परिसंवाद -संतसाहित्य आणि आधुनिकता

( सौजन्य - इसकाळ न्यूज सर्व्हीस)
"विश्‍वचैतन्याचे तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ या दोन्ही भूमिकांतून केलेला विचार म्हणजे संतसाहित्य,' असा सूर विश्‍व साहित्य संमेलनातील "संतसाहित्य आणि आधुनिकता' या परिसंवादात सोमवारी व्यक्त झाला. अध्यक्षस्थानी संतसाहित्याचे अभ्यासक रामचंद्र देखणे होते. रसाळ चिंतनाने हा परिसंवाद रंगला.
मिलिंद जोशी, मधू नेने, दादा गोरे, माधव वैद्य आणि भालचंद्र शिंदे यांचा या परिसंवादात सहभाग होता.
अमेरिकेत होणारे हे संमेलन हा मराठीचा गौरव आहे. संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, बालकवी, कुसुमाग्रज यांच्या गावांहून आलेली अक्षरांची पालखी मिलपिटासमध्ये आली आहे. "मायबोली मातृभाषा वंद मायेसारखी...घेऊनी चाललो ही अक्षरांची पालखी,' असे वर्णन करून देखणे यांनी परिसंवादाची सुरवात केली.
""ज्ञानदेव हा महाराष्ट्राचा श्‍वास आहे. संत तुकाराम हा निःश्‍वास आहे, तर समर्थ रामदास आणि संत एकनाथ हा ध्यास आहे. या ध्यासापोटी संतांनी लोकजीवनाचे उत्कट दर्शन घेतले आणि तितक्‍याच उत्कटतेने ते साहित्यातून व्यक्त झाले. मराठी भाषेच्या नगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ करून ज्ञानदेवांनी भागवत धर्माच्या साध्या-भोळ्या भक्तीला वैश्‍विक मानवतावादाची बैठक दिली, तर तुकोबारायांनी त्या मानवतावादाला अखंड ऐक्‍याच्या वैश्‍विक पातळीवर नेऊन बसवले. म्हणून विश्‍वचैतन्याचे तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ या दोन्ही भूमिकांतून केलेला विचार म्हणजे संतसाहित्य होय,'' असे त्यांनी सांगितले.
जोशी म्हणाले, ""आधुनिक युगातल्या सगळ्या प्रगत संकल्पना संतसाहित्यात सापडतात. आपले संत विज्ञाननिष्ठ होते. व्यक्ती, समाज, राष्ट्र आणि जगाचा विचार करणाऱ्या संतांनी सकारात्मक जागतिकीकरणाचा विचार मांडला. आज आपण तंत्रज्ञानाच्या आहारी जात आहोत; पण तंत्रज्ञानाइतकेच तत्त्वज्ञानही आवश्‍यक आहे.''
संतसाहित्याच्या चळवळी, त्यातील वैश्‍विक जाणिवा, भावदर्शन, त्यातील लोकसंवाद आणि वैज्ञानिक दृष्टी या परिसंवादातून व्यक्त झाली. विज्ञान, संस्कृती, व्यवस्थापन असे वेगवेगळे पदर उलगडून दाखविण्यात आले.
मनाची गुलामी बाजूला सारा - धर्माधिकारी
मनाची गुलामी बाजूला सारून परस्पर संवाद असणारी विश्‍वासार्ह समाजव्यवस्था निर्माण करा, असे आवाहन अविनाश धर्माधिकारी यांनी केले. विश्‍व मराठी साहित्य संमेलनात प्रेक्षकांशी मुक्त संवादात ते बोलत होते.
मराठी माणसांच्या वर्तनातील संगती आणि विसंगतीच्या अनेक बाबींकडे लक्ष वेधून चाळीस मिनिटांच्या संवादात धर्माधिकारी यांनी प्रसंगी मराठी माणसावर बोचरी टीका केली, तर कधी त्याच्यातील विश्‍वात्मक ताकदीचेही वर्णन केले. मराठी माणसाच्या वैगुण्यावर बोट ठेवताना त्यांनी विश्‍वासार्ह समाजव्यवस्था निर्माण करण्याचे आवाहन केले.

Hits: 9