलांनी सुगंधित झालेले. मोठ्या खुशीत शंतनुकाका लोकांच्या शुभेच्छांचा स्वीकार करीत होते. त्यांची अगत्याने विचारपूस करीत होते. त्या आनंदमेळाव्यात कुणीसे त्यांना विचारले, ‘या वयातही आपली तब्येत एवढी कशी छान?’ त्यावर मनापासून हसत त्यांनी उत्तर दिले, "अहो, आफ्टर ऑल इट इज ए किर्लोस्कर प्रॉडक्ट" त्यावर उपस्थितात हास्याचे कारंजे चमकले. मीही त्यांना चिडवून म्हटले, "इतके छान दिसताय तुम्ही, सांभाळून रहा हं नाहीतर एखादी बुढ्ढी खूश होऊन जाईल तुमच्यावर!’ त्यावर जवळ उभ्या असणार्‍यांना म्हणतात, ‘बघा ही प्रोफेसर मालूताई काकांची कशी चेष्टा करते आहे!" असा जीवनाचा आनंद भरपूर लुटणारा आणि इतरांनाही तसाच वाटणारा हा आनंदयात्री काका आमचा! आमच्याशी एरवी असे सवंगड्याच्या जिव्हाळ्याने वागणारे शंतनुकाका कामाच्या विषयात भलतेसलते लाड कधी करायचे नाहीत. माझा चुलतभाऊ जीवन ‘रुद्रवाणी’ नावाचे मासिक चालवीत असे. त्याचे ते प्रथमपासून सल्लागार राहिले. पण "मी तुला पैसे देणार नाही किंवा त्यात जाहिरात देण्यासाठी कुणालाही गळही घालणार नाही" हे स्पष्टपणे त्याला सुरुवातीलाच सांगितले. मुलांनी मिंधे होता कामा नये. आपल्या बुद्धीने आपले मार्ग शोधले पाहिजेत, ही त्यांची जागरूक पालकाची दृष्टी मला प्रशंसनीय वाटते. एकदा जीवन मला म्हणाला, "मालूताई, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि यंत्रवीर शंतनुकाका यांची जन्मतारीख एकच आहे गं २८ मे. किती सुंदर योगायोग हा!" मी म्हटले, "त्यांची कार्यक्षेत्रे भिन्न असली तरी त्यांची राष्ट्रभक्ती अस्सल आण शंभर नंबरी आहे , खरं ना?" अशा या देशाच्या औद्योगिक विकासात लाखमोलाची भर घालणार्‍या उद्योगमहर्षीच्या जीवनात वैयक्तिक आणि व्यावसायिक, इतरांप्रमाणेच अनेक दुःखाचे प्रसंग आले. राजदरबारी हांजी, हांजी त्यांनी कधीच केली नाही. त्याचा सूड म्हणून की काय नकळे, शासनाने अनेक खटल्यांचे झंगट त्यांच्या मागे लावले. देशभर नव्हे, जगभर त्यांची जेवढी बदनामी, विटंबना करता येईल तेवढी सर्व माध्यमांचा वापर करून केली. अनन्वित छळ केला. असह्य मनस्ताप दिला. पण शंतनुकाकांनी असामान्य धैर्याने, चिरस्मरणीय विवेकाने त्या आसुरी छळाला तोंड दिले. शासनाच्या कपटव्यूहाबद्दल एक अक्षरही त्यांनी तोंडातून काढले नाही. उलट ‘कारखान्याचा प्रमुख या नात्याने ही सर्व जबाबदारी मी माझ्यावर घेतो’ असे उद्‍गार काढले. कै. नानासाहेब गोर्‍यांच्या अध्यक्षतेखाली प्रचंड सभा होऊन सारे पुणे, अप्रत्यक्षपणे देश त्याच्या पाठीशी उभा राहिला. शंतनुकाका, किर्लोस्कर घराणे, त्यांचे कार्य यावरचा विश्वास त्यांनी प्रकट केला. त्याबद्दल वाटणारी कृतज्ञता कशी व्यक्त करावी? विराट जनतेची ही उत्स्फूर्त प्रतिक्रिया बघून शासनालाही ‘सत्य न भरते दळभारे’ हे समजून चांगला झणझणीत धडा मिळाला. सत्याचे सोने भट्टीत जाऊन अधिक लखलखू लागले. 

