सय

Written by Suresh Ranade

देव

देव असे तो जगतामधि या भरूनिया की राही
अर्पिल्याविण कायावाचामने न दृष्टिस येई
कधी कुणाच्या रूपे आपणा मदत कराया येई
म्हणुनि मानवा नामामृत हे सदासर्वदा घेई . . . १

भल्या पहाटे मंजुळसे स्वर कानी आपुल्या येती
स्वागत करिती सुप्रभाती पक्षीगण या रीती
अंधारी ती रातचि सरता चांदण्या विरघळती
नीलनभी या सोनपाऊली सूर्यदेव अवतरती . . . २

वृक्षलता अन् झाडेझुडपे गोष्टिस एका कथिती
जे जे आपणाजवळी ते ते द्यावे दुसर्‍यासाठी
गरीबबापुड्या वृद्धजनांची सदाच व्हावे काठी
इतरजनांचा विचार करिता देवचि राही पाठी . . . ३

ज्ञाना, गोरा, तुकया, नामा कुणी वेगळे नसती
परि सुमती त्यांची दावी त्यांना सुजनांची ही रीती
नरनारी अन्‌ पशुपक्षीही सारे एकचि असती
देवरूप ते होऊनि सारे जगती या वावरती . . . ४

निर्गुण आणि निराकार तो व्यापी चराचर सृष्टी
कृष्णचि जेवि नंदाघरचा गोपगोपी आकृष्टी
अथकप्रयत्ने संतचि करिती आनंदाची वृष्टी
समाधान अन्‌ शांतीस देई नितळशी ती दृष्टी . . . ५

मनपाखरू

जा उडुनी जा लवकरी मनपाखरा
तव आवडीचा असे गाव हा सारा . . .

तुज खुणावतो दूर देशिचा तारा
जणू चांदण्या रात्री ध्रुवतारा . . .

अतिमोहक मायाजाली
रंगांची उधळण भवती
मति गुंगचि होऊनि जाई

परि भुलू नको पाहुनि मोरपिसारा
देवाचा होशिल प्यारा . . . १

जा उडुनी जा लवकरी मनपाखरा
तुज अडवीतो खट्याळ जरि हा वारा . . .

तुज ध्यास असे आस असे जाण्या पैलतीरा
या नगरीचा नुरला चारा . . .

मोहासि सारिता दूर
आनंदे भरूनि ऊर
कर्तव्या पाडिसी पार

तुज गवसेल अद्‌भुत स्वर्गनजारा
देवाचा होशिल प्यारा . . . २

त्याशिवाय

दुखाचा दर्या तरल्याशिवाय
सुखाचा किनारा भेटत नाही
सुखाचा किनारा भेटत नाही . . . १

दुखाच्या पर्वतराजी पार केल्याशिवाय
सुखाचे एव्हरेस्ट सर करता येत नाही
सुखाचे एव्हरेस्ट सर करता येत नाही . . . २

टाकीचे घाव सोसल्याशिवाय
दगडाला देवपण येत नाही
दगडाला देवपण येत नाही . . . ३

 

तावून सुलाखून निघाल्याशिवाय
कसाला सोने उतरत नाही
कसाला सोने उतरत नाही . . . ४

दुधाचे दही झाल्याशिवाय
नवनीत हाती येत नाही
नवनीत हाती येत नाही . . . ५

 

अपार कष्ट घेतल्याशिवाय
यशमाला पदरी पडत नाही
यशमाला पदरी पडत नाही . . . ६

स्वतः मेल्याशिवाय
स्वर्ग कसा तो दिसत नाही
स्वर्ग कसा तो दिसत नाही . . . ७

मीपणा सोडल्याशिवाय देवभेट होत नाही
देवभेट होत नाही . . . ८

 

आनंदाची वेणू

गूज मनीचे आई, तुज कथिते तरी
म्हणशील मज तू लेक आपुली खरोखरी
आनंदाची वेणू घुमली घरोघरी
आली रे आली लेक जन्मा आली . . . १

जन्मायेण्याआधी गेल्या देवाघरी
भगिनी माझ्या गणती किती होईना तरी
हाक दिली त्यांनी तुम्हा देवापरी
हाकेला ना ‘ओ’ दिधली कुणीही तरी . . . २

