सांगावा

Written by Suresh Ranade

रसिकसम्राज्ञी

(साध्यासुध्या शब्दातून मनाच्या अंतर्भागात दडून बसलेला भावार्थ व्यक्त करण्यासाठी उस्फूर्तपणे बाहेर पडणाऱ्या कवितेचा रसिकसम्राज्ञी म्हणून केलेला यथोचित गौरव.)

शब्दसुरांच्या अंगणी, साधीभोळीच मांडणी
तेथ लावण्याच्या खाणी, भेटती गे रात्रंदिनी . . . १

तया सौख्याच्या सदनी, नाना देशीच्या रमणी
येती नटूनी थटूनी, भास अप्सरा नयनी . . . २

आनंदाच्या वेलीमधुनी, पाहे पल्लवी वाकूनी
रसाळ ती ऐकुनी वाणी, तृप्ती होतसे श्रवणी . . . ३

घट अमृताचे भरूनी, अलगद पावलांनी
मेघांसवे येई गगनी, भासे राणी सौदामिनी . . . ४

अलंकार आभूषणांनी, सहजी ये मंडपी नटुनी
जणू रसिकसम्राज्ञी, तैशी कविता ये मनी . . .५

पिशवी

(आपली एखादी लहानशी गोष्ट हरवली तरी आपल्या मनाला त्याची चुटपुट लागून राहते. वस्तू हरवली तरी आठवणरूपाने ती आपल्या मनात सदैव राहते.)

पैशाची पिशवी होती माझी सुरेख
कशी गेली हरवुनी नाही मज ठाऊक . . . १

जरि रंगाने ती काळीसावळी होती
परि लालगुलाबी फूल असे त्यावरती . . . २

ती संगती माझी सोडुनी उडुनी जाई
परि नजरेपुढुनी जाई न मम ती कधीही . . . ३

जरि दुसऱ्या तैशा पिशव्या असती गेही
मम ध्यानीस्वप्नी सदा तीच ती येई . . . ४

जरि पिशवी माझी दैवे उचलुनी नेली
तरि नेऊ न शकतो स्मृति मम मनी जपलेली . . . ५

प्रत्येक वस्तुचा विनाश अटळचि आहे
मनी शांति राखण्या पांडुरंग तो राहे . . . ६

आळस

(माणसाच्या शरीरात आळस, कंटाळा हा अनाहूतपणे नकळत घरात घुसणाऱ्या मांजरासारखा वस्तीला आलेला असतो. त्या आळसाशी एक शब्दही न बोलता, त्याची अजिबात सरबराई न करता त्याला घरातून म्हणजे शरीरातून दूर हाकलून देण्यासाठी मनाला केलेला उपदेश आहे. आळस गेल्यावर केलेल्या प्रयत्नातूनच यशप्राप्ती होते.)

आळस असे हा शत्रु आपुला
कधी न ठाऊक येई घरी
गुपचूप येई चोरपाऊली
लबाड जैसी मनीमांजरी --- १

चेहरामोहरा दिसे न याचा
हातपाय ना दिसती जरी
भल्याभल्यांना दावी वाकुल्या
करणी याची अजब खरी --- २

तळ ठोकुनी बसे आळस हा
काही केल्या हालत नसे
कळे न मजला हाकलुनी देऊ
या रिपुराजा कुठे कसे --- ३

आळस सोडुनी देई मना बा
उद्योगाची कास धरी
दोन शब्द ना बोल त्याजशी
काम उद्याचे आज करी --- ४

पुन्हा पुन्हा रे कथिते तुजला
विचार थोडा तरी करी
झटकुनी देई बळेचि आळसा
दिसे तेधवा खरा हरी -- ५

सज्जनांचे अंगडे

(वरवरच्या दिखाऊपणाला माणसाने भुलू नये. चमकते सारे सोने नसते.)

रंग चांगा परि रस नोहे चांगा
काय भुललासी वरलिया रंगा . . . १

कडू कारल्याची सजावट भारी
कडू रसांतरी भरलेसे . . . २

दुर्जनाचे बोली असे जरी गोडी
अंतरी लबाडी भरलीसे . . . ३

सज्जनांचे अंगी साधेचि अंगडे
मनी क्षमाशांती भरलीसे . . . ४

अतिथी

(घरी आलेल्या अतिथीचा हसतमुखाने पाहुणचार करावा. तहानलेल्यास पाणी व भुकेलेल्यास दोन घास देणे हीच खरी देवपूजा होय.)

अतिथीस तुम्ही सदा देव माना
अतिथीरूपे यशोदेचा कान्हा
अतिथीस तुम्ही सदा देव माना . . . ध्रु. ।।

कधी ये घरासि कुणाला कळेना
दोन गोड शब्दा विसरा परि ना
हसू ओठी थोडे तरी येऊ द्या ना
अतिथीस तुम्ही सदा देव माना . . . १

शुभप्रभाती जरि येई सदना
आनंदे द्यावे चहा-कॉफीपाना
सत्कारणी त्या समयास जाणा
अतिथीस तुम्ही सदा देव माना . . . २

माथ्यावरी जेवि रवि येई गगना
दोन घास अतिथी आला त्यासी द्या ना
थोडे तरी त्या स्मरा तुम्ही कर्णा
अतिथीस तुम्ही सदा देव माना . . . ३

संध्यासमयी गुरूसी स्मराना
अतिथी आला त्या गूळपाणी द्या ना
सहजी त्या शुभआशीषा मिळवाना
अतिथीस तुम्ही सदा देव माना . . . ४

अतिथीच्या जागी आपणास माना
भविष्यकाळातील ठेव जाणा
पुण्याची गणना करी देवराणा
अतिथीस तुम्ही सदा देव माना . . . ५

काळ

(मानव हा स्वत:ला सर्वश्रेष्ठ समजत असला तरी काळापुढे त्याची काही मात्रा चालत नाही. त्या काळामुळेच रावाचा रंक व रंकाचा राव होतो. होत्याचे नव्हते होऊ शकते. अशा ह्या सर्वशक्तिमान काळाला वंदन असो. )

काळाचा खेळ निराळा रे बाळा
काळाचा खेळ निराळा . . . ध्रु. ।।

काळाच्या पुढे फिकाच पडे
सारा मानव चाळा रे बाळा
काळाचा खेळ निराळा . . . १

उंच डोंगरी वसे जो कधी
जाई सागर तळा रे बाळा
काळाचा खेळ निराळा . . . २

सागर तळाचा मासा इवला
भिडे निळया आभाळा रे बाळा
काळाचा खेळ निराळा . . . ३

सिंहासन मिळे कुणाला
कुणा बंदिशाळा रे बाळा
काळाचा खेळ निराळा . . . ४

पाण्याची कोठे भरती तळी
कोठे न थेंब तळा रे बाळा
काळाचा खेळ निराळा . . . ५

कोठे झुले तो पानमळा तर
कोठे ये पानगळा रे बाळा
काळाचा खेळ निराळा . . . ६

पिकाचा होई कधी भोपळा
कधी आणे सोळा रे बाळा
काळाचा खेळ निराळा . . . ७

उलघाल होई कोठे उन्हाळा
हुडहुडी थंडी हिवाळा रे बाळा
काळाचा खेळ निराळा . . . ८

काळाहाती मानव खुळखुळा
नमन करी त्या काळा रे बाळा
काळाचा खेळ निराळा . . . ९

काळाचा खेळ निराळा रे बाळा
काळाचा खेळ निराळा

चक्र

(दिवस-रात्र, उदय-अस्त, सुख-दु:ख असे हे चक्र पृथ्वीच्या पाठीवर सतत चालू असते. हे चक्र ज्या शक्तीच्या, नियतीच्या, निसर्गाच्या हातात आहे त्याच्या चरणावर घेतलेली शरणागती. )

सुखापाठी ते दु:ख येतसे
दु:खापाठी सुख येई
कधी न हो अपवाद याजला
राजा वा तो रंक जगी . . . १

दिवसानंतर रात्र येई ती
रात्रीनंतर दिवस असे
सूर्यचंद्र अन् तारे यांचा
प्रकाश सकला एक असे . . . २

पूर्णचंद्र तो रोज न दिसतो
हळूहळू कमी होत असे
दिवस एकचि लुप्तचंद्र तरी
पुन्हा पुन्हा नव उगवतसे . . . ३

बीजामधुनी जन्मा येई
भलाथोरला वृक्ष जरी
अनंत बीजे जन्मा घालुनी
अखेर निद्रा भूमिवरी . . . ४

उदय-अस्त हा नियम असे ती
नियती आम्ही सदा स्मरू
जन्ममरण हे चक्र असे त्या
काळाला परि नमन करू .. . ५

चहा

(चहा हे सर्वसामान्यांचे पेय आहे. कवितेत चहाच्या फायद्यातोट्यांची जंत्री केली आहे. सर्वदूर पसरलेल्या चहाची किमया कशी आहे त्याचा आढावा घेतला आहे. )

झोप होता ती सकाळच्या पारी
चहापाने बहु येतसे तरारी
दूध ताजे त्या आणि ती खुमारी
चहा बहुता आवडे जगी भारी . . . ।।१ ।।

चहा नसता ते कुणा दुखे डोके
शरीरगाडीला चहाचीच चाके
अतिथिस्वागत करण्यास चहा चाले
त्याविणा ना जगी पान कधी हाले . . . ।।२ ।।

