आप्त

Written by Suresh Ranade

समाधान

गृहलक्ष्मी जेथे प्रसन्न तेथे
राहील शांती वसतीस तेथे ---- १

अनंत असती राशी सुखाच्या
सार्‍या न सकला मिळावयाच्या ---- २

रहस्य जरि हे समजून घेता
चित्ती समाधाना काही न तोटा ---- ३

दुसर्‍याशी तुलना कधी ना करावी
पदरी पडे त्या तृप्ती असावी ---- ४

आचार अपुला असा असावा
आदर्श ज्याचा सकलांनी घ्यावा ---- ५

खुर्ची ही अपुली खाली करावी
जागाही थोडी इतरांस द्यावी ---- ६

नवासनी ही सुखी असावे
गतस्मृतींना मनी ऊजळावे ---- ७

संसार पुढल्या पिढीचा पहावा
डोळयात आनंद भरुनी वहावा ---- ८

माझे हे माझे कधी न वदावे
ईशाच्या चरणी तल्लीन व्हावे ---- ९

चुकलेल्या कार्या क्षमा करावी
गतकार्ये इतिहासजमा करावी ---- १०

फुलापरी हे आयुष्य अपुले
ठाऊक नाही किती आखलेले ---- ११

अपुल्या हाती नाही त्याचीही दोरी
बसला असे तो वरती मुरारी ----१२

वदते न माझ्या मनिचे हे काही
मुखी नित्य माझ्या सखा तोच राही ----१३

आभाळपोकळी

गोजिरवाणे रूप तुमचे
मनी भरूनी राही
तुमच्यासाठी सदा आमुचा
कंठ दाटुनी येई ---- १

बकुळफुलापरिस असती
आठवणी साrर्‍या
मनात घर करून राहती
जशा सोनपर्‍या ---- २

सगेसोयरे सतत सारे
असती भोवती
परि तुमच्या आठवणींना
नसे कधी क्षिती ---- ३

देवापुढती जशा तेवती
समईमधल्या ज्योती
तशा घालवू आम्ही सारे
दिवस आणि राती ---- ४

आभाळीच्या पोकळीची
जीवनी जाणीव होई
भरूनी तिजला काढायाला
जगती शब्दचि नाही ---- ५

आनंदाचा मळा

यशस्वितेचे रहस्य अपुल्या
कळले हो आज ऽ ऽ ऽ ऽ ऽ
पथप्रदर्शी ठरेल आम्हा
अपुला ग्रंथराज ---- १

अनुभवियेले प्रसंग असती
आपण जे नाना ऽ ऽ ऽ ऽ ऽ
गणती त्यांची करण्या अमुची
मतीही चालेना ---- २

कष्ट करोनी आनंदाचा
मळाच फुलवियला ऽ ऽ ऽ ऽ ऽ
सुगंध त्याचा सर्वदूरही
पसरूनिया गेला ---- ३

आपणासरसे मातपिता हे
कुणास ना मिळती ऽ ऽ ऽ ऽ ऽ
भागयवान ते आम्ही वाटे
खरेच या जगती ---- ४

ठाऊक नव्हते जे जे आम्हा
ग्रंथी या कळते ऽ ऽ ऽ ऽ ऽ
वाचुनी ते ते पाणी अमुच्या
डोळा ना खळते ---- ५

गतकालाते उकलूनी वाटे
दाखविले द्वार ऽ ऽ ऽ ऽ ऽ
स्वीकारावा त्रिवार अमुचा
तुम्ही नमस्कार ---- ६

शुभाशीश

तुम्ही प्राणदाते तुम्ही रोगहर्ते
उपकारकर्तेही सार्‍या जनाते
म्हणुनीच स्मरते जग हे तुम्हाते
शुभाशीष तुम्हा आजी आज देते ---- १

जोडूनि द्या मोडलेल्या हाडाते
मंजूळ बोलून रोगीजनाते
आशीर्वचा घ्या तुम्ही दोन्ही हाते
शुभाशीष तुम्हा आजी आज देते ---- २

जन सारे स्मरती धन्वन्तरीते
विश्वास तुमच्यावरी ठेविती ते
यश तेवि तुमच्या हातास येते
शुभाशीष तुम्हा आजी आज देते ---- ३

