इतर

Written by Suresh Ranade

मानवता धर्म

माझे तेही असेचि माझे
तुझे तेही म्हणतो मी
असला कसला धर्मचि म्हणता
फसवणूक ही खरी नामी ---- १

देवाने कधी सांगितले का
चोरी लबाडी करा तुम्ही
राम-कृष्ण तर सांगत नाही
येशु-बुद्ध ना अल्लाही ---- २

सदाचार अन् सुविचारच हे
रूप असे हो देवाचे
दुराचार अन् दुर्विचार हे
रूपचि घेई दैत्त्याचे ---- ३

स्वर्गामध्ये देव ना राही
नरकामधि ना दानवही
मृत्युलोकी परि दोन्ही भेटती
निर्मिती ही मानवहाती ---- ४

सुखी असावे प्रत्येकाने
अपुल्या अपुल्या घरामधे
डोकावुनी ना कधी पहावे
दुसर्‍याच्या त्या घरामधे ---- ५

धर्माच्या त्या नावाखाली
दुष्कृती करती अतिरेकी
लपूनी जरि दुष्कार्या करिती
इतिहासचि त्या साक्षी की ---- ६

सद्धर्मचि हा शाश्वत राहील
अधर्मासि ना थारा रे
उखडुनी टाकील अधर्मासि या
एक होऊनी जग सारे ---- ७

मानवता हा धर्म एकचि
असे खरा या जगामधे
सांभाळचि तो सदा करावा
प्रत्येकाने मनामधे ---- ८

भारतवासी

भारतवासी नरनारी
कुणीही असो शेजारी
प्रेमाने आम्ही नांदू तरी
परी न खपवू शिरजोरी
भारतवासी नरनारी ---- १

पूर्व नि पश्चिम भेद नसे
उत्तर दक्षिण द्वैत नसे
भारतमाता एक असे
झुकवू मस्तक पदांवरी
भारतवासी नरनारी ---- २

नरनारी ना भेद इथे
धर्म-जात ना पंथ इथे
रक्षण अपुल्या भूमीचे
करण्या शक्ती लावू पुरी
भारतवासी नरनारी ---- ३

झाशीची ती राणी असे
शिवबा अमुच्या मनी वसे
टिळकांचा वरहस्त असे
याद तयांची ठेवू खरी
भारतवासी नरनारी ---- ४

कुठेही असो अतिरेकी
पर्वतावरी चढला की
सागरतळी तो दडला की
शोधुनि त्याला काढू तरी
भारतवासी नरनारी ---- ५

भारतवासी जन सारे
जिंकू आम्ही जग सारे
प्रेमाने ना युद्धाने
जगती शांती आणू खरी
भारतवासी नरनारी ---- ६

फिनिक्स


(अमेरिकेवरील दहशतवाद्यांचे हल्ले)
भला थोरला वृक्ष एक तो
सकल जगा आधारभूत तो ..१

दूरवरी ती मुळेही गेली
जमिनीमध्ये रुतून बसली ...२

पर्णे ज्याची अगणित होती
फळे नि पुष्पे अनंत येती ..३

भव्य दिव्य तो पारही ज्याचा
शोभे राजा अखिल वनाचा ...४

अनंत पक्षी रोजच येती
विसाव्यासही कोणी थांबती ...५

किलबिल किलबिल सारे करती
गजबजून त्या फांद्या जाती ...६

वादविवादा कधी न करती
सुखात सारे पक्षी नांदती ...७

दिवस एक परि कसा उदेला
ठाऊक नव्हते पक्षीगणाला ...८

प्रभातवात तो मंद सूटला
वृक्षराज तो डुलू लागला ...९

गतकालाची भविष्यवाणी
विसरुनी गेला वृक्ष परी मनी ...१०

क्षणार्धात ते सर्व हादरले
कोणा न कळे काय जाहले ...११

भले थोरले गिधाड आले
वृक्षासचि त्या धडकुनि गेले ...१२

शक्ती त्याची अफाट होती
विषवल्लीही होती संगती ...१३

उन्मळून तो वृक्षही पडला
पक्षीगण त्याखाली अडकला ...१४

धूळ उडाली गगनी भिडली
क्षणात वार्ता जगती कळली ...१५

दुष्ट गिधाडे दोनचार ती
करिती त्यासम दुष्कृतीस ती ...१६

गिधाडांस त्या क्षमा न करता
शिक्षा देईल विश्व एकदा ...१७

कालावधी तो थोडा जाता
वृक्षाची जरी राखचि होता ...१८

राखचि परि ती जन्मा घालील
फिनिक्स पक्षी उदया येईल ...१९

अखिल जगातील गिधाडवृत्ती
खचितचि जाईल विलयाला ती ...२०

अमेरिका

विमानातल्या प्रथमप्रवासी अमेरिका गाठले
परि मातृभूमीला स्वप्नी सुद्धा कधी न अंतरले ---- १

