मनाचे श्लोक ४१-५०

Written by Suresh Ranade

बहु हिंडता सौख्य होणार नाही ।
शिणावे परी नातुडे हीत कांही ॥
विचारे बरे अंतरा बोधवीजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥४१॥

बहूतांपरी हेचि आता धरावे ।
रघूनायका आपुलेसे करावे ॥

दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे ।
मना सज्जना राघवी वस्ति कीजे ॥४२॥

मना सज्जना एक जीवी धरावे ।
जनी आपुले हीत तूवा करावे ॥

रघूनायकावीण बोलो नको हो ।
सदा मानसी तो निजध्यास राहो ॥४३॥

मना रे जनी मौनमुद्रा धरावी ।
कथा आदरे राघवाची करावी ॥

नसे राम ते धाम सोडूनि द्यावे ।
सुखालागि आरण्य सेवीत जावे ॥४४॥

जयाचेनि संगे समाधान भंगे ।
अहंता अकस्मात येऊनि लागे ॥

तये संगतीची जनी कोण गोडी ।
नये संगतीने मनी राम सोडी ॥४५॥

मना जे घडी राघवेंवीण गेली ।
जनी आपुली ते तुवा हानी केली ॥

रघूनायकावीण तो शीण आहे ।
जनी दक्ष तो लक्ष लावूनि पाहे ॥४६॥

मनी लोचनी श्रीहरी तोचि पाहे ।
जनी जाणता भक्त होऊनि राहे ॥

गुणी प्रीति राखे क्रमू साधनाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४७॥

सदा देवकाजी झिजे देह ज्याचा ।
सदा रामनामे वदे नित्य वाचा ॥

स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४८॥

सदा बोलण्यासारिखें चालताहे ।
अनेकीं सदा एक देवासि पाहे ॥

सगूणीं भजे लेश नाहीं भ्रमाचा ।
जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥४९॥

नसे अंतरी काम नाना विकारी ।
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ॥

निवाला मनी लेश नाही तमाचा ।
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥५०॥

Hits: 15