सामोसे

Written by Suresh Ranade
साहित्य :-
दोन वाट्या मैदा, दोन बटाटे, मटारचे दाणे पाऊण वाटी, कोवळी चिरलेली फरसबी पाऊण वाटी, कांदा चिरलेला पाऊण वाटी, ओले खोबरे पाऊण वाटी, पंधरा-वीस ओल्या मिरच्या, आल्याचा दोन इंच तुकडा, दहा-बारा लसणीच्या पाकळया, दोन चमचे जिरे, तीन चमचे धने, चिरलेली कोथिंबीर पाऊण वाटी, मीठ, साखर, अनारदाणे अगर लिंबू.
कृती :

मैद्यात थोडेसे मीठ व पाव वाटी तेल व पाणी घालून मैदा पोळयांच्या कणकेइतपत भिजवावा. फरसबी व मटार तेलावर परतून घ्यावेत. धने व जिरे भाजून, कुटून घ्यावेत. मिरच्या, आले व लसूण वाटून घ्यावे. बटाटे उकडून कुस्करावेत. नंतर फरसबी, मटार, धन्या-जिऱ्याची पूड, मिरच्या, लसूण व आले यांचा वाटलेला गोळा व कुस्करलेला बटाटा हे सर्व एकत्र करून, त्यात आंबटपणाकरिता वाटलेले अनारदाणे घालून अगर लिंबू पिळून सारण तयार करावे. मैद्याच्या लिंबाएवढ्या दोन गोळया घेऊन त्या पुरीसारख्या लाटाव्या व एका पुरीला तेल लावून त्यावर थोडी पिठी लावावी व त्या पुरीवर दुसरी पुरी ठेवावी व ही जोड-पुरी पोळीप्रमाणे मोठी लाटावी. नंतर ती पोळी भाजावी. पोळी कडक भाजू नये. पोळी फुगल्याबरोबर काढून ती ओल्या फडक्याखाली झाकून ठेवावी. नंतर सुरीने त्या पोळीच्या उभ्या तीन पट्ट्या पाडाव्या. त्या पट्ट्या सोडवून घेतल्यावर सहा पट्ट्या होतील. ह्या पट्ट्या रेफ्रिजेटरमध्ये ठेवल्यास पंधरा दिवससुध्दा टिकतात. त्यापैंकी एक पट्टी घेऊन, तिची खणासारखी घडी घालून, त्यात तयार केलेले सारण घालून, घडी घालावी व शेवटची घडी घातल्यावर जे टोक राहील, ते भिजवलेला मैदा अगर कणीक लावून चिकटवावे. नंतर ते सामोसे तेलात बदामी रंगावर तळून काढावेत. खावयास देताना बरोबर खोबऱ्याची चटणी द्यावे.

 

Hits: 15