भलाथोरला देशचि आहे अमेरिका हा जसा
फळाफुलांनी फुलारलेला स्वर्गचि वाटे जसा ---- २

त्या देशाप्रती जाण्याचीही संधी मज लाभली
शितावरुनी त्या भाताचीही जाणीव की जाहली ---- ३

रसाळवाणीमधुनी सांगण्या लागे जी बुद्धी
ठाऊक आहे मला तेवढी नाही माझी मती ---- ४

पिटुकल्याशा खारीपरि ते यत्नचि मी केले
भावलेच जे मला तसे ते वर्णन मी केले ---- ५

पैसा-अडका सारे तेथे आहे मुबलक
घरे नि दारे रस्ते शहरे सारे सुरेख ---- ६

ठेंगणीठुसकी बसकी घरे ती छपरे उतरती
आकाशाला भिडणार्‍याही दिसती इमारती ---- ७

कसल्याही त्या कामाचा ना कोणा कमीपणा
ठायीठायी असती तेथे शिस्तीच्याच खुणा ---- ८

लाल नि हिरव्या दिव्यांच्या त्या इशार्‍यावरती
सुसाटवेगे पळती गाड्या त्या रस्तोरस्ती ----९

पोलिसमामांच्या कायद्याची ती भीती असे मनी
म्हणुनि तयांच्या वाटेला ना जाई कधी कुणी ---- १०

अमेरिकेमधि आहे सारे जगताच्या उलटे
लेफ्टहँड ड्राइव्ह करीत गाडी पळत की सुटते ---- ११

राइटटर्न घेण्या कधीही तेथा नलगे परमिशन
परि लेफ्टटर्न घेण्या रस्यावरती आखलेली खूण ---- १२

फ्रीवेवरती असती तेथे दोन-चार लेन
घुसाघुशी अन् गैरशिस्तीचे नाही देणं घेणं ---- १३

सुपरबाजारी लहानमोठ्या वस्तूंची दाटी
तारीखवार नि किंमतीचीही प्रत्येका पाटी ---- १४

कोठेही जा पोस्टात सुद्धा हसुनी स्वागत होते
प्रत्येक गोष्टीत ` मेड इन चायनाचे ' दर्शन की घडते ---- १५

अर्ध्यावरती जनता तेथील चिनी जपानी दिसे
काळा-गोरा भेदही तेथे फारसा उरला नसे ---- १६

कॉलेजच्या त्या वाटेला ना विशेष कुणी जाती
दहा-पंधरा वर्षाचीही होती कमावती ---- १७

घराघरातून राजाराणी सुखात नांदती
लहान मुलेही वेळेआधी शहाणीसुरती होती ---- १८

आजी-आजोबा काका-मामा नाती ना उरली
कुटुंबसंस्था कधी न तेथे खोलवरी रुजली ---- १९

लग्नबंधनी अडकत नाही कोणी लवकरी
स्वातंत्र्याच्या उपभोगाची प्रत्येका सुरसुरी ---- २०

स्वच्छतेचे का बा आपणा इतुके ते वाकडे
शिकू नये का आपण त्यांचे दोन चार तरी धडे ---- २१

मधमाशीच्यापरी आपणही चांगले तेचि घ्यावे
कोठेही जरी गेलो जगती संस्कार न बदलावे ---- २२

लोकसंख्या हे कारण आहे अपुल्या गरिबीचे
कर्तव्यचि ते आहे अपुल्या सार्‍या जनतेचे ---- २३

मेघदूत

साहित्याच्या सम्राटा तू प्रणाम घे अमुचा
कालक्रम जरि तुझा कुणाला नसे ओळखीचा
प्रसन्नचित्ते सरस्वती तुज देई दिव्य वाचा
अलौकिकाचा स्पर्शही लाभे तव काव्या साचा ---- १

तीन नाटके काव्ये चारही ऐसी सप्तपदी
प्रसिद्ध झाली काव्यसंपदा कालिदासहाती
`मेघदूता'सम ना मिळते काव्यकृती दुसरी
कविकुलगुरु हे, सकलजनांचे नमना स्वीकारी ---- २

