स्वागतकक्ष arrow इ-प्रकाशन arrow प्रिय सोनिया
प्रिय सोनिया पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेख़क Administrator   
 

प्रिय सोनिया,

अनेकोत्तम आशीर्वाद! तू देवाघरी गेलीस त्याला पाहता पाहता महिना होऊन गेला हे खरं वाटत नाही गं! पण काळ कुणासाठी थांबतो थोडाच? एक मात्र निश्चित की त्या काळाला आमच्या मनातली तुझी स्मृती मात्र पुसता येणार नाही. सोनुले, गेली दोन अडीच वर्षे एका असाध्य आणि भयानक दुखण्याशी तू जी कडवी झुंज विलक्षण धैर्याने दिलीस ना, त्याची आठवण झाली की मन गलबलून जाते. आणि तुझ्या लढाऊ वृत्तीने, अभिमानाने भरूनही येते.

तू माझ्या जिवलग मैत्रिण कै. उषाताई जावडेकर यांची नात, म्हणून मलाही माझी नातच वाटायचीस. सुमारे पन्नास वर्षापूर्वी नोकरीच्या निमित्ताने मी सांगलीला आले तेव्हा तुझे आजोबा प्रा. जावडेकर आणि सौ. उषाताई हेच तर माझे पहिले शेजारी होते. सारे कुटुंबच हुशार, सुस्वभावी, कुणाच्याही अडीअडचणीला धावून जाणारे! स्वाभविकच माझे त्या घराशी मैत्र जुळले ते अगदी आजतागायत! तुझा या घरात प्रवेश झाला ना, त्यावेळची एक गमतीदार आठवण तुला सांगते. तुझी आई डॉ. सौ. रेवती आमची माहेरवाशीणच म्हणेनास, ती हॉस्पिटलमध्ये जायला निघाली तेव्हा मी थट्टेने तिला म्हटले, "बाई गं, या जावडेकरांच्या घरात ठणठणासारखे मुलगेच होतात. तुलाही पहिला मुलगा ‘प्रेषितच’. तेव्हा आम्हाला आता एक छबुकडी कन्याच हवी असा माझा तुला नम्र अर्ज आहे. त्याचा तू कृपावंत होऊन विचार करावास." तू झाल्याचे कळताच ती हसून उषाताईना म्हणाली, "मालूमावशींना म्हणावं घेतला बरं का तुमचा अर्ज विचारात." हॉस्पिटलमध्ये तुला पाहिल्यावर मी रेवतीला म्हटले, "अरे व्वा, काय लाखात एक अशी देखणी छोकरी आहे ही तुझी!" केवड्यासारखी तुझी गोरीपान, सुवर्णकांती, दाट काळेभोर केस, टपोरे मोठे डोळे, रुंद कपाळ असे मोहक रुपडे पाहून घरादरात प्रसन्नतेचं कारंजेच जणू थुईथुई नाचू लागले. तू हळूहळू मोठी होऊ लागलीस. स्वभावातल्या गोडव्याने, अभ्यासातल्या हुशारीने तुझे पांढरे शुभ्र दात हिवाळ्यातल्या गवतावरच्या दवबिंदूंसारखे चमचम करायचे नि इंग्रजी सहाच्या आकड्यासारखी तुझ्या कपाळावर भुरभुरणारी केसांची बट तुला मोठी शोभून दिसयची. आपली केशभूषा नि वेशभूषा आकर्षक असावी, पण भडक मात्र मुळीच असू नये याची तुझी जाण कौतुकास्पद होती. मखमली चपला घालून तू रस्त्याने चालू लागलीस की तुझी उंच, बांधेसूद, सुदृढ मूर्ती पाहतच राहावे असे वाटायचे. मी तर म्हणायची, "आली बघा आमची परी." ( आणि शाळेच्या नाटकात तू परीचे काम केल्यावर मला खूप मजा वाटली.) देवाने रंगरूप, बुद्धिमत्ता याचे तुला जणू वरदानच दिले होते. म्हणून मी मनाशी म्हणायची, "देवा, ही आमची सोनसाखळी शंभर वर्षाची म्हातारी होऊ दे बरे!’ पण नियती तो आशीर्वाद ऎकताना छद्मीपणे हसत होती याची मला कुठून कल्पना असणार?