थंडीमध्ये चव चहाचीही न्यारी
ऊन वारा सरी कोसळत्या भारी
ऋतू असला जरि कोणताही दारी
गंध उधळित ये चहाचीही स्वारी . . . ।।३ ।।

चहा कोणाचे दैन्य ते निवारी
चहा घेता कुणी म्हणे हरीहरी
चहा अतिपाने रोग ये शरीरी
अति होता मति निघुनी जाय दूरी . . . ।।४ ।।

उंच डोंगरी वा दप्तरी कचेरी
गाडी लावीते चहाची हजेरी
भिस्त बहुतांची असे चहावरी
खरी किमया या चहाचीच सारी . . ।।५ ।।

कुणा वाटे

(व्यक्ति तितक्या प्रकृती. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळया गोष्टीत आनंद मिळतो. कुणाकुणाला कशात आनंद मिळतो ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे. )

कुणा वाटे आनंद निसर्गात
कुणा येई मजा भोजनात
कुणी घेती रस राजकारणात
सुखही वाटे ते दुजा शिकवण्यात . . .१

गर्क होती ते कुणी सिनेमात
गुंग होती कुणी तसे नाटकात
कुणी होई ते धुंद गायनात
जाई रंगुनी तो कुणी कुंचल्यात . . . २

बुडुनी जाती ते कुणी वाचनात
हौस वाटे ती कुणा खेळण्यात
छंद लागे तो कुणा काव्यलेखनात
दंग होती ते कुणी चिंतनात . . . ३

कुणा दिसते सुख कलाकुशलतेत
धन्य म्हणती कुणी धनधान्यसंचयात
सौख्य वाटे परि कुणा चाकरीत
सुखी राही कुणी गोरगरीबीत . . . ४

सुखही वाटे ते कुणा निंदण्यात
नसे मजला परि रागही मनात
सत्यवाणी ज्या वसे ती मुखात
जगी दुर्मिळ नर असा पाहण्यात . . ५

विनती

(जगात जेंव्हा जेंव्हा महायुद्धे झाली तेंव्हा त्यात सामान्य जनता भरडली गेली. अगदी परवा परवा झालेल्या अमेरिका व इराकमधील युद्धाच्या वेळीही हेच घडले. दुसऱ्याच्या घरात डोकावून न बघता माणूस आपापल्या घरात जर सुखाने राहिला तर ही वेळच याणार नाही. जॉर्ज बुश व सद्दाम हुसेन या दोघांनाही देवाने समजूतदारपणा द्यावा अशी विनंती येशू व अल्लाकडे केली आहे. )

इतिहासाच्या पानोपानी
रक्त रंजित पडती सडे
युध्दाच्या त्या खाईमध्ये
देश अडकती बडे बडे . . . १

दो हत्तींच्या लढतीमध्ये
चिरडुनी जाती सान किडे
तैसे जाई प्रजाजनांचे
मोडुनी मग ते कंबरडे . . . २

जगात सगळे जुलुस काढती
युध्द नको मज शांती हवी
परि आर्त स्वरांनी पुकारलेली
कानी हाक त्या कशी जावी . . . ३

पैशाच्या त्या जोरावरती
शिकवू नये कुणी कुणा धडे
परस्परातील वैरापायी
सदैव जगती युध्द घडे . . . ४

सुखी रहा तू तुझ्या घरी
अन् मीही राहतो सुखी इकडे
सुमती ऐसी जरी ठेवता
नांदे शांती चोहीकडे . . . ५

हुसेन आणखी बुश दोघांना
सौजन्यचि ते दे थोडे
विनती माझी एकचि इवली
अल्ला आणि येशुकडे

मार्जारास

(ही मार्जारान्योक्ती आहे. दुसऱ्यांची नजर चुकवून चुकीच्या मार्गावरून चालणाऱ्या व्यक्तीस उद्देशून लिहिलेली अशी ही कविता आहे.)

चोरूनी दुग्धा चाखणाऱ्या
मार्जारा, तू भुलू नको
आयुष्याच्या अंती सुध्दा
अवैध मार्गा धरू नको . . . १

दुग्धावरल्या दाट सायीच्या
मोहामधि तू पडू नको
जिभल्या चाटित तोंडा पुसुनी
चाल वाकडी धरू नको . . . २

समाधानी तू ऐस जगामधि
विवेकबुद्धि सोडू नको
देव पाहतो वरूनी वेड्या
ढोंगीपणाचा आव नको . . . ३

चोरी करता मार्जाराते
वाटे कुणी ना त्या पाही
आपण डोळे मिटले तरीही
दिसते सकलही सकलाही . . .

आरसा

(माणसाचे मन हे आरशासारखे निर्मळ असते. सुख, दु:ख, राग, लोभ, समाधान इत्यादी साऱ्या भावना त्या त्यावेळी माणसाच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित झालेल्या दिसतात.)

आरसा जणू मानवाचा चेहरा मज भासे
मनातल्या त्या भावभावना सकला दावितसे
तो सकला दावितसे . . . ध्रु. ।।

आंनदचि तो होता त्याच्या वदनी विलसतसे
मुक्तपणाने आंनदाची उधळण करीतसे
आनंदाचे अमृतकण तो सकला देतसे
स्वर्गसुखाच्या लाभाने तो मोहरून येतसे
तो मोहरून येतसे
आरसा जणू मानवाचा चेहरा मज भासे . . . १

दु:खाचे ते डोंगर सहजी पचवू शकतसे
संकटावरी मात करोनि मार्ग क्रमीतसे
विपत्तिच्या त्या लाटांवरती स्वार होतसे
कधीमधी परि मनिची खळबळ वदनी दिसतसे
त्याच्या वदनी दिसतसे
आरसा जणू मानवाचा चेहरा मज भासे . . . २

गोष्टी घडता नावडत्या मनि राग येतसे
दुर्वासचि तो मनात त्याच्या जन्मा येतसे
संतापाने चेहरा लालीलाल होतसे
प्रतिबिंबचि जे मनातले ते वदनी अवतरसे
त्याच्या वदनी अवतरसे
आरसा जणू मानवाचा चेहरा मज भासे . . . ३

सर्वजनांच्या कल्याणस्तव सदैव प्रयतावे
प्रसाधनापरि दोन गोड शब्द ओठी लावावे
चंदनापरि झिजवुनी देहा सूखचि उधळावे
चांदणे मग चित्तामधले वदनी उतरसे
त्याच्या वदनी उतरसे
आरसा जणू मानवाचा चेहरा मज भासे . . . ४

वृद्धत्व

(बालपण, तरूणपण व म्हातारपण या तीन नैसर्गिक अवस्था आहेत. प्रत्येक माणसाला त्या तीनही अवस्थातून जावे लागते. बालपण व तरूणपणातील दिवस भरभर सरकतात. पण म्हातारपणातील दिवस मात्र मुंगीच्या पावलांनी सरकत असतात. या काळात बालपणीच्या आठवणी पुन्हा पुन्हा मनात डोकावू लागतात. वृद्धत्वाची सावली शरीरावर पडू लागली तरी खचून न जाता हसतमुखाने तिचे स्वागत करावे हे या कवितालेखनाचे तात्पर्य.)

कोडे ना उलगडले
झणी वृद्धत्वचि ते आले . . .

बाळपणीचे खेळही स्मरती
लपाछपी अन् पळापळी ती
हुतुतू कधी तर कधी लगोरी
आठवणी मज करिती बावरी
चित्र हळू ते सरले
झणी वृद्धत्वचि ते आले . . . ।।१।।

इवल्या इवल्या चिंचा कैऱ्या
गोड तेधवा गमती साऱ्या
आंबट चिंबट दातही होती
सानवयी त्या तरि आवडती
दृश्य कसे विरघळले
झणी वृद्धत्वचि ते आले . . . ।।२।।

भुरूभुरू उडती केस रूपेरी
ना ना म्हणते मान ही खरी
काठी झाली सखी जिवाची
मनात दाटी भूतकाळाची
गाली क्षण ओघळले
झणी वृद्धत्वचि ते आले . . . ।।३।।

वेळेचे ना बंधन उरले
जे जे होते हरवून गेले
करण्याचे वा राहुन गेले
अखेर मजला परि गवसले
कळले देवा कळले
झणी वृद्धत्वचि ते आले . . . ।।४।।

उतरणीस ती गाडी लागली
मतीस ठेवी सदा चांगली
परमेशाच्या परी पदकमली
विनती माझी एकचि इवली
हसूनि स्वागत केले
झणी वृद्धत्वचि ते आले . . . ।।५।।

कारण आम्ही लहान होतो

(माणसाचे लहानपण हे निरागस बाळासारखे असते. लहान लहान गोष्टीत सुद्धा परमानंद मिळतो. म्हणूनच लहानपण देगा देवा असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. वयानं मोठा झाल्यावरसुद्धा लहानपणच्या छोट्या छोट्या गोष्टींची केवळ स्मृतीही माणसाला अमाप आनंद मिळवून देते.)