प्रतिबिंबचि ते निसर्गातले काव्यी अवतरले
कालिदासमनभावसागरी तरंग जणू उठले
शृंगारासम करूणरसाचे दर्शन त्यात घडे
काव्यकृतीही शोधुनी ऐसी कुठेचि ना सापडे ---- ३

यक्षाला त्या सदैव लागे प्रियेचाच ध्यास
मूर्ती तियेचि नयनापुढती उभी असे खास
रामगिरीहुनी अलकापुरीला मेघा जाण्यास
शापभ्रष्ट तो यक्ष देतसे प्रियेस संदेश ---- ४

शतकसम्राट

अक्षरवाङ्मयदालन आम्हासाठी केले खुले
विखरुनी पडती सुविचारांची गोजिरवाणी फुले ---- १

सुंदर सोज्वळ उपमांना ना असे कधी खीळ
स्फूर्तीची मनि उसळे उर्मी नसे पोरखेळ ---- २

नाजुकहाती बकुळफुलांचा शोभे जणू हार
प्रसन्न चित्ती प्रवेश करता हासे जणू दार ---- ३

साहित्याच्या परिमलासवे डुले मोरपीस
जगी जन्मले अमर जाहले खांडेकर वि.स.---- ४

शतकाच्या ह्या सम्राटा, तू प्रणाम अमुचे घेई
शुभकार्या परि करण्या सकला स्फूर्ती तू देई ---- ५

नक्को नक्को

बोलावल्याविणा जाऊ नको
अन् विचारल्याविणा सांगू नको
कुणास काही मागू नको
अन् दुःख कुणाला सांगू नको ---- १

दोघात तिसरा बोलू नको
अन् वेडावाकडा चालू नको
पैशाची ती हाव नको
अन् सरड्याची ती धाव नको ---- २

कोणासंगे भांडू नको
अन् वितंडवादा घालू नको
उगा कुणाला हसू नको
अन् थोड्यासाठी रुसू नको ---- ३

आपुली टिमकी वाजवू नको
अन् फुकटची दमडी घेऊ नको
अधिक सलगी धरू नको
अन् नात्यातली मुलगी करू नको ---- ४

अतिगोडाते खाऊ नको
अन् सदासर्वदा झोपू नको
वेळ रिकामा दवडू नको
अन् नामस्मरणा विसरू नको ---- ५

शेतकरी

आम्ही शेतकरी कामकरी
शेताची लेकरं, काळया आईची लेकरं
करनार काम, गाळनार घाम
समद्यांच्या फुडं जानारं, जगाच्या फुडं जानारं ---- १

ढवळया नि पवळया आमचे
शूर सरदारं, आमचे शूर सरदारं
त्यांच्या पायी आहे आमची
खरी मदारं, आमची खरी मदारं ---- २

शूर आमच्या सरदारांची
गानी गानारं, आम्ही पवाडे गानारं
करून काम सुखाचा मग
घास खानारं, आम्ही घास खानारं ---- ३

नांगराला धरता धरता
साळा शिकनारं, आम्ही साळा शिकनारं
शेतकीच्या पदवीबिगर
न्हाई र्‍हानारं, आम्ही न्हाई र्‍हानारं ---- ४

बक्कळ धान्य पिकवून आम्ही
समद्यांना देनारं,आम्ही समद्यांना देनारं
जनतेची आम्ही बी
सेवा करनारं, आम्ही सेवा करनारं ---- ५

घर

महाल झोपडी बंगला फ्लॅट
प्रत्येकाचा निराळा थाट ---- १

प्रत्येकाची आपापली शान
नाही मोठे नाही सान ---- २

ज्याचं त्यालाच घर प्यारं
बोलक्या भिंती हसरी दारं ---- ३

दुसर्‍याचे घर दुरूनच बरे
स्वतःच्या घरातच सुखाचे वारे ---- ४

दगड माती निर्जीव पसारा
त्यातच लाभे मायेचा उबारा ---- ५


सोपे आणि अवघड

तोडणे सोपे जोडणे अवघड
बोलणे सोपे करणे अवघड ---- १

घेणे सोपे देणे अवघड
येणे सोपे जाणे अवघड ---- २

तरणे सोपे तारणे अवघड
स्विकारणे सोपे नाकारणे अवघड ---- ३

पेरणे सोपे जोपासणे अवघड
ऐकणे सोपे ऐकवणे अवघड ---- ४

वाचणे सोपे लिहिणे अवघड
जगणे सोपे जगवणे अवघड ---- ५

सुवर्णाक्षरे

नारी किंवा नरही असो त्या
नियम एकचि अखिल जगी
रंक असो वा राव असो वा
अमर न कोणी सकल जगी ---- १

