निसर्ग

Written by Suresh Ranade

भेट

दिवस व रात्र पळत असतात
एकमेकांच्या पाठोपाठ
भेटण्याचा करतात प्रयत्न
एकमेकांना आटोकाट ---- १

प्रेमाने ओसंडून वाहत असतात
मने त्यांची काठोकाठ
मनातल्या मायेत चिंब भिजून
धावत सुटतात बिनबोभाट ---- २

जन्मजन्मांतरीचे सोबती पण
भेट नाही वास्तवात
कळत नकळत एकच गाणे
भेटीचे ते गात असतात ---- ३

चांदणं

पुनवेचं चांदणं गगनात
अन् प्रकाश पडलाय दरियात
चांदणं आयलय हातात
अन् लाज वाटे मला बाई मनात ---- १

चंदेरी मासोळी आली पाण्यात
अन् गोड गोड खळी माझ्या गालात
गवसली गं माझ्या जाळयात
अन घेऊन निघाले मी तोrर्‍यात ---- २

समिंदरा रे समिंदरा
घेऊन चल मला माझ्या घरा
जाईन मी लाटांच्या संगतीत
अन् वाळूत पावले रेखीत ---- ३

गंगामाई

जगी असती ते बहुत नदी-नाले
परी सकला ना एक नाव चाले ---- १

पुण्यदायी ती एक खरी गंगा
दुजी नाही तिजपरी जगी सांगा ---- २

सकल पापे ती सुखे घेई पोटी
क्षमा सकलांना करुनी होई मोठी ---- ३

चूक नसताना आपुली जरी काही
क्षमा करता त्या देव वरुनी पाही ---- ४

सजा पाप्याला देव खरी देई
सदा आठवावी मनी गंगामाई ---- ५

सांगता

पैलतिरी ते बिंब उतरता
संध्याराणी लाजुन बघता
रंगांची ती उधळण होता
लालगुलाबी रंग ही जमता ---- १

रंगांचे धन तिथे उधळता
कड सोनेरी ढगास मिळता
रंगधनूचे दर्शन होता
रंगुनी जाई धरणी माता ---- २

गाई परतुनी घरासि येता
देवापुढती दिवा लावला
`शुभं करोति' म्हणता म्हणता
अंधाराचे नावही नुरता ---- ३

घरधनी अपुल्या घरास येता
हसर्‍या वदनी दिसे धन्यता
श्रमसाफल्या होई तत्वता
दिवसाची ती होई सांगता ---- ४

संदेश

साहवेना बाई मला
शिशिरातील पानगळ
पेलवेना डोईवरी
भलेथोरले आभाळ ---- १

ग्रीष्मातली हाय हाय
कशी काय सांगू माय
सांगून तुला कध्धी खरं
वाटायचं नाही बरं ---- २

