स्वाती दांडेकर

(सौजन्य - इसकाळ न्यूज सर्व्हिस)
स्वाती दांडेकर. आयोवा राज्याच्या सिनेटर. महाराष्ट्राची मान अभिमानानं उंच व्हावी, असं त्यांचं अमेरिकेच्या राजकीय क्षेत्रातलं कर्तृत्वं. पहिल्या विश्व साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवसाच्या सोहळ्याला त्या आवर्जून हजर राहिल्या. दिवसभर लोकांमध्ये मिसळल्या. अनोळखी लोकांनी कुतूहलानं विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी संयमानं मोजक्या आणि नेमक्या शब्दांत उत्तरं दिली. त्यातून दिसल्या त्या मनमोकळ्या स्वाती दांडेकर. मृदू भाषी, हसतमुख आणि तरीही ठामपणे कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची क्षमता बाळगणाऱया. दिवसभरात वेगवेगळ्या निमित्ताने त्यांच्याशी बोलता आलं. त्यांचं बालपण, आयोवातलं स्थिरावणं, तिथल्या राजकारण-समाजकारणातला प्रवेश यावर त्या बोलल्या. या क्षेत्राकडं पाहण्याची त्यांची दृष्टीही त्यातून जाणवलं.
स्वाती मुळच्या नागपूरच्या. टाटा पारशी स्कूलमध्ये शिकलेल्या. धर्माधिकारी घराण्यातल्या. इंग्लिश ही शाळेतली पहिली भाषा आणि गुजराती दुसरी. 'खरं सांगायचं, तर अमेरिकेत आल्यानंतर अरविंदच्या मदतीनं माझं मराठी सुधारलं. माझी संस्कृती, माझ्या संस्काराचं संचित अधिक बळकट झालं...,' इतकं प्रांजळपणे, कोणताही खोटा आव न आणता त्या सांगतात.
'अरविंद दांडेकरांशी लग्न ही आयुष्यातली एक संधी होती. जी मी घेतली...', असंही त्या मोकळेपणानं सांगतात. 'माझे आजोबा, ज्यांना मी मोठे बाबा म्हणायचे, ते नेहमी विचारायचे की पप्पू मोठेपणी तू कोण होणार?'. मी काही उत्तरं द्यायचे. मी हे होईन. ते होईन. मोठ्या कंपनीची व्हाईस प्रेसिडेंट होईन, असं काही त्यांना सांगायचे. त्यावर मोठे बाबा म्हणायचे, की पप्पू, हे सगळे तुझे प्लॅन्स आहेत. देवाचा प्लॅन काय आहे?. त्यावर माझं उत्तर असायचं, देवाचा प्लॅन काहीही असो. माझा प्लॅन ठरलेला आहे...!. एकदा मोठे बाबा म्हणाले, पप्पू नेहमी लक्षात ठेव की देवाचाही एक प्लॅन असतो. तुझं मन नेहमी खुल ठेव. दरवाजे उघडे ठेव. संधी दाराशी येते तेव्हा ती मिळण्यासाठी दरवाजा खुला राहू दे नेहमी...अरविंदशी लग्न ही माझ्या आयुष्यातली पहिली संधी होती. घरच्यांनी विचारलं, तेव्हा मी हो म्हटलं. घरच्यांनी परत विचारलं, की तुझी अमेरिकेत जायची तयारी आहे का...मी हो म्हटलं...अरविंदसोबत अमेरिकेत आले...', अशा सत्तरच्या दशकातल्या आठवणी स्वाती सांगतात.
'घरच्यांची खूप आठवण यायची. मला माझी फॅमिली हवी होती. हळू हळू अरविंदचा इथला मित्र परिवार माझा परिवार बनत गेला. मी आयोवात स्थिरावत गेले. त्या काळात जमलेला हा परिवार आजही कायम आहे. एकत्र आहे. माझ्या राजकीय वाटचालीत हाच परिवार माझा मोठा आधार असतो,' असं त्या सांगतात.
'आयोवा खूप प्रगतशील राज्य आहे. म्हणूनच मी तिथं सिनेटर बनू शकते,' असं त्या अभिमानानं सांगतात. आयोवाविषयी सांगताना, अमेरिकेतील लोकप्रतिनिधी म्हणून कामाविषयी बोलताना त्या अधिक नेमकेपणानं माहिती देतात. 'माझं माझ्या नागरीकांसाठी काही एक स्वप्न असतं. ते पूर्ण करायचं असतं. सगळ्याच कल्पना, सगळेच प्रकल्प लोकांना आवडतील, झटकन स्विकारले जातील, असं नसतं. त्यामुळं संयम हवा असतो. एखाद्या प्रकल्पावर मी काम करते, तेव्हा त्या क्षेत्रातील सगळ्या तज्ज्ञांना जाऊन भेटते. त्यांच्याकडून शक्य तेवढी माहिती मिळवते. सगळ्यात आधी प्रकल्पाविषयी माझी भूमिका मी स्वतःला स्पष्ट करते. एकदा ती स्पष्ट झाली, की मग ठामपणानं प्रकल्पाला भिडते. लोकांना पटवून देते,' अशी आपल्या कामाची पद्धत त्या मांडतात.
राजकारणासाठी राजकारण ही भूमिका त्यामध्ये येत नाही. समाजकारणासाठी राजकारण ही भूमिका तिथं असते. स्वाती ही भूमिका आग्रहानं पुढं नेतात. शक्य तितक्या व्यावसायिकतेने समाजकारण करतात. 'आयोवातल्या प्रत्येक नागरीकासाठी मी त्यांची लोकप्रतिनिधी आहे...त्यामुळं विशिष्ट समाजाचेच नेतृत्व मी करतेय, असं होत नाही,' इतका स्पष्टपणा त्यांच्याजवळ आहे.
अमेरिकेच्या नागरीकत्वाची शपथ घेताना मुळ संस्कृतीची, संचिताची जपणूक करण्याचे आवाहन केले जाते. जाणिवपूर्वक मराठी बोलणाऱया स्वाती दांडेकर या आवाहनाला जागतात. त्यांच्या मराठीला हिणवायचं की त्यांचा अभिमान बाळगायचा, हे ज्यानं त्यानं ठरवावं. मात्र, एक मराठी महिला प्रगत राष्ट्रात जाऊन राजकारणात स्थिरावते आणि तिथल्या समाजाचे नेतृत्व करते ही मराठी जनांसाठी अभिमानाची गोष्ट आहे, हे मान्यही करावं...

Hits: 20