कारण आम्ही लहान होतो
कारण आम्ही लहान होतो . . . . ध्रु. ।।

खेळावरती प्रीती होती
नीती अनीती ठाऊक नव्हती
आईवरती भक्ती होती
सारे तिचे एकत होतो
कारण आम्ही लहान होतो . . . १

वडीलधाऱ्यांची भीती होती
चालही थोडी उडती होती
बाबांची नोकरी फिरती होती
गावोगाव फिरत होतो
कारण आम्ही लहान होतो . . . २

सवंगड्यांची आवड होती
अभ्यासाची नावड होती
म्हणून बाइंर्ची भीती होती
आईच्या मागे लपत होतो
कारण आम्ही लहान होतो . . . ३

गोष्टीत राजाराणी होती
राक्षस आणि परिराणी होती
मंजुळ मंजुळ गाणी होती
तालावर त्या नाचत होतो
कारण आम्ही लहान होतो . . . ४

घरची हालत बेताची होती
दोन-चार कच्ची बच्ची होती
पण वाणी तेवढी सच्ची होती
थोरल्यांना अनुसरीत होतो
कारण आम्ही लहान होतो . . . ५

शिरापुरी ठाऊक नव्हती
भाजीभाकरीला कमी नव्हती
पण फारच गोड लागत होती
वाटून सारे घेत होतो
कारण आम्ही लहान होतो

चष्मा

(चष्मा म्हणजे उतारवयातील व्यक्तींची एक गरजेची वस्तू झाली आहे. त्यातच भर म्हणजे विस्मरण. त्यामुळे अशा आजीआजोबांच्या म्हणजे अस्मादिकांच्या चष्म्याच्या बाबतीत होणाऱ्या गमतीजमती चष्मा या कवितेत मांडल्या आहेत.)

आजी आजोबा दोघेजण
चष्म्याची मुळी न राही आठवण
आजीची सारखी एकतारी
चष्मा कुठे शोधू तरी . . . ।।१ ।।

चष्म्याची त्यांच्या गंमत न्यारी
कोठेही विसावे चष्म्याची स्वारी
उशाशी कधी तरी टीव्हीवरी
कधी तर भेटे शेजारच्या घरी . . . ।।२।।

कोठेही येती त्याला विसरून
परि चैन पडेना त्यावाचून
टेबलावरून नि फळीवरून
गंमत पाही ही चष्मा हसून . . . ।।३ ।।

हातात घेऊन चष्मा म्हणती
शोधू कुठे मी सांगाती
चष्म्याचा करिती सदा गजर
ध्यास लागता भेटे ईश्वर . . . ।।४ ।।

कळया नका तोडू

(झाडेवेलींना सुद्धा माणसांप्रमाणेच भावना असतात. त्या भावना कवितेतून व्यक्त केल्या आहेत.)

फुले तोडा तुम्ही परि कळया नका तोडू
लाडक्या ह्या बाळांंची नीज नका मोडू ---

मुले जशी तुम्ही सांगा अपुल्या घरची
तशी कळयाफुले आम्हा वृक्षवेलींची
चुकीच्या कृतीची येती फळे अति कडू
लाडक्या ह्या बाळांंची नीज नका मोडू --- १

पाणी तुम्ही घाला मग फुले आम्ही देऊ
एकमेका म्हणू आपण सारे बहिणभाऊ
एक दिवस नक्की येतील धीर नका सोडू
लाडक्या ह्या बाळांंची नीज नका मोडू --- २

सूर्यदेव येता उषाराणीच्या महाली
पखरण रंगांची होईल त्यावेळी
झोपू देत सुखे नका पांघरूण ओढू
लाडक्या ह्या बाळांंची नीज नका मोडू --- ३

गोड गोड गुलाबी स्वप्ने पाहताती
दिस एक जगुनी जगा सुखविती
कामा येतील उद्या तुमच्या आज नका तोडू
लाडक्या ह्या बाळांंची नीज नका मोडू --- ४

झोप त्यांची होता छान पहा उमलती
रंग आणि गंधाची कुपी घेऊन हाती
हळू फुले तोडा त्यांच्या माना नका मोडू
लाडक्या ह्या बाळांची नीज नका मोडू

एक खेडे

(आजकाल सर्वत्र धरणे बांधली जातात. परंतू त्या पाणलोट क्षेत्रात असलेली खेडेगावे. त्यांचे काय ? तेथील लोकांचे पुढे काय होते ? अशाच एका खेडेगावाचे वर्णन प्रस्तुत कवितेत केले आहे. )

काळाशार शाळिग्राम माझ्या माईच्या घरचा
आप्त जसा माहेरचा . . . १

रोज रोज मज कथा एक नवीन ऐकवी
वाटे लिहून ठेवावी . . . २

पूजा करताना दिसे मज एक खेडेगाव
तिथे पुन्हा पुन्हा जावं . . . ३

नदीपल्याडच्या माळावर सात कोसांवर
उभे मायेचे ते घर . . . ४

सात डोंगरांच्या कुशीमध्ये विसावले गाव
भरपूर हो वर्षाव . . . ५

बांधावरती डोलती आंबाफणसाची झाडे
पाठी जांभूळसडा पडे . . . ६

जाळीतून डोकावते काळी डोंगरची मैना
हिरवाई सुखवी नयना . . . ७

चाफा पांढरा नि लाल घेती हातामध्ये हात
बेल तुळस दारात . . . ८

गाई म्हशी नि खिल्लारी जोडी बैलांची गोठ्यात
दूध दह्याची खैरात . . . ९

धरणाने उधळून सारी दिली शेतीभाती
दूर गेली ती वस्ती . . . १०

अमृतफळे

(झाडे, वेली, झरे, आभाळ अशा निसर्गातील अनेक गोष्टीतून आपल्याला नवे ज्ञान मिळते. आणि त्यातूनच खऱ्या सुखाची प्राप्ती होते. चांगल्या गोष्टीचे फळ नेहमी चांगलेच असते.)

वृक्षवेलींची सळसळ गोड
मनाला माझ्या लावितेे ओढ . . .

झुळझुळ झऱ्याचे खळाळे पाणी
शिकवी मजला मंजुळ गाणी

अवखळ वाऱ्याची भिरभिर भारी
मजला म्हणते दु:ख विसरी . . .

उंच आभाळीची कृष्ण निळाई
सुखाचे चांदणे पसराया शिकवी . .

थोडे हसून निसर्ग म्हणे
विसर सारे दुष्ट पुराणे . . .

सुख कोठेना बाजारी मिळे
अंतरी तुझ्या तू फुलव मळे . . .

मळयात येतील अमृतफळे
अमृतफळांचे सुख निराळे . . .

परदु:खे ज्याचे हृदय जळे
फळांची गोडी त्याला

यात्री

(आजकाल बरीच तरूण मंडळी शिक्षण किंवा नोकरीनिमित्त परदेशी जातात. आईवडीलही त्यांना आनंदाने पाठवितात. पण त्यांच्या एका डोळयात हसू तर एका डोळयात आसू असतात. अशा दूर राहणाऱ्या मुलांच्या आईवडिलांचे सुख-दु:ख समान असते. जणू काही ते सर्व एकाच बोटीतले प्रवासी असतात. देवाला स्मरून मनोमन शुभाशीष देणे एवढेच त्यांच्या हातात असते.)

एका बोटीमधले यात्री, आपण हो म्हणुनी
मधुर हास्य ते ओठावरती, अन् आसू नयनी . . . १

लेकरांना शिकवुनी आपण, केले सज्ञानी
अमेरिकेचे दर्शन आपणा घडवियले त्यांनी . . . २

दोन ध्रुवावर तरीही आपण आज समाधानी
क्षणात कानी पडे ध्वनी तो दूरध्वनीमधुनी . . . ३

सुखदु:खे ही समान अपुली बुडुया आठवणी
गोकुळ जेंव्हा नांदत होते अपुल्या घरातुनी . . . ४

वासुदेव अन् श्रीलक्ष्मीसी सदा मनी स्मरूनी
आनंदचि हा देऊ घेऊ एकदुजा भरूनी . . . ५

आनंदाचा परिमल घेऊ दूर जरा राहुनी
आशीर्वचही देऊ त्यांना खरे मनापासुनी . . . ६

काळासचि त्या करूनी वंदन स्मितभरल्या वदनी
सुखी ठेव प्रभु पुढील पिढीला करूया विनवणी . . . ७

पुंडलीक

(सुखात आणि दु:खातही मनाचा समतोल ढळू न देता आनंदी वृत्तीने राहणाऱ्या व्यक्ती विरळाच असतात. अशाच व्यक्तीविषयी मनात आलेले विचार व्यक्त करण्यासाठी हा कविताप्रपंच केला आहे.)

