बाल

Written by Suresh Ranade

ड्रायव्हर

एकदा काय झाले सांगते
बसा सारे खालती
उंदीरमामा सापडला
मांजरोबाच्या हाती ---- १

मामाने मग केला
गणपतीचा धावा
`वाहन मी होईन तुमचे
मला आता पावा ---- २

नाही म्हणू नका तुम्ही
गणपतीराया
तुमच्याच चरणी
वाहीन ही काया' ---- ३

मांजरोबा पण मनी म्हणे
`देवाधिदेवा,
उंदराचा हा नैवेद्य
गोड करुन घ्यावा` ---- ४

खोटे खोटे डोळे मिटून
मांजर बसले ध्यानाला
मामांनी मग तेवढ्यात
सूंबाल्या केला ---- ५

फळ मिळे उंदराला
गणपतीच्या भक्तीने
तावडीतून मांजराच्या
सुटका केली युक्तीने ---- ६

तेव्हापासून गणपतीची
स्वारी खूष झाली
`ड्रायव्हर' म्हणून उंदराची
नेमणूक केली ---- ७

छोटे

एकदा छोट्या खारीला
वाटते व्हावे घार
उंच भरारी घेऊन
जावे साता समुद्रापार ---- १

एकदा छोट्या सशाला
वाटते व्हावे लांडगा
शिकार करणार्‍या पारध्याचा
आपणच करावा पापड-सांडगा ---- २

एकदा छोट्या मुंगीला
वाटते व्हावे हत्ती
एका दमात आणावी
सारी साखरेची पोती ---- ३

एकदा छोट्या राजूला
वाटते व्हावे अमिताभ
आणि ढिश्यांव ढिश्यांव करुन
चोरांना सार्‍या करावे साफ ---- ४

छोट्यांचे आपले एकच गाणे
खाणे, पिणे, खेळणे, झोपणे
बरे आहे आपले छाटेच राहणे
नको रे बाबा मोठ्ठे होणे ---- ५

मधमाशी

मधमाशी, मधमाशी, मधमाशी
गुण गुण करशी
भिर भिर फिरशी
दम दम दमशी
एका जागी बैस जराशी ---- १

मधमाशी, मधमाशी, मधमाशी
एकटी दुकटी
तू मधमाशी
मधाच्या बाटल्या
भरतेस कशी ? ---- २

मधमाशी, मधमाशी, मधमाशी
पैशाचा बटवा
घेऊन जा तुला
अन् मधाची बाटली
आणून दे मला ---- ३

आवळीजावळी पिंटू नि पिंकी
सांगते ऐका
भावंडे माझी
सतराशे साठ
पण सारी कामाची ---- ४

आवळीजावळी पिंटू नि पिंकी
मध नाही आणत
बाजारातून विकत
फुलातून हिंडत
घेऊन येते फुकट ---- ५

आवळीजावळी पिंटू नि पिंकी
जवळ नका येऊ
नाहीतर देणार नाही खाऊ
त्रास नका देऊ
नाहीतर चावा आम्ही घेऊ ---- ६

चिमुकली चिऊताई

चिमुकली चिऊताई
कंटाळयाचे नाव नाही
पंखाचा पदर बांधून
एकसारखी कामाची घाई ---- १

काय खाऊ काय खाऊ
म्हणत असतात कावळे भाऊ
संपत नाही हट्ट
म्हणून झाले आहेत मठ्ठ ---- २

पोपटदादा हिरवागार
चोच याची बाकदार
तिखट्ट मिरची खातो
तरी गोड गोड बोलतो ---- ३

कुत्रोपंत आलात काय ?
शेपूट हलवून सांगतात काय ?
ताजी पोळी वरती साय
खूप आवडती म्हणताय काय ? ---- ४