जन्मायेण्याआधी का गे झाले नकोशी
लेकच जन्मा घाली खरी एका आईसी
लेक, भगिनी, पत्नी, सासू तूही अससी
कैसी गे तू भुलसी अपुल्या सार्‍या नात्यासी . . . ३

कपाळाला कोणाच्या ना पडो ही आठी
अमृताचा पेला माझ्या लाव तू ओठी
प्रेमाने घे जवळी मजला देऊन मिठी‍
पांग तुझे फेडीन मी झाल्यावर मोठ्ठी . . . ४

मुलगा किंवा मुलगी ऎसा भेद ना करी
होतीस ना तू मुलगी बाई माझ्यापरी
वंशदीपक नाही तरी मी पणती खरी
वेल नेईन वंशाचा मी गगनावेरी . . . ५

आईपणा घेऊन आले तुझ्यासाठी
देवराणा राहतो गे तुझिया पोटी
पुण्यकर्मा येती अति फळे गोमटी
गोष्ट लाख मोलाची ही होईना खोटी . . . ६

सांगणे हे इतुके माझे ऎक तरी
येऊ दे गे आई, मजला अपुल्या घरी
ऋणी राहीन तुझी मी जन्मभरी
मगच म्हणतील सारे तुला ‘आदर्श नारी’ . . . ७

असली-नकली

घर होतं भलं मोठ्ठं
पण स्वच्छतेचं नाव नव्हतं
सगळीकडे धूळच धूळ
पाहणा‍‍र्‍याला लागायचं खूळ . . . १

क्षणभर वाटलं बाह्या सरासावून
आपणच करावं झाडपूस सारवण
पण दुसर्‍याचं घर, करता काय?
अलगद वर घेतले पाय . . . २

आरसा समोर दिसला म्हणून
सहज पाहिले वाकून
डोकावणारे धुळीच्या पलिकडून
दिसले स्वच्छ निर्मळ मन . . . ३

लख्‌ख ऊन पडले अन्‌ दूर गेली सावली
शंकेची पाल भिऊन पळाली
बाहेरची स्वच्छता केवळ नकली
मनाची स्वच्छता हीच खरी असली . . . ४

माया

माया माऊलीच्यापरी
सार्‍या जगाच्या बाजारी
शोधू गेले किती तरी
सापडेना बाई बाई . . . १

प्रेमाची ही गंगा खरी
झरे तिच्याच अंतरी
दूर जरि गेली तरी
चित्त घरी बाई बाई . . . २

संतजनांची भलाई
आभाळाची ही निळाई
मूळ पाहू गेले तरी
गवसेना बाई बाई . . . ३

विटेवरची विठाई
सार्‍या जगाची हो आई
लेकरांना अपुल्या कध्धी
विसंबेना बाई बाई . . . ४

न्याय

अजब तुझा हा न्याय देवा
म्हणू की महान ऽ ऽ ऽ . . . ॥ ध्रु.॥

हिर्‍याची न कध्धी आम्हा
झाली पहेचान
सुखासाठी मर्कटी घेई
लहानग्याचे प्राण
आकळे न मजला असले
अगाध तत्वज्ञान ऽ ऽ ऽ
अजब तुझा हा न्याय देवा
म्हणू की महान . . . १

देती कैसे सोडुनि दूर
सोनभरल्या ताटा
गुलाबाच्या वाट्याला का
देसी तू रे काटा
तुझ्याच लेखी आम्ही
जगी सारेचि लहान ऽ ऽ ऽ
अजब तुझा हा न्याय देवा
म्हणू की महान . . . २

कुंतीने त्या सोडुनि दिधले
जळामध्ये बाळ
राधा परि माता करी
प्रेमे प्रतिपाळ
उदार त्या कर्णा दिधले
दैवाने अभिधान ऽ ऽ ऽ
अजब तुझा हा न्याय देवा
म्हणू की महान . . . ३

खरेच तुजला कथिते देवा
न्याय उफराटा
सान वदनी घेते मी हा
घास थोडा मोठा
रागावुनि तू देवा,
होसी का अंतर्धान ऽ ऽ ऽ
अजब तुझा हा न्याय देवा
म्हणू की महान ऽ ऽ ऽ
अजब तुझा हा न्याय देवा
म्हणू की महान. . . ४

