रक्षाबंधन - १

Written by Suresh Ranade

रक्षाबंधनाचे दिवशी आम्ही पाच भाऊ व तीन बहिणी माझ्या मोठया बहिणीच्या घरी एकत्र येऊन राखी बांधणे व नंतर भोजन असा कार्यक्रम आयोजित केला होता. माझ्या मोठया बहिणीचा मुलगा व सून अमेरिकेतून आल्यामुळे तिनेच आग्रहाने आम्हा सर्वांना बोलावले होते. रविवारचा दिवस असल्याने सर्वानाच सुट्टी होती. हॉलमध्ये मध्यावर एक पाट मांडून सभोवती सुरेख रांगोळी काढली होती. प्रत्येकाला या पाटावर बसवून बहिणी राख्या बांधत होत्या आणि आम्ही सर्व भाऊ बहिणींना भेटवस्तू देत होतो. आम्हा सर्व भाऊबहिणींचे विवाह झाल्यानंतर प्रथमच आम्ही सर्वजण रक्षाबंधनाचे दिवशी एकत्र जमत होतो. आम्हां सर्व कुटुंबियांच्या हृदयपटलावर कोरून राहाणारा हा प्रसंग कधीही विसरता येणार नाही. दुसर्‍या दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट रोजी सर्वांनी माझ्या घरी भोजनास यायचे, असे आग्रहाचे निमंत्रण सर्वांना देऊन आम्ही घरी परत आलो. रक्षाबंधनाचा हा दिवस जसा आम्हा सर्वांच्या लक्षात राहिला तसाच हा रक्षाबंधनाचा दिवस सर्व मुंबईकरांच्या लक्षात जन्मभर राहील असे जर कोणी आम्हाला सांगितले असते तर त्यावर आमचा विश्वासच बसला नसता.
१५ ऑगस्ट, सोमवारी सर्व ठिकाणी नेहमी प्रमाणे झेंडावंदनाचे कार्यक्रम दाखवून झाले. माझ्या आमंत्रणाप्रमाणे सर्वजण ११ वाजेपर्यंत आमचे घरी जमले होते. आमच्या गप्पा सुरू असल्याने आम्ही चित्रवाणी संच बंद ठेवला होता. पण माझ्या भाच्याचे हट्टाने तो लावला आणि त्यावरील विशेष ताजी बातमी वाचून सर्वानाच आश्चर्य वाटले. संध्याकाळी सहा वाजता दादरच्या शिवाजी उद्यानावर एका प्रचंड सभेचे आयोजन केले होते. प्रचंड म्हणण्याचे कारण असे की या सभेला सर्वानी यावे असे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व पुढारी चित्रवाणीवर जनतेला विनंती करीत होते आणि कारणही तसेच होते. या सभेत सर्व पक्षांचे पुढारी व्यासपीठावर येऊन दोन तरूण आणि एक तरूणी यांचे अभिनंदन करणार होतेच, शिवाय हजारो लोकांचे प्राण वाचवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार होते. या सभेला सर्वाना येता यावं म्हणून संध्याकाळचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द केले होते. एकमेकांचे उणेदुणे काढणारे पुढारी आणि शत्रू समजून दगडफेक करणारे त्यांचे कार्यकर्ते सर्व भेदभाव विसरून शिवाजी उद्यानावर एकत्र येणार होते.
कोण होते हे दोन तरूण आणि एक तरूणी ? एक तरूण होता महमद मुलाणी आणि दुसरे दोघे होते सुसंस्कृत घराण्यातील सख्खे भाऊ बहीण, मनोहर देशपांडे आणि सौ. मधुरा कुलकर्णी. काय केलं यानी आणि कशामुळे वाचले हजारो लोकांचे प्राण ? कारण एकच, रक्षाबंधन !
सौ. मधुराने मनोहर व महंमद यांना बांधलेली राखी.

Hits: 38