काव्य

Written by Suresh Ranade

तीच


घराच्या सुखासाठी
प्राण वेचते
तीच खरी वनिता ---- १

काठावरच्या लोकांचे
जीवन फुलवते
तीच खरी सरिता ---- २

मनाच्या गाभार्‍यातून
जन्म घेते
तीच खरी कविता ---- ३

कवितासखी

सोडुनी मजला जाऊ नको तू
बाई सखये कविते
ओळखीस नच झाले असती
दिवस चारही पुरते ---- १

संगतीत तव उडुनी जाती
क्षण किती मज ना कळते
साद घालता कैसी येशी
कोडे ना उलगडते ---- २

अवीट ऐशा तुझ्या सोबती
माझी मी नच उरते
समाधीत तव असता मीही
भान जगाचे नुरते ---- ३

भरजरी हा तव रेशिमशेला
पाहून मन हे खुलते
पेलवेल का परि हे मजला
ओझे असले भलते ---- ४

मातेपरि तू पाखर घाली
म्हणो काहीही जग ते
कसलीही मग भीती माझ्या
मनामधे ना उरते ---- ५

कविता

कवितेला वास माझ्या
येतो साधेपणाचा
कवितेचा बाज माझ्या
खेडवळी वळणाचा ---- १

कवितेचा रंग माझ्या
साध्या सदाफुलीचा
कवितेचा संग माझ्या
मायेच्या माऊलीचा ---- २

कवितेचा नूर माझ्या
शब्दांमधल्या टिंबांचा
कवितेचा सूर माझ्या
मनातल्या प्रतिबिंबांचा ---- ३

कवितेचा अर्थ माझ्या
शब्दांच्याही पलिकडचा
कवितेचा आवर्त माझ्या
परमेशाच्या प्राप्तीचा ----४

पुसू नको

पुसू नको गं सखे मला तू कविता स्फुरते कशी ?
ठाऊक नाही मला परी जणू रंभा की उर्वशी
नाचत मुरडत अलगद येती स्वर्गलोकीच्या पर्‍या
कुंद अबोली जाईजुईच्या कळया जणू साजिर्‍या ----१

पुसू नको गं सखे मला तू कविता की ही फुले ?
ठाऊक नाही मला परी जणू झोपाळा हा झुले
पहाटसमयी पारिजात हा मंदमंदसा डुले
गोजिरवाण्या गोविंदाची दुडदुडती पाऊले ---- २

पुसू नको गं सखे मला तू कविता की आरती ?
ठाऊक नाही मला परी जणू समईच्या ह्या ज्योती
वेणू घरी हा सखे श्रीहरी नाजुकसाजुक ओठांवरती
बासरीतुनी घननीळाच्या सूर जणू उमलती ---- ३

स्पर्श


तव हस्ताचा स्पर्श लाभता
शब्द घे तव माधुरी
मधुरतेसवे अर्थ हा करी
अमृताची बरोबरी
शब्द-अर्था जोड जैशी
नववधू जणू लाजरी
कृष्णकन्हैय्या हाती शोभे
हासरी जणू बासरी ----१

तव हस्ताचा स्पर्श लाभता
शब्दास ये नव पल्लवी
झिरमिरी ह्या सोनपदरी
अर्थ नूतन साठवी
सौंदर्याचे दर्शन जगता
उकलुनि परि तो दाखवी
कृष्णकन्हैय्या हासुनि दावी
आपुली ही छबी नवी ---- २

तव हस्ताचा स्पर्श लाभता
शब्दास ये नव रूपडे
विविधरंगी अर्थछटांचे
प्रथमदर्शनी कूट पडे
लक्षपूर्वक पाहता नव
अर्थ त्यातूनी उलगडे
कृष्णकन्हैय्या अंगी शोभे
सानुले जणू अंगडे ---- ३

प्रतिमा


जिकडे पहावे तिकडे मजला
काव्य काव्य अन् काव्य दिसे
काय करावे उमगत नाही
वाटे मज लागले पिसे ---- १

स्वच्छंदी या वाऱ्यासंगे
होउनि मयूरपंखी पिसे
मन हे माझे लहरत जाई
ठाऊक नाही कुठे कसे ---- २

पुनवेच्याही राती चांदण्या
चंद्र नभीचा तो विलसे
पाहुनि त्या सागरास वाटे
चांदा भेटू कुठे कसे ---- ३

उत्तुंग रुपेरी हिमालयाचे
भव्य रुप ते सुंदरसे
हिरव्या मखमली तृणावरीही
मन माझे अडकून बसे ---- ४

चराचरातील विविध छटामधि
परमेशाचे रूप दिसे
मनात माझ्या प्रतिमा त्याची
रूप घेऊनि बसलीसे ---- ५

पूर्ती

प्रत्येक कविता होताना
मनात एक सणक असते
तिची पूर्ती होईतो
मनात थैमान चालू असते ---- १

सागराच्या लाटांपरी
कल्पनांचे तरंग उमटत असतात
चराचराचे रूप घेऊन
डोळयांसमोर नाचत असतात ---- २

इतरांना काही वाटले तरी
एक अनामिक खुशी असते
वार्‍यावर स्वार होऊन
मन स्वैर भटकत असते ---- ३

मराठी माऊली

माझी मराठी माऊली
सार्‍या जगाची सावली
घरी गं माझ्या आली
माझी मराठी माऊली ---- १

शालू सखूचा ल्यायिली
पैठणी बहिणाई आणिली
साऱ्या जगी देखणी
माझी मराठी माऊली ---- २

चोळी जनीच्या हाताची
जरी मुक्तीच्या काठाची
अंगी मऊ मखमली
माझी मराठी माऊली ---- ३

हार नाम्याने घातला
गजरा सावत्याने माळिला
पैंजण नाथा घाली
माझी मराठी माऊली ---- ४

चुडा तुक्याने भरविला
मुकुट ज्ञान्याने चढविला
सकला हाती धरी
माझी मराठी माऊली ---- ५

गजर करिती वारकरी
जमती विठूच्या नगरी
पंढरी खरी दुमदुमली
माझी मराठी माऊली ---- ६

माझी मराठी माऊली
गंगा ज्ञानाची जाहली
दिगंतरासि निघाली
माझी मराठी माऊली ---- ७

Hits: 89