Designed & developed byDnyandeep Infotech

संमेलनाचा दुसरा दिवस

Parent Category: साहित्य संमेलने

( सौजन्य - इसकाळ न्यूज सर्व्हीस)
'मला दादला नको गं बाई...', चा ठसका इंडिया कम्युनिटी सेंटरमध्ये घुमला आणि केदार शिंदेच्या खड्या आवाजाला शेकडो लोकांनी टाळ्यांची साथ सुरू केली. महाराष्ट्राच्या भूमीपासून हजारो मैल दूर शिस्तबद्ध अमेरिकेत केदार, भरत जाधव आणि अंकुश चौधरीने लोकनाट्य, लोकगीतांची अशी काही भन्नाट अदाकारी पेश केली, की शिट्ट्यांच्या बरसातीने क्षणभर मिलपिटासही "बेशिस्त' बनले !
संस्कृतीच्या अंगाने मराठीचे लोकसाहित्य किती सकस आहे, याची साक्षच केदार, भरत आणि अंकुशच्या "हसा चकटफू' या गप्पागोष्टींच्या कार्यक्रमाला पहिल्या विश्‍व मराठी साहित्य संमेलनात मिळाली. या त्रिकुटाच्या ठसकेबाज विनोदांना आणि लोकगीतांना केवळ बे एरियातील आजी-आजोबा आणि आई-बाबांनीच नव्हे, तर "टीन्स्‌'नेही दणदणीत दाद दिली.
खरेतर साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसावर वर्चस्व राहिले, तर नाट्य-चित्रपट कलावंतांचे. संध्याकाळच्या सत्रातील कवीसंमेलनाला जरूर चांगला प्रतिसाद होता. पण, प्रशांत दामले यांची सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली प्रकट मुलाखत आणि "हसा चकटफू'ने अख्खे सभागृह डोक्‍यावर घेतले.
"समकालिन मराठी साहित्य-नव्या वाटा,' या विषयावरील परिसंवादाने संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात झाली. त्यानंतर "आजची मनोरंजनाची माध्यमे आणि अभिरूची', या विषयावर चर्चा झाली. त्या पाठोपाठ बे एरियातील कलाकार सुप्रिया पुराणिक यांनी "नवरस' नृत्याविष्कार सादर केला. परिसंवादातील दीर्घ चर्चेने आलेला किंचितसा आळस या कार्यक्रमाने झटकला आणि त्यानंतर कवीसंमेलनाने संमेलनात रंगत आणली. ज्येष्ठ कवी शंकर वैद्य यांच्या अध्यक्षतेखालील या कवीसंमेलनात अरूणा ढेरे, प्रकाश होळकर, नलेश पाटील, इंद्रजित भालेराव, सुधाकर गायधनी, प्रवीण दवणे आणि श्रीधर नरांदेकर यांचा सहभाग होता. निसर्गापासून मृत्यूपर्यंत सर्व विषयांचे चिंतन या कवींच्या कवितांमध्ये आले. नलेश पाटील यांनी सादर केलेल्या "सानुल्यां'ना (चारोळी) रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाट प्रतिसाद दिला. प्रशांत दामले यांना बोलके करीत गाडगीळ यांनी त्यांची खुसखुशीत मुलाखत रंगवली. याच दरम्यान, बहिणाबाईंच्या कवितांवर आधारित "माह्य मनगत' या संजय पाचपांडे यांनी सादर केलेल्या कार्यक्रमालाही रसिकांनी दाद दिली.
परिसंवाद, कविता, नाट्य, नृत्य या कलामैफलीला आणखी उंचीवर नेले, ते केदार, भरत आणि अंकुशने. "हसा चकटफू' हा वेगळाच प्रयोग आहे. नाट्य-मुलाखत असे त्याचे स्वरूप. शाहिर साबळेंचे खडे बोल तितक्‍याचा खड्या आवाजात केदारने रंगमंचावरून सादर केले. या तिघांमधील अचूक टायमिंगने आणि बेफाम विनोदांनी सभागृहाला खळखळून हसवले.
पंडित हृदयनाथ मंगशेकर यांच्या "भावसरगम'ने आदल्या दिवशी रसिकांना पहाटेपर्यंत खिळवून ठेवले होते. आज त्याचीच पुनरावृत्ती झाली.

X

Right Click

No right click