आई

Written by Suresh Ranade

काव्यदीप

काव्यदीपा हाती धरोनी
अमर तुला करणार
माऊली सदा तुला स्मरणार ----------(धृ.)

आम्हाला जरी सोडून गेलीस
काव्यधना परी देऊन गेलीस
सकलांना ते वाटून देण्या
कधी न विस्मरणार
माऊली सदा तुला स्मरणार ----------(१)

काव्यज्योतिच्या रूपे तुझिया
स्वर पडती तव कानी माझिया
दीपामधल्या स्नेहाला मी
कमी न पडू देणार
माऊली सदा तुला स्मरणार --------(२)

काट्यामधूनी गुलाब फुलवित
सजविलेस तू अमुचे जीवित
जरतारी हे काव्यवस्त्र मी
लेऊनिया जगणार
माऊली सदा तुला स्मरणार --------(३)

उठता-बसता कामही करता
विरली काया सकलांकरिता
कवितारूपी सदा तुझे मी
नाम मुखी धरणार
माऊली सदा तुला स्मरणार ----------(४)

तुझ्याचरुपे विठूहरी तो
रोजच मजला दर्शन देतो
आठवरुपी मजजवळी तू
सदाचीच उरणार
माऊली सदा तुला स्मरणार ----------(५)

तव आयुष्या झाले सोने
बैसविले तुज जवळी प्रभूने
काव्यदीपा देऊनि मज सुख
दिधले अपरंपार
माऊली सदा तुला स्मरणार ----------(६)

स्थलकालाचे बंधन नुरले
अखिल विश्व हे तुझे जाहले
स्वप्नी परी मी कधीमधी तरी
अंकी तुझ्या निजणार
माऊली सदा तुला स्मरणार --------(७)

तुझ्यामुळे

तुझ्या स्मृतींच्या उबेत
उमलत गेली एकेक पाकळी
माझ्या मनाची ---- १

तुझ्या आशीर्वादरूपी
हळुवार स्पर्शाने खुलली कळी
माझ्या मनाची ---- २

तुझ्या आधारावरच
फुलारून आली प्रत्येक झावळी
माझ्या मनाची ---- ३

केवळ तुझ्यामुळे
जुळली गेली अखंड साखळी
माझ्या मनाची ---- ४

तुझ्या पाठिंब्यावरच
इमारत उभारली आगळीवेगळी
माझ्या मनाची ---- ५

तुझ्या प्रेमळ सोबतीने
येता या राऊळी, उलघाल थांबली
माझ्या मनाची ---- ६

सुमनमाला

पाहते अन् ऐकते मी
त्वत् गुणांच्या गौरवाला
साश्रुनयनी पाहते मी
या जगाच्या नाटकाला ---- १

` एकी धरा अन् नको दुही '
स्मरू तुझ्या या संदेशाला
`करित रहावी कर्तव्ये ही '
स्मरण तुझे हे पुढील पिढीला ---- २

सुवर्णपुष्पे गुंफिते मी
आठवणींची या समयाला
चरणकमली अर्पिते मी
भावनांची सुमनमाला ---- ३

एकही

एकही क्षण असा जात नाही की
तुझी आठवण येत नाही ---- १

एकही सण असा जात नाही की
तुझ्याविना घास खाली उतरत नाही ---- २

एकही वस्तू अशी सापडत नाही की
ज्यावर तुझा हात फिरला नाही ---- ३

एकही व्यक्ती अशी भेटत नाही की
तुझा शुभाशीष जिला लाभला नाही ---- ४

जिद्द

तू आहेस आभाळाएवढी
खूप खूप मोठ्ठी
बळ ओतलेस पंखात आमच्या
गरुडझेप घेण्यासाठी ----- १

संसाररथाचे एक चाक
अचानक निखळून पडले
पण तुझ्या एकटीच्या खांद्यात
दहा हत्तींचे बळ संचारले -----२

दिवस-रात्र तहान-भूक
कश्शाचीही पर्वा न करता
संसाररथाला पैलतिरी पावते केलेस
जिद्दीने संकटांना न डगमगता ----- ३

सम

तुजी माझी सम सांग
एक कशी जुळते
मी मनापासून घातलेली साद
तुला अचूक कशी कळते ---- १

तुझ्या माझ्यात आहे
चार दशकांचे अंतर जरी
वाटतेस मात्र मला तू
जिवलग मैत्रीण खरी ----२

