भाद्रपद

Written by Suresh Ranade
अनंत चतुर्दशी


भाद्रपद शुध्द चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणत असतात. या दिवशी अनंत म्हणजे विष्णुची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात.

आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे व आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेले रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात.

पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. पुढे या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत ब्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला. अशी कथा आहे.

गणेश चतुर्थी

आपल्या भारतीयांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन भाद्रपद शुध्द चतुर्थीस होते. व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो. गणरायाची जन्म कथा अशी आहे. एकदा पार्वती मातेस स्नान करण्यास जावयाचे असताना बाहेर कोणीच राहण्याकरता नसल्यामुळे तिने मातीची मूर्ती करून ती जिवंत केली व पहारेकरी नेमून कोणालाही आत मध्ये येऊ देऊ नको असे सांगून पार्वतीमाता स्नानास निघून गेली.

काही वेळाने भगवान शंकर तिथे आले. व आत जाऊ लागले. पहारेकऱ्याने त्यांना रोखले. भगवान शंकर संतप्त होऊन त्यांनी पहारेकऱ्याचे शिरच उडवले.

पार्वतीमाता स्नान करून परत आल्यावर पहारेकऱ्याला मारलेले पाहून अतिशय संतापली. तेंव्हा शंकरांनी आपल्या गण नावाच्या शिष्याला बाहेर जाऊन जो कोणी भेटेल त्या प्राण्याचे डोके कापून घेऊन ये असा आदेश दिला. गण बाहेर पडल्यावर त्याला एक हत्ती दिसला. त्याचे मस्तक कापून तो घेऊन आला. भगवान शंकरांनी ते मस्तक पुतळयाला लावले व जिवंत केले. हा पार्वतीमातेचा मानस पुत्र गज (हत्ती) आनन (मुख) असलेला गजानन होय. भगवान शंकराच्या गणाचा ईश म्हणजे परमेश्वर म्हणून गणेश हे नांव ठेवले. हा दिवस चतुर्थी चा होता. त्यामुळे चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणून महत्व आहे.

या दिवशी भक्तगण श्रीगणेशाची पूजा, प्रार्थना व तसेच उपवास करून भक्ती करतात. भाद्रपद चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्या महाराष्ट्नत फार मोठा उत्सव साजरा होत असतो. श्रीगणेशाचे वास्तव्य या काळात मानण्यात येऊन गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जातात. ह्या गणेश उत्सवाची सुरूवात लोकमान्य टिळकांनी केली.

हरितालिका

भाद्रपद शुध्द तृतीयेला हरितालिका हा सण येतो.

हरितालिका हा सण कुमारिका सौभाग्यासाठी करतात. हिमालयाची कन्या गौरी हिने या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकर पती मिळावा म्हणून कठोर तप व उपवास केला होता. त्यामुळे भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यांनी विवाह करण्याचे मान्य केले. भगवान शंकर पती म्हणून लाभले.

या दिवशी स्त्रिया समुद्रातील व नदीतील वाळू आणून पार्वती व सखी यांच्या मूर्ती व महादेवाची पिंड करतात व त्या दिवशी उपवास करून मूर्तीची भक्तीभावे पूजा करतात. व रात्री धुपारती, कथा श्रवण व जागरण करतात. हरितालिकेचे व्रत केल्याने मुलींना चांगला वर व अखंड सौभाग्य, आरोग्य व सुखसंपत्ती प्राप्त होते.

महालक्ष्मी
आपल्या महाराष्ट्रात महालक्ष्मीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महालक्ष्मी हे देवी जगदंबेचे नामरूप असून जेष्ठा व कनिष्ठा या दोन भगिनी असून त्यांच्या पूजनात सौख्य समृध्दी व अखंड सौभाग्य प्राप्त होते.

भाद्रपद महिन्यात व मूळ नक्षत्रावर सुरू करून तीन दिवस हा सण साजरा करण्यात येत असून पहिल्या दिवशी आगमन, दुसऱ्यादिवशी पूजा अर्चा व तिसऱ्या दिवशी सौभाग्य लेणे देण्यात येते.
महालक्ष्मीची कथा अशी आहे.
पौराणिक काळात कोलासुर नावाचा दुष्ट राक्षस स्त्रियांना अतिशय त्रास द्यायचा. सर्व स्त्रिया कंटाळून अखेर ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे कडे गेल्या तेव्हा परमेश्वराने कोलासुर राक्षसाचा नाश करण्याची जबाबदारी महालक्ष्मी देवीवर सोपविली. देवीने कोलासुर राक्षसाशी घनघोर युध्द करून त्याचा वध केला. व स्त्रियांना त्याच्या त्रासापासून मुक्त केले. त्याविषयी कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो.

अशा या संकट निवारिणी देवीची सर्व हिंदूबांधव भक्तीभावाने पूजा करतात.

 

Hits: 23