भक्ती

Written by Suresh Ranade

राऊळ

राऊळाच्या दारी येण्या
नाही कोणी संग
राऊळाच्या दारी येता
भेटला अभंग ---- १

तुझ्या पायी येता सारे
विरती भावबंध
तुझ्या पायी नाही कोणी
राव आणि रंक ---- २

मनाचा ना लागे कोणा
इतुकाही थांग
कसे करू देवा आता
तूच मला सांग ---- ३

संसाराचा पाहिला मी
राग आणि रंग
नामाचा रे तुझ्या परि
आगळाच ढंग ---- ४

जो तो आहे आपुल्याच
संसारात दंग
मीही आता जाहले रे
पुरती नि:संग ---- ५

मन माझे जाहले रे
आज बा पाखरू
राऊळाची वाट तुझ्या
कशी रे विसरू ---- ६

हात दे रे देवा आता
अंत नको पाहू
राऊळात तुझ्या कैसी
पुन्हा सांग येऊ? ---- ७

वारी

चला जाऊ पंढरी वारीला ---जाऊ वारीला
विठूरायाच्या भेटीला ----।। ध्रु ।।

अभंग गाणी गायाला
साrर्‍यांनी मिळून र्‍हायाला
मिळेल ते चालेल पोटाला
विठूरायाच्या भेटीला ---- १

एक तरी ओवी अनुभवायला
ग्यानबा तुकाराम म्हणायला
सार्‍यांनी एकरूप व्हायाला
विठूरायाच्या भेटीला ---- २

देवाच्या जाताना भेटीला
दोन गोड शब्द गाठीला
दरवर्षीच्या आषाढीला
विठूरायाच्या भेटीला ---- ३

चंद्रभागा नदीतीराला
नामदेव पायरी गाठायला
गरूडखांबा हात लावायला
विठूरायाच्या भेटीला ----४

संत जनांच्या माऊलीला
विठूच्या पायी मिठी घालायला
वय जरी आले आपले साठीला
विठूरायाच्या भेटीला ----५

माघारी

आली आहे मोठी
आस घेऊनी मी उरी
नको धाडू रे माघारी, विठूराया ---- १

नाही रमत रे मन
आता या संसारी
नको धाडू रे माघारी, विठूराया ---- २

भातुकलीच्या खेळाची
हौस फिटली रे सारी
नको धाडू रे माघारी, विठूराया ---- ३

झाले करुन उपास
व्रतवैकल्येही सारी
नको धाडू रे माघारी, विठूराया ---- ४

दु:खाचे डोंगर हे
आले घेऊन डोईवरी
नको धाडू रे माघारी, विठूराया ---- ५

कर हलके हे दु:ख
नाही सोसवत भारी
नको धाडू रे माघारी, विठूराया ---- ६

अभंग


जगी कोणीही नसतोच स्वयंपूर्ण
एकमेकाविण नरनारीही अपूर्ण ---- १

येतजाता तू एकटाच अससी
संगतीला दो-चार पावलासी ---- २

कुणी न येती परि कीर्तीविना अंती
आईवडिलांविण नाही कुणा खंती ---- ३

उठतबसता तू म्हणत जा अभंग
शेवटाला परि तोचि पांडुरंग ---- ४

आस

देवा तुझा ध्यास / लागलासे खास /
लागे मज आस / दर्शनाची //१//

देवा तुझ्या पायी / ठेविते मी डोई /
आहे तुझ्या ठायी / भक्ती माझी //२//

देवा तुझा छंद / हाच माझा बंध /
वाया हा सत्संग / जावो नये //३//

देवा तुझ्या नामी / लागे मज प्रीती /
ठेवी माये माथी / कृपादृष्टी //४//

देवा तुझ्या दारी / कोणी ना भिकारी /
प्रेमे जेऊ घाली / निजकरे //५//

देव दिसला

देव दिसला बाई देव दिसला
कृष्णरुपाने अवतरला ----ध्रु ----

धावे जनीच्या हाकेला
मदत करी तो दळायला
मीराबाईचा विषप्याला
पिऊनी झाला तो काळा ----१

भोळया तुक्याच्या नामाला
कधी न हरि तो विसरला
काढुनि वरती गाथेला
दर्शन दिधले जनतेला ----२