जाणीव ही ही ठेवावी रे
तुवा मानवा म्हणुनी मनी
वर्तन ऐसे ठेवावे की
सजगपणाने जपुनी जनी ---- २

धनुष्यातुनी सुटलेला तो
बाण परतुनी ये न कधी
वदनामधुनी नि:सरलेला
शब्द न परतुनी येई कधी ---- ३

रविशशीचे किरण न करती
रंकराव हा भेद कधी
सर्वांभूती तैसी तूही
ठेवी मानवा समबुध्दी ---- ४

अपुल्यासरशा सूज्ञ जनाप्रती
उपदेशा ना मी केले
ठाऊक आहे सकल जना तरी
सुवर्णाक्षरी गुंफियले ---- ५

स्वप्नात

गुंतले हे मन माझे
तुझ्या केशपाशावरी
कसे आवरू हे मन
सल बोचते ही उरी ---- १

खोल जखम उरीची
कशी कुणाला गे सांगू ?
जखमेत जळून गे
मन लागते दुभंगू ---- २

केशपाशाने ग तुझ्या
ठेव बांधून मजला
ऊन उतरले अंगी
जीव होई सोनसळा ---- ३

मनमोराचा पिसारा
फुलेल का कधीतरी ?
निवेल हे मन माझे
तृप्त होईन अंतरी ---- ४

नाही सफल जाहले
नाते आपुले सत्यात
पण चुकवू नको गं
भेट आपुली स्वप्नात ---- ५


शिक्षण

माणसा रे माणसा,
शिकायचे असेल तर
एवढेच शीक-
सुंदर सुरेल पक्षांच्या
गळयामधली तान शीक ---- १

माणसा रे माणसा,
शिकायचे असेल तर
एवढेच शीक-
गुणगुणणार्‍या भुंग्याकडून
गुणांचे गुणगान शीक ---- २

माणसा रे माणसा,
शिकायचे असेल तर
एवढेच शीक-
मिणमिणणार्‍या पणतीकडून
सर्वस्वाचे दान शीक ---- ३

माणसा रे माणसा,
शिकायचे असेल तर
एवढेच शीक-
झुळझुळणार्‍या झर्‍याकडून
जीवनाची जाण शीक ---- ४

माणसा रे माणसा,
शिकायचे असेल तर
एवढेच शीक-
साधुसंतजनांकडून
परमेशाचे ध्यान शीक ---- ५

पलिकडले


पूजा-अर्चा मंदिर-मूर्ती
यांच्याही पलिकडे असते
देवाचे देवपण ---- १

खिडक्या-दारे माती-भिंती
यांच्याही पलिकडे असते
घराचे घरपण ---- २

नाक-डोळे रंग-रूप
यांच्याही पलिकडे असते
माणसाचे माणूसपण ---- ३

रांधा-वाढा उष्टी-काढा
यांच्याही पलिकडे असते
गृहिणींचे अंगण ---- ४

कपडा-लत्ता दाग-दागिने
यांच्याही पलिकडे असते
स्त्रीचे आईपण ---- ५

सन्मती

अरे अरे माणसा -

आयुष्यभर जपत आलास
स्वत:च्याच मताला
एकदा तरी द्यावी म्हणते
किंमत दुसर्‍याच्या मनाला ---- १

आयुष्यभर वाजवत आलास
स्वत:चीच टिमकी
एकदा तरी म्हणते मी
दुसर्‍याचं ऐकावं की ---- २

आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर
येऊन पोहोचल्यावरती
एकदा तरी बोल महणते
मान घालून खालती ---- ३

आता सारी भिस्त आहे
त्या विठूरायावरती
तोच देवो सर्वांना
थोडी तरी सन्मती ---- ४

मनात

मनात येई कधीमधी
काहीतरी लिहावे
मनातल्या विचारांना
फुलपाखरांचे पंख द्यावे ---- १

मनात येई कधीमधी
पक्ष्यांपरी उडावे
आभाळातील स्वच्छंदी
पाखरांशी हितगुज करावे ---- २

मनात येई कधीमधी
चातकापरी असावे
परमेश्वरी कृपादृष्टीच्या
एका थेंबाने तृप्त व्हावे ---- ३

मनात येई कधीतरी
माणसातील अंतर दूर व्हावे
माणसाने माणसाशी
माणसापरी वागावे ---- ४

मनात येई कधीतरी
निसर्गाच्या कुशीत शिरावे
अन् परमेशाच्या रूपात
विलीन होऊन जावे ---- ५

