प्रासंगिक

Written by Suresh Ranade

महालक्ष्मी स्तोत्र

महिषमर्दिनी महालक्ष्मी हे
नमितो तुजला जय जय जय
सिंहारोहिणी रणचंडिके
नमितो तुजला जय जय जय ---- १

दुर्जनदंडिनी दुर्गामाते
नमितो तुजला जय जय जय
दु:खविमोचिनी मायभवानी
नमितो तुजला जय जय जय ---- २

अरिहंत्री तू अंबामाते
नमितो तुजला जय जय जय
भवभयहारिणी भक्तावरदे
नमितो तुजला जय जय जय ---- ३

शैलनंदिनी उमामहेश्वरी
नमितो तुजला जय जय जय
मृदुलभाषिणी सुहास्यवरदे
नमितो तुजला जय जय जय ---- ४

ज्ञानदायिनी ज्ञानदीपिके
नमितो तुजला जय जय जय
विश्वधारिणी विष्णुपत्नी हे
नमितो तुजला जय जय जय ---- ५

उदे गं अंबे

उदे गं अंबे उदे गं
उदे गं अंबे उदे गं ---- ध्रु ----

कोल्हापूरवासिनी उदे गं
करवीरवासिनी उदे गं
रूप तुझे हे गोजिरवाणे
सकला पाहूदे गं ----
उदे गं अंबे -- १

जगन्माऊली सकलजनांची
अंबा पुजूदे गं
नामाचा तव महिमा
सकला मिळूनी गाऊदे गं ----
उदे गं अंबे -- २

भक्तिरसाच्या आनंदामधि
सकला न्हाऊदे गं
सकलजनांची मायमाऊली
सेवा तव करूदे गं ----
उदे गं अंबे -- ३

प्रीती ऐशी सकलांवरती
अखंड राहूदे गं
अंबामाते कृपादृष्टी तव
सकला लाभूदे गं ----
उदे गं अंबे -- ४

तव प्रसादा सकलजनांना
वाटून देऊदे गं
स्त्रीशक्तीचा महिमा सकला
पटवून देऊदे गं ----
उदे गं अंबे -- ५

सकलजनांच्या कल्याणाची
आरती गाऊदे गं
शांती नांदो सकल जगामधि
आशिष मागूदे गं ----
उदे गं अंबे -- ६

सुमनांची ही माला
सुंदर चरणी वाहूदे गं
उदे गं अंबे उदे गं
उदे गं अंबे उदे गं ----
उदे गं अंबे -- ७

तुळशीचं लगीन


वर्‍हाडी कोण कोण येणार
आमच्या तुळशीचं लगीन ---- १

दादा म्हणे मी मोठा
धरीन अंतर पाटा
आमच्या तुळशीचं लगीन ---- २

छोटू म्हणे मी छोटा
कामे करु पटापटा
आमच्या तुळशीचं लगीन ---- ३

ताई म्हणे मी ताई
मेंदी लावीन बाई
आमच्या तुळशीचं लगीन ---- ४

काका म्हणे मी काका
उडवू लग्नाचा दणका
आमच्या तुळशीचं लगीन ---- ५

मामा म्हणे मी मामा
करीन पडेल त्या कामा
आमच्या तुळशीचं लगीन ---- ६

मावसा म्हणे मी मावसा
म्हणेन सार्‍या या बसा
आमच्या तुळशीचं लगीन ---- ७

आजा म्हणे मी आजा
म्हणेन पेढे खा जा
आमच्या तुळशीचं लगीन ---- ८

बाबा म्हणे मी बाबा
पैशाची काचकुच नायबा
आमच्या तुळशीचं लगीन ---- ९

काकू म्हणे मी काकू
लावीन हळदी कुंकू
आमच्या तुळशीचं लगीन ---- १०

मामी म्हणे मी मामी
सांगीन युक्त्या नामी
आमच्या तुळशीचं लगीन ---- ११

मावशी म्हणे मी मावशी
सार्‍यांची करु चौकशी
आमच्या तुळशीचं लगीन ---- १२

आजी म्हणे मी आजी
पंगत वाढीन खाशी
आमच्या तुळशीचं लगीन ---- १३

आई म्हणे मी आई
डोळा पाणी येई
आमच्या तुळशीचं लगीन ---- १४

वर्‍हाडी सगळे येणार
आमच्या तुळशीचं लगीन ---- १५

दीपावली

काय वर्णू बाई दिवाळीचा थाट
आनंदाची करी सदा बरसात ---- १

कृष्णदेव दावी नरकासुरा वाट
स्नानाची गर्दी होई होता पहाट ---- २

पणतीरूपी चांदण्याही येता दारात
प्रकाशाने ऊजळे सारा आसमंत ---- ३

लक्ष्मीपूजनाचा मोठा थाटमाट
सारे जन गाती धनश्रीचे गीत ---- ४

सुख भरुनी राहे घरादारात
आनंदाने झुलती सारे मजेत ---- ५

भाऊबीज येई मोठ्या झोकात
डोळियांच्या ज्योती लावुनी दारात ---- ६

सणांच्या राजाची चालता वरात
आनंदाने आसवे येती नयनात ---- ७

खिरापत (हादगा)