दहावीला तू तुझ्या शाळेत पहिली आलीस, बारावीला तर ब्याण्णव टक्के गुण मिळवलेस. इथल्याच ‘वालचंद’ महाविद्यालयात ‘इलेक्ट्रॉनिक्सला तुल प्रवेश मिळाला. पण तुझे आईवडील, काकाकाकू सगळेच घरात ‘डॉक्टर’! तेव्हा आपणही त्यांच्यासारखेच धन्वन्तरी बनून समाजसेवा करावी असे तुला वाटले तर ते स्वाभाविकच म्हणायला हवे. मेडिकलच्या प्रवेशाचा नेहमीचा गोंधळ त्यावर्षीही होताच पण तरीही तुला कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील महाविद्यालयात एकदाचा प्रवेश मिळाला. त्यापूर्वी क्वचित तुझी पाठ किंचित दुखायची. सर्वांना वाटले तू आईबरोबर बॅडमिंटन खेळायला जातेस स्कूटरस्वार होऊन फिरतेस, दुखत असेल, लचकला असेल पायबिय तुझा! पण तरीही लगेच डॉ. अजित, रेवतींनी सर्व परीक्षा करून घेतल्या. पण आठ-दहा दिवसांनी तू कोल्हापूरहून आलीस ती जिना चढताना मला कठड्याला धरावे लागते, पायात अशक्तपणा जाणवतो असे सांगतच. सांगली-मिरजेचे डॉक्टर झाले. पुणे-मुंबईच्या डॉ. वाडिया, डॉ. पंड्या, डॉ. चारुदत्त आपटे अशा अन्य नामवंतांनीही तपासणी केली आणि निदान केले ते तुझ्या Spinal Chordवर ट्यूमर झाल्याचे.लाखोत एखाद्याला होणारे हे दुखणे तुझ्या वाट्याला कुठून आले या विचारांनी आम्ही सारे हतबुद्ध झालो. ते दुखणे रुग्णाच्या स्तनाला वा गर्भाशयाला झाले तर काढता येते. आता इलाज काय? तू हे कसे सोसशील या विचारात आम्ही व्यग्र होतो. तू भावी डॉक्टर हे जाणून डॉक्टरांनी सर्व दुखणे, त्याचे स्वरूप, गांभीर्य तुझ्या आग्रहावरून तपशीलवार सांगितले. तू ते कमालीच्या शांतपणे, लक्षपूर्वक ऎकलेस, भ्याली नाहीस, रडली-भेकली नाहीस वा स्वतःच्या नशिबाला बोल लावीत हताशही झाली नाहीस. आता लढायचे आहे, आपल्याला एका दैत्याशी याची जणू खूणगाठ मनाशी बांधून लढाईला सज्ज झालीस. कुटुंबियांना तूच धीर दिलास. भले शाबास, सर्व डॉक्टर मंडळी तुला अतिशय जिव्हाळ्याने निःस्वार्थपणे औषधोपचार, मार्गदर्शन करीत होते. त्यांच्या अचूक उपचारांनी तुझाही आत्मविश्वास वाढयला मदत झाली असणार ना? नंतर डॉक्टर चारू आपटे यांनी तुझ्यावर दोन शस्त्रक्रिया कुशलतेने केल्या. दरवेळी शस्त्रक्रियेला जाताना, हे मला अजित-रेवती सांगत होते की, तू अंगठा वर करून म्हणायचीस, "I will fight" आणि बाहेर आल्यावर उत्तर द्यायचीस, "I am fine". पुढे काही दिवस तुला अतिदक्षता विभागात राहावे लागले. तिथले चित्र म्हणजे कुणाच्या घशा-नाकात नळ्या घातलेल्या, तर कुणाला ऑक्सिजन लावलेला. चोरपावलांनी मृत्यूदूत जवळ फिरत असलेल्या वातावरणाने तू खचली नाहीस, उलट हसतमुखाने जवळच्या रुग्णांना, त्यांच्या पालकांना धीर देत म्हणत राहिलीस, "I will pray for you, for your maother and your father." एका शिकाऊ डॉक्टराने तुझ्या तोंडावरच, "हिला शेजारच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये का नाही ठेवले?", असे विचारले. (तुझे दुखणे कॅन्सरचे नव्हतेच, पण तेवढेच असाध्य बरीक होते.) तुझ्यातला सुप्त पण जातिवंत डॉक्टर जागा होता. तू रेवती-अजितला म्हणालीस, की रुग्णाशी असे बोलते का कुणी कधी, आईबाबा? पुढे तर तीस-पस्तीस दिवस रोज मिनिटभर तुला रेडिओथेरपीही घ्यावी लागली. ते अगडबंब मशीन त्या खोलीतला तो शंभर टक्के एकाकीपणा, जणू न संपणारा अंधारी बोगदाच वाटतो तो मला! आताही तू तोंड दिलेस. डॉक्टर मंडळी तुझ्या सहनशीलतेची, शौर्याची तोंडभरून तारीफ करीत. मी तर तुला ‘वीरबाला’ हेच नाव दिले. डॉक्टर चारू आपटे यांनी रोज सकाळ-संध्याकाळ मिळून सहा तास तुझ्याकडून नियमित व्यायाम करून घेतला. फार मायाळू माणूस! तुझी त्यांच्यावर स्वाभाविकच नितांत श्रद्धा! त्यांच्या व तुझ्या थोर मेहनतीला यश येऊन तू काही पावले, काठी घेऊन का असेना, पण चालू लागलीस. पुन्हा कोल्हापुरातील तुझे शिक्षण सुरू झाले. आमच्या रेवतीने तर तुझ्याजवळ सतत राहता यावे म्हणून स्वतःची प्रॅक्टिसही सोडून दिली. तुझा वर्ग होता महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावर. दिवसातून तीन-चार वेळा तिथे चढ-उतार करावी लागे. काठी व रेवती यांच्या सहाय्यने तू तेही केलेस. प्रॅक्टिकल्स केलीस, मित्र-मैत्रिणींच्या शंका खुर्चीवर बसल्या बसल्या सोडवल्यास, गृहपठातला पहिला नंबरही कायम टिकवलास, गुणी मुली, तुझी कशा कशासाठी नि किती पाठ थोपटावी गं! कोल्हापूरची दगदग टळावी व एम. बी. बी. एस. चे पहिले वर्ष तुला मिरजेत करायला मिळावे म्हणून सांगलीपासून दिल्लीपर्यंत अजित-रेवतीने, दिलीप-स्मिताने फेर्‍या मारून अनेक वरिष्ठ संबंधितांच्या गाठीभेटी घेऊन जिवाचे रान केले. उपयोग शून्य. कारण माणसांच्या सुखदुःखापेक्षा नियमांची रुक्ष चोपडी येथे महत्वाची ठरली. ते रामायण उगाळावे तेवढे काळेच.