मनातल्या साrर्‍या विचारांना
देण्या स्वरूप मूर्त
मला वाटते तूर्त
माणूस आहे असमर्थ ---- ६

आभाळमन

दुसर्‍याला चांगले म्हणायला
आभाळाएवढे मन लागते
विद्येच्याही जोडीला
संस्काररूपी धन लागते ---- १

अनमोल हिर्‍यालाही
सुवर्णाचे कोंदण लागते
नुसती ऐश करायलाही
खिशामध्ये छन्‌‍छन् लागते ---- २

उच्च ध्येय गाठायचे तर
मनाशी खूण बांधावी लागते
सुख हवे असेल तर
दु:ख पचवून टाकावे लागते ---- ३

परमेशाच्या प्राप्तीला
भक्तीत रंगून जावे लागते
पांडुरंगाच्या भेटीला
संसार सोडून जावे लागते ---- ४

बोल बोलता

घड्याळाचा काटा सरकतो कधी
कळत नाही बघता बघता
अचानकपणे ठसका लागतो
न कळत जेवता जेवता ---- १

हॅलो, हाय-फाय म्हणावे लागते
घाईमध्ये असता असता
देखल्या देवा हात जोडतो
नकळत जाता जाता ---- २

मनातल्या मनात हसू येते
पु.लं. चे लिखाण वाचता वाचता
डोळयामध्ये आसू भरती
नकळत हसता हसता ---- ३

भली मोठी जांभई येते
बोअर कविता ऐकता ऐकता
झोपेतून जाग अलगद येते
पहाटपक्षी गाता गाता ---- ४

क्षणात ऊन क्षणात पाऊस
श्रावणमासी बघता बघता
ज्याचा तोही उरत नाही
आठवडोही बुडता बुडता ---- ५

देवाचे नाव मनोमन घ्यावे
काम करता उठता बसता
ठाऊक नाही संपेल कधी
जीवन आपले बोलबोलता ---- ६

काकू बाई

शेजारच्या काकू
घाईघाईने उठल्या
सकाळच्या प्रहरी
व्यायाम करु म्हणाल्या ---- १

`होय-नाही' म्हणता म्हणता
कपभर चहा प्यायल्या
``राहू दे बाकीचा
आल्यावर घेऊ'' म्हणाल्या ---- २

जामानिमा आवरून
चपला सरकवल्या
सहाचे ठोके ऐकताच
``येते हो'' म्हणाल्या ---- ३

झपाझप पावले टाकीत
काकूबाई निघाल्या
पण पाच-दहा पावलातच
गळाठून गेल्या ---- ४

``आज पुरे. उद्या बघू ''
काकू पुटपुटल्या
अन् कशाबशा धापा टाकीत
घरापर्यंत आल्या ---- ५

ठाऊके ना

गोड गोड पाणी नारळालागूनी
येई कोठूनी ठाऊके ना ---- १

इवलीशीशी चिमणी गाई गोड गाणी
शिकविली कोणी ठाऊके ना ---- २

आकाशीच्या अंगणी चमके जी चांदणी
कैसी येई झणी ठाऊके ना ---- ३

कातळाला कोणी पाझर फोडोनी
काढीतसे पाणी ठाऊके ना ---- ४

संपता रजनी जाग स्वप्नामधुनी
कैसी ये नयनी ठाऊके ना ---- ५

जैसी ज्याची करणी तैसी असे भरणी
कधी ये सदनी ठाऊके ना ---- ६

सज्जनांच्या वदनी साखरपेरीवाणी
घातलीसे कोणी ठाऊके ना ---- ७

नामयाची जनी पांडुरंगचरणी
रंगे कैसी भजनी ठाऊके ना ---- ८

तैसी माझे मनी कवितासाजणी
कैसी ये नटूनी ठाऊके ना ---- ९

एक क्षण

एक क्षण असा येतो -
स्वप्नाळलेल्या भावनांना
शब्दरूप देऊन जातो ---- १

एक क्षण असा येतो -
मरगळलेल्या मनावर
श्रावणाचा शिडकावा करून जातो ---- २

एक क्षण असा येतो -
दुखावलेल्या दिलाला
सुखाचा दिलासा देऊन जातो ---- ३

एक क्षण असा येतो -
ओथंबलेल्या आसवांचे
ओझे हलके करून जातो ---- ४

एक क्षण असा येतो -
करपलेल्या कातळालाही
हलकेच पाझर फोडून जातो ---- ५

एक क्षण असा येतो -
पुन्हा कधी न येण्यासाठी
जीवनमुक्त करून जातो ---- ६

Hits: 82