२८. १९४३ सांगली - श्रीपाद महादेव माटे

 

श्री. म. माटे यांनी महाराष्ट्राविद्यापीठाची मागणी आग्रहाने मांडली. सामुदायिक अभ्यासपद्धती, अभ्यासातील योजनापुरस्सरता, मुरब्बी साहित्यभक्तांनी दाखवायच्या दिशा, ह्या तीन कल्पना त्यांनी अशासाठी मांडल्या की मराठी भाषेच्या अभिवृद्धीचा , वाङ्मयवृद्धीचा वेग वाढावा. मराठी विचारवंतांचा मोहरा स्वकीयांकडे वळला पाहिजे असा त्यांचा आग्रह. समाजाच्या सर्व थरांचे चित्रण वाङ्मयात यावयास पाहिजे. भूतकालात हिंदुस्थानच्या बाहेर पाहिले नाही ही चूक होती तर आधुनिक काळात घराच्या बाहेर दॄष्टी फेकीतच आपण बसलो आहोत ही उरफाटी चूक आहे. युरोपातून येणारी वुद्या, कलाकौशल्य, तत्त्वज्ञान, व्यापार, अनुशासनपद्धती व वाङ्मय यांचेकडे आपली दॄष्टी सारखी लागून असते. हिंदुस्थान ही एक जणू प्रयोगशाळा आहे आणि युरोपातील लोकांनी ठरविलेल्या योजना, बसविलेल्या कल्पना आणि मनात आणलेले संकल्प यांचे प्रयोग या ४० कोटी लोकांवर करून बघावयाचे अशी राज्यकर्त्यांची व आमचीही कल्पना होत चालली आहे. आमचे आम्हाला स्वतंत्र जिणे आहे, स्वतंत्र हवामान आहे, काही स्वतंत्र पीठिका, परंपरा आहेत स्वतंत्र विचारपद्धती आहेत, आणि मन:पिंडाच्या स्वतंत्र प्रकृती आहेत याची इतर लोकांनी व आम्ही ठेवावी तितकी ओळख ठेवली नाही असे दु:खाने म्हणावे लागते. .

Hits: 12