ओलावलेल्या पापण्या

मात-पित्यांचे प्रेमळ आशिश
आहेत तुमच्या पाठीशी
सदैव मिळोत तुम्हाला
ज्ञानाच्या ह्या अगाध राशी . . . १

आजवर जरी आई-बाबा
अधिक-उणे बोलले
तरी त्यामागे आहे त्यांचे
निर्व्याज प्रेम लपलेले . . . २

आहात तुम्ही नशीबवान
पण सदैव ठेवा एकच भान
वय आणि ज्ञान यांचा
राखा तुम्ही मानसन्मान . . . ३

इच्छा जेंव्हा होईल तुम्हा
मागे वळून पाहण्या
दिसतील दोन उंचावलेले हात
अन्‌ ओलावलेल्या पापण्या . . . ४

ईशचरणी टेकून माथा
एकच आहे प्रार्थना
सुखी ठेव प्रभो, आमच्या
गोजिरवाण्या पिलापाखरांना . . .५

घरटे

घरटे बांधियले झुलते झाडावर ते
मऊसूत रेशमापरि ते . . . १

दो पिल्लांची किलबिल त्या सुखवीते
हासरे सदा ते घरटे . . . २

दाणापाणीही शोधुनि भरवी त्याते
हळुहळूच फुलवी त्याते . . . ३

दिन एक परि पंखात भरुनिया वारा
पिल्ले ती घेती भरारा . . . ४

गगनाचा त्या खुणवी गंधित वारा
पिल्ला ने दूर संचारा . . . ५

कधी अवचितसे येती जणू त्या धारा
तरू जाई फुलुनी सारा . . . ६

कांदा बटाटा

भाजीत भाजी पहिला मान
कांदाबटाट्याने सजले पान . . . १

जिवलग खरे पण स्वभाव वाकडा
जहाल नि मवाळ छत्तिसाचा आकडा . . . २

कांदा सारखा चिडायचा
रागराग फार करायचा . . . ३

रागाने लालबुंद व्हायचा
सार्‍यांच्या डोळा पाणी आणायचा . . . ४

बटाटा समजूत काढायचा
कध्धी नाही रागवायचा . . . ५

सार्‍यांना मदत करायचा
मिळून मिसळून वागायचा . . . ६

सारे कांद्याला हसू लागले
चिडका बिब्बा म्हणू लागले . . . ७

कांदा पटकन्‌ रुसला
कोपर्‍यात जाऊन बसला . . . ८

मुळूमुळू रडू लागला
पळत पळत बटाटा आला . . . ९

कांद्याला म्हणे हळू बटाटा
तू तर मोठा धीराचा बेटा . . . १०

सार्‍यांशी गोड गोड बोलावे
कुणा कधी ना रागवावे . . . ११

तेंव्हापासून कांदा गोड बोलू लागला
लाल रंग सोडून पांढरा झाला . . . १२

दोघांची छान गट्टी जमली
कांदा बटाट्याने रंगत आणली . . . १३

चांदोबा

दुडुदुडु दुडुदुडु धावत चाले सावरीत तो तोल
म्हणे राम "गे आई, देई चांदोबा तो गोल" . . . १

"चंद्र दूर अति बाळा असतो आकाशीच्या माथी
कैसा आणुनि देऊ हाती दीप ना ती वाती" . . . २

सार्‍यांचे ते यत्नही पुरते होती ते अतिफोल
ऎकत असता रामाचे ते बोबडेसे बोल . . . ३

रामाच्या त्या हट्टापुढती झुके कुशल ती माय
कसे करावे समजेना तिज म्हणे "करू मी काय?" . . . ४

"का दिसता हो उदास आपण" म्हणे सुमंत प्रधान
"काय जाहले कथन करावे नका करू अनमान" . . . ५

"समजावू कैसे मी याला आहे सानही पोर"
परि सुमंत देई आणुनि हाती आरशाचा तो गोल . . . ६

हातीच्या त्या आरशामधि तो राम बघे चंद्रासी
अंबरीच्या सौरभासी धरी उरी नि मनासी . . . ७