शरदाच्या चांदण्याची
रीतच न्यारी
मनाच्या चोरकप्प्यात
अलगद उतरी ---- ३

वर्षाऋतूत बरसतात
सरीवर सरी
हात गुंफून हातात
कोसळती जरी ---- ४

दिवस कसा सरतो
कळत मला नाही
तुझ्या सयीशिवाय
घास उतरत नाही ---- ५

मेघराजा संदेशाला
नीट ठेव ध्यानात
दूर माझ्या माईच्या
जाऊन सांग कानात ---- ६

झुळुक


वाrर्‍याची छोटीशी आली झुळुक
पाने वाजली सुळुक् सुळुक् ---- १

कोवळी पाने गोडशी हासली
हिरवी पाने थोडीशी लाजली ---- २

पिवळी पाने मात्र शहारली
अन् झाडाखाली गळून पडली ---- ३

पानांचा झाला चक्काचूर
झाडापासून गेली दूरदूर ---- ४

याद


स्वप्नी धुंद होताना
पहाटपक्षी गाताना ---- १

सनईचे सूर ऐकताना
गुलाबी थंडी लपेटताना ---- २

शुभ्र धुक्यात हरवताना
रिमझिम पावसात भिजताना ---- ३

मऊशार गवती चालताना
चांदण्याची फुले वेचताना ---- ४

झोपाळयावर झुलताना
मनातल्या मनात फुलताना ---- ५

देवाचे नाव घेताना
कामात गुंग असताना ---- ६

हमखास तुझी याद येते
अन् ओल्या आठवणीत विरून जाते ---- ७

बाग

बागेतल्या फुलांची एकच गर्दी
फुलांनी भरुन गेली परडी ---- १

गुलाबाच्या फुलाचा तोराच भारी
तुळशीची मंजिरी जणू नाजुक नारी ---- २

मोगrर्‍याच्या फुलाची ऐटच बाई
पण जुईच्या कळीची सर त्याला नाही ---- ३

हिरव्या चाफ्याचा नखराच मोठा
पिवळया चाफ्याला नाही काही तोटा ---- ४

जास्वंदी कर्दळी भाव खाऊन जाई
लाल-पिवळी गुलबाक्षी गोड हसून पाही ---- ५

पांढरी शुभ्र ब्रम्हकमळे क्वचितच येती
पारिजाताच्या फुलांना नाही काही गणती ---- ६

गेंदेवाल्या झेंडूचा दिमाखच भारी
ऐटदार शेवंतीची रीतच न्यारी ---- ७

तू-तू मैं-मैं नका करू मारामारी
सारीच आहेत देवाला प्यारी ---- ८

पावसा रे पावसा

पावसा रे पावसा तू असा रे कसा
आमच्यावरती रुसलास जसा
जप तुझा करून कोरडा पडला घसा
लवकर ये जसा असशील तसा ---- १

वाट तुझी पाहून आमचे शिणले डोळे
तुझ्याविना चातकही इथे तळमळे
तुझ्यासाठी जीव आमचा तिळ तिळ उले
तुझ्याविना झालो आम्ही सारे खुळे ---- २

सार्‍यांचे हाल काही पाहवेना
हाय हाय ऊन काही साहवेना
ढगातले पाणी खाली येईना
डोळयातले पाणी काही जाईना ---- ३

भेटीसाठी तुझ्या काही नाही घासाघीस
भेट तुझी होता ना वाटे बासबीस
भेटीसाठी तुझ्या होतो जीव कासावीस
भेट तुझी होता जणू फिरे मोरपीस ---- ४

भल्या पहाटे


भल्या पहाटे अंधारी
सूर्यदेवाच्या मंदिरी
शालू नेसून अंजिरी
उषा येई ---- १

भल्या पहाटे पहाटे
सूर्यदेवा पाहू वाटे
कोंबड्याच्या मुखावाटे
संतवाणी ---- २

भल्या पहाटे सकाळी
सूर्यदेवाच्या राऊळी
पक्षी गाताती भूपाळी
आनंदाने ---- ३

भल्या पहाटेच्या क्षणी
सूर्यदेवाच्या चरणी
वृक्षवेली आनंदोनी
लवताती ---- ४

भल्या पहाटे उठोनि
सूर्यदेवाला नमुनि
सर्वांसाठी चहापाणी
माय करी ---- ५

वेलीवरची फुले


अनंत असती वेलीवरती
जाईजुईची फुले
परि ठाऊक नाही नशिबी कुणाच्या
काय असे लिहिले ---- १

कितीक येती आणि जाती
कुणास ना दिसती
परि सुगंध अपुला जगास देण्या
अविरत धडपडती ---- २

फूलपाखरी पंख लेऊनी
वार्‍यासंगे भिरभिरती
कुणी देवाच्या चरणावरती
पायी कुणी तुडविती ---- ३

अवचित कोणी जाऊनी पडती
विष्णुपदाचे वरी
अलगद कोणी शोभुनी दिसते
केशकलापावरी ---- ४

आकाशीच्या तारकांपरि
वेलींवरती फुलायचे
परि ठाऊक नाही कधी कुणाला
कुठे कसे जायचे ---- ५

जीवन अपुले दोन क्षणी जणू
अळवावरचे पाणी
करी तयाचे सोने तर कुणी
वाळूवरची गाणी ---- ६

Hits: 89