कोल्हापूर अंबा माय गं
खिरापतीला काय गं ? ---- १

वंदिन तुझे पाय गं
खिरापतीला काय गं ? ---- २

लेक आली हाय गं
खिरापतीला काय गं ? ---- ३

गुणाची माझी बाय गं
खिरापतीला काय गं ? ---- ४

साखर जश्शी साय गं
खिरापतीला काय गं ? ---- ५

लाडू चिवडा खाय गं
खिरापतीला काय गं ? ---- ६

दारी बांधली गाय गं
खिरापतीला काय गं ? ---- ७

प्रेमळ जश्शी माय गं
खिरापतीला काय गं ? ---- ८

दुधाला वाण नाय गं
खिरापतीला काय गं ? ---- ९

लोणी तूप खाय गं
खिरापतीला काय गं ? ---- १०

तिखट्ट हाय हाय नाय गं
खिरापतीला काय गं ? ---- ११

ओळखणार तुम्ही हाय गं
खिरापतीला काय गं ? ---- १२

सांगणार मी नाय गं
खिरापतीला काय गं ? ---- १३

हारलात म्हणू काय गं ?
खिरापतीला काय गं ? ---- १४

गौराई

आली गौराई सजूनी आज माझ्या गं अंगणी
आनंदाचा बाई येई घरी मळाच फुलोनी ---- १

हळदीकुंकवाच्या पावलांनी घरासि तू येशी
साrर्‍या घरा तू गं देशी सोनपोवळयाच्या राशी ---- २

माय माऊलीच्या आगमने आनंद उसळे
घरदार बाई माझे कसे उजळूनी गेले ---- ३

गणरायाचे कौतुक तिच्या मनात साठले
तिच्यासाठी आज केले गोड घावन-घाटले ---- ४

दीन लेकरांची असशी तू बाई खरी आई
काय सांगावे ठाऊके तुज सारे सारे काही ---- ५

तुझ्याकडे माई माझे दुजे मागणे ना काही
शांती नांदावी जगती हीच आस असे बाई ---- ६

गणपती उत्सव

आला बाई आला गणपती
उत्सव दारी आला
सडासारवण रांगोळीने
करूया स्वागताला ---- १ आला बाई आला --

केशर कुंकुम दुर्वा फुले
मोदक नैवेद्याला
लहानथोरही जमती सारे
येथे आरतीला ---- २ आला बाई आला --

बुद्धीशक्तीच्या देवा आपण
सारे भजुया चला
सुखशांती अन् समाधान हे
मागू केवळ त्याला ---- ३ आला बाई आला --

स्मरणी सदैव ठेवू सगळे
मंगलमूर्तीला
हेवेदावे पार पुसोनी
मैत्री करूया चला ---- ४ आला बाई आला --

पुढच्या वर्षी लवकर येण्या
विनवू नमुनी त्याला
सारे मिळूनी गणरायाला
निरोप देऊ चला ---- ५ आला बाई आला --

निरोप देता गजाननाला
पाणी ये नयनाला
मनात माझ्या भरूनी उरला
आनंदसोहळा, ऐसा आनंद सोहळा ---- ६ आला बाई आला --

मंगलागौरीची आरती

जयदेवी जयदेवी मंगलागौरी
पूजनी तुझिया रमती नारी ---- ध्रु ---- जयदेवी जयदेवी--

जाईजुई अन् कुंद अबोली
गुलाब चाफा धुंद चमेली
जास्वंदी कर्दळी शुभ्र सायली
गुलबाक्षी गोकर्णी गोडुली लिली ---- १ जयदेवी जयदेवी--

मोगरा पारिजात कोरांटी
रंगीबेरंगी फुलांची दाटी
आघाडा दुर्वा बेल तुळशी
नानापरीची पत्री आणिली ---- २ जयदेवी जयदेवी--

श्रावणमासी धरणीमाता ही
रोज नवीन साडी ल्यायिली
पाहाया सृष्टीची रूपे आगळी
फुलांची ऐसी योजना केली ---- ३ जयदेवी जयदेवी--

मंगलदिनी सोनसकाळी
मंगलागौरीची पूजा बांधिली
तुझ्या कृपेची सदा सावली
लाभू दे आम्हा माय माऊली ---- ४ जयदेवी जयदेवी--