केले बरे तुम्ही मजसारखीते
फडकावुनी द्या गगनी ध्वजाते
तव कीर्ती पसरो दिगंतराते
शुभाशीष तुम्हा आजी आज देते ---- ४

तुळस

घर तसं मोठ्ठं
भर वस्तीत छानसं
आल्या गेल्या पाहुण्यालाही
वाटे खूप रहावसं ---- १

एक नाही दोन नाही
खोल्या दहा बारा
प्रत्येक खोलीचाच
स्वागतशील उंबरा ---- २

भल्या पहाटे सकाळी
दारी सजते रांगोळी
स्वागताला तयार जणू
कुंकुमतिलक लेऊन भाळी ---- ३

देव-धर्म पूजा-अर्चा
सारे कसे शिस्तीने
सणवार होती अगदी
पूर्वीच्याच पध्दतीने ---- ४

कित्ती काम केले तरी
आठी नाही कपाळी
गालावरती सदैव फुलते
तीच ती गोड खळी ---- ५

केव्हाही जा तिथं तुम्ही
भर दुपारी उन्हात
स्वागत होईल नेहमीच तुमचं
हसू लेऊन गालात ---- ६

संसाराच्या हिंदोळयावर
झोके घेता घेता
गळयातल्या कोकिळेला
सवड नाही आता ---- ७

लहान थोर पै-पाहुणे
सार्‍यांनाच जपणारी
हसर्‍या अंगणी शोभून दिसते
तुळस जणू मंजिरी ---- ८

शेजीबाई

पहाटे उठोनी स्वयंपाकपाणी
करोनी कॉलेजला शिकवाया जाई
भर दुपारी परतुनी येई
अशी माझी शेजीबाई ---- १

टापटीप अन कलाकुसरी
साrर्‍यांची तिला आवड भारी
सदा हासरी आणि गोजिरी
अशी माझी शेजीबाई ---- २

नातीगोती सांभाळी सारी
आल्यागेल्याचे कौतुक करी
सासरमाहेरा आवडी होई
अशी माझी शेजीबाई ---- ३

कामाधामात बुडुनी राही
कंटाळा शब्द कोशात नाही
आजच्या काळाची आदर्श नारी
अशी माझी शेजीबाई ---- ४

सुवर्णपट

संसाराचा सुवर्णपट हा कधी न द्यावा उधळोनी
दान कसेही पडले तरीही घ्यावे सकला समजोनी ---- १

पेला अर्धा रिकामा ही खंत करावी कधी न मनी
पेला अर्धा भरलेला हे सूखचि राही भरुनी मनी ---- २

झाले गेले विसरुनी जावे पुढील पाना उलटोनी
नशीबवान हो खरेच आपण नरजन्मा आलो म्हणुनी ---- ३

टाकीचे ते घाव सोशिता देवत्वचि ये दगडाला
सजीव आपण त्यातुन माणुस उणे कुठे मग पुण्ण्याला ---- ४

अर्धनारी त्या नटेश्वरापरि संसारचि तो असे खरा
थोडे इतरा समजुनि घेता रोजचि येई तो दसरा ---- ५

रोजचि दसरा घरात असता आनंदा नाही तोटा
दुसrर्‍यासाठी झिजता झिजता चंदनगंधही ये मोठा ---- ६

सदा करावा विचार अपुल्या पुढील पिढीचा तोच भला
हेवेदावे पार पुसोनी मदत करू त्या तरायला ---- ७

आकाशीच्या देवाघरची फुलेच असती अपुली मुले
सुंदर सोज्वळ संस्कारांनी सजवू तयांचे मधुर झुले ---- ८

सुजाण आपण आहात सारे ठाऊक आहे जरि मजला
दोन शब्द हे सांगितल्याविण राहवते ना परि मजला ---- ९

सुमनांजली

सासुश्वशुर कधि न झाले
असती आपणासारखे
वडिलधार्‍या आम्ही शब्दा
जाहलो हे पारखे ---- १

मातपित्यासम ही दिधली
प्रीती आम्हा सकलास
लेकी म्हणूनी वागविले
कधी न हो सासुरवास ---- २

