Designed & developed byDnyandeep Infotech

मस्त मज्जा माडी भाग - ३

Parent Category: मराठी साहित्य

----------------------------------------- वैभव मालसे, बंगलोर
बि.एम्.टी. बस मध्ये पुरुषांना बसण्यासाठी मागील भाग तर स्त्रीयांसाठी पुढचा भाग राखीव असतो.त्यामुळे पुरुष व स्त्रीयांचा संपर्क खूप कमी येतो.पुण्यामध्ये बसच्या डाव्याबाजुची जागा स्त्रीयांसाठी राखीव असते.या निर्णयावर बरेच वाद झाले. स्त्रीया राखीव जागा मिळाली ,यातच खूष आहेत.जयानगरची तुलना पुण्याच्या डेक्कनशी करायला हरकत नाही.लोक इथे वेळ घालवण्यासाठी येतात.मुली आपला मेकप आणि तोकडे कपडे दाखवायला आणि मुलं मुलीना बघायला, याच भागात येतात.बँगलोरला 'वनवें'च शहर सुध्दा म्हणतात, ते इथे येवून आपल्याला नक्की पटेल.
नेहमी प्रमाणे शक्यतेवढ्या सर्व मोठ्या 'ब्रँडस्'ची शोरुम्स् येथे आहेत. 'माँल्स' ही नवीन संस्कृती या 'काँस्मोपाँलिटन' शहरामध्ये आली आहे.इथे गल्लो गल्ली माँल्स आहेत.लोक येथे आपलं 'स्टेटस' दाखवायला येतात असं मला वाटतं.खूप पैसा उधळून , सगळीकडे लखलखाट करून ,३-४ मजल्यांमध्ये जास्तीत जास्त ब्रँडस् ची दुकाने एकत्र आली की, जी काही वास्तू तयार होते , त्याला माँल म्हणता येइल.या माँल मध्ये माझ्यासारखे 'मध्यम वर्गीय' फक्त वेळ घालवणे याच एका उदात्त हेतूने जाउ शकतात. विकत घेण्याच्या भानगडीत पडू नये. एकदा मी एका 'बरमुडा'ची किम्मत विचारली होती,त्याच किमतीमध्ये मला एक चांगल्या कंपनीची 'पँट' आली असती. मी 'थँक्यू'म्हणालो आणि पुढे निघालो.ह्या असल्या माँल्स मध्ये संभाषण फक्त 'आंग्ल' भाषेमध्ये करायचं असतं असचं माझ्या लक्षात आलं आहे. हिंदी मध्ये बोललं की सर्व लोक 'हा कोणत्या देशाचा?' अशा चेहर्‍याने बघतात.त्यात आमचं 'म्हींदी', मराठी लोक हिंदी बोलू लागले की ती शुद्ध हिंदी उरत नाही. 'भाइसाब, कांदा कैसे दिया ?' ऐकणारा माणूस तिन ताड उडतो. काहीच कळत नाही.हिंदीला सुद्धा मराठी 'टच' असतो.त्यामुळे संभाषण थोडं लांबतं. दोन वाक्यात संपू शकणारी गोष्ट एक निबंध बनून जाते.त्यातून बर्‍याच मजेशीर गोष्टी घडतात.
एका अशाच माँलचा धसका मी घेतला होता. मी आत चाललो होतो तर समोरचा भला मोठा काचेचा दरवाजा आपोआप उघडला, मी घाबरून २-४ पावलं मागे गेलो. सांगायचा मुद्दा असा की हे माँल्स असल्या काहीतरी अत्याधुनीक गोष्टींनी भरलेले असतात.पाय न हालवता वरती नेणारे जिने, आपोआप चालू-बंद होणारे नळ ,आपोआप उघडणारे दरवाजे , हात वाळवण्याची यंत्रं इत्यादी.