स्वर्गसुखाच्या अमोघ राशी
असती तुझिया चरणांच्यापाशी
संतति संपत्ती सौभाग्या देई
मागणे इतुकेच दुसरे न काही ---- ५ जयदेवी जयदेवी--

घर

महाल झोपडी बंगला फ्लॅट
प्रत्येकाचा निराळा थाट ---- १

प्रत्येकाची आपापली शान
नाही मोठे नाही सान ---- २

ज्याचं त्यालाच घर प्यारं
बोलक्या भिंती हसरी दारं ---- ३

दुसर्‍याचे घर दुरूनच बरे
स्वतःच्या घरातच सुखाचे वारे ---- ४

दगड माती निर्जीव पसारा
त्यातच लाभे मायेचा उबारा ---- ५


चैत्रगौर

स्वागत करण्या चैत्रगौरीचे
मयूर होऊनी मन हे नाचे
फूलपाखरी पंख लेऊनी
सदा सर्वदा हसर्‍या वदनी ---- १

लग्नापरी ते हळदीकुंकूही
चैत्रमासी हे चढे मन्मनी
काय करु अन् काय नकासे
वाटे सकला भेटावेसे ---- २

जमवुनि सार्‍या सख्या मैत्रिणी
इकडुनि तिकडे करिती भगिनी
लहान मोठे येथ न कोणी
आनंदाने उडती पक्षिणी ---- ३

परि न भुलती निजगृहाला
झटपट उरकती घरकामाला
सडा शिंपुनी सुबक अंगणी
रंगावली ती पुढती रेखुनी ---- ४

कोणी अंबाडा कोणी वेणी
केस मोकळे सोडी कोणी
सुगंधीत तो गजरा माळुनी
किंवा गुलाबपुष्प खोवुनी ---- ५

साड्यांची जणू मैफल भरली
इंद्रधनूसही लाज वाटली
हिरव्यांची तर चंगळ झाली
जरी पदराची रेशीम काळी ---- ६

कोणी अंजिरी कोणी चंदेरी
कोणी झिरमिरी कोणी रुपेरी
कोणी पिवळी कोणी गव्हाळी
अलगद येई निळी जांभळी ---- ७

सकलांवरती नवी झळाळी
कुंकुमतिलका लावुनी भाळी
सुरभि अत्तरा हाती लावुनी
हसर्‍या हाती गुलाब पाणी ---- ८

हरभर्‍यासही छान भिजवुनी
ओटी भरती नमुनी वाकुनी
अशीच एकी ठेवा म्हणुनी
आशीर्वच हा देती सुवासिनी ---- ९

डाळ आंब्याची सुरेख सजवुनी
पन्हे कैरिचे नीट हलवुनी
वडी नारळी मध्ये ठेवुनी
पेपरडीशही देती नेउनी ---- १०

कन्या अपुल्या नटुनी थटुनी
विविधवर्णी वस्त्रे लेऊनी
अप्सराच जणू स्वर्गामधुनी
उतरुनी येती अवनी सदनी ---- ११

मिळे सर्व ना पुन्हा पुसोनी
बडीशेप ती हाती देऊनी
आनंदा जणू देती वाटुनी
`या या' म्हणती आनंदोनी ---- १२

नटुनी थटुनी सुहास्य वदनी
स्वागत करिती सार्‍या मिळुनी
चैत्रगौरीच्या वंदुनी चरणी
प्रतिवर्षी सण करिती भगिनी ----१३

तीळगूळ

तीळ आणि गूळ यांचे
नाते अति जवळचे
कध्धी म्हणजे कध्धी सुध्दा
भांडण नाही दोघांचे ----१

तीळ आणि गूळ यांची
मैत्री असते घनिष्ठ
दोघांपैकी नाही कोणी
थोडा सुध्दा गर्विष्ठ ---- २

तीळ आणि गूळ यांची
दोस्ती असते अतूट
आयुष्यात एकदाही
होत नाही फाटाफूट ---- ३

तीळ आणि गूळ यांच्यात
नाही कध्धी तंटा
कारण दोघांचाही असतो
प्रेमदानाचा वायदा ---- ४

तीळ आणि गूळ आहेत
सख्खे शेजारी
दोघेही देतात
प्रेमाचीच सुपारी ---- ५

तीळ आणि गूळ यांच्यात
आहे थोडा वर्ण भेद
पण कध्धीही दोघांच्यात
होत नाही मतभेद ---- ६

तीळ आणि गूळ यांचे
कार्य फार मोलाचे
सूर्य आणि चंद्र यांच्या
कार्याच्याही तोलाचे ---- ७

Hits: 64