शंतनुकाकांनी आपल्या उद्योगाने, चिंतन मननाने अवलोकन, अभ्यासाने, प्रवासाने कारखान्यांचे मोठे जाळे विणून अनेकांना मदतीचा, मार्गदशनाचा, प्रसंगी धनाचा आधार देऊन उभे केले. गुणी सहकारी व कामगार यांचे वडील बंधू बनून ‘दादा’ ही पदवी मिळवली. ‘शम्‌ करोति तो शंतनु’ (शम्‌ म्हणजे कल्याण) हे नाव तर सार्थ केलेच पण शासनाची लढाई खेळून ते ‘धैर्यधर’ही ठरले! जगभराच्या औद्योगिक जगात मोठेच नाव मिळवले.

पण नियतीचे खेळ आपल्याला कळत नाही हेच खरे! चंद्रकांत, श्रीकांत ही त्यांची दोन्ही कर्तबगार मुले त्यांच्या खांद्यावरच्या जबाबदार्‍या समर्थपणे पार पाडीत असतानाच कालवश झली! शंतनुकाकांच्या हृदयावर दोन शस्त्रक्रिया झाल्या. यमुकाकू अल्झायमर या भयंकर व्याधीने देवाघरी गेली. त सर्वार्थाने त्यांची अनुरूप सहचारिणी होती. त्यांच्या कर्तृत्वाला, पराक्रमाला तर तिने सदैव प्रोत्साहन दिलेच पण स्वतंत्रपणे तिने सामाजिक कार्यही केले, कारखाना चालवला.

आपल्या सुविद्य कलानिपुण पत्नीचा चिरवियोग त्यांना फार जाणवला. आनंदात हसणरे त्यांच्या घराचे गोकुळ काळवंडून गेले. शंतनुकाका, यमुताई हे खरोखरच ‘मेड फॉर इच आदर’ असेच सुखी समाधानी, एकात्म झालेले दाम्पत्य होते. काकूच्या मृत्यूनंतर मी व सौ. शांता त्यांना एकदा भेटायला गेलो, बसलो, बोललो आणि आता निरोप घ्यायला उठणार तर ते म्हणाले, "बसा गं थोडा वेळ! कुणी आले की आता फार बरे वाटते बघा!" माझ्या मनात आले सारी ऎश्वर्ये हात जोडून या आपल्या काकांपुढे उभी आहेत, पण  अंतर्यामी हे आता किती एकटे एकटे झाले आहेत. माझा हुंदका गळ्यतच अडकला.

मंद पावलाने शंतनुककांच्या जीवनाची रात्र पुढे सरकत होती. त्यांनी सरोजिनी (मुलगी) आणि सुमन-शशी या सुनांना जवळ बोलावून सांगितले, "मी देहदान कमिटीचा अध्यक्ष आहे. योग्य वेळ येताच माझा देह त्या कमिटीकडे पोहोचवायचा. तसा शब्द तुम्ही मला द्या. ‘बाबा’ तर आता गेलाच आहे, त्याला काय कळणार आहे थोडेच आम्ही देहाचे दहन केले की काय केले ते. आसे म्हणू नका."

त्या तीन मुलींनी दिलेला शब्द पाळला!

२४ एप्रिलला पहाटे साडे पाचला त्यांच्या निर्वाणाची वार्ता आम्हा कुटुंबियांना कळली. जड मनाने आम्ही सारे ‘लकाकि’वर धावलो! तिथे दरवाजात होता शंतनुकाकांचा हार घातलेला फोटो! त्याला नमस्कार करीत मी म्हटले, "शंतनुकाका तुमची प्रोफेसर मालूताई आली आहे. पण आज तुम्ही नाही तिला मायेने चिडवायला, पाठीवर कौतुकाची थाप आता कधीच देणार नाही तुम्ही. पण तुमचा आशीर्वाद आहेच ना शिरावर, तो कसा विसरेन मी?"

उद्याचा औद्योगिक इतिहास लिहिणारा इतिहासकार म्हणेल, ‘जगात भारताची मान उंचावणारा, उद्योगक्षेत्रातला कौस्तुभ घरंगळला!. ज्याने केवळ देशाचे औद्योगिकच नव्हे तर सांस्कृतिक जीवनही अनेक उपक्रम राबवून संपन्न केले. असा माणूस पुन्हा जन्माला यायला आता किती काळ वाट पहावी लागेल, कोण जाणे!

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color