आईची सेवा केली तुवा
पुंडलीकाच्यापरी
दु:खाची सल, मनात तरी
हसू चेहऱ्यावरी . . . ।।१ ।।

एकही क्षण कामाविण
घालविशी ना वाया
लहान थोर, आप्त इष्ट
साऱ्यांवरी माया . . . ।।२ ।।

स्मरणी असताी, संतजनांच्या
सांगितलेल्या गोष्टी
तवरूपाने, तेचि संत
पुन्हा जन्मा येती . . . ।।३ ।।

आनंदाच्या चांदण्या असती
जगती ठायी ठायी
परि नजर त्यासी शोधण्याची
नसे सकला ठायी . . . ।।४ ।।

दु:खाचे डोंगर शिरी असता
सदा सुखी राहणे
दुसऱ्या कोणा जमेल का हो
कधी असे वागणे? . . . ।।५ ।।

कल्पनेची भरारी

(कल्पना चावलाने भारताचे नाव जगाच्या इतिहासात कोरून ठेवले. अवकाशयानातून पृथ्वीवर परतताना घडलेली दु:खद घटना ही सर्वांना ठाऊक आहे. आपल्या कर्तृत्वाने उज्वल झालेली कल्पना चावला तरूण पिढीचे स्फूर्तिस्थान ठरली. या कवितेद्वारे तिला श्रद्धांजली वाहिली आहे. )

शुक्राच्या चांदणीपरि आकाशी
चमकून गेलिस कल्पना तशी
कल्पना नव्हती कुणाला ऐसी
नियतीची क्रू र थट्टा कैसी . . . . ।।१ ।।

कल्पनाशक्तीत विलीन होसी
जगताच्या तू कणाकणाशी
शौर्यगाथा ही गातील तुझी
देशी नि परदेशी . . . . ।।२ ।।

कार्याने तव प्रेरणा मिळेल
साऱ्या युवकांसी
पुढील पिढीचे स्फूर्तिस्थान
तूच खरी होसी . . . . ।।३ ।।

कल्पनांचे पंख लेऊन
आकाशी भराऱ्या घेसी
स्मरण करील जग तूचि
महिला अविनाशी . . . . ।।४ ।।

साऱ्या जगाचा दीपस्तंभचि
होऊनी बसलीसी
अंतरिक्षाच्या इतिहासी
अमर होऊनी जासी . . . . ।।५ ।।

अज्ञानाचा ध्यासच देईल
मानवा ज्ञानराशी
कार्य तुझे इतुके मोठे
उठतील फिनिक्स पक्षी . . . . ।।६ ।।

अंतरिक्षी भारतदेशा तू
उच्चपदा नेलेसी
नतमस्तक होतील सारे
तुझिया चरणांच्यापाशी . . . . ।।७ ।।

परिस

(श्रीमती मालतीबाई किर्लोस्कर. काव्यदीप या माझ्या काव्यसंग्रहाच्या मार्गदर्शक. जसे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते तसे मालतीबाइंर्नी केलेल्या प्रेमळ कौतुकाने माझ्या कवितेला परिसस्पर्श होतो अशी माझी प्रामाणिक समजूत. अशा काव्यगुरूच्या गुणगौरवगानपर लिहिलेली ही कविता.)

सुखात बहु नांदती जगती आपुल्या कन्यका
कधी न भुलती परि सकल आपुल्या तासिका
अखंड तव सत्पदी अमुचि राहते नम्रता
असाच सहवासही तव मिळो अम्हाला सदा . . . १

अनंत असती जरी शुक नि सारिका भूवरी
करूनी अति गलबला विहरतीही त्या अंबरी
सदैव नच कूजिते खरीच कोकिला सुस्वरी
तशीच गमते मला ती कविता तुवा अंतरी . . . २

(चाल बदल)

तुवा हाती बघता दिसती मजला सप्तसरिता
स्मरण करिता त्यांचे अविरत मनी ये धन्यता
जशी परिसस्पर्शे येई लोहाते स्वर्णता
तशी तव सुस्पर्शे सुभग होई माझी कविता . . . ३

सच्चे बंधन

(मनापासून केलेल्या कोणत्याही गोष्टीला कसलेही बंधन आड येऊ शकत नाही. प्रेम, मैत्री, नाते, ज्ञान, भूषण इत्यादी गोष्टी जर अगदी खरेपणाने केलेल्या असतील तर त्यासाठी जातपात, देश, धर्म अशा प्रकारचा कोणताही अडसर मधे येऊ शकत नाही.)

बंधन सच्च्या प्रेमाला ना
कधी कुठले उरते
जातीपातीमधील भिंती
पार करोनी फुलते . . .१

बंधन सच्च्या मैत्रीला ना
कधी कुठले उरते
देशादेशामधील रेषा
पार करोनी खुलते . . . २

बंधन सच्च्या नात्याला ना
कधी कुठले उरते
जुन्या-पुराण्या आठवणींना
पार करोनी राहते . . . ३

बंधन सच्च्या भूषणा ना
कधी कुठले उरते
सोन्यामोत्या दागिन्यांना
पार करोनी उरते . . . ४

बंधन सच्च्या नामाला ना
कधी कुठले उरते
घरदारातिल कामाधामा
पार करोनी उरते . . . ५

बंधन सच्च्या ज्ञानाला ना
कधी कुठले उरते
जनामनातिल अंधश्रद्धा
पार करोनी उरते . . . ६

सद्गुणांचे पुतळे

गृहलक्ष्मीमधि खरेच दिसता
सद्गुणांचे जणु पुतळे
आंनदाचे पडती सडे अन्
समाधान ना दूर पळे . . . ।।१ ।।

सारे आपण सुखात राहू
वादविवादा कधी न करू
एक तीळही सातजणामधि
सुखात वाटुनिया घेऊ . . . ।।२ ।।

अशी धारणा मुळात असता
पर्णे पुष्पे हो तैशी
भाजी-भाकरी आनंदाने
खाता येई तृप्ती तशी . . . ।।३ ।।

उडुनी जाता जरी पाखरे
ओढ तयांना घरट्याची
किमया ही खरी मला वाटते
गृहलक्ष्मीच्या त्यागाची . . . ।।४ ।।

संसाराच्या वटवृक्षातळी
पुत्रपौत्रा बैसविले
इतिहासाची दूषित पाने
उलटुनी जगण्या शिकवियले . . . ।।५।।

नवीन वास्तु देवो सकला
आनंदाची मधुर फळे
दिन हे केवळ दिसती सकला
माय माऊली तुझ्यामुळे . . . ।।६ ।।

माझी ताई

(एक खरेखुरे व्यक्तिेचत्र. अत्यंत प्रेमळ, समजूतदार, लोभसवाणी, कष्टाळू , सदा समाधानी, कधीही न रागावणारी अशी माझी मोठी बहिण - ताई . तिच्या व्यक्तिमत्वाच्या काही पैलूंवर प्रकाश टाकला आहे. हिमनगाचा १/१० भाग पाण्यावर व ९/१० भाग पाण्यात असतो तसे या कवितेत वर्णन केलेल्या भागात तिच्या जीवनातील १/१० भागच मांडण्याचा प्रयत्न केला आहे.)

खरेचि कथिते बाई
भारी गुणाची माझी ताई . . . ध्रु.

तिसऱ्या मजली घर माहेरचे
होते जरि ते एक खोलीचे
तीर्थक्षेत्र ते परि मायेचे
उणे न होते तेथ कशाचे
आठवणी रमुनी जाई
भारी गुणाची माझी ताई . . . १

हुतुतु आसने आवड होती
द्रुतगतीतही प्रथम येत ती
घरकामातही आनंदी ती
खंत ना करी जागेची ती
संसारी परि रमली
भारी गुणाची माझी ताई . . . २

लग्नासमयी लहान होती
सासर माहेर नाती गोती
कुशलपणाने सांभाळी ती
सदा हासरी समाधानी ती
मनात भरूनी राही
भारी गुणाची माझी ताई . . . ३

कुंद-मोगरा, जाई-जुई ती
जीवनवेली उंच जात ती
बहरूनी कळसाला चढली ती
त्यागाची जणू सुरेख मूर्ती
तिला सर कुणाची नाही
भारी गुणाची माझी ताई . . . ४

अनंत दु:खे तिने झेलली
कुटुंबकल्याणास्तव झिजली
नशीबवान तुम्ही मुलेसुनाही
ताईसम ती लाभे आई
प्रेमे पाखर घाली
भारी गुणाची माझी ताई . . . ५

सदा गुणांची कैवारी ही
दोषांवरि परि पांघर घाली
सोशिकतेची मर्यादा ही
लेकीसुनांना सांभाळी ही
प्रेमळ सासू होई
भारी गुणाची माझी ताई . . . ६

संसाराच्या वटवृक्षा ही
चहू बाजूंनी धरूनी ठेवी
त्यागाचा त्या महिमा हाही
ठाऊक आहे सकल जनाही
शब्द न ओठी येई
भारी गुणाची माझी ताई . . . ७

गरज म्हणोनी काळाची ती
चिमणपाखरे उडोनी जाती
मायेची परि ओढ असे ती
विसाव्यास कधी घरट्या येती
नयनी जल ते येई
भारी गुणाची माझी ताई . . . ८

अगं अगं मुली गं

अगं अगं मुली गं
काळजी नको तू करू गं
सत्त्याची खरी जीतच होते
मानी ही नोकरी गं . . . १

दु:खाचा जरि पहाड हा
हळूहळू वितळेल पहा
आचरूनिया सद्धर्माते
संसारी तू सुखी रहा . . . २

अतिशये ना हाव धरी
मत्सरा ना साथ करी
पानामध्ये वाढले ते
आनंदाने स्वीकारी . . . ३

संसाराचा फिरवी कोलू
रागाने परि नकोस बोलू
सदाचरण तव दिसता जग ते
आनंदाने लागे डोलू . . . ४

परतावा

(नोकरीनिमित्त परदेशी गेलेल्या मंडळींना मातृभूमी खुणावत असते. कायमचे परदेशी न राहता आपण नक्कीच मायदेशी परत येणार असल्याचे त्यांचे सांगणे आहे. मातृभूमीची व नातेवाईकांची ओढ त्यांच्या शब्दातून व्यक्त होताना दिसते.)