तुझे दुखणे तर मागे हटायला मुळीच तयार नव्हते. तुझे पाय बाद झाले आणि तू चाकाच्या खुर्चीची तेव्हापासून जी बंदिवान झालीस ते तुझ्या अखेरच्या श्वासापर्यंत. तुझ्या आजोबांपासून ते धाकट्या आशयपर्यंत सारेजण तुला बरे वाटावे म्हणून त्यांना जे जे शक्य होते ते अहोरात्र करीत होती. हे सार्‍यांचे तुझ्यावरील व परस्परांवरील अतूट प्रेम बघून देखील माझे डोळे भरून यायचे. परवाच्या दिवाळीत घटप्रभेच्या कर्नाटक आरोग्यधामात तुम्ही चार-पाच दिवस राहून आलात. तिथे खुर्चीवर बसून का होईन तू आवारात मोकळेपणी हिंडली-फिरलीस आणि म्हणालीस, "आईबाबा, किती दिवसांनी मला कोवळ्या उन्हात, शीतल चंद्रप्रकाशात हिंडता आले हो! खूप मजा वाटली बघा." पण ती नियती महानिर्दय! एखद्या वेड्या माणसने सुंदर बिलोरी आरशावर दगड फेकून त्याचा चक्काचूर करावा ना, तशी ती तुझ्या सार्‍या आनंदाचा, उत्सहाचा चक्काचूर करीत होती. तुझे पाय गेले तेव्हा तू म्हणालीस, "हात आहेत की माझे शाबूत. मी आता कॉम्युटर शिकेन." अजितने तोही विचार कृतीत आणला. दिलीपकाकचे मार्गदर्शन मिळू लागले. वालचंद कॉलेजमध्ये त्या विषयाच्या डिप्लोमाला तू नव्या उत्साहाने, आशावादाने नाव घातलेस. प्राचार्य श्रीराम कानिटकर, प्रा. ताम्हनकर इत्यादी गुरुजनांनी आम्ही तुला घरी येऊन शिकवू. गो अहेड, म्हणून तुला प्रोत्साहन दिले. नाना वृत्तपत्रातल्या इंग्रजी कविता तू त्या मशीनवर उतरविल्यास. इंग्रजी संभाषणाची पुस्तके आणून वाचायला सुरुवात केलीस. जणू तू नियतीला सांगत होतीस, "हम भी कुछ कम नहीं. मी मोडेन पण वाकणार नाही कधीच तुझ्यापुढे." आणि खरंच खरंच नाही गं वाकलीस तू. तुझे सामान आवरताना एक कागद मिळाला रेवती-अजितला. तो कागद नव्हता तर ते होते तुझ्या निर्भय, शूर मनाचे स्वच्छ प्रतिबिंब! स्वतःचे नाव घालून, तारीख घालून तू जणू स्वतःशीच स्वगत भाषण करीत होतीस. ते होते, "Never give up! Always think positive, work hard, hope for the best, be sincere, cofident, patient. Then leave it to God. God will help you. All the best." खाली सही केली होतीस ‘Sonia’. गडे सोनिया, यौवनाच्या देहलीवर उभी असलेली तू  सुकुमार कन्या. कुठून कुठून आणलेस तू एवढे शहाणपण? सुसरी-मगरीच्या जबड्यात सापडलेल्या माणसाने आपली मान सोडवून घेण्यासाठी जिवाच्या आकांतने धडपडावे तशी तू प्रयत्नांचे वज्र हाती घेऊन त्या मुर्दाड ट्यूमरचा डोंगर फोडायला जिद्दीने उभी होतीस! तुझ्या त्या दुर्दम्य इच्छाशक्तीला माझा पुन्हा पुन्हा सलाम! या तुझ्या शौर्यानेच इतरांना अधिकाधिक प्रयत्न करायला बळ लाभत होते. मनातले भय उणावत होते. पण तेव्हाच नेमके स्टेरॉइडस या औषधाचे वाईट परिणाम दिसू लागले. तुझे वजन अणि रक्तदाब वढू लागला. ते कमी व्हावे म्हणून औषधाचा डोस कमी करावा तर तुझे मज्जातंतू - त्यांची संवेदना अधिक बधिर, निकामी होऊ लागली. दैवाला संस्कृतात ‘महाभूत’ म्हटले आहे तेच खरे! त्या भुताला तू भीक घातली नाहीस. म्हणालीस, ‘पाय गेले, हातही गेले, पण माझा गळा तर शाबूत आहे ना? आईबाबा, मी गाणे शिकते आता.’ (धन्य तुझी ज्ञानाभिलाषा नि जिज्ञासाबुद्धी!) त्याची व्यवस्था तुझ्या आईवडिलांनी तत्परतेने केली. श्री. प्रकाश नातू नावाचे गुरुजी अगत्याने तुला शिकवू लागले. काही भजने , काही राग तू शिकलीस. तुझा गळा जात्याच मधुर! नंतरच्या एका भेटीत नातू गुरूजी म्हणाले, "सोनिया आणखी सहा महिने शिकली असती तर तिचा एकटीच तासा दीड तासाचा छान कार्यक्रम करता आला असता." ते उद्‌गार ऎकताना माझ्या मनात आले आमच्या उषाताईंनी हिचे नाव ‘सोनिया’ ठेवले आहे ते सार्थ आहे. ज्याला हात लावावा त्या विषयाचे, कलेचे सोने करून दाखविणारी कन्या आहे ही! 

