आंबोली

Written by Suresh Ranade

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी या प्रसिद्ध शहरापासून हे ठिकाण अवघ्या ३५ कि. मी. अंतरावर आहे. सह्याद्रीच्या कुशीतच समुद्रसपाटीपासून सुमारे ६९० मीटर उंचीवर असलेले हे स्थान निसर्ग रम्यता आणि हवामान यासाठी प्रसिद्ध आहे. सभोवताली पसरलेले दाट जंगल, डोंगरदऱ्या, अप्रतिम सृष्टी सौंदर्य हे या स्थानाचे वैशिष्ट्य आहे. येथील नजिकच्या परिसरात सावंतवाडीच्या राजांचा राजवाडा व देवीचे मंदिर आहे. हिरण्यकेशी नदीत डुबक्या घेणे किंवा तिच्या काठाकाठाने भटकंती करणे मोठे आनंददायी वाटते. येथील हिरण्यकेशी मंदिरातून या नदीचा उगम होतो. जवळच १० कि. मी. अंतरावर नागरतास धबधबा आहे. महादेवगड, मनोहरगड आदि जुने किल्लेही नजिकच्या अंतरावर आहेत.
आंबोलीचं जंगल दाट असल्याने सभोवतालच्या परिसरात अनेकदा रानडुक्कर, ससे, गवे, बिबटे, चितळ आदि आणि वन्यप्राणी आढळतात. सहसा न दिसणाऱ्या पक्षांचेही येथे दर्शन होते.
Hits: 20