लेकरांच्या सुखासाठी
यातनाही भोगल्या
मुखावाटे परि न उमटे
शब्द कधिही आपुल्या ---- ३

चार पुत्रांपरिस असती
चार लेकी आपुल्या
फुले येती नेटकीशी
वेलीवरती सानुल्या ---- ४

छत्र आपले दिवस काही
आणखी जरि लाभते
नवीन नातू पणतू पणती
पाहण्या हे साधते ---- ५

रोपट्याच्या शाखा इवल्या
गेल्या आता दुरवरी
पाहण्या त्या उभयतांनी
यावे आपण झडकरी ---- ६

उठत बसता काम करता
स्मरण आपुले नित्य होते
अश्रु भरती नयनी माझ्या
मनही ऐसे भरुनी येते ---- ७

सुख मिळे जे आज आम्हा
खरी कृपा ही आपुली
स्मरण त्याचे ठेवुनीया
वाहते ही सुमनांजली ---- ८

माऊली

देवाजीने आज खरी हाक माझी ऐकली
सोनुल्यांनो, तुमच्यामुळे धन्य मीही माऊली ---- ।।

चांदण्यांची फुले सांगू किती म्हणुनि वेचली
काट्यांचीही गुलाबाच्या फुले जणू जाहली
तृप्ती माझ्या संसाराची आज खरी जाहली
सोनुल्यांनो, तुमच्यामुळे धन्य मीही माऊली ---- १

सुखाची ही रास माझ्या अंकी जणू उतरली
रामकृष्ण जोडी जणू अवनी अवतरली
वैद्यराजकृपेमुळे देवभेट जाहली
सोनुल्यांनो, तुमच्यामुळे धन्य मीही माऊली ---- २

तुमच्यामुळे राजसांनो, सृष्टी माझी बदलली
दृष्ट तुमची काढण्याला सृष्टी शालु ल्यायिली
स्वागताला तुमच्या सारी सजुनि सिध्द जाहली
सोनुल्यांनो, तुमच्यामुळे धन्य मीही माऊली ---- ३

कृष्णदेवरायाचीही मुरली जणू ऐकली
द्रौपदीची थाळी माझ्या हाती आज गवसली
नाती-गोती सारी माझ्या मदतीला धावली
सोनुल्यांनो, तुमच्यामुळे धन्य मीही माऊली ---- ४

माय माझ्या माऊलीची स्वप्नी मला भेटली
अमृताची वेल तिने तुमच्यासाठी धाडली
याद तिची येई मजला आज पावलोपावली
सोनुल्यांनो, तुमच्यामुळे धन्य मीही माऊली ---- ५

देवाजीही अला घरी बाळरुप घेऊनी
कौतुकाने पाहते मी त्याला डोळे भरूनी
एकसमयी सूर्य-चंद्र-उदय माझ्या सदनी
सोनुल्यांनो, तुमच्यामुळे धन्य मीही माऊली ---- ६

दोन नाती

दोन नात्यातील अंतरा पुसोनी
सून-सासू संबध येती जुळुनी ---- १

घरा येता ती लेक परगृहीची
सून होई लक्ष्मीच स्वगृहीची ---- २

मायलेकीपरि प्रेम दुजे नाही
जगी ऐसी ही रीत असे बाई ---- ३

सूनबाई त्वा लेक सासू आई
सुखे नांदावे जगी धन्य होई ---- ४

लेक समजावी आपुली सासूबाई
आई समजावी तूही सूनबाई ---- ५

एकमेकींच्या मताला `हो' म्हणता
समज जपता होई न कधी गुंता ---- ६

`` होतीस ना कधीतरी तू सूनबाई
होशील ना कधीतरी तू सासूबाई `` ---- ७

जाणीव हीही हृदयी जपुनी धरावी
सुखदुःख एकमेका समजून घ्यावी ---- ८

विहिण

बहिण आहे मी विहिण नसे तुमची
लेक आमुची ही सून होई तुमची
लेक दिधलीसे आम्ही तुम्हा हाती
तुम्ही शिकवा तुमच्याही रीतिभाती ---- १

प्रेम लेकीपरि जगी अन्य नाही
तुम्हा विनवीते लेकीचीच आई
सांगणे हे जरि उचित नसे काही
परि मजला ते राहवे न बाई ---- २

विहिणबाई तुम्ही सावकाश जेवा
तुम्हा हाती हा देत आम्ही ठेवा
दिवस इतुके हा जपुन वाढवीला
सुखे अर्पाया आलो या घराला ---- ३

दोन शहरांचे संबंध जुळुनी येता
माऊली ही मनी धन्य होई आता
ठेव दिधली ही असे ज्याची त्यांना
सुखी ठेवो प्रभु दोनही कुळांना ---- ४

(चाल बदल)

कन्या असे हे धन दूसऱ्याचे
ठाऊक होय सकला मुनिकण्ववाचे
आता न शब्द सुचती वदण्या मनीचे
समजून हेतु परि घ्या अमुच्या मनीचे ---- ५

गुरुदक्षिणा

मातापिता हे प्रत्येकाचे
पहिले वहिले गुरू हो
त्याजविणा मी दुजा कोणा
सांगा कैसे स्मरू हो ---- १

मायेचा हा मेरु आणि
कर्तव्याचा तरू हो
आयुष्याच्या वळणावरचा
दीपच जैसा तारू हो ---- २

गोमातेच्या जवळी जैसे
बागडते वासरू हो
गगनी जेवि भिरभिरणारे
इवलेसे पाखरू हो ---- ३

गुरुठायी मी सदैव तैसे
लहानगे लेकरू हो
आदर्शाची खाण जणू ही
दूर कैसी सारू हो ---- ४

प्रणतीविण त्या एकही माझा
दिवस होईना सुरू हो
दुजी काय मी देऊ दक्षिणा
कैसी त्या विस्मरू हो ---- ५

कूर्मापरि ती दृष्टी गुरुची
फुलवि मनाचा बहरू हो
आशीर्वच त्या मानुनि मग ही
लेखणी लागे झरू हो ---- ६

अपूर्व प्रेम


दो हाताविण टाळी न वाजे
कधीही या जगती
एकचि नाणे दो बाजूंनी
दिसती पत्नी पती ----१

सागरातल्या शिंपेमध्ये
जैसे दो मोती
दो घटकांच्या भवर्णवामधि
तैसे पत्नी-पती ----२

सप्तपदीही करती दोघे
हाता घेऊन हाती
उभयजनांच्या आनंदाने
संसारा ये गती ----३

घासही राही अडून कंठी
एकदुजासाठी
एकदुजास्तव दोघा वाटे
माया करू किती ----४

गतकाळाते स्मरता स्मरता
आनंदे नांदती
वर्णन करण्या अपूर्व प्रेमा
शब्द न सापडती ----५

बंधन

विचारता जरी भाऊ कसा
भाऊ कसा माझा भाऊ कसा ?
आवडे मजला असे तसा
नि वाटे सकला हवासा ---- १

आठवते ते सारे मजला
होता जेव्हा इवलासा
सोज्वळ वदनी भावुक डोळे
रूपगुणांचा जणू आरसा ---- २

मायेचा जणू घेई वसा
नि पाठीशी तो उभा तसा
प्रेमाने मी साद घालता
धावत येई देव जसा ---- ३

स्मरण ठेवुनी भाऊबीजेचे
समयी येई मम सदनी
सुहास्य वदनी भेट देत तो
ओवाळुनि घे मजकडुनी ---- ४

विचारता जरी ताई कशी
ताई कशी माझी ताई कशी ?
प्रेमाची जणू मूर्ति साजिरी
ताई माझी असे तशी ---- ५

मूर्ति तियेची नाजुकशी
परि कीर्ती तियेची परदेशी
जगही ओळखी सारे तिजला
भगिनी तीच ना सुकेशी ---- ६

राखी बांधी प्रतिवर्षी ती
आठवणीने मज हाती
औक्षण करता प्रेमाने ती
गाली ओघळती मोती ---- ७

तिच्या गुणांचे वर्णन करण्या
शब्द न असती मजपाशी
ताई-भाऊ अतूट बंधन
उपमा देऊ त्या कैसी ? ---- ८

ओढ

बाळपणीचा देवचि आई
स्वर्गसुखाची ठेवचि आई
साडीचा परि शेव तिच्याही
हाती असता चिंता नाही ---- १

शाळेमध्ये मित्र भेटता
खेळाची ती ओढ लागता
वेळेचे मग भानचि नुरता
आनंदाचा गवसे साठा ---- २

तरूणपणाच्या मधुर जीवनी
अनंत शिल्पे मनी कोरली
संगत त्यांची क्षणिक ठरली
मनिची आशा मनी निमाली ---- ३

शिल्पांची त्या संगत नुरता
घेरुनि येई उदासीनता
आठव घरचा येई आता
मनास लाभे खरी शांतता ---- ४

संसाराची ओढ लागता
उठता बसता हसत खेळता
संसारी मग मन हे रमता
विरती सगळया भ्रामक चिंता ---- ५

अखेरच्या त्या टप्प्यावरती
ओढ एकचि मना असे ती
ध्यानी मनी अन् स्वप्नी दिसे ती
परमेशाची सदैव मूर्ती ---- ६

बाळराज

वाट पाहताना आज / डोळे शिणले गं माझे /
येणार बाळराज / आज घरी //----- १

डोळा मिटेना मिटेना / नीज येईना नयना /
किती करु आराधना / देवराया //----- २

आत बाहेर तरी / किती करु येरझारी /
भांडे पालथे हे दारी / घातले गं //----- ३

कधी पाहीन बाळास / हीच एक लागे आस /
मनी बोलले नवस / नारायणा //----- ४

हासे गुलाब केवडा / पारिजाताचा गं पडे सडा /
दारी पाहता गं खडा / बाळराज //----- ५

लाडका लेक

लाडका लेक घरासी येता
आनंदाते उधाण येई ---- १

कौतुकाने त्याकडे पाहता
बाळपणीची सय येई ---- २

फार दिसांनी दर्शन होता
मायेने उर भरुनी येई ---- ३

आठवणींची गर्दी होता
नयनी जल भरुनी येई ---- ४

डोळयांची कड ओली होता
हळुच पुसुनी हसुनी पाही ---- ५

देवाच्या चरणी टेकता माथा
पुत्रसुखाविण मागे न माई ---- ६

दुलई

मऊशारशी आठवणींची
दुलई विणली तुजसाठी ही
इ मेलमधुनी पाठविते जरि
पांघरुन तू सुखे पहा तरि ---- १

इवलालीशी बोटे तुझी ती
पडती जेधवा गळयाभोवती
स्वर्ग स्वर्ग तो कशास म्हणती
मजला आली होती प्रचीती ---- २

आठवणी तव अनंत असती
रुंजी घालती मनाभोवती
मोठी झाली मुले जरि किती
सानचि असती मातपित्या ती ---- ३

दोन शब्द

अनंत कोटी त्या परमेशाचे
स्मरण कराया विसरु नका ---- १

अनंत असती आशा अमुच्या
निराश तुम्ही करू नका ---- २

अनंत असती मोहसक्ती
भक्ती तयाची करू नका ---- ३

आल्यागेल्या अतिथीशी तुम्ही
गोड बोलण्या विसरु नका ---- ४

मिळवा उदंड यशकीर्तीला
नीतीला परी सोडू नका ---- ५

उपदेशाचे दोन शब्द हे
राग तयाचा मानू नका ---- ६

सोनुला

उन्हं आली गं कोवळी
सोनभरल्या सकाळी
माझ्या सोनुल्याच्या गाली
उमटली गोड खळी ---- १

उन्हं आली गं कोवळी
पक्षी गाती गोड गाणी
माझ्या सोनुल्याच्या हाती
सायसाखरेची वाटी ---- २

उन्हं आली गं कोवळी
सोनपाऊले घरात
माझ्या सोनुल्याच्या पायी
सुख आले ठायी ठायी ---- ३

उन्हं आली गं या वेळा
मीठ मोहरी ओवाळा
माझ्या सोनुल्याच्या भाळा
लावा कुंकवाचा टिळा ---- ४

उन्हं आली गं खालती
उधळीत हिरेमोती
माझ्या सोनुल्याच्या बाई
वाढदिवसाची घाई ---- ५

बाळरुप

पैसा-अडका दागदागिने
काहीच नाही अपेक्षा
बाळरुपात देव पाहणे
हीच केवळ प्रतीक्षा ---- १

विसरती मग जगताला
लहानग्यांशी खेळताना
भूतकाळात हरवून जाती
डोळे हळूच टिपताना ---- २

दुधापेक्षा प्रेम असते
साईवरती खूप अनूप
लोण्यापेक्षा नाजुक असते
लोणकढे साजुक तूप ---- ३

नातवंडात इवल्या दिसे
आजी आजोबांना खूप
आपल्या सानुल्या बाळांचे
गोजिरवाणे बाळरूप ---- ४

बारसे

सोनुलीच्या आगमनाने
रोज दिवाळी नि दशहरा
मंगल दिन हा सोनियाचा
मंगल क्षण आला घरा ---- १

आई-बाबा आजी-आबा
नवनाते ये आकारा
मंगल दिन हा सोनियाचा
मंगल क्षण आला घरा ---- २

ताई-दादा सांगताती
खेळण्यांची त्वरा करा
मंगल दिन हा सोनियाचा
मंगल क्षण आला घरा ---- ३

फुले नि माळा लेऊनी
दिसे पाळणा गोजिरा
मंगल दिन हा सोनियाचा
मंगल क्षण आला घरा ---- ४

पाळण्याच्या सभोवती
सार्‍या मिळुनी फेर धरा
मंगल दिन हा सोनियाचा
मंगल क्षण आला घरा ---- ५

नामकरणाचा सोहळा
करुया आपण साजरा
मंगल दिन हा सोनियाचा
मंगल क्षण आला घरा ---- ६

पेढे बर्फी खाऊनी
तोंड आपुले गोड करा
मंगल दिन हा सोनियाचा
मंगल क्षण आला घरा ---- ७

कीर्तीपताका यशोमतीची
उजळो नील अंबरा
मंगल दिन हा सोनियाचा
मंगल क्षण आला घरा ---- ८

शुभाशीष हा आजी देते
स्मरूनिया त्या रमावरा
मंगल दिन हा सोनियाचा
मंगल क्षण आला घरा ---- ९

पाळणा

सोनुलीच्या आगमने
जणू होई उष:काल ---- सखे पाळणा सांभाळ

सोनुलीच्या दरशने
जणू भेटे घननीळ ---- सखे पाळणा सांभाळ

लाडे लाडे मामा म्हणे
हिला मिलेनिया बाळ ---- सखे पाळणा सांभाळ

वेगे वेगे नका झोका देऊ
झोपलीसे बाळ ---- सखे पाळणा सांभाळ

सोनीसंगे खेळताना
कसे पळते घड्याळ ---- सखे पाळणा सांभाळ

सोनुलीच्या बारशाला
बाळ जमले गोपाळ ---- सखे पाळणा सांभाळ

फ्रॉक रेशमाचा अंगी
घाली सोनियाची माळ ---- सखे पाळणा सांभाळ

जरी रेशमाचे टोपडे
अन् मखमली झूल ---- सखे पाळणा सांभाळ

गाली रेखला गं तीळ
हळू घातले काजळ ---- सखे पाळणा सांभाळ

कवतुके बघताना
भरे नयनी का जल? ---- सखे पाळणा सांभाळ

काढ दृष्ट हिची रोज
ठेव याद सायंकाळ ---- सखे पाळणा सांभाळ

शुभाशीष देते प्रेमे आजी
गुणाची हो बाळ ---- सखे पाळणा सांभाळ

उतराई

तान्हुले हे रूप अपुले
पाहिले मी डोळा
मनी फुलुनि येई खरा
मायेचा फुलोरा ---- १

केस काळे कुरळे अन्
निळे निळे डोळे
पाहुनिया मन माझे
मोहुनिया गेले ---- २

लाल गोर्‍या गालांवर
पडे गोड खळी
जणू हसुनि म्हणे मला
घेई गं जवळी ---- ३

प्रेमाचे हे रुप नवे
मनी भरुनि राही
याचसाठी जाहले मी
आज खरी आई ---- ४

झोपले हे बाळ गुणी
नका बोलू कोणी
मीठ मोहरी ही कुणी
टाका ओवाळोनी ---- ५

माया मज माऊलीची
कळे आज बाई
देवाजीची कशी मी
होऊ उतराई ---- ६

Hits: 80