हॅलो हाय-फाय सोडुनी आम्ही सुस्वागत म्हणतो
आप्तजनांना सारे मिळुनी वंदन हे करितो . . . धु्र.

आपण अमुचि मातापितरे, आम्ही आपुली असू लेकरे
संस्कारच जे केले आपण, जपुनी त्या ठेवितो
आप्तजनांना सारे मिळुनी वंदन हे करितो . . . १

घरे तेथली असती सुंदर, सोयीसुविधा त्याही भरपूर
कायमच्या परि वास्तव्याचा, विचार ना करितो
आप्तजनांना सारे मिळुनी वंदन हे करितो . . . २

येथे येता इथले होऊ, आपुल्या संगे सुखात राहू
खुणावते हे घरटे आम्हा, पाठ न त्या दावितो
आप्तजनांना सारे मिळुनी वंदन हे करितो . . . ३

आनंदचि हा अतीव झाला, भेटूनि साऱ्या सग्यासोयऱ्या
चार दिवसचि राहू तेथे, लवकर परततो
आप्तजनांना सारे मिळुनी वंदन हे करितो . . . ४

कायमचे ना दूरही राहू, परतुनी आम्ही खचितचि येऊ
तोवरि फोन नि इमेलमधुनी संपर्का साधतो
आप्तजनांना सारे मिळुनी वंदन हे करितो . . . ५

दिवस

(मुलाबाळांनी भरलेले घर म्हणजे नंदनवनच. मुलं लहानाची मोठी होतानाच्या गमतीजमती अवर्णनीय असतात. त्यावेळचे ते दिवस भुर्रकन् उडून जातात. शिक्षणाच्या, नोकरीच्या निमित्ताने जेंव्हा मुलं बाहेरगावी जातात तंव्हा उरतात त्या केवळ आठवणी.)

दिवस-राती येती जाती
कैसे ना कळती
सान बालके असता घरी ती
कामे ना संपती . . . . ।।१ ।।

शाळा सुटता आई भूकचा
गजर ये कानावरती
खाऊ-टाऊ भरले डबे
किती तरी ना पुरती . . . . ।।२ ।।

पेन कुणाचे घेई कोणी
पुस्तक तेही लपविती
गंमत जंमत करीत सारे
अभ्यासा त्या संपविती . . . . ।।३ ।।

सुट्टी लागता शाळेला ती
मस्तीला ये ऊत अती
वारे शिरूनि कानामध्ये
वासरे जणू बागडती . . . . ।।४ ।।

कलकल कलकल करीत सारे
डोक्यावरती घर घेती
गोष्टी ऐकण्या सारे जमती
वडीलधाऱ्यांसभोवती . . . . ।।५ ।।

पै-पाहुणा आला-गेला
घड्याळास ना ती गणती
दिवा लावता देवापुढती
`शुभंकरोति' ही म्हणती . . . . ।।६ ।।

संस्कारांची शिदोरी ही
घेऊनिया खांद्यावरती
पुढील पिढी ही मार्ग क्रमते
रथ घेऊनी अपुल्या हाती . . . . ।।७ ।।

शिक्षण घेऊनी नोकरीधंदा
करण्या परदेशा जाती
उडुनी जाता पिले संपती
घरातल्या साऱ्या गमती . . . . ।।८ ।।

आठवणी परि त्या आणिती
नयनी अमोल ते मोती
सरते वय परि दिवस तेचि ते
मुळी ना सरती . . . . ।।९ ।।

चार दिन

(लग्न झालेली मुलगी सवडीने चार दिवस माहेरी येते. अशावेळी त्या मुलीला व त्या आईवडिलांना त्या दिवसांचा आठवणीची पुरचुंडी जन्मभर पुरेशी होते. )

माहेरचे दिन चार सखये
परिश्रमा परिहार सखये
माहेरचे दिन चार . . . धुर.

स्वर्गसुखाच्या राशीवरती
सुखे सखे तू जरी नांदसी
बाळपणीच्या आठवणी तव
परि आम्ही बेजार सखये
माहेरचे दिन चार . . . १

संसाराच्या वेलीवरती
मोहकशी दो फुले उमलती
सुमनांचा परि परिमल देई
सकलजगा आधार सखये
माहेरचे दिन चार . . . २

संसाराच्या हिंदोळयावरी
झुलता झुलता मना विचारी
मायतात जरि असती दूरी
मनोमनी आधार सखये
माहेरचे दिन चार . . . ३

पाठवणी

(लग्नानंतर मुलीची सासरी पाठवणीकरताना साऱ्यांच्या जिवाची घालमेल होते. मग प्रत्यक्ष त्या मुलीच्या आईच्या मनाची काय अवस्था होत असेल ! असा हा पाठवणीचा प्रसंग कायमचा मनात कोरला जातो.)

लेक निघता सासरी
दाटे डोळा कैसे पाणी
पाठविते पांडुरंगा
पाठराखणी म्हणूनी
पाठराखणी म्हणूनी . . . १

दिसे रोज ती दारात
तुळस उभी गोजिरवाणी
तुळशीच्या रूपे भासे
लेक आलीसे अंगणी
लेक आलीसे अंगणी . . . २

देवरायाच्या कृपेने
सुखे वसे ती सदनी
मायमाऊलीच्या मना
येई भरते अजूनी
येई भरते अजूनी . . . ३

वेड्याबापुड्या मनास
कसे तरी सावरोनी
डोळे लावी वाटेकडे
लेकमाय मनामेनी
लेकमाय मनामेनी . . . ४

काळ जातसे सरूनी
डोळयाचे ना खळे पाणी
कैशा जाती आठवणी
ठेविल्या ज्या कोरूनी मनी
ठेविल्या ज्या कोरूनी मनी . . . ५

वर्षे बहुत जाहली
लेक सासरी जाऊनी
दिस असे तो स्मरणी
केली जेंव्हा पाठवणी
केली जेंव्हा पाठवणी . . . ६

आठवणीचे पाणी

(मायलेकीचे नाते फार नाजूक असते. आजकाल बऱ्याच मुली लग्न झाल्यावर परदेशात जातात. अशावेळी आईच्या मनाची बेचैनी फक्त आईलाच ठाऊक असते. केवळ मुलीच्या आठवणीने तिच्या डोळयात पाणी तरळते. आणि ते पाहणारा साक्षीदार फक्त एकच असतो. तो म्हणजे स्वयंपाकाचा कट्टा.)

परदेशी वस्ती तुझी आनंदाअंगणी
मनाच्या तुळशीला घालते येथुनी आठवणीचे पाणी . १

गगनी भराऱ्या घेणाऱ्या पिलासि निरखी पक्षिणी
मूर्ती तुझी वसे तशी नयनकोंदणी . . . २

संसारासाठी दूर जाशी उपाधि घेऊनी
बालपणीच्या स्मृति ठेवी जपुनी माय मनी . . . ३

सुखी राहो बाळ गुणी विनती ईशचरणी
लेकीच्या ऐशा शुभचिंतनी जाय रंगुनी . . . ४

स्वयपाकाचा कट्टा जाणी, जाणी ना दुसरे कोणी
आठवणी आणिती किती नयनातुनी पाणी . . . ५

ओला आशीष

(उचकी लागणे याचे कारण कोणीतरी दुसरी व्यक्ती आपली आठवण काढीत असते असे म्हटले जाते. त्यात तथ्य किती हा भाग वेगळा. पण प्रत्येक मातेला उचकी लागल्यावर पहिली आठवण आपल्या दूरस्थ मुलाबाळांची होते असे मला वाटते. त्यातून मुलांच्या प्रगतीची बातमी कळल्यावर ती मनोमन आशीर्वाद देते. पण तो मधुर वचनांबरोबरच आनंदाश्रूंनी भिजलेला.)

उचकी कशी, इतुकी येई
कळेना काही, मजला बाई
आप्तजनांची, आठवण केली
परि उचकी, ना ती शमली . . . . ।।१ ।।

इतक्यात तुझी, इमेल आली
क्षणात उचकी, दूर पळाली
कळाले तुला, बढती मिळाली
आनंदाते, भरती आली . . . . ।।२ ।।

कष्टाचे फळ, येई हाती
जगाच्या साऱ्या, जाई पुढती
जीवनी सुखाचे, मळे फुलती
जोडीला असावी, नम्रता ती . . . . ।।३ ।।

तव इमेल, बघता क्षणी
गंगा यमुना, नयनातुनी
शब्दैक ना, फुटे वदनी
ओला आशीष, देई जननी . . . . ।।४ ।।

भेटीचा योग

(नातवंडे परदेशी अमेरिकेत. त्यातून पहिला विमानप्रवास ! तोही ३० तासांचा ! विमानतळावरचे सर्व सोपस्कार यथासांग पार पाडल्याने मन थोडे हलके झालेले. उतरवून घ्यायला आलेल्या लेक नातवंडांशी झालेली पहिली भेट. अशावेळी शब्दांच्याऐवजी डोळयातील गंगायमुनांचा पूरच सारे काही सांगून जातो.)