पिंकी

एक होती पिंकी
आईची भारी लाडकी
चाल तिची दुडकी
खेळत राही सारखी ---- १

खेळण्याच्या टोपलीत
होतं एक झुरळ
फ्रॉकवर पिंकीच्या
जाऊन बसलं सरळ ---- २

घाबरगुंडी उडाली
पिंकी पळू लागली
आईला बिलगताच
भीती दूर पळाली ---- ३

आज्जी ग आज्जी

आज्जी ग आज्जी
तू लाडकी ना माझी
गोष्ट मला सांग तू
छान चिऊकाऊची ---- १

आज्जी ग आज्जी
तू लाडकी ना माझी
चिऊकाऊची शाळा
असते तरी कुठची? ---- २

आज्जी ग आज्जी
तू लाडकी ना माझी
चिऊकाऊच्या या डब्यात
असते का पोळीभाजी? ---- ३

आज्जी ग आज्जी
तू लाडकी ना माझी
चिऊकाऊला असतात का
आज्जी नि बिज्जी ---- ४

राधा

स्वप्नी माझिया कुणीतरी आले
डोळयांच्या कडा टिपून गेले
सखये माझे भान हरपले
काहीही मजला कळेना झाले ---- १

कुंजवनी मी जेधवा गेले
स्वप्नीचे रूप नयनी आले
जळी-स्थळी अन् पाषाणी भले
सगुण सुंदर रूप दिसले ---- २

मुरलीचे सूर कानी आले
अमृतधारांनी न्हाऊनी गेले
राधेचे मन तल्लीन झाले
कृष्णरूपात विलीन झाले ---- ३

कृष्णसखा

अडीनडीला हाक मारता
धावत तू येशी
कृष्णसख्या रे म्हणुनी मजला
तूच आवडशी ---- १

नीलवर्ण ह्या तनूस शोभे
मुद्रा तव हासरी
मोरमुकुट हा मस्तकी शोभे
हाती तव बासरी ---- २

बासरीतुनी सुरेल सुंदर
सूर जणू फुलती
ऐकण्यास ते म्हणुनी सारे
जमती तुजभवती ---- ३

मंत्रमुग्ध रे होऊनी जाती
सारे गहिवरती
काय करावे उमगत नाही
गुंग होई ती मती ---- ४

तुझ्याविना या जगती नाही
दुजा कुणी आसरा
मनात माझ्या सदैव वसतो
चेहरा तव हासरा ---- ५

कृष्ण न केवळ मूर्तीमध्ये
दडुनी की बसला
चराचरातील वस्तुजाती तो
भरुनी असे उरला ---- ६

मुरली

कृष्णा वाजव रे मुरली
मुरलीने भूक नुरली ---- ।।ध्रु।।

गोपी निघाल्या लवकरी
जाण्या मथुरेच्या बाजारी
करण्या गोरस विक्री
कृष्णा वाजव रे मुरली ---- १

पेंद्याचंद्या रे बल्लारी
गाई घेऊनि जा नदीतीरी
परतुनि या लवकरी
कृष्णा वाजव रे मुरली ---- २

गोपी अणिती तक्रारी
काय कमी रे तुज घरी
न करी गोरस चोरी
कृ ष्णा वाजव रे मुरली ---- ३

उघडी वदना मुरारी
दूर सारी रे बासरी
नवनीत ना अंतरी
कृष्णा वाजव रे मुरली ---- ४

विश्वरूपाच्या दर्शनी
झाली यशोदा बावरी
हृदयी त्या कवटाळी
नक्को वाजवु रे मुरली ---- ५

हौस


नाही मजला छंद दूसरा
पायी तुझिया देई आसरा
गुरु सखा खरा तूच यादवा
हौस एवढी पुरवि केशवा ---- १

प्रेमे पूजिती राऊळी जरी
वसशी तू खरा हृदयमंदिरी
नामी तुझिया अमृती गोडवा
हौस एवढी पुरवि केशवा ---- २

भेटीची तुझ्या ओढ लागली
पैलतीरासी दृष्टी लागली
मार्ग दाखवी तू रमाधवा
हौस एवढी पुरवि केशवा ---- ३

जवळी बैसवी निववी अंतरा
विनविते तुला मी रमावरा
कणव का तुला ना येई माधवा
हौस एवढी पुरवि केशवा ---- ४

Hits: 66