Designed & developed byDnyandeep Infotech

नृसिंहवाडी

Parent Category: महाराष्ट्र दर्शन
     

कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी हे एक प्रसिध्द तीर्थक्षेत्र आहे. नृसिंहवाडी म्हणजे दत्तसंप्रदायची राजधानीच. कोल्हापूरपासून सुमारे ४५ कि. मी. अंतरावर कृष्णा आणि पंचगंगेच्या पावन संगमावर हे क्षेत्र वसलेले आहे.

श्री दत्तगुरूंच्या अवतारामुळे नृसिंहवाडीचा परिसर पावन झाला असून, त्यांच्या स्वयंभू पादुकांची पूजा अर्चा येथे अखंड सुरू असते. श्री दत्तगुरूंचे साक्षात तिसरे अवतार मानले गेलेले श्री नृसिंह सरस्वती यांनी औदुंबर वृक्षांनी बहरलेल्या या अरण्यभूमीत १२ वर्षे वास्तव्य केले व त्यांनीच हा परिसर सुफल करून सोडला.

नृसिंहवाडीचे क्षेत्र कृष्णा व पंचगंगा या दोन नद्यांच्या मधोमध सुमारे एक चौरस मैल परिसरात पसरले आहे. गावची लोकसंख्या सुमारे चार हजारापर्यंत आहे. कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली सुंदर व मनोरम असे मंदिर आहे. मंदिरातच स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत. वाडीहून गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली. त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत. म्हणून त्याची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात.

सांप्रत उभे असलेले मंदिर विजापूरला अदिलशहा या मुसलमान बादशहाने बांधले आहे. विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले. तेव्हा बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून बादशहा नृसिंहवाडीस आला. त्याने श्री गुरूंचे दर्शन घेतले व नवस बोलला. पुजाऱ्याने अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळयाला लावला असता, तिला दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे बादशहा आनंदित झाला. त्याने कृष्णेच्या पैलतीरावरील औरवाड व गौरवाड ही दोन गावे देवस्थानच्या पूजेअर्चेसाठी इनाम दिल्याची नोंद आढळते. सध्या उभे असलेले श्री गुरुमंदिर विजापूरच्या मुसलमान बादशहाने बांधले असल्याने त्यावर कळस नाही, तर लांबट आकाराची उंच अशी वास्तू आहे आणि त्यासमोरच कृष्णेचा विस्तीर्ण घाट व कृष्णा नदी संथ वाहत आहे.
मधोमध श्रीगुरू ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली कृष्णा नदीसन्मुख त्या मनोहर पादुका आहेत व त्यापुढे थोडी मोकळी जागा आहे. त्याच ठिकाणी पुजारी बसतात व आतील गाभाऱ्यात पादुकांचे पूजन करतात. या गाभाऱ्याचे दार अतिशय लहान आहे. पादुका ज्या सभागृहात आहेत त्याच्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा मढविला आहे. मधोमध गणेशपट्टी, त्यावर आजूबाजूला मयूर व जय-विजय आणि त्यांच्या वरील बाजूस नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा उठवलेली आहे. पुजारी येथे आसनस्थ होऊन पूर्जा-अर्चा करतात, त्यांच्या एका बाजूला श्रीगणेशाची भव्य मूर्ती स्थापिली असून तिचीही पूजा होते.

या मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चारही बाजूंनी उंच व विस्तृत खांब आहेत.

X

Right Click

No right click