५७. अंबेजोगाई १९८३ - व्यं. माडगूळकर

माझ्या समोरच्या श्रोत्यात काही असे वाचक असतील की जे संभाव्य लेखक असतील किंवा काही केवळ कोंब असे असतील की त्यांच्यात महावृक्षाचं आश्वासन असेल. त्यांना मी हे सांगेन की, अनुभवाशी प्रामाणिक राहा आणि स्वत:ची अभिरुची साक्षी ठेवून लिहा. कुठलीही मळलेली वाट धरू नका. तुमची वाट तुमच्याच पायांनी पडू द्या. ही भूमी एवढी विशाल आहे की नव्या वाटेसाठी नित्य जागा असतेच. कोणासारखे होण्यासाठी खपू नका. स्वत:लाच ओळखण्यासाठी खपा. एक कलावंत दुसर्‍यासारखा नसतोच. यशस्वी होण्यासाठी घाई करू नका. अटीतटीच्या खटपटी करू नका. रसिकांनी दिलेली दाद ही अतिशय महत्वाची आहे. केवळ सरकारी पारितोषिकांवर काव्याचे मूल्यमापन होत नाही. समीक्षकाच्या मतामुळे खट्टू होऊ नका. ते त्याचं एकट्याचं मत असतं. शिवाय तोही एक वाचकच असतो.
साहित्यिक हा मुळातच असावा लागतो. तो होत नाही. एकाच परिसरात अनेक व्यक्ती जन्मतात, वाढतात. पण तोपरिसर सर्वांना सारखाच उपयोगी पडत नाही. प्रतिभा संवेदनक्षमता आणि अनुभव या तिन्हींच्या रसायनातून साहित्य निर्माण होतं. योग्य क्षेत्र नसेल तर अनुभवाचं बियाण फुकट जातं. निर्मितीचा कोंब त्याला कधी फुटत नाही.

Hits: 8