मनाचे श्लोक ११-२०

Written by Suresh Ranade

जगीं सर्व सूखी असा कोण आहे ।
विचारे मना तूंचि शोधूनि पाहे ॥
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले ।
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ॥११॥

मना मानसी दु:ख आणू नको रे ।
मना सर्वथा शोक चिंत़ा नको रे ॥
विवेकें देहबुध्दि सोडूनि द्यावी ।
विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥१२॥

मना सांग पां रावणा काय झाले ।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ॥
म्हणोनी कुडी वासना सांडि वेगीं ।
बळे लागला काळ हा पाठलागी ॥१३॥

जिवा कर्मयोगें जनी जन्म झाला ।
परी शेवटीं काळमूखी निमाला ॥
महाथोर ते मृत्युपंथेचि गेले ।
कितीएक ते जन्मले आणि मेले ॥१४॥

मना पाहता सत्य हे मृत्यभूमी ।
जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥
चिरंजीव हे सर्वही मानिताती ।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥१५॥

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।
अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
पुरेना जनी लोभ रे क्षोभ होतो ।
म्हणोनी जनीं मागुता जन्म घेतो ॥१६॥

मनीं मानव व्यर्थ चिंता वहाते ।
अकस्मात होणार हो्ऊन जाते ॥

घडे भोगणे सर्वही कर्मयोगे ।
मतीमंद ते खेद मानी वियोगे ॥१७॥

मना राघवेवीण आशा नको रे ।
मना मानवाची नको कीर्ति तू रे ॥
जया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे ।
तया वर्णिती सर्वही श्लाघ्यवाणे ॥१८॥

मना सर्वथा सत्य सांडू नको रे ।
मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ॥

मना सत्य ते सत़्य वाचे वदावे ।
मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावे ॥१९॥

बहू हिंपुटी होईजे मायपोटी ।
नको रे मना यातना तेचि मोठी ॥

निरोगे पचे कोंडिले गर्भवासी ।
अधोमूख रे दु:ख त्या बाळकासी ॥२०॥

Hits: 9