तुझ्या दुखण्याची घोडदौड चालूच होती. पुन्हा पुणे, पुन्हा डॉक्टर आपटे यांना भेटणे सर्व झाले. त्यांनी कालच्या डिसेंबरात तुझ्यावर आणखी दोन शस्त्रक्रिया केल्या. जरा प्रकाशाचा कवडसा दिसतो न दिसतो तो पुन्हा गाडे पूर्वपदावर! तरीही नवनव्या कल्पनात तू स्वतःला गुंतवून घेत होतीस. आकाशवाणीवर आवडीच्या चित्रपटगीतांचा पहिलाच कार्यक्रम होता. तू सबंधित अधिकार्‍यांना फोनवर म्हणालीस की मी एम. बी. बी. एस. च्या पहिल्या वर्षात शिकते आहे. पण काही अनपेक्षित आजाराने माझे शिक्षण स्थगित झाले आहे. तरीही माणसाने जीवनात प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेत जगले पाहिजे असे मला वाटते. म्हणून तू त्यांना आवडीचे गाणे कळवलेस. सोनिया, बेटा, त्या गाण्याचे शब्द इथे लिहितानाही मला भरून येते आह गं. गाणे होते, "मौत आएगी तो आएगी एक दिन। जान जाएगी तो जाएगी एक दिन। ऎसी बातोंसे क्या घबराना? यहॉं कल क्या हो किसने जाना? जिंदगी एक सफर है सुहाना" मुली, ही स्थितप्रज्ञता तू कुठून मिळवलीस? कर्णाने जन्मतःच कवचकुण्डले घातलेली असावीत इतकी तुझी ही स्थिर बुद्धी सहज आहे गं! दुर्दैवाने मागे राहणार्‍या आमच्यासारख्यांना माणसाने कसे जगावे हेच जणू सांगून गेलीस काय? 