मी एका 'फास्ट फूड' दुकाना मधून व्हेज ग्रिल-सँडविच घेतलं आणि हिरव्यागार झाडांच्या सावलीमध्ये चालू लागलो.बँगलोर मध्ये येवून व्हेज ग्रिल सँडविच , फ्रुट ज्युस आणि पेस्ट्रीज खाल्याशिवाय कोणिच जाउ नये हा फुकटसल्ला.खाण्याच्या बाबतीत आपल्या लोकांचे इथे हाल होतात.महाराष्टीयन हाँटेलचं येथे दुर्भीक्ष आहे.त्यामुळे जे कोणी महाराष्टीयन जेवण करून देतात ते, आपल्याच लोकान्ना लुटतात हे माझंच नाही, तर इतरही बर्‍याच लोकांचं मत आहे.या हाँटेल मध्ये महाराष्ट्रीयन लोकांसाठी खास 'सबसिडी' असावी अशी मी इच्छा व्यक्त केली,ती पूर्ण होइल तेव्हा बँगलोर महाराष्ट्रीयन लोकांनी भरून जाईल याची मला खात्री आहे.
संध्याकाळी थोडा वेळ घालवण्यासाठी मी मित्राला फोन केला.पुण्याप्रमाणेच बँगलोर मध्ये स्वत:ची गाडी असावी म्हणजे कमी वेळेमध्ये कामं होवू शकतात.इथली बस सेवा खूप चांगली असून सुध्दा येथे सर्वात मोठा प्रश्न आहे तो 'वाहतुकीचा'.मुंबईमध्ये 'लोकल' आहे,त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी करण्यामध्ये खूप मदत होते.तशी व्यवस्था सध्यातरी बँगलोर मध्ये नाही.त्यामुळे कामाच्यावेळेमध्ये बसेस तुडुंब भरलेल्या असतात.लोकांची खूप गैरसोय होते. यावर तोडगा म्हणून 'मेट्रो ट्रेन' हा नवीन प्रोजेक्ट बँगलोर मध्ये सुरू झाला आहे.यामुळे वाहनांमध्ये थोडीफार कमी येईल असा अंदाज आहे.
गाडी असल्यामुळे मित्र १५ मिनिटामध्ये आला. आता उरलेला वेळ एखादा चित्रपट बघून घालवायचा यावर अथक प्रयत्नाने एकमत झालं.परत एकदा आम्ही एका माँल मध्ये शिरलो.आपण ज्याला 'थेटर' म्हणतो त्याला असल्या मोठ्या शहरामध्ये 'मल्टीप्लेक्स' म्हणतात. फरक इतकाच की येथे एका पेक्षा जास्त पडदे असतात.त्यामुळे फक्त चित्रपटाची वेळ बघून भागत नाही , आपल्याला कोणत्या पडद्यावर तो चित्रपट आहे हे सुध्हा बघावं लागतं. त्या श्रीमंतांच्या पडद्यावर चित्रपट बघण्यासाठी, तिकिटाने माझ्या पाकिटाचा मोठा चावा घेतला होता. इथे 'बाल्कनी' ला 'गोल्ड क्लास' म्हणतात ही नविन गोष्ट मला कळाली.तिकिटाच्या किंमतीवरून नाव ठेवलं असावं. (एका टिपिकल पुणेकराचा द्रुष्टीकोन).
या ठिकाणी बायका दुसर्‍याबायकांचा मेकप, दागिने आणि पुरुष दुसर्‍यांच्या बायका बघायला येतात,या मताशी सर्वलोक नक्की सहमत होतील.आत गेलो आणि पैसे वसूल झाल्यासारखं वाटलं.खूप सूंदर व्यवस्था,कोणताही गोंधळ नाही, आरडा-ओरडा नाही,मंद संगीत लावून छान वातावरण निर्मिती केली होती.चित्रपट नेहमीप्रमाणेच रटाळ होता. लोक सुध्दा तो बघण्यासाठी येथे आले नसावेत.