Designed & developed byDnyandeep Infotech

मनाचे श्लोक १३१-१४०

Parent Category: मराठी संस्कृती

भजाया जनी पाहता राम येकु ।
करी बाण येकु मुखी शब्द येकु ॥

क्रिया पाहता उद्धरे सर्व लोकु ।
धरा जानकीनायकाचा विवेकु ॥१३१॥

विचारूनि बोले विवंचूनि चाले ।
तयाचेनि संतप्त तेही निवाले ॥

बरे शोधिल्यावीण बोलो नको हो ।
जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो ॥१३२॥

हरीभक्त वीरक्त विज्ञानरासी ।
जेणे मानसीं स्थापिले निश्चयासीं ॥

तया दर्शनें स्पर्शनें पुण्य जोडे ।
तया भाषणें नष्ट संदेह मोडे ॥१३३॥

नसे गर्व अंगी सदा वीतरागी ।
क्षमा शांति भोगी दयादक्ष योगी ॥

नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा ।
इही लक्षणी जाणिजे योगिराणा ॥१३४॥

धरी रे मना संगती सज्जनाची ।
जेणे वृति हे पालटे दुर्जनाची ॥

बळे भाव सद्‍बुद्धि सन्मार्ग लागे ।
महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे ॥१३५॥

भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे ।
भयातीत ते संत आनंत पाहे ॥

जया पाहता द्वैत कांही दिसेना ।
भय मानसी सर्वथाही असेना ॥१३६॥

जिवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले ।
परी जीव अज्ञान तैसेचि ठेले ॥

देहेबुद्धिचे कर्म खोटे टळेना ॥
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥१३७॥

भ्रमे नाढळे वित्त ते गुप्त जाले ।
जिवा जन्मदारिद्र ठाकूनि आले ॥

देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥१३८॥

पुढे पाहता सर्वही कोंदलेसे ।
अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे ॥

अभावे कदा पुण्य गांठी पडेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥१३९॥

जयाचे तया चूकले प्राप्त नाही ।
गुणे गोविले जाहले दु:ख देही ॥
गुणावेगळी वृति तेही वळेना ।
जुने ठेवणे मीपणे आकळेना ॥१४०॥

X

Right Click

No right click