मनाचे श्लोक १-१०

Written by Suresh Ranade

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
नमू शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमू पंथ आनंत या राघवाचा ॥१॥

मना सज्जना भक्तिपंथेचि जावे ।
तरी श्रीहरी पाविेतो स्वभावे ॥
जनी निंद्य ते सर्व सोडूनि द्यावे ।
जनी वंद्य ते सर्वभावे करावे ॥२॥

प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।
पुढे वैखरी राम आधी वदावा ॥
सदाचार हा थोर सांडू नये तो ।
जनी तोचि तो मानवी धन्य होतो ॥३॥

मना वासना दुष्ट कामा नये रे ।
मना सर्वथा पापबुध्दी नको रे ॥
मना धर्मता नीति सोडू नको हो ।
मना अंतरी सार विचार राहो ॥४॥

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा ।
मना सत्यसंकल्प जीवीं धरावा ॥
मना कल्पना ते नको वीषयांची ।
विकारे घडे हो जनी सर्व ची ची ॥५॥

नको रे मना क्रोध हा खेदकारी ।
नको रे मना काम नाना विकारी ॥
नको रे मना लोभ हा अंगिकारु ।
नको रे मना मत्सरु दंभ भारु ॥६॥

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे ।
मना बोलणे नीच सोशीत जावे ॥
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे ।
मना सर्व लोकांसि रे नीववावे ॥७॥

देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी ।
मना सज्जना हेचिं क्रिया धरावी ॥
मना चंदनाचे परी त्वां झिजावे ।
परी अंतरी सज्जना नीववावे ॥८॥

नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे ।
अति स्वार्थबुध्दी न रे पाप साचे ॥
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे ।
न होता मनासारिखे दु:ख मोठे ॥९॥

सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी ।
सुखाची स्वये सांडि जीवी करावी ॥

देहेदु:ख हे सूख मानीत जावे ।
विवेकें सदा सस्वरुपीं भरावें ॥१०॥

Hits: 29