कारण त्यांचा बघण्यापेक्षा खाण्यावर जास्त जोर होता. ब्रेक झाला, मी नेहमीच्या सवयी प्रमाणे वडापाव आणि चहा शोधू लागलो.पण नंतर लक्षात आलं की मी पुण्यात नाही.येथे सर्वलोक ब्रेक मध्ये 'लाह्या' खातात आणि शीतपेये पितात.लाह्यांच्या किमतीमध्ये माझं जेवण झालं असतं,पण कधी कधी जगाप्रमाणे आपल्यालासुध्दा बदलावं लागतं,मी पण त्या उधळपट्टी मध्ये सामील झालो.सुरु झालेली गोष्ट केव्हातरी संपणारच,तसा चित्रपट देखील संपला,आम्ही चेहर्‍यावर जास्तीत जास्त आनंदी भाव आणून बाहेर आलो.तरी पण भूक ही माणसाला काहीही खायला भाग पाडते आणि जे काही खाउ ते गोड लागतं.बरेचशे महाराष्ट्रीयन इथे याच एका दैवी शक्ती मुळे सुखी आहेत असं म्हणायला हरकत नाही.
बाहेर आलो,घड्याळ पाहिलं रात्रीचे ९:३० वाजले होते.बँगलोर मध्ये खूप लवकर रस्ते शांत होतात.पुण्यामध्ये रात्री १ ते सकाळचे ४ हाच वेळ मिळतो भुतांना मुक्त संचार करण्यासाठी.इथे तस नाही, लोक खूप लवकर घरी जातात आणि शक्यतो रात्री बाहेत पडत नाहीत.त्यामुळे रस्ते शांत होते आणि मंद वारा होता.आता प्रश्न होता जेवणाचा. परत एकदा तेच पंजाबी जेवण जेवायचं या विचारानेच मित्राने चेहरा वाकडा केला.मी 'चायनिज?' त्याला कल्पना आवडली.आता या वेळी बँगलोर मध्ये चालू असलेलं हाँटेल शोधणं या सारख अवघड काम नाही.चायनीज हाँटेल रात्री उशिरापर्यंत सुरू असतात,त्यामुळे आमचा निर्णय योग्य होता.एका हाँटेल मध्ये शिरलो, शेवटचीच पंगत चालू असल्याप्रमाणे वातावरण होतं.आम्ही विचारलं तर 'ईट्झ क्लोज्ड , सर' हे उत्तर मिळालं.आम्ही जास्तीत जास्त 'बिचारे' चेहरे करुन आम्हाला एखादी डिश देण्यासाठी विनंती केली. त्याला दया आली. खाणं फरसं काही चांगलं नव्हतं.पण जे काही पानात पडेल ते गोड मानावं,हेच संस्कार लहानपणापासून झाल्यामुळे आम्ही अन्न गोड मानून घेतलं.नेहमी प्रमाणे वजनदार बिल आलं.बिल देउन आम्ही बाहेर आलो.
बँगलोर मध्ये वैयक्तीक आयुष्यासाठी वेळ बाजूला काढणं खूप कठीण असतं.त्यामुळे जोकाही वेळ मिळेल त्याचा पुरेपुर उपयोग करून घ्यायचा.कामाच्या दिवशी मित्रांना भेटणे शक्यच होत नाही.त्यामुळे 'आता भेट पुढच्या शनीवारी' असं म्हणून मी मित्राचा निरोप घेतला.रिक्शापकडली आणि घरी आलो. दिवसभर खूप फिरल्यामुळे थकलो होतो.आता दिवस संपला होता आणि मनामध्ये फक्त आठवणी उरल्या होत्या. त्या दिवशी भेटलेल्या आणि मला मदत केलेल्या सर्व लोकांचे आभार मानत ,अजुन एका अशाच 'यादगार' दिवसाची स्वप्नं बघत ,मी झोपी गेलो.

X

Right Click

No right click