आजकालची बरीच मंडळी परदेशाला जाती
उच्च शिक्षणा,नोकरी करण्या धरूनी हेतु मनी ती . . १

भिन्न जरीही असल्या तेथील भाषा रीतीभाती
थोडेही ना अडून बसती तज्ञ परि ती होती . . . २

पाण्यामध्ये राहात असता माशाशी त्या दोस्ती
केल्याविण ना जळात जैसे कोणी राहू शकती . . . ३

अशी एकदा सुवर्णसंधी आली अमुच्या हाती
स्वये राहण्या सायीसंगे दुग्धावरल्या प्रीती . . . ४

आनंदाने मातपित्यांचे नेत्रही भरूनी जाती
कौतुक करण्या पुढील पिढीचे परदेशाला जाती . . . ५

प्रथमविमानप्रवासभीती मनामधे ती होती
परि भेटीची ती अधिक माझिया ओढ मनामधि होती .६

तीसही घंटे प्रवास करिता भेट जेधवा झाली
भेटीचा त्या योग पाहण्या नयनी आसवे आली . . . ७

स्वागत

(खूप खूप दिवसांनी माहेरी येणाऱ्या लाडक्या लेकीचे स्वागत करायला सारे घरदार आतुर झालेले असते. घरातल्या माणसांप्रमाणेच घराभोवतालच्या बागेतली झाडेझुडपेही पानाफुलांनी नटूनथटून अतिथीस्वागतास तयार आहेत. कोकिळ, मैना, मोर, चातक इत्यादी मनरूपी पक्ष्यांनीही सुवासिक फुलांची संगत धरलेली आहे. या साऱ्या गोष्टींचे वर्णन कवितेत केले आहे.)

स्वागताला तुझ्या मोगरा फुलतो
मोगरा फुलता मनमयूर नाचतो . . . १

स्वागताला तुझ्या जाई फुलारते
जाई फुलारता मनमैना मंजूळते . . . २

स्वागताला तुझ्या पारिजात बहरतो
पारिजात बहरता मनरावा हिंदोळतो . . . ३

स्वागताला तुझ्या जुई उमलते
जुई उमलता मनमयूरी डोलते . . . ४

स्वागताला तुझ्या गुलाब खुलतो
गुलाब खुलता मनबुलबुल बोलतो . . . ५

स्वागताला तुझ्या रातराणी गंधाळते
रातराणी गंधाळता मनचकोरी नाहते . . . ६

स्वागताला तुझ्या कुंद डवरतो
कुंद डवरता मनचातक भिजतो . . . ७

स्वागताला तुझ्या आंबा मोहोरतो
आंबा मोहोरता मनकोकिळ कूजतो . . . ८

स्वागताला तुझ्या घरदारही सजते
घरदारही सजता मन चिंबचिंब होते . . . ९

माझ्या मना

(आई स्वत: कष्ट सोसून आपल्या बाळाला जन्म देते. लहानाचे मोठे करते. ह्या सुंदर जगाचे दर्शन घडवते. त्या देवतेसमान असणाऱ्या माऊलीचे सदैव स्मरण ठेवावे असा मनाला केलेला उपदेश प्रस्तुत कवितेत आहे. )

माझ्या मना मी कथिते तुला
स्मर सदा तू त्या माऊलीला . . .

तुजसि जगी आणण्या देहा कष्टविले
स्वर्गीच्या अमृता तुजमुखी घातले
कष्ट सोसून किती तुजसि वाढविले
गणती कोणी न करू शकला
स्मर सदा तू त्या माऊलीला . . . १

काऊ-चिऊ दावुनी तुजसि भरवियले
गोष्टी सांगून किती तुजसि रिझवियले
तिजविना सुख ना कधी कुणा लाभले
मानी परमेशासम तू तिला
स्मर सदा तू त्या माऊलीला . . . २

देह आता तिचा जरि असे थकला
प्रेमाच्या शब्दासि जीव आसूसला
आशीषा तियेच्या राजाही भुकेला
ठेवी जपुनी या संदेशाला
स्मर सदा तू त्या माऊलीला . . .

सहस्त्रचंद्रदर्शन

(वयाच्या ८०व्या वर्षी सहस्त्रचंद्रदर्शन हा कार्यक्रम करतात. माझी आई ८९व्या वर्षी देवाघरी गेली. पण आईचा तो कार्यक्रम करण्याचा योग मला लाभला नाही. तरीपण तिच्या कृपाप्रसादाने मिळालेले शब्दरूपी अनमोल मोती कविता करण्यास उपयोगी पडले ही जाणीव ह्या कवितेतून व्यक्त केली आहे.)

सहस्त्रवेळा बघुनी तुजला
धन्य मानी तो चंद्र स्वत:ला
सहस्त्रचंद्र ते दर्शन घडता
ब्रह्मशरीर हे लाभे तुजला . . . १

परि ना जमले करण्या आम्हा
ऋषिसमान तो तव सोहळा
विचारात या गढून जाता
ठाऊक ना कधी लागे डोळा . . . २

पहाट समयी स्वप्नी येऊनी
देशी मजला हातामधुनी
उघडुनि बघता पुरचुंडी ती
शब्दांचे ते मोती दिसती . . . ३

कवितारूपी हार गुंफिले
कितीतरी त्या शब्दमंथने
कृष्णसख्याच्या दह्याप्रमाणे
कमी न होती अमोल रत्ने . . .४

सांगावा

(मुलीच्या आठवणीने आईला बेचैनी येते तर आईच्या आठवणीने मुलीच्या जिवाची घालमेल होते. दोनही नात्यातली गहिराई मनात खोलवर रूजल्याने अनेक कवितांचा विषय बनली आहे.)

कुणी माझ्या माहेरी धाडवा सांगावा
माय माऊलीच्या रूपे विठ्ठल भेटवा . . . १

आठवणी तिच्या मन उदास ते होता
काळवेळाचेही मज भान ना उरता . . . २

आसवांच्या महापुरी वाहुनी मी जाता
नेत्रसुख होई मग स्वप्नी ती भेटता . . . ३

बाळ ऐसी अक्षरे दो कानावरी येता
आंनदाचा पेला शिगोशीग भरूनी जाता . . . ४

जाईजुईकुंदलता बहर ये चित्ता
सुख सुख म्हणति तेचि सहजी येई हाता . . .५

अश्रूंचा डोह

(आईची आठवण व अश्रूंचा पूर हे जणू समीकरणच बनले आहे. आठवण केंव्हा यावी याला जसे बंधन नसते तसेच त्यापाठोपाठ येणाऱ्या अश्रूंनाही दिवस किंवा रात्र हे बंधन नसते.)

मोठे झालो उगाच वाटे
आजी म्हणती कुणी पणजी
तुझ्या चिंतनी गुंतुन जाता
मीही ना उरते माझी . . . . ।।१ ।।

घरे आमुची सुरेख सजली
करूनी सुंदरशी आरास
नयनापुढुनी मम जाईना
कष्टांची परि तुझ्याच रास . . . . ।।२ ।।

लहान मोठे गुंफून मोती
माला सुंदर केलीस ती
सूत्र त्यातले ओघळता ते
विखरुनी पडती भूवरती . . . . ।।३ ।।

लहानसहानही गोष्टींमधुनी
येती तुझ्या त्या स्मृति अजुनी
नयनामधले आसू न पुसती
वाट कुणाला रातदिनी . . . . ।।४ ।।

अश्रूंच्या त्या डोहामध्ये
बुडुनी मी जाता येसी
कवितारूपी माय माऊली
उचलुनी तू मजला घेसी . . . . ।।५ ।।

आवराआवरी

(गावाला जाताना प्रत्येकजण सामानाची आवराआवर करतो. पण परलोकी - देवाघरी जाताना मात्र सवड मिळतेच असे नाही. घरदार, सोनेनाणे, भांडीकुंडी, कपडेलत्ते इतकेच काय पण आपल्या म्हणणाऱ्या जवळच्या व्यक्ती कोणी सुद्धा सोबतीला येत नाहीत. सोबतीला येते ते केवळ देवाचे नाव. म्हणून सतत मनापासून देवाचे नाव घेत रहावे.)

माझे माझे म्हणती जरी
संगे कुणी ना येती तरी
देवाजीच्या जाती घरी
सोडुनी सारे माघारी . . . १

परगावी जाता ती खरी
कितीतरी आवराआवरी
परलोकी जाता ती परि
सवड न राही क्षणभरी . . . २

संसाराच्या वाटेवरी
असती किती ती दरीखोरी
मृगजळाच्या पाठी परि
लागुनी ना हो बेजारी . . . ३

मायाजाळी माशापरि
गुंतू नको या संसारी
विचार थोडा करुनी तरी
परमेशाचे स्मरण करी . . . ४

दीपज्योती

(चैत्रगौरीच्या हळदकुंकू प्रसंगी हौसेने आरास केली जाते. यावेळी विविध प्रकारच्या दिव्यांची योजना केली होती असंख्य पणत्या, समया साध्या, विजेच्या, तरंगत्या मेणबत्त्या इत्यादी. जणू दीपोत्सवच केला होता.)