एकेक दिवस तुझी प्रकृती अधिकाधिक बिघडत चालली! सारे घरदार अधिकाधिक काळजीने कळवंडू लागले. तरीही तू धीरोदात्तपणे कालक्रमणा करीत होतीस. आता तर श्वास घेणेही तुला अवघड होऊ लागले होते. अन्न गिळता येईना म्हणून नळीने द्रव पदार्थ घालावे लागले. दैवाचे क्रौर्य पाहून मी भडकून जायची. आम्ही म्हातारी माणसे कशाला जगलो या विचाराने मला अपरधी वाटायचे. तुझी सहनशक्ती पाहून जीव तिळतिळ तुटायचा. पण उपयोग काय? अखेरीस वीस जानेवारीच्या पहाटे पाच साडेपाचला शांतपणे तू या जगाचा निरोप घेतलास. तुझे अर्धेमुर्धे उघडे नेत्र पाहताना "या सुंदर डोळ्यांना कितीतरी जग बघायचे होते ते राहूनच गेले! या निरागस जिवाची सारी स्वप्ने मातीमोल झाली. हिने आपल्या घराचे, देशाचे नाव कितीतरी उज्ज्वल केले असते पण सारेच आता भूतकाळात जमा झाले." असे माझ्या मनात आले.

तुझ्या निर्भय स्वभावाचा तुझ्या निधनानंतरही एक अनुभव आला. तू आपले ‘नेत्रदान’ केले होतेस. तू गेल्यावर त्याच संध्याकाळी दोन अंधांनी तुझ्या टपोर्‍या, काळ्याभोर डोळ्यांनी या जगाचे पहिले सुंदर दर्शन घेतले. मी स्वतःशीच म्हटले, "हे दोघे तिच्या डोळ्यांनी पाहतील खरे. पण आमच्या सोनियाची अद्‌भुत, धीरोदात्त, पराक्रमी झुंजार जीवनदृष्टी यांना कधी लाभेल का?" 

तू गेल्यावर रेवती तुझ्या पार्थिवावर हळुवारपणे हात फिरवीत मूकपणे अश्रू ढाळीत होती. आमचा अजित तर जणू वाकूनच गेला होता. सार्‍यांची लाडकी सोनिया गेली. जावडेकर घरातले चैतन्याने नाचणारे कारंजे आटले. त्या घरातली हिरकणी निखळली. तिला अडीच वर्षे हालहाल करून नाचवणार्‍या मृत्यूला मी म्हटले, "मृत्यो, जगाच्या बागेतील वाळलेली पानं गोळा करण्याचे काम ईश्वराने तुझ्याकडे सोपविले असता मुक्या अर्धोन्मीलित कळ्या तोडण्याइतका तू क्रूर आणि मठ्ठ कसा आहेस रे? तुला फार गर्व आहे. मी सारे चराचर नमवतो. पण भ्रम आहे तुझा तो! तू आमच्या सोनियाचा फक्त देहच नेऊ शकलास, तिची जिद्द, तिचे ज्ञानाचे प्रेम, तिचे अलौकिक धैर्य, आणि तिचे सद्‌गुण तू कधीच नेऊ शकणार नाहीस. खरा पराभूत तू आहेस. आमची सोनिया बाळ अपराजित आहे. अपराजिता आहे."

सोनिया, अजित-रेवतीला तुझ्या रुपाने लाखाची ठेव मिळाली होती. ती त्यानेच परत घेतली. कुणाकडे तक्रार करायची? रेवती, अजित आणि त्यांच्याबरोबर अखंड राबणारे सारे लहानमोठे कुटुंबीय यांना आयुष्याच्या अखेरीपर्यंत तुझ्या चिरवियोगाने काळजात पेटलेली आग घेऊनच यापुढे जगावे लागणार! यापेक्षा काय म्हणू?

बेटा, कुठे असशील तिथे सुखी अस. यापेक्षा तुला काय आशीर्वाद देऊ?
तुझी
मालूआजी        

 
www.mymarathi.com                                                                                 ही ई-मेल पाहण्यासाठी कृपया जावास्क्रिप्ट कार्यान्वित करा.
 
< मागील

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color