५८. जळगांव १९८४ - शंकरराव खरात

साहित्यिक हा दैनंदिन जीवनातील सुख-दु:ख, राग- द्वेष., चीड-संताप, विद्रोह संघर्ष अशा जीवनात जगतो. असे जीवन अनुभवतो. तेच जीवन त्याच्या साहित्य कलाकृतीत आविष्कृत होते. साहित्य कला  ही समाजजीवनाच्या अंतरंगाशी, आतील ताण-तणावाशी, एकरूप झालेली असते. त्यातून निर्माण होणारी कलाकृती ही जीवनवादी, जीवनाशी बांधिलकी मानणारी असते. म्हणून दलित साहित्य हे सामाजिक बांधिलकी, जीवनाशी बांधिलकी मानते. <br /> मध्यम वर्गातील साहित्यिकांचे वास्तव हे संकुचित असते. बंदिस्त खोलीसारखे असते. ते आपल्याच बंदिस्त खोलीत-विचारात बसून जीवनाकडे, प्रश्नाकडे पाठ फिरवून बसतात. म्हणूनच ते खर्&zwj;या मोठ्या समाजापासून दूर राहतात. त्यामुळे ते माणसाच्या आशा-आकांक्षाला, त्यांच्या संघर्षाला महत्व न देता शैलीला, आकृतीबंधाला अधिक महत्व देतात. म्हणूनच गेल्या पन्नास-पाऊणशे वर्षांच्या मध्यमवर्गीय साहित्यिकांच्या अनुभवविश्वात कांहीही बदल झालेला नाही. त्यांच्या अनुभवाचीच एक जात बनली. त्यामुळे त्यांच्या वाङ्मयात तोचतोचपणा भरून राहिलेला आहे. म्हणून ते निर्जीव वाटते.<br /> दलित लेखकाची कलाकृति ही व्यक्तीची असली तरी ती शेवटी व्यक्तीच्या जातिसमूहाची बनते. दलित कलाकृतीत आविष्कृत झालेले जीवनदर्शन हे त्या व्यक्तीचे राहात नसून ते जीवनदर्शन त्याच्या जातीसमूहाचे बनते. त्यामुळे दलित लेखकाची कलाकृति ही वास्तववादी, जीवनाभिमुख असते. खरे तर दलित साहित्य हे जीवनाचे भाष्य करते.  ग्रामीण भागात निर्माण होत असलेल्या नवीन वर्गातून लेखक निर्माण झाले तर ते आपल्या साहित्यकलाकॄतीतून आपल्याला जीवनातील अनुभवाचा आकार देणार, देत राहणार. अशा साहित्यिकांमुळे व साहित्यामुळेही नागर, ग्रामीण व दलित साहित्यप्रवाह एकमेकाच्या जवळ येतील. कालांतराने एकमेकांत मिसळतील असे मला वाटते.

Hits: 7