Designed & developed byDnyandeep Infotech

चैत्र

Parent Category: मराठी संस्कृती
चैत्र महिना हा आपल्या भारतीय वर्षाचा पहिला महिना आहे. इंग्रजी महिन्याच्या साधारण एप्रिल महिन्यात येतो. हा महिना वसंतऋतूच्या सुरूवातीचा आहे. गुढीपाडवा हा सण याच महिन्यात येतो. थंडी कमी होऊन उन्हाळा सुरू व्हावयाचा असतो. त्यामुळे या महिन्यात आल्हाददायक वातावरण असते.
गुढीपाडवा
हिंदू धर्मियांच्या नवीन वर्षातील पहिला सण गुढीपाडवा आहे. हा दिवस साडेतीन मुहुर्तापैकी एक असून कोणत्याही नवीन कामाची सुरूवात करण्यास शुभ मानतात. आपला भारतीयांचा नवीन वर्षाचा प्रारंभ याच दिवशी म्हणजेच चैत्र शुध्द प्रतिपदेस होतो. म्हणून या दिवसाला वर्ष प्रतिपदा असे म्हणतात.
याच दिवशी सूर्योदयाच्या वेळी ब्रम्हदेवाने सृष्टीची निर्मिती केली होती. म्हणून काही ठिकाणी ह्या दिवसाला ब्रम्हपूजा तसेच जो वार असेल त्या अधिपतींची पूजा करतात.

प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा वध करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. शालीवाहन राजाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला ह्या शुभ गोष्टी याच दिवशी घडल्या म्हणून घरोघरी वर्षप्रतिपदेच्या दिवशी वेळूची काठी स्वच्छ धुवून, तिला तांबडे वस्त्र नेसवून, फुलांची माळ व साखरेची गाठी बांधतात. टोकावर चांदीचे किंवा तांब्याचे फुलपात्र पालथे ठेवतात. मग अशीच सजवलेली गुढी घराच्या दाराशी उंच गच्चीवर लावून आनंद साजरा करतात. या पाडव्याच्या शुभदिनी नव्या वर्षात सहकार्य करण्याचा संकल्प करावा व शुभेच्छा व्यक्त कराव्यात.

X

Right Click

No right click