दही-मिसळ

Written by Suresh Ranade

 

 
दही-मिसळ
 
साहित्य :-
ओला अगर सुका वाटाणा एक वाटी, मटकी दोन वाट्या, चवळी एक वाटी, उकडलेल्या बटाट्याच्या फोडी एक वाटी, टोमॅटोच्या फोडी एक वाटी, बारीक शेव दीड वाटी, चिवडा दोन वाट्या, चिरलेला कांदा एक वाटी, ओले खोबरे एक वाटी, चिरलेली कोथिंबीर एक वाटी, एक लिटर दुधाचे गोड मलईचे दही, तिखट, मीठ, काळा मसाला, चिंच, गूळ, तेल, फोडणीचे साहित्य.
कृती :
 सुका वाटाणा, मटकी व चवळी भिजत घालावीत. मटकीस मोड येऊ द्यावेत. ओले मटार असल्यास जास्त चांगले. तेलाची खमंग फोडणी करावी व भिजविलेली धान्ये फोडणीस टाकून, एक-दोन वाफा आल्यावर पाणी घालून चांगली शिजवावीत. नंतर त्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ, गूळ, चिंचेचे पाणी व काळा मसाला हे सर्व जिन्नस नेहमीच्या प्रमाणापेक्षा थोडे जास्त घालावेत. थोडासा रस राखून ही उसळ तयार करून घ्यावी. बटाटे वाफवून, ते सोलून त्यांच्या फोडी कराव्यात. कांदा व कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. खावयास देतेवेळी खोलगट डिशमध्ये गरम उसळ प्रथम घालावी. त्यावर बटाट्याच्या फोडी व बारीक चिरलेला कांदा घालावा. त्यावर बारीक शेव व चिवडा घालावा. त्यावर सभोवती टोमॅटोच्या फोडी, कोथिंबीर व ओले खोबरे घालावे व मध्ये दही घालावे. वाटल्यास दह्यावर दोन-तीन टोमॅटोच्या फोडी घालाव्या, म्हणजे सजावटीच्या दृष्टीने उठून दिसेल. अन्य तऱ्हेनेही सजावट करण्यास हरकत नाही. टीप - वर दिलेले साहित्य व प्रमाण आपापल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त करण्यास हरकत नाही. या मिसळमध्ये डाळीच्या पिठाची जी व पापडीही घालतात.

 

Hits: 21