नाचू लागे थुई थुई तो राममनीचा मोर
म्हणे "आई गे, आला हाती चांदोबा तो गोल" . . . ८

घुंगुरवाळा

छुम्‌छुम्‌ छुम्‌छुम्‌
रुम्‌झुम्‌ रुम्‌झुम्‌
घुंगुरवाळा वाजे
हो घुंगुरवाळा वा ऽ ऽ जे
गोविंदाच्या तालावरती
बाळ आमुचा नाचे
हो बाळ आमुचा ना ऽ ऽ चे . . . १

धा धिन्‌ धा धिन्‌
ता तिन्‌ ता तिन्‌
तबला की हा वाजे
हो तबला की हा वा ऽ ऽ जे
बोलांच्या ह्या तालावरती
बाळ आमुचा नाचे
हो बाळ आमुचा ना ऽ ऽ चे . . . २

छन्‌छन्‌ खळ्‌खळ्‌
छन्‌छन्‌ खळ्‌खळ्‌
लेझिम ऎसी वाजे
हो लेझिम ऎसी वा ऽ ऽ जे
नाजुकशा ह्या तालावरती
बाळ आमुचा नाचे
हो बाळ आमुचा ना ऽ ऽ चे . . . ३

सा रे ग म प ध नी सा
सा नी ध प म ग रे सा
पेटीचा सुर लागे
हो पेटीचा सुर ला ऽ ऽ गे
सुरावटीच्या तालावरती
बाळ आमुचा नाचे
हो बाळ आमुचा ना ऽ ऽ चे . . . ४

थुई थुई थुई थुई
थुई थुई थुई थुई
उडते जणू कारंजे
हो उडते जणू कारं ऽ ऽ जे
गीताच्या ह्या तालावरती
बाळ आमुचा नाचे
हो बाळ आमुचा ना ऽ ऽ चे . . . ५

तिकडची स्वारी

भारी प्रेम आहे माझ्यावरी
तिकडच्या स्वारीचे

कप चहाचा नि देती
मज बिस्किट मारीचे . . . १

गोडी वाढते ही अशी
खरी नाते दो जीवांचे

एकमेकांच्या मनाला तरी
समजून घ्यायचे . . . २

पख फुटता पाखरे
होती पाहुणे देशीचे

गोड आठवणी मग
त्यांच्या रमून जायचे . . . ३

काळी घोंगडी

आकाशीचे ग्रहगोलचि ते खुणावती सारखे
परि तारकांची घरातल्या त्या सर न येऊ शके . . . १

भव्यदिव्य त्या राजगृहातिल वैभव वाटे मुके
झोपडीतले गूळपाणीही वाटे अति बोलके . . . २

ऎक सखये सोनेचांदी दागदागिने फुके
शरीरसंपदा, निर्मलसे मन हीच खरी गे सुखे . . . ३

अगणित असति देवदेवता सकलजना ठाऊके
परि विटेवरच्या विट्ठलाविण वाटे सारे फिके . . . ४

स्वर्गलोकीच्या सुखासनीही झोप न येई सुखे
मृत्युलोकीची काळी घोंगडी बोलावी कौतुके . ५

विठुवाचुन

विठु ये रे मनमंदिरी
आस नाही दुजी अंतरी
विठुवाचुन मुळी बहरेना
चंद्रभागाकाठ काठ काठ . . . १

दुथडी भरूनि वाहे नदी
दोहो तीरांच्या मी मधी
विठुवाचुन मला सुधरेना
पैलतीरवाट वाट वाट . . . २

आप्त असले कितीही जरी
अंती साथीस कुणी ना तरी
विठुवाचुन मला आवडेना
कुणाचीही साथ साथ साथ . . . ३

विठु भेटे मजला उरी
तृप्ती झाली आता खरी
विठुवाचुन कशी ती कळेना
वर्षे गेली साठ साठ साठ . . . ४

शतायुषी दान

देई गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान, देवा
गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान ऽ ऽ ऽ . . . ॥ध्रु.॥

गुरूगृही जाण्यासाठी, पुरे प्रेमाचे बंधन
गुरूचरणी लाभते, सुखशांतीसमाधान
सुखशांतीसमाधान ऽ ऽ ऽ
देई गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान, देवा
गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान ऽ ऽ ऽ . . . १

