सुस्त अशी दुपार उगवली आहे

Written by Suresh Ranade

सुस्त अशी दुपार उगवली आहे
सगळे शरीर सुस्तीने भेंडाळुन यावे अशी दुपार ...!
सर्वत्र सुन्न असे वातावरण ...
माणसाच्या जमावाला पण ओहोटी लागलीय
सगळीच पेंगत डुलकीच्या नशेत ...
कान नि मन बधीर व्हावे असे वातावरण
वटवाघळ! सारखी टांगून राहिलेय दुपार ..!!

झाडांच्या पानापानानी कसे घेतलेय स्वताला मिटवून
चिडीचुप्प स्वप्नात हरवून
काही गायी म्हशी स्वताला गुंडाळून
रवंथ करीत बसल्यात ही दुपार
कुत्रे देखील डोळे मिटून पेंगत बसलेय
भुंकायचे सोडून

सूर्य नारायणासारखा खत्रूड शिक्षक
नि मठ्ठ अशी ही दुपार ......!
गणित सुटले नाही की पट्टी हातावर
मग दुपार अशी केविलवाणी
रडकुंडीला आलेली ..
त्यामुळे कोरड पडलीय तिच्या घशाला ...!!


मठ्ठ चेह्र्यासारखी दिसतेय ही दुपार
मास्तरांनी शिक्षा दिल्यासारखी ...
पायाचे अंगठे धरून कंटाळलिय ही दुपार
ती वाट पाहतेय घंटेची
मग होईल संध्याकाळ नि गार हवा सुटेल
ही दुपार वाट पाहतेय त्या क्षणाची
तोपर्यत ती निमूट
सहन करतेय आपल्या प्राक्तन-भोगाला ...!!

तो वाट बघत बसलाय
दयेचा ,करुणेचा एखादा थेंब टपकेल त्याच्या ओंजळीत
कधीतरी ...!!
केव्हातरी ...!!!

Hits: 28