आकाशीच्या असती तारका नच ह्या दीपज्योती
हळदकुंकू घेण्या येती उतरुनी धरतीवरती . . . १

तेजफुले जणू गगनामधली नच ह्या दीपज्योती
चंदेरी जणू हिमकण येती अवचित अवनीवरती . . . २

बकुलफुलांची जणू ही माला चैत्रगौरीच्यासाठी
मयूरपिच्छावरील लाखो डोळे लखलख करिती . . .३

मौक्तिकमालेतून गौरीच्या ओघळती जणू मोती
गर्भरेशमी पदरावरची सोनफुले चमचमती . . . ४

चैत्रगौरीच्या करिती पूजना लेऊनी भरजरी वसना
सण हा करिती चैत्रमासी हर्षभरित त्या ललना . . . ५

वटसावित्रीचे गाणे

(वटसावित्रीची कथा सांगणारी दीर्घ कविता. )

अश्वपतीकन्या जरी
नाम असे सावित्री
सत्यवाना पती तरी
मानी मनी . . . . ।।१ ।।

नारदाने कथिले जरी
अल्पायुषी पती तरी
सत्यवाना मनी वरी
निजपती . . . . ।।२ ।।

गरिबी ही होती जरी
कष्ट करी दिसभरी
सावित्रीही राही तरी
समाधानी . . . ।।३ ।।

सासुश्वशुर वृद्ध जरी
सेवा करी परोपरी
आदर्शाची ठरे नारी
जगामाजी . . . ।।४ ।।

देव मानी पतिस खरी
आज्ञापालन सुखे करी
वाकुडा ना मुखांतरी
शब्द कधी . . . ।।५ ।।

एकदा ती सावित्री
सत्यवानाबरोबरी
गेली वनाअंतरी
सरपणालागी . . . ।।६ ।।

वाळक्याशा फांद्या जरी
असती ज्या तरूवरी
चढूनिया काढी तरी
सत्यवान . . . ।।७ ।।

पुरे म्हणे सावित्री
चला आता जाऊ घरी
म्हणे यम हसुनी तरी
``वर माग सुंदरी
जाई परि तू माघारी
लवकरी '' . . . ।।१६ ।।

``नातवंडे अपुली खरी
बैसलेली राज्यावरी
सासुसासरे माझे तरी
पाहू देत'' . . . ।।१७ ।।

एका वरे सावित्री
मागितले वर चारी
समाधानी अंतरी
यमराज . . . ।।१८।।

अखेरची काढी तरी
सत्यवान . . . ।।८ ।।

फांदी तोडता ती खरी
येऊनिया अंधारी
पडे कैसा भूवरी
सत्यवान . . . ।।९ ।।

मनातुनी सावित्री
समजूनी गेली खरी
पतिशिरा मांडीवरी
घेतलेसे . . . ।।१० ।।

श्रध्दा तिची देवावरी
नयनातुनी वाहे वारी
यमराज आला तरी
भीती नाही . . . ।।११ ।।

पतीची ती सेवा करी
वारा पाणी वरचेवरी
जपे मनाअंतरी
रामनाम . . . ।।१२ ।।

वाट संकटांची जरी
काटेकुटे असती तरी
यमापाठी सावित्री
निडरे जाई . . . ।।१३ ।।

यम म्हणे ``सावित्री
जाई आता माघारी
उपयोग नाही तरी
आता काही'' . . . ।।१४ ।।

धिटुकली सावित्री
ना फिरे माघारी
दया यमाअंतरी
उपजली . . . ।।१५ ।।

सत्यवानप्राणदोरी
हाती घेई सावित्री
फिरे यम माघारी
आल्या वाटे . . . ।।१९ ।।

आजच्या ह्या आम्ही नारी
सावित्रीच्यापरि खरी
कु टुंबाची खरोखरी
सेवा करू . . . ।।२० ।।

शुभदिनी आजतरी
देवाजीच्या चरणावरी
मागणी ही एक खरी
साऱ्या मागू . . . ।।२१ ।।

मंगळागौर

(मंगळागौर या सणाचे समग्र वर्णन)

सण सखे आज घरी मंगळागौरी
पूजा करू जमवूनि नगरीच्या नारी --- ।।ध्रु.।।

सणांचा हा राजा शोभे श्रावणमास
हिरवा शालु शोभतो सृष्टिमातेस
पर्णफुले वेलबुट्टी जणू जरतारी
पूजा करू जमवुनी नगरीच्या नारी ---१

चंदनाचा चौरंग नक्षी रुपेरी
केळीकर्दळीचे मखर शोभते वरी
आनंदाने विराजते गौरीची स्वारी
पूजा करू जमवुनी नगरीच्या नारी ---२

जाई-जुई कुंद-बकुळ फुले साजिरी
सुवासिक सुमने ही देत हजेरी
बेल-दूर्वा तुळस-शमी पत्री साजिरी
पूजा करू जमवुनी नगरीच्या नारी ---३

षोडशोपचारभरी पूजा करूनी
अंबेची आरती करू मनापासुनी
धूपदीप पुरणपोळी नैवेद्यावरी
पूजा करू जमवुनी नगरीच्या नारी ---४

खेळुनिया खेळ सरवू रात्र जागरी
उखाण्यांची बरसात होई अंबरी
आनंदाचे ऊन नव्या चेहऱ्यांवरी
पूजा करू जमवुनी नगरीच्या नारी ---५

अंबा नित वास करी भक्ताघरी
शाल सुखशांतीची घाल भूवरी
आशीषा या मागू चला मनमंदिरी
पूजा करू जमवुनी नगरीच्या नारी ---६

स्वर्गसुख

( सर्व नात्यांमध्ये मातेचे नाते हे सर्वश्रेष्ठ असते. साधुसंत सुद्धा परमेश्वराला माऊलीच्या रूपातच बघतात.)

असती जगती या किती नातीगोती
सर मातेपरि कुणा नसे हाती . . . १

साधुसंतजन सकल हेचि वदती
विठूरायाते माऊलीच म्हणती . . . २

दोन डोळयातुनी जळती दोन ज्योती
परि अंती परमेश एक बघती . . . ३

तूचि नसता जग शून्यवत् जाहाले
तुझ्यासाठी हे नयन भरूनी आले . . . ४

तुझ्या मूर्तीमधि विठूमाय भासे
सुख स्वर्गीचे आज खरे गवसे . . . ५

श्रीगणेशआरती

( श्रीगणेशाचे कानडी चालीवरचे स्तोत्र)

अरे श्रीगणेशा, ही आरती तुजला
तुजवीण नाही ही, गति मानवाला . . . १

शमीपर्णे दूर्वा, फुले रक्तवर्णा
आवड तुझी साधी, हे शूर्पकर्णा . . .२

सकलाते मोहुनी, घे तव शुण्डा
लम्बोदरा हे, गजवक्रतुण्डा . . . ३

मानव नि प्राण्याचा, संगम सुरेख
तव सुस्वरूपी, दिसे त्याची मेख . . . ४

गौरीसमवेत, येसी तू देवा
उत्सव सदा वाटे, आम्ही करावा . . . ५

विघ्ने मनी नि, शरीरीचि सदया
तुझिया कृपेने, जाती ती विलया . . . ६

मनापासुनी तूज, येती जे शरण
गणाधीशा तुझे त्या, दिसती चरण . . . ७

एकवीस ही संख्या, तुला प्रिय भारी
आनंदकंदा, तुझी न्यारी स्वारी . . . ८

एकवीस मोदकांचा, नैवेद्य दावुनी
एकवीस दूर्वा, वाहू तव चरणी . . . ९

सोडुनी देता, सारे हेवेदावे
तरी चराचरी, तव रूप भावे . . .१०

सद्बुद्धि देई तू, मानवजातीला
पुन:पुन्हा वंदुनी, प्रार्थिते तुजला . . . ११

चिंगीचा देव

(लहान मुलांनाही अनेक शंका येतात.देव कुठे असतो या चिंगीच्या प्रश्नाला आईने चिंगीला समजेलसे दिलेले उत्तर. लहान मुलांशी त्यांच्या भाषेत बोलले तर त्यांना ते सहज पटते. त्यांच्या कोवळया मनावर आपोआप सुसंस्कार घडविले जातात. म्हणूनच आपल्याशी जवळकीने, प्रेमाने बोलणाऱ्या मुलीला आपली आईच देवस्वरूप वाटते.)

देव कोठे राहतो गे
कसा असे तो ते सांगे
उत्तर देई मम प्रश्नाते
आई दुजे ना मी मागे . . . १

सोनुलीसी घेऊनि संगे
आई विचार करू लागे
मांडीवरती घेऊनि तीते
ऐक म्हणे आई,, चिंगे . . . २

देव राही ना मंदिरी
सत्कर्माच्या वसे घरी
मनापासुनी स्मरता त्याते
दिसे तरी तो चराचरी . . . ३

देव नसे गे मूर्तीमध्ये
सोन्याचांदी वस्तुमध्ये
पांडुरंग तो राही सखये
सकल जनांच्या मनामध्ये . . . ४

भुकेस देता भाकरी
तहानलेल्या पाणी तरी
समाधान ते विलसे वदनी
दिसतो तेथे श्रीहरी . . . ५

डोंगर, झाडे, नदीनाले
सूर्यचंद्र आकाश भले
सजीवनिर्जीव देवाहाते
जगती या जन्मा आले . . . ६

आनंदाने वदली चिंगी
गंमत कथिते तुज आई
प्रेमळ तुझिया रूपामध्ये
देवच दिसला मज बाई . . . ७

मांढरदेवी

(वाई येथील मांढरदेवीच्या यात्रेप्रसंगी जी दुर्घटना घडली त्या पार्श्वभूमीवर लिहिलेली कविता. कल्पना अशी की स्वत: मांढरदेवीच प्रकट होऊन तिचे विचार सांगत आहे. कोंबड्या-बकऱ्यांच्या बळीची ती भुकेली नाही तर भक्तिभावाने अर्पण केलेल्या भाजीभाकरीची ती भुकेली आहे. दोन हात जोडून मनापासून केलेला नमस्कार तिला अधिक आवडतो.)

स्वप्नी एकदा आली माझिया, वाईची मांढरदेवी
म्हणे साऱ्यांना सांग सखे, गाऊनी माझी ओवी . . . १

हिरवी साडीचोळी ल्यायिली, गोडवा वदनी
हिरवा चुडा नि कपाळी कुंकू दिसे समाधानी . . . २

गौरवर्ण नि मोहक मुद्रा, नाक चाफेकळी
बोलके वदन हसरे नयन, गाली गोड खळी . . . ३

नयनी आणू सदा तियेची, प्रसन्नशी मूर्ती
घाईगर्दी नि धक्काबुक्की, नसे ही खरी भक्ती . . . ४

करू जोडून हात दोन, नमन तिजप्रती
मागणे मागू मनापासून, नको चुकीच्या रीती . . . ५

कोंबडी बकरी आवडे न तिला, साधी गौरीपरी
गरिबाघरची बरी म्हणते, भाजी नि भाकरी . . . ६

जाणावेचि

(येथे संतत्वाची व्याख्या केलेली आहे. देव हा प्रत्येक अणूरेणूत आहे. प्रत्येक माणसाच्या मनात आहे. फक्त प्रत्येक माणसाने ते स्वत: समजून घ्यावे लागते.)

सुखाची प्रभात । दु:खाचा हो अंत ।
त्याचे नाव संत । जाणावेचि, जाणावेचि ।।

सीतेचा श्रीराम । मीरेचा घनश्याम ।
एकचि रामश्याम । जाणावेचि, जाणावेचि ।।

देव नाही दूरी । गिरी वा कंदरी ।
वसे चराचरी । जाणावेचि, जाणावेचि ।।

राही ना तो काशी । पुरी वा कैलासी ।
आपुल्या मानसी । जाणावेचि, जाणावेचि ।।

देव ना धनात । नसे काननात ।
असे तो मनात । जाणावेचि, जाणावेचि ।।

नंदादीप

(भक्तिरूपी नंदादीप म्हणजे सतत तेवणारा दिवा. असा नंदादीप जर मनात लावला तर काहीही न मागता समाधान आपोआप चालत आपल्या दारात येते. समईचा प्रकाश शांत, मंद, शीतल असतो. त्या प्रकाशात दिसणारे देवघर, देवाची मूर्ती अधिक प्रसन्न वाटते. तसेच भक्तिरूपी नंदादीपाचे आहे. )

आनंदाचा ठेवा, गवसला देवा
केशवा माधवा, आजन्म तुझी सेवा
आजन्म तुझी सेवा . . . १

आहे माझे मन, अति रे चपळ
दूर जाता मळ, जाहले निर्मळ
जाहले निर्मळ . . . २

हौस नाही उरली, पुरी असे भागली
मनभरी राहिली, देवा तुझी मुरली
देवा तुझी मुरली . . . ३

भक्तिनंदादीप, लाविता अनूप
दर्शनाचे सूख, येई आपोआप
येई आपोआप . . . ४

देवा तुझ्या दर्शने, धन्य मी जाहले
भरूनी पावले मन, हे निवाले
मन हे निवाले . . . ५

देवा तुझ्या दर्शनाचा, आनंद हा साचा
मूक होई वाचा, मार्ग हा मुक्तीचा
मार्ग हा मुक्तीचा . . . ६

निष्काम काम

( कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हे भगवद्गीतेतले सुप्रसिद्ध वचन सर्वांना ठाऊक आहेच. फळाची अपेक्षा न धरता जो मनुष्य आपले कर्तव्यकर्म योग्य रीतीने पार पाडतो त्याला एक ना एक दिवस देव भेटतोच. त्याच्या मनाला समाधान मिळते व शांतता लाभते.)

स्मरा स्मरा तुम्ही देवासी
दिसे न जरि तो नयनासी
पुसापुशी ना करा कधी
निरखुनि बघता मनामधी . . . . ।।१ ।।

धीर धरा तुम्ही परि चित्ती
चळो न द्यावी अपुली मति
येई प्रभाती वा राती
मदतीला तो रमापती . . . . ।।२ ।।

पापंाच्या त्या जरि राशी
ठाऊक नाही कशी काशी
जळूनि जाती क्षणमाजी
प्रेमे स्मरता हृषिकेशी . . . .।।३ ।।

मोह नि माया ना धरिती
निष्कामे जे कृति करिती
रात्रंदिन परि प्रभु स्मरती
त्या सहजचि भेटे रघुपती . . . . ।।४ ।।

गरज

(जो मनुष्य तनमन अर्पण करून परमेश्वराला शरण जातो, अगदी मनापासून देवाचे नामस्मरण करतो त्याच्या हृदयातच देवाची वस्ती असते. देवाला शोधण्यासाठी त्याला देवळात, तीर्थक्षेत्रात किंवा अन्यत्र कोठेही जाण्याची गरज पडत नाही. हे पटवून देण्यासाठी दोन दाखले दिले आहेत. सर्व दानात श्रेष्ठ दान म्हणजे कन्यादान होय. तसेच आईवडिलांची सेवा ही सर्व सेवांमध्ये श्रेष्ठ सेवा होय. )

हृदयी वस्ती ज्या रामाची
त्या गरज न अन्या नामाची . . .

मंदिरी कुणी त्या शोधिती तर कुणी
शोधण्या तीर्थासी जाती
परि अंतरी हरी ज्या नित्य वसे त्या
गरज न दूजा जाण्याची
त्या गरज न दूजा जाण्याची . . . १

करिती दाना कुणी सुवर्णा
कर्णापरि कवचा देती
परि कन्यादाना करि जो स्वकरी
गरज न दुजा दानाची
त्या गरज न दूजा दानाची . . . २

गरिबासही ते कुणी सेविती
अपंगसेवा कुणी करती
परि प्रथम सेविता मातपित्या त्या
गरज न दूजा सेवेची
त्या गरज न दूजा सेवेची . . . ३

आळवणी

(संसाराच्या मोहातून सुटका व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी एक अत्यंत सोपा व प्रभावी उपाय म्हणजे देवाच्या चरणी लीन होणे. देवाची मनापासून केलेली विनवणी या कवितेत दिसते.)

धाव घेई देवराया अंत नको पाहू
तूच माझा विठूराया काय तुला देऊ . . .

आकाशीच्या देवा तुला ठाऊके हे सारे
दु:ख कैसे सांगू तुला जाणुनी तू घेरे . . .

आकाशीच्या देवा किती करू आळवणी
आळवणी करता मी दाटे डोळा पाणी . . .

जगी काही नाही खरे आहे सारी माया
गुंते जीव त्यात जैसा भ्रमर सरोजी या . . .

नाम तुझे घेता परि विरे मोहमाया
सोडता हे गोड पाशा येती तुझ्या पाया . . .

विठूराया

(आषाढी व कार्तिकी एकादशीची पंढरपूरची वारी कोणाला बरे ठाऊक नाही ? संसाराच्या रहाटगाडग्यातून थोडेसे बाजूला होऊन पंढरीच्या विठोबाला भेटायला चालत प्रवास करणारी वारकरी मंडळी साऱ्यांच्या परिचयाची आहेत. अशाच एका वारकऱ्याने वारीला येण्याबद्दल मला विचारले. त्या प्रश्नाच्या उत्तरादाखल केलेली ही कविता आहे. दररोज सकाळपासून संध्याकाळच्या प्रत्येक कामात मला विठूरायाचेच दर्शन कसे घडते हे सांगितले आहे.)

विठूराया भेटे मजला
पंढरीला गेल्याविना
येई स्वये भेटायाला
रूपे घेऊनिया नाना
रूपे घेऊनिया नाना - - - १

रामाच्या त्या पाराला गे
झुंजुमंजु होऊ लागे
कोंबड्याच्या आरवणी
भेटे मज चक्रपाणी
भेटे मज चक्रपाणी - - - २

दिनराज येता गगनी
संपुनी ती जाई रजनी
पक्षी गाताती भूपाळी
भेटे मज वनमाळी
भेटे मज वनमाळी - - - ३

गोठ्यामध्ये बोलाविते
हंबरूनी गाय जेंव्हा
वाटे मज कृष्णसखा
वाजवीत येई पावा
वाजवीत येई पावा - - - ४

भर दुपारी उन्हात
वृक्षराज दे साऊली
भेटे मज निसर्गात
पंढरीची विठुमाऊली
पंढरीची विठुमाऊली - - - ५

उन्हे होता ती कलती
झाकाळुनी जाती नभा
भेटे मज कृष्णसखा
गोड हासत तो उभा
गोड हासत तो उभा - - - ६

सूर्य जाता परदेशी
आकाशी तो येई शशी
अवस्था ती लागे कैसी
विठू राही मम मानसी
विठू राही मम मानसी - - - ७

Hits: 102