गुरूसेवेमध्ये होई, माझी काया ही चंदन
गुरूचरणाशी माझे, नित्यनेमानं वंदन
नित्यनेमानं वंदन ऽ ऽ ऽ
देई गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान, देवा
गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान ऽ ऽ ऽ . . . २

गुरूकृपा हेच माझं, सर्व संसाराचं धन
तुझ्याकडे देवा माझं, नाही दुजं रे मागणं
नाही दुजं रे मागणं ऽ ऽ ऽ
देई गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान, देवा
गुरुमाऊलीला माझ्या, शतायुषी दान ऽ ऽ ऽ . . . ३

गारा आल्या

आला पाऊस गार वारा संगे घेऊनिया त्या गारा
टपटप टपटप कौलावरती लागे वाजू नगारा
हो लागे वाजू नगारा . . . ध्रु.

अवचित त्याच्या आगमने त्या धांदल गेली उडोनी
गारा आल्या आल्या, म्हणूनी जाती आनंदोनी
हो जाती आनंदोनी . . .
आला पाऊस गार वारा संगे घेउनिया त्या गारा . . . १

काळाचेही भान नुरोनी जाती वय विसरोनी
भिजता भिजता वेचिती सारे गारा दो हातांनी
हो गारा दो हातांनी . . .
आला पाऊस गार वारा संगे घेउनिया त्या गारा . . . २

हिमकन्या जणू येती नटुनी उतरूनी स्वर्गामधुनी
अप्सराच जणू आल्या म्हणूनी कुशीत धरी त्या धरणी
हो कुशीत धरी त्या धरणी . . .
आला पाऊस गार वारा संगे घेऊनिया त्या गारा . . . ३

घेऊनि वाटे संदेशाते येती देवाघरूनी
क्षणभंगुर हे जीवन तरी द्या आयुष्या उधळोनी
द्या आयुष्या उधळोनी . . .
आला पाऊस गार वारा संगे घेउनिया त्या गारा . . . ४

आला पाऊस गार वारा संगे घेऊनिया त्या गारा
टपटप टपटप कौलावरती लागे वाजू नगारा
हो लागे वाजू नगारा . . . ध्रु.

तुळशीबाई

तुळशीबाई तुळशीबाई
आपण दोघी मायलेकी
सुखदुःख माझिया मनी
सांगेन हळूच तुझिया कानी – - – १

रोज सकाळी पहाटवेळी
घालती पाणी तुझे चरणी
शिंपुनि दारी सडा अंगणी
रेखिती सुबक रेघ-रांगोळी – - – २

कृष्णदेवाची लाडकी म्हणुनी
वससि तयाचे सदा चरणी
विठूरायाचे गळाभरी
साजे तव हार मंजिरी – - – ३

सकलजनांच्या घरीदारी
तुझीच सखये दिसते स्वारी
पूजन करिती सार्‍या नारी
वृंदावनी तुज सामोरी – - – ४

हळद-कुंकू नि फुले सोबती
नैवेद्याची अर्पुनि वाटी
संतति-सौख्या-आरोग्यासाठी
तुझिया चरणी दान मागती – - – ५

वरदहस्त

ऎसी शक्ती नाही जगती हनुमानासम ती गती
शरणागत जे येताती त्या देई मारूती सन्मती . . . ॥ध्रु.॥

नारी किंवा नर ऎसा ना भेद असे कधि त्याप्रती
नियमित व्यायामा करी त्या मिळे मारूतीसम शक्ती . . . १

ऎसी शक्ती नाही जगती हनुमानासम ती गती
शरणागत जे येताती त्या देई मारूती सन्मती . . . ॥ध्रु.॥

साधे ताजे घरचे खाणे घेई रोज जो दिनराती
आरोग्याची खाणचि देई मारूती त्या सुजनाप्रती . . . २

ऎसी शक्ती नाही जगती हनुमानासम ती गती
शरणागत जे येताती त्या देई मारूती सन्मती . . . ॥ध्रु.॥

लोभ मोह अन्‌ मदमत्सरा त्यागुनी जगी जे वर्तती
सुखशांती अन्‌ समाधान दे मारूती त्या सुजनाप्रती . . . ३

ऎसी शक्ती नाही जगती हनुमानासम ती गती
शरणागत जे येताती त्या देई मारूती सन्मती . . . ॥ध्रु.॥

मधुर मुलायम मृदुस्वरे जो करी जनामधि जागृती
मारूतीराया येई सहाया सदा अशा सुजनाप्रती . . . ४

ऎसी शक्ती नाही जगती हनुमानासम ती गती
शरणागत जे येताती त्या देई मारूती सन्मती . . . ॥ध्रु.॥

मदत करी जो सदा दुजासी स्वार्थाची ना त्या खंती
वरदहस्त तो मारूती ठेवी सदा अशा सुजनाप्रती . . . ५

ऎसी शक्ती नाही जगती हनुमानासम ती गती
शरणागत जे येताती त्या देई मारूती सन्मती . . . ॥ध्रु.॥

समजावणी

कोवळ्याशा रविराजाचे दूतचि येता दारी
पाहुनिया आनंदे मग मनपक्षी घेई भरारी . . . १

सुख स्वर्गीचे रोज येई हे विनामूल्यसे दारी
कामे होती झराझरा अन् अंगी येई हुशारी . . . २

निसर्गराजा कथिते तुजला तुझी खरी आभारी
सुवर्णाचा वर्षावच तो रोज जणू या धरेवरी . . . ३

वृक्षराज हा पांघरतो जणू शाल ही हिरवी जरतारी
माता पृथ्वी रोजच लेई शालु हा भरजरी . . . ४

स्वागतास ते तुझिया होती सज्ज खरे नरनारी
निसर्गदान हे दोन्ही हाते भरण्या सारी तयारी . . . ५

व्यर्थ न दवडी जन्मासी या शुभकर्माते सख्या करी
समजावणी ही तुजला करिते अरे मना बा परोपरी . . . ६

मैत्रिणीस

अगं मैत्रिणी गं ऽ ऽ ऽ
रोज तव याद येई मजला - - -

शाळेमध्ये मिळून गेलो
उडवुनी वेण्या बागडलो
हसलो रुसलो आणि भांडलो
आठवते का हे तुजला
अगं मैत्रिणी गं ऽ ऽ ऽ
रोज तव याद येई मजला - - - १

शाळा कॉलेज सरूनी जाता
संसारी मग मन हे रमता
सुखदुःखाच्या क्षणी तत्वता
स्मरते नियमित मी तुजला
अगं मैत्रिणी गं ऽ ऽ ऽ
रोज तव याद येई मजला - - - २

स्वप्नी आपण सखे येऊनी
पुन्हा एकदा सान होऊनी
गतकालाते पाहू वाकुनी
आवडेल ना हे तुजला
अगं मैत्रिणी गं ऽ ऽ ऽ
रोज तव याद येई मजला - - - ३

इवली विनती

भलेबुरे जो जसे वागतो भरल्या अपुल्या गेही
मिळे तसे त्या कर्माचे फळ नसे ठाऊके कधीही . . . १

द्यावे तेव्हा घ्यावे ऎसा नियम असे या जगती
परि ना स्मरती उपकाराला सुखेचि विसरूनी जाती . . . २

गोष्ट चांगली घडता त्याचे श्रेय सर्वही घेती
इतर जनांचे कौतुक कधि ना उदारचित्ते करिती . . . ३

लहानसहानही दोषांसचि ते पर्वतापरि गणती
कशी करावी अशा जनांवरी प्रीती वा ती भक्ती . . . ४

वडीलधारे आजी-आजोबा गोष्टीस एका कथिती
चुकले जरि जन इतर कितीही सोडू नये जनरीती . . . ५

भल्याबुर्‍या सार्‍या कर्मांचा हिशोब असतो वरती
चुकता केल्याविण न हिशोबा जात कुणीही वरती . . . ६

म्हणूनि जगती सकल जना जे सदा आपुले म्हणती
देव धरी तो वरदहस्त त्या गुणी जनांच्या वरती . . . ७

म्हणूनि कथिते तुम्हाप्रती हे चार शब्द मी अंती
राग नसावा लोभ असावा एकचि इवली विनती . . . ८

विठ्ठल अमुचा म्हणा

विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा
विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा . . .

वारीस याच्या वारकरी किती जाती ना गणना
गळाभेट ती होता कोणी सानथोर मानेना
भजन हरीचे करिता करिता पाणी ये नयना
तहानभूकही हरपूनि जाता देई विठू दर्शना
विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा
विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा . . . १

प्रेम शिंपुनी मनापासुनी नामा करी वंदना
ग्रहण कराया नैवेद्यास्तव धाडी आमंत्रणा
नाम्याची ती तगमग कळकळ परमेशा बघवेना
क्षीरसागरा सोडुनी येई नाम्याच्या अंगणा
विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा
विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा . . . २

सोडुनी सार्‍या मोहबंधना आले तुझिया शरणा
भवसागर हा तरूनि जाण्या धरिते तुझिया चरणा
तनमन माझे तुला वाहिले येऊ दे तुज करूणा
भेटीवाचु्नि तुझ्या विठ्ठला मजला मुळी करमेना
विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा
विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा . . . ३

नंदनंदना गोपीरमणा गोकुळवासी कान्हा
पुन्हापुन्हा हे कथिते तुजला दयाघना पावना
चातकापरि मन हे माझे आतुर तव दर्शना
चरणावरि तव ठेवुनि मस्तक करिते मी याचना
विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा
विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा . . . ५

जागोजागी जगती याच्या दिसती पाऊलखुणा
हेवेदावे पुसूनि टाका करू नका वल्गना
केवळ पैसा येई न कामा सकला अपुले म्हणा
सान जरि मी सर्वांहुनि तरी विनती सर्वांना
विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा
विठ्ठल अमुचा म्हणा सारे विठ्ठल अमुचा म्हणा . . . ६

शिवस्तवन

जय शंकरा जगदीश्वरा
तू येई मम मनमंदिरा
जय शंकरा ऽ ऽ ऽ शंकरा ऽ ऽ . . .

गंगालयी गिरिकेदारी
दारुकावनी रामेश्वरी
सौराष्ट्री अन्‌ श्रीशैलावरी
तू पार्वतीपरमेश्वरा
जय शंकरा जगदीश्वरा
तू येई मम मनमंदिरा
जय शंकरा ऽ ऽ ऽ शंकरा ऽ ऽ . . . १

उज्जयिनी अन्‌ ओंकारी
परळी तसे भीमशंकरी
त्र्यंबकी नि घृष्णेश्वरी
काशीसी तू विश्वंभरा
जय शंकरा जगदीश्वरा
तू येई मम मनमंदिरा
जय शंकरा ऽ ऽ ऽ शंकरा ऽ ऽ . . . २

हिमपर्वती वस्ती जरी
गंगेसी घेसी शिरावरी
भस्मावलेपनमंदिरी
तुज नमन हे शशीशेखरा
जय शंकरा जगदीश्वरा
तू येई मम मनमंदिरा
जय शंकरा ऽ ऽ ऽ शंकरा ऽ ऽ . . . ३

सय

उठत बसत रांगत दुडू दुडू बाळ धावे
घरभरी धावताना रुणझुणती वाळे - - - १

कागद-पेन सार्‍या सार्‍याची चव घेऊनि पाही
सानुलासा कणही त्या नजरेत येई - - - २

साधे तरी रोज नवे खेळणे लागते बाई
कालच्याही खेळण्याची नावड कशी होई - - - ३

मागे हिच्या लागता लागता होईना काम काही
‘अगं अगं’ म्हणता म्हणता दिवस सरूनि जाई - - - ४

आई-बाळ हे जन्मभराचे नाते जुळूनि येई
आई म्हणजे चीज काय ते उमगले बाई - - - ५

पंचमीचा सण नयनी आसवे घेऊनि येई
सय मायमाऊलीची मनी भरूनी राही - - - ६

पंचमीचा सण नयनी आसवे घेऊनि येई
चार दिवस तुजघरी यावेसे वाटते, आई - - - ७

सारमेया

सारमेया* तू वससि जरि दारी
मिळे तुजला जरि दूध-पोळी न्यारी
प्राण देऊनि तू करिसी करिसी ही चाकारी
मान हलवीता गळा दोरी भारी - - - १

पुच्छ हलवोनी धन्या खूष करिसी
जगी नाही ती स्वामिभक्ती ऎसी
मान अडकवुनी साखळीत ऎसी
नीज येई तुज सांग गड्या कैसी - - - २

मिळे पुढती जे सुखाने गिळावे
नयन झाकोनी उगी की रहावे
कधि न वाटे तुज रानीवनी जावे
स्वये मिळवोनी दोन घास खावे - - - ३

रक्तामधली नाती

आपण सारे सूज्ञ आहा तरी इवली माझी विनती
सुष्ट दुष्ट वा नरनारी कुणी पुन्हा न येती खालती
स्वर्ग नरक हा खेळ मनीचा मृत्युलोकी जरी जगती
म्हणूनि कथिते आयुष्याची पाने उलटू जुनी ती . . . १

जुन्या कडू त्या आठवणींची दूर सारुनी गर्दी
सुवर्णाक्षरे लिहुया सारे कोर्‍या पाटीवरती
जात्यमधि कुणी कुणी सुपामधि अमर न कुणीही असती
विसरूनी कैसे गेलो सारे कुंठित होई मती ती . . . २

लहानमोठ्या मोत्यांची ती माला सुंदर होती
एक एक मणि निखळूनी जाता उरे न काही अंती
एकही इच्छा उरली नाही हौस भागली पुरती
दोन गोड शब्दही पुरेत म्हणती रक्तामधली नाती . . . ३

राम अससी तू

राम अससी तू कन्हैय्या माझा तू ऽ ऽ ऽ
मुखी माझिया नामरूपे वससी तू ऽ ऽ ऽ
राम अससी तू . . . १

सार्‍या जगाचा नियंता होसी तू ऽ ऽ ऽ
शरणार्थीसी देसी सन्मती तू ऽ ऽ ऽ
राम अससी तू . . . २

येता संकट वाट दाविसी तू ऽ ऽ ऽ
भवसागरातूनी तारिसी तू ऽ ऽ ऽ
राम अससी तू . . . ३

द्रौपदीचा रे कृष्णसखा अससी तू ऽ ऽ ऽ
सीतामाईचा रामरमैय्या तू ऽ ऽ ऽ
राम अससी तू . . . ४

भक्तजनांचा प्राणविसावा तू ऽ ऽ ऽ
गीतारूपाने ज्ञानसांगावा तू ऽ ऽ ऽ
राम अससी तू . . . ५

राम अससी तू कन्हैय्या माझा तू ऽ ऽ ऽ
मुखी माझिया नामरूपे वससी तू ऽ ऽ ऽ
राम अससी तू . . .
राम अससी तू . . .

पारिजाताचा सडा

पारिजाताचा गं पडे सडा केवढा
सडा केवढा गं पडे ढगाएवढा . . .

मंद गंध दरवळतो पहाटेस हा
दुजा नसे जगति कुणी अतुलनीय हा
दान द्यावे जगा जणू शिकवितो धडा
पारिजाताचा गं पडे सडा केवढा
सडा केवढा गं पडे ढगाएवढा . . . १

मोती-पोवळ्यांच्या राशी ओतितो पहा
स्वर्गलोकीचा ह वृक्ष दारी ये महा
कृष्णराज दिसे जणू दारी हा खडा
पारिजाताचा गं पडे सडा केवढा
सडा केवढा गं पडे ढगाएवढा . . . २

नवे घर

नव्या घरामधि सारे जाती
पूर्ण कराया सुखस्व्प्ने ती . . .

उंच उंच त्या इमारती किती
डोंगरमाथ्यावरी बांधिती
झोपडीत जरी कुणी राहती
आनंदाची परमावधि ती . . . १

कुणा बंगली कुणा चाळ ती
सुखात अपुल्या घरी नांदती
सकलांची परि एकचि धरती
देवो सकला सन्मती खरी ती . . . २

दारी जरी कधि येत अतिथी
प्रसन्नचित्ते दार उघडती
आनंदाने स्वागत करिती
समाधान ये त्यांच्या हाती . . . ३

हात आपुला धरता वरती
घरी येई ती सुखसमृद्धी
शुभाशीश तो देत अतिथी
तथास्तु म्हणते वास्तु गृहाप्रती . . . ४

Hits: 127