३०. १९४६ बेळगाव ग. त्र्यं. माडखोलकर

 

ग. त्र्यं. माडखोलकरांनी संयुक्त महाराष्ट्राची मागणी आवेशाने मांडली. महारष्ट्राच्या एकीकरणाच्या मूलभूत प्रश्नाविष्यी राष्ट्रनेत्यांनी उदासीन राहू नये अशी इच्छा व्यक्त करून ‘वर्‍हाड, मराठवाडा व गोमंतक हे महाराष्ट्राचे तीन निरनिराळ्या राजसत्तांखाली असलेले तुटक भाग एकत्र यावेत आणि नवा महाराष्ट्र निर्माण व्हावा असे माझे स्वप्न असून महारष्ट्राची मागणी ही मराठी भाषेच्या प्रतिष्ठेसाठी व विकासाठी आहे’ असे ते म्हणाले. मराठी सहित्याने जीवनाच्या सर्व कक्षा व्यापल्या पहिजेत. ज्या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यात व घरात मराठी उत्सुकतेने लिहिले व वाचले जाईल त्याच दिवशी मराठी भाषेचे सामर्थ्य व वैभव हे खरोखरीच वाढीला लागेल. कोणतीही भाषा जी उत्कर्षाला चढते, ती राजसत्तेच्या किंवा विद्यापीठाच्या आश्रायाने नव्हे, तर ज्या बहुजनसमाजाच्या जिव्हाग्रावर ती नाचत असते, आणि हृदयात प्रतिध्वनित होत असते, त्या बहुजनसमाच्या जीवनाचा जोम व जिव्हाळा तिच्यात भिनल्यामुळे ! मरठीची हाक कानावर पडताच धर्म, जाती, पंथ आणि वर्ग यांचे सारे कृत्रिम भेद विसरून जाऊन प्रत्येक महारष्ट्रीय आपण मराठी असल्याच्या एकाचएक जाणीवेने ज्या दिवशी उठेल तो राष्ट्रीयत्वाचा खरा सुदिन ! नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राची अस्मिता मराठी जनतेच्या जीवनातून कोटिकलांनी प्रगट होऊ लागली असे त्याच दिवशी आपण म्हणू शकू व जीवनापासून ओज आणि तेज घेतलेले खरे लोकवाङ्मयही त्याच दिवशी निर्माण होईल.

Hits: 10