स्वागतकक्ष arrow सय arrow सफर थायलॅंडची
सफर थायलॅंडची पी.डी.एफ़ छापा ई-मेल
लेखिका - सौ. शोभा साळोखे
अजब पब्लिकेशन्स, किंमत - रु. २००/-
प्रथम आवृत्ती - १२ ऑक्टोबर २००५
अगदी परवा परवा म्हणजे आठ दिवसापूर्वी ज्ञानदीपतर्फे ट्रीपला गेलो होतो. कुठे म्हणाल, तर थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉक व पटाया येथे. आणि पाच दहाजण नाही तर नव्वद लोक मिळून गेलो होतो. तेथे बसमधून जात असताना आमच्यासोबत असणार्‍या गाईडकडून आम्हाला त्या त्या भागाबद्दल, तेथील लोकांबद्दल, धार्मिक, सामाजिक, राजकीय माहिती मिळाली खरी पण अगदी वरवरची. काही ठिकाणी माहितीपत्रकेही मिळाली. पण गंमत म्हणजे ट्रीपहून परत आल्यावर चारच दिवसांनी ‘सफर थायलॅंडची’ हे पुस्तक माझ्या हातात पडले आणि मी ते सर्व घाईघाईने वाचून संपविलेही. वाचताना मला परत एकदा थायलंडला जाऊन आल्याचा आनंद मिळाला. मुख्य म्हणजे थायलंडची सर्वंकष माहिती उपलब्ध झाली.
वास्तविक बघता प्रथम हे पुस्तक वाचून नंतर थायलंडला गेलो असतो तर आम्हाला तेथील संस्कृती अधिक चांगल्या रीतीने समजून घेता आली असती. या पुस्तकाच्या लेखिका शोभाताई स्वतः थायलंडमध्ये २०-२१ वर्षे वास्तव्यास होत्या. तेथील अनेक ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. थायी लोकांची संस्कृती  जवळून पाहिली, अनुभवली असल्याने ती पुस्तकात स्पष्टपणे प्रतिबिंबित झाली आहे. आज दिसणारे थायलंड व २०-२५ वर्षापूर्वीचे थायलंड यात झपाट्याने होत गेलेला बदल त्यांनी स्वतः अनुभवला आहे.
पुस्तकाची विभागणी सात मोठ्या प्रकरणात करण्यात आलेली आहे. सुरुवातीस थायलंडच्या भौगोलिक, तसेच नैसर्गिक पार्श्वभूमीचे दर्शन घडविल्यानंतर लेखिकेने बँकॉक पटाया व कंचनाबुरी या तेथील प्रसिद्ध शहरांबाद्दल समग्र माहिती आपल्या रसाळ भाषेत वाचकांपर्यंत पोहोचविली आहे. त्यानंतर कलात्मक सांस्कृतिक परंपरांचे जतन करणारा वारसा असलेल्या विविध आकर्षक इमारतींची, मंदिरांची प्रेक्षणीय स्थळांची सविस्तर गमतीशीर माहिती वाचकाच्या हाती पडते तीही सुंदर, रंगीत फोटोंसह. त्यामुळे वाचकाला समक्ष जाऊन आल्याचा अनुभव मिळतो. बौद्ध धर्माचा थायी लोकांवर असलेला पगडा याचेही आपणास दर्शन घडते. थायी लोक हे अत्यंत मृदु स्वभावाचे असून भांडणतंटा, मारामारी यापासून चार हात लांब राहणेच पसंत करतात.
थायलंडमध्ये राजेशाही पद्धत असल्याने प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी राजा व राणीचे मोठ्या फॊटोसहित फलक लावलेले दिसतात. राजघराण्याबाद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनात नितांत आदरभाव असल्याचे ते प्रतीकच आहे. तसेच तेथील वैविध्यपूर्ण रीतीरिवाज व आगळेवेगळे वाटणारे उत्सव यांचेही समग्र वर्णन वाचायला मिळते. ‘थायी नववर्ष’, ‘थायी पतंग’, ‘विवाह सोहळा’ अशा अनेक नाविन्यपूर्ण उत्सवांची ओळख त्यांच्या थायी नावांसकट करून दिली आहे. आपल्याकडील दिवाळीप्रमाणे येथेही दीपोत्सव साजरा केला जातो. त्याला ‘लॉय क्रथॉंग’ असे म्हणतात. आपल्याकडील त्रिपुरी पौर्णिमेप्रमाणे पाण्यात दिवे सोडले जातात. ‘लॉय’ म्हणजे तरंगणे व ‘क्रथॉंग’ म्हणजे केळीच्या पानापासून केलेले पसरट भांडे. असे भांडे पाण्यात तरंगत सोडणे. या पसरट भांड्यात म्हणजे दिव्यात मेणबत्ती, उदबत्ती, फुले, पैसा, सुपारी ठेवून ते पाण्यात सोडले जाते. अर्थात हे भांडे म्हणजेच हा दिवा पाण्यात सोडण्यापूर्वी मेणबत्ती व उदबत्ती पेटविली जाते. काही ठिकाणी हे दिवे स्तूप, बोट, प्रसिद्ध मंदिरे अशा विविध आकाराचे केले जातात. तसेच काही ठिकाणी त्यावर खाद्य पदार्थही ठेवले जातात. असे प्रवाहित केलेले दिवे मोठे मनोवेधक दिसतात. दिवे दूर नजरेआड गेला म्हणजे आपली गेल्या वर्षीची पातके नाहीशी होऊन पुढील वर्ष सुखाचे जाते असे समजले जाते. अशा रीतीने जलदेवतेची मनापासून पूजा केली जाते. हे वर्णन करताना लेखिकेने त्यामागची कथाही सांगितली आहे.
थायलंडमध्ये सोनेरी रंगाला फार महत्व दिले जाते. त्यामुळे सगळीकडे सोनेरी रंगाचा वापर केला जातो. बॅंकॉक विमानतळालाही ‘सुवर्णभूमी’ असे समर्पक नाव दिलेले आहे. आपल्याकडे जसे प्रत्येक घरासमोर तुळशीवृंदावन असते तसे थायलंडमधील घरासमोर सोनेरी रंगाच्या बुद्धाच्या मूर्तीची स्थापना केलेली दिसते. बुद्धाची सुवर्णमंदिरे पाहताना प्राचीन भारतातील सुवर्णयुगाची कल्पना येते. थायलंडमध्ये हत्तीला दिला जाणारा मान हे त्याचेच द्योतक आहे.
१७५ पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तकात थायलंडबद्दल इतकी माहिती दिलेली आहे की या छोट्याशा अभिप्रायात त्याचा गोषवारा घेणे सुद्धा मला जमणार नाही. सांगायचे तात्पर्य एवढेच, की असे हे पुस्तक प्रत्येकाने स्वतः मुळातूनच वाचले पाहिजे. हे पुस्तक लिहून लेखिकेने भारत थायलंडमध्ये एक नवा स्नेहबंध निर्माण केला आहे.      

सौ. शुभांगी सु. रानडे

 
< मागील   पुढील >

  • Narrow screen resolution
  • Wide screen resolution
  • Auto width resolution
  • Increase font size
  • Decrease font size
  • Default font size
  • default color
  • blue color
  • green color