मनाचे श्लोक १०१-११०

Written by Suresh Ranade

जया नावडे नाम त्या यम जाची ।
विकल्पे उठे तर्क त्या नर्क ची ची ॥

म्हणोनि अती आदरे नाम घ्यावे ।
मुखे बोलता दोष जाती स्वभावे ॥१०१॥

अती लीनता सर्वभावे स्वभावे ।
जना सज्जनालागि संतोषवावे ॥

देहे कारणी सर्व लावीत जावे ।
सगूणी अती आदरेसी भजावे ॥१०२॥

हरीकीर्तने प्रीति रामी धरावी ।
देहेबुध्दि नीरूपणी वीसरावी ॥

परद्रव्य आणीक कांता परावी ।
यदर्थी मना सांडि जीवी करावी ॥१०३॥

क्रियेवीण नानापरी बोलिजेते ।
परी चीत दुश्चीत ते लाजवीते ॥

मना कल्पना धीट सैराट धांवे ।
तया मानवा देव कैसेनि पावे ॥१०४॥

विवेके क्रिया आपुली पालटावी ।
अती आदरे शुध्द क्रिया धरावी ॥

जनीं बोलण्यासारिखे चाल बापा ।
मना कल्पना सोडि संसारतापा ॥१०५॥

बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा ।
विवेके मना आवरी स्थानभ्रष्टा ॥

दया सर्व भूती जया मानवाला ।
सदा प्रेमळू भक्तीभावे निवाला ॥१०६॥

मना कोपआरोपणा ते नसावी ।
मना बुध्दि हे साधुसंगी वसावी ॥

मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी ।
मना होइ रे मोक्षभागी विभागी ॥१०७

सदा सर्वदा सज्जनाचेनि योगे ।
क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे ॥

क्रियेवीण वाचाळता ते निवारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१०८॥

जनी वादवेवाद सोडूनि द्यावा ।
जनी सूखसंवाद सूखे करावा ॥

जगी तोचि तो शोकसंतापहारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥१०९॥

तुटे वाद संवाद त्याते म्हणावे ।
विवेके अहंभाव याते जिणावे ॥

अहंतागुणे वाद नानाविकारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥११०॥

Hits: 11