आवडी नाम्याच्या भक्तीला
नाम्यासाठी हरि भुकेजला
कावडी घेऊन पाण्याला
श्रीखंड्या तो कधी बनला ---- ३

सुदामदेवाच्या मैत्रीला
जागुन चाखी पोह्याला
दुर्जनास ना गवसला
विदुराघरी परि हरी रमला ---- ४

वदण्या गीता जनतेला
ज्ञान्याहृदयी तो वसला
धावुनी आला मदतीला
रेड्यामुखी वेद वदविला ---- ५

संकटी रक्षी जगताला
गोवर्धन हाती धरीला
वदनी विश्वरुपाला
दावी यशोदामातेला ---- ६

देव दिसला बाई देव दिसला
कृ ष्णरुपाने अवतरला ---- ध्रु ----

राधा

स्वप्नी माझिया कुणीतरी आले
डोळयांच्या कडा टिपून गेले
सखये माझे भान हरपले
काहीही मजला कळेना झाले ---- १

कुंजवनी मी जेधवा गेले
स्वप्नीचे रूप नयनी आले
जळी-स्थळी अन् पाषाणी भले
सगुण सुंदर रूप दिसले ---- २

मुरलीचे सूर कानी आले
अमृतधारांनी न्हाऊनी गेले
राधेचे मन तल्लीन झाले
कृष्णरूपात विलीन झाले ---- ३

कृष्णसखा

अडीनडीला हाक मारता
धावत तू येशी
कृष्णसख्या रे म्हणुनी मजला
तूच आवडशी ---- १

नीलवर्ण ह्या तनूस शोभे
मुद्रा तव हासरी
मोरमुकुट हा मस्तकी शोभे
हाती तव बासरी ---- २

बासरीतुनी सुरेल सुंदर
सूर जणू फुलती
ऐकण्यास ते म्हणुनी सारे
जमती तुजभवती ---- ३

मंत्रमुग्ध रे होऊनी जाती
सारे गहिवरती
काय करावे उमगत नाही
गुंग होई ती मती ---- ४

तुझ्याविना या जगती नाही
दुजा कुणी आसरा
मनात माझ्या सदैव वसतो
चेहरा तव हासरा ---- ५

कृष्ण न केवळ मूर्तीमध्ये
दडुनी की बसला
चराचरातील वस्तुजाती तो
भरुनी असे उरला ---- ६

मुरली

कृष्णा वाजव रे मुरली
मुरलीने भूक नुरली ---- ।।ध्रु।।

गोपी निघाल्या लवकरी
जाण्या मथुरेच्या बाजारी
करण्या गोरस विक्री
कृष्णा वाजव रे मुरली ---- १

पेंद्याचंद्या रे बल्लारी
गाई घेऊनि जा नदीतीरी
परतुनि या लवकरी
कृष्णा वाजव रे मुरली ---- २

गोपी अणिती तक्रारी
काय कमी रे तुज घरी
न करी गोरस चोरी
कृ ष्णा वाजव रे मुरली ---- ३

उघडी वदना मुरारी
दूर सारी रे बासरी
नवनीत ना अंतरी
कृष्णा वाजव रे मुरली ---- ४

विश्वरूपाच्या दर्शनी
झाली यशोदा बावरी
हृदयी त्या कवटाळी
नक्को वाजवु रे मुरली ---- ५

हौस


नाही मजला छंद दूसरा
पायी तुझिया देई आसरा
गुरु सखा खरा तूच यादवा
हौस एवढी पुरवि केशवा ---- १

प्रेमे पूजिती राऊळी जरी
वसशी तू खरा हृदयमंदिरी
नामी तुझिया अमृती गोडवा
हौस एवढी पुरवि केशवा ---- २

भेटीची तुझ्या ओढ लागली
पैलतीरासी दृष्टी लागली
मार्ग दाखवी तू रमाधवा
हौस एवढी पुरवि केशवा ---- ३

जवळी बैसवी निववी अंतरा
विनविते तुला मी रमावरा
कणव का तुला ना येई माधवा
हौस एवढी पुरवि केशवा ---- ४

Hits: 57