मसाले भात

Written by Suresh Ranade
 
मसाले भात

साहित्य :-
चार वाट्या तांदूळ, पाव किलो वांगी, एक वाटी तेल, जिरे एक ते दीड चमचा, तितकेच धने, दोन चमचे गोडा (काळा) मसाला, पाव वाटी सुके खोबरे, दोन सुक्या मिरच्या, ३-४ चमचे मीठ, २-३ चमचे साखर अथवा गूळ, १०-१५ काजू, एक वाटी खोवलेले खोबरे, एक वाटी सायीचे दही, कढीलिंब, कोथिंबीर व फोडणीचे साहित्य.
कृती :

तांदूळ एक तासभर आधी धुऊन ठेवावेत. वांग्याच्या फोडी करून अगर बारीक व लहान वांगी असल्यास भरल्या वांग्याप्रमाणे चिरून, पाण्यात थोडे मीठ घालून, त्यात टाकून ठेवावीत. मिठामुळे वांग्याचा काळा राप निघून जातो. कढीलिंब घालून नेहमीप्रमाणे फोडणी करावी. तांदूळ फोडणीला टाकून चांगले परतावेत. तांदळाबरोबरच वांग्याच्या फोडी अगर वांगी परतावीत. तांदळाच्या दुप्पट पाणी घेऊन त्यास उकळी आणावी व ते पाणी तांदळावर ओतावे. धनेे, जिरे, सुक्या मिरच्या व सुके खोबरे भाजून घेऊन कुटावे व भात शिजत आल्यावर त्यात हा मसाला, मीठ, साखर अथवा गूळ, काळा मसाला व काजूगर घालावे. दोन चांगल्या वाफा द्याव्या. एक वाफ येण्यापूर्वी त्यात एक वाटी सायीचे दही घालावे. नंतर भात मंद निखाऱ्यावर ठेवावा व वाढतेवेळी त्यावर खोवलेले खोबरे व कोथिंबीर पसरावी. भरल्या वांग्यांच्या भाजीप्रमाणे लहान वांगी मसाला भरून घातल्यासही चांगली लागतात.

 

 

Hits: 20