सुविचार - ९

Written by Suresh Ranade

स्तुतीने चांगली माणसे सुधारतात, तर वाईट माणसे बिघडतात.

सत्तेची हाव हा एक अत्यंत प्रबळ विचार आहे.

चांगल्या धनुर्धराची ओळख त्याने धरलेल्या नेमावरून समजते. जवळ बाळगलेल्या बाणावरून नाही.

दु:खद घटना येताना गरूडाच्या भरारीने येतात आणि जाताना मात्र मुंगीच्या पावलंनी जातात.

जीवन हा एक धुळीने माखलेला रस्ता आहे. त्यावर अगदी जपुन पावले टाकली पाहिजेत.

उत्पत्तीशिवाय स्थिती नाही, स्थितीशिवाय लय नाही, लयावाचून पुन: उत्पत्ती नाही.

क्वचित अर्थ न कळला, तरी नित्य पठनानेही आपली वाणी पवित्र होते व हळू हळू मन शुध्द होत राहाते.

मनुष्याला राग आला की तो किती खोटे बोलतो याला सुमारच नसतो. कारण रागाच्या भरात त्याची विचारशक्ती व सत्याबद्दलची निष्ठा नाहीशी होऊन गेलेली असते.

दाट धुक्याने क्षणभर दृष्टीला दिसत नाहीसा होणारा पर्वत जेथल्या तेथे व जसाच्या तसाच राहतो. धुके लवकरच निघून जाते.

जी माणसे आपल्या कुवतीप्रमाणे इच्छा करतात, सामर्थ्यानुसार काम करतात व कुणाचा अनादर करीत नाहीत; ती माणसे कर्तव्यदक्ष समजावीत.
विश्रांती मिळविण्याची धडपड करण्यातच माणसे थकून जातात.

स्वत:च्या वाट्याला जरी काटे आले असले, तरी दुसर्‍याला गुलाबाची सुंदर फुले देता येतात.

पापी माणसे तोंडानं बळकट असतात; पण अंत:करणांनं दुबळी असतात.

आत्मविश्वास, इच्छाशक्ती व दृढ निर्णय ह्या त्रिवेणी संगमाने जीवनाचा झरा जलद वाहत जातो.

स्वार्थाची ढाल आणि दुष्कृत्यांची तलवार हाती घेऊन लढणारा वीर स्त:च्या मरणाला कारणीभूत होतो.

कीर्तीरूपी दंवबिंदूंनी हृदयरूपी पान जास्त चमकत राहाते.

दु:खी माणासाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात, प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे.

मृत्यू हा माणसाला दिलेला शाप आहे, तर प्रीती हा उ:शाप आहे.

बहीण-भावाच्या प्रेमात पवित्रता असते; तर पती-पत्नीच्या प्रेमात मादकता असते. प्रेमाचे पावित्र्य शांती देते, तर मादकता मनुष्याला व्याकुळ बनवते.

चिंतेप्रमाणे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही.

प्रतिभा ही चारित्र्याची दासी आहे.

विवाह-होमात जर खरोखरी कसली आहुती द्यावी लागत असेल; तर ती जीविताकडे पाहण्याच्या साहसी वृत्तीची.

दोन अपूर्ण माणसांना एकमेकांना पूर्ण करण्याची जी विलक्षण तळमळ लागते तिचेच नाव प्रीती.

नीतीचा खून समाजाला पाहवत नाही. पण माणसाचे खून समाज हसतमुखाने पाहतो. माणसासाठी नीती असते. नीतीसाठी माणूस नसतो.

गुलाबाला काटे असतात म्हणून पिरपिरत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो म्हणून मजा मारावी हे उत्तम !

जगात पैशासाठी जितक्या लबाड्या केल्या जातात, त्यापेक्षा जास्त लबाड्या कीर्तीसाठी व नेतृत्वासाठी केल्या जातात.

कीर्ती हे उद्याचे सुंदर स्वप्न आहे, पण पैसा ही आजची भाकरी आहे.

जो समाजास नेत्राने, मनाने, वचनाने व आचरणाने खूष करतो, त्याच्यावर समाज खूष असतो.

कोणतेही तत्व जोपर्यंत स्वत:च्या आड येत नाही, तोपर्यंत त्याची पूजा करायला लोक तयार असतात; पण ज्या क्षणी ते त्यांच्यावर उलटते, त्या क्षणी ते त्यला दूर भिरकावून देतात.

तासभराचे ध्यान हे वर्षभर केलेल्या पूजेअर्चेहून श्रेष्ठ होय.

अपराधावाचून क्षमा करणे आणि पराक्रमावाचून बक्षिस देणे, या दोन्ही गोष्टी सारख्याच वेडगळपणाच्या आहेत.

सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे हा योगायोग आहे; पण सज्जन म्हणून मरणे आयुष्यभरची कमाई आहे !

उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता व वर्तनावरून शील समजते.

अज्ञ, श्रध्दाहीन व संशयखोर मनुष्याला कधीही सुख मिळत नाही.

दिलदार हृदयाशिवाय धनवान मनुष्यदेखील भिकारीच असतो.

हृदयात अपार सेवा भरली की, सर्वत्र मित्रच दिसतात.

जेव्हा मित्रच मित्राला बरबाद करतात, तेव्हा पेटलेल्या हृदयात शत्रुत्व धगधगते.

झाडाला पेटवून त्यांची राख करण्यास अजिबात वेळ लागत नाही; पण तीच झाडे रूजवून वाढविण्यास खