दत्तोबा दळवी

Written by Suresh Ranade

दत्तोबा दळवी हे कोल्हापूरातले एक वेळचे प्रसिध्द चित्रकार. बाबूराव पेंटर व त्यांचे बंधू आनंदराव पेंटर यांच्या संगतीने दळवी हे चित्रकलेकडे आकर्षित झाले. कलाशिक्षणाकरिता ते जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये गेले व तिथे त्यांना त्या काळचे विख्यात कलाशिक्षक तासकर व गणपत केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण मिळाले. त्याचप्रमाणे सेसिल बर्न्स, रा. ब. धुरंदर, आगासकर व त्रिंदाद यांसारख्या मातब्बर कलावंतांनीही त्याच्यांवर योग्य ते संस्कार घडविले. कोल्हापुरात परत आल्यानंतर कलाशिक्षण संस्था काढून शिक्षणाचे काम अंगावर घेतले. याचा परिणाम असा झाला की, दळवी हे हळूहळू व्यावसायिक चित्रकारांच्या पंक्तीमधून बाहेर होऊन कलाशिक्षकांच्या पंक्तीत जाऊन बसले. आर्ट स्कूलमध्ये झपाटल्यासारखे काम करणारे दळवी एकाएकी शांत स्थिर वृत्तीचे कलाशिक्षक बनले ते कायमचेच. त्यांच्या हातून स्वत:च्या अशा कलाकृती फार बनल्या नाहीत, पण ज्या उपलब्ध आहेत त्यांमधून यांच्यामधील कलानैपुण्याची ओळख पटते.
तंत्रामधील साधेपणा व छायाप्रकाशची सखोल जाणीव हे दळवींच्या चित्रातील एक प्रमुख गुण म्हणून दाखवता येतील. वस्तूंचे रेखनही मोजक्याच रेषांमधून दाखवलेले आहे. जलरंगाने भरुन ओथंबलेला ब्रश अलगदपणे चित्रपृष्ठावर फिरतो व चित्रातील विशेषत: छायाक्षेत्रामधून अनेक रंगांच्या छटा एकमेकात मिसळून जातात. आणि हे सर्व चित्रित करत असताना त्यांच्या समोरचे चित्र स्तब्ध होऊन गेले की काय असा भास होतो. विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्यांनी अनेक चित्रे बनविली. ते प्रत्येक विद्यार्थ्यांला शिकविताना जातीने मदत करत असत. त्यांच्या चुकात सुधारणा करीत. विद्यार्थ्यांनी सुमार दर्जाचे केलेले चित्र दळवींचे हात लागताच म्हणता म्हणता बदलून जाई. व त्यामधून एक रसरसलेले आणि तजेलदार रंगछटांनी नटलेले नवीन चित्र जन्म घेई. आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला आव्हान मिळे.

Hits: 20