तुझ्या मनातल्या उभ्या आडव्या
विचारांची वीण मला नेमकी गवसते
अन् वाrर्‍याच्या वारुवर स्वार झालेले
माझे मन तुझ्याकडेच धाव घेते ---- ३

आई म्हणजे

आई म्हणजे
जशी -
तान्हुल्याची माऊली
जशी -
वासराची गाऊली
जशी -
वृक्षाची सावली ---- १

आई म्हणजे
जशी -
अंबरीची चांदणी
जशी -
भरजरीची पैठणी
जशी -
तुळस उभी अंगणी ---- २

आई म्हणजे
जसा -
निराधाराला आसरा
जसा -
गाईचा कासरा
जसा -
सणात दसरा ---- ३

आई म्हणजे
जशी -
आंधळयाची काठी
जशी -
सायसाखर वाटी
जशी -
विठू माऊली भेटी ---- ४

आई म्हणजे
जसा -
पंख असे पाखरा
जसा -
मोराचा पिसारा
जसा -
सागराचा किनारा----- ५

आई म्हणजे
जशी -
गाभार्‍यातील मूर्त
जसे -
कोटी देवांचे तीर्थ
जसे -
स्वर्गामधले अमृत ---- ६

स्मरण

स्मृतिखजिन्यातुनि तुझिया मिळती
मजला अमोल रत्ने गं
फिकेच पडती पुढती ज्याचिया
पैसा नि दागिने गं ---- १

मूर्ती वसते तुझी मन्मनी
सुचवित मज नव कवने गं
अर्पियली मी तव चरणी ही
अगणित पुष्पे सुमने गं ---- २

या जन्मी तरी फिटणे नाही
अमोज हे तव देणे गं
आठव त्याचा ठेऊनी मीही
साकारिन तव लेणे गं ---- ३

अशीच येई गीतामधुनी
दावित नित नवकिरणे गं
अवचित ऐशा भेटीमधुनी
उपकृत अमुचि सदने गं ---- ४

तुझियाविण मनमंदिर मजला
वाटे सारे सुने गं
देवचि भेटे मजला वाटे
केवळ तुझिया स्मरणे गं ---- ५

आठवणी

वर्षामागुनी वर्षे जाती
परी न जाती आठवणी
आठवणींची अनंत पुष्पे
असती माझ्या साठवणी ----- १

स्मृतीसुमनांच्या गंधकोशी गे
मरंद जो राही भरुनी
प्राशन करिता आनंदाने
अवतरशी तू मम सदनी ----- २

गुजगोष्टी त्या करीत असता
वेळेचे मज भान नुरे
अलगद उकले स्मृतिमंजूषा
सकलांची मग एकसुरे ----- ३

आठवणी तव काढीत असती
बागेमधली सर्व फुले
आठवणींच्या हिंदोळयावर
मन माझे मग घेत झुले ----- ४

नशीब अमुचे थोर म्हणूनी
लाभे माता तुज जैसी
अनंत असती स्मृती तुझ्या मी
गणती त्यांची करु कैसी ----- ५

आठवणी तव बुडूनि जाता
आनंदाचे ऊन पडे
चरणधूलि तव सदनी लागता
सोनियाचा कळस चढे ----- ६

स्मृतिसुमने

वर्ष कसे हे सरून गेले
कळले मजला नाही
परि माऊली माया अमुचि
तिळभर आटली नाही ---- १

कितीक झाले त्यागी विरागी
गणती त्यांची नाही
परि मला वाटते त्यागाला तव
जगती उपमा नाही ---- २

अमोज आहे धनद्रव्यादि
कमी न कोणा काही
परि साध्य न झाले तव यत्नाविण
आम्हा यातले काही ---- ३

टिचभर अपुल्या जुन्या घराचे
रूपच बदलून जाई
परि मनात माझ्या तुझीच खोली
सदैव जागृत राही ---- ४

असतील झाल्या अगणित भगिनी
गृहिणी अन् माताही
परि मला वाटते तुझ्यासारखी
आई होणे नाही ---- ५

सकल जनांच्या सारून मोहा
दूरच गेलिस बाई
परि मनात माझ्या तव कवनांची
प्रतिमा तेवत राही ---- ६

कृष्णतुलेसम उणीव तुझी ही
सदैव भासत राही
तुला वाहतो स्मृतिसुमने ही
विनम्रभावे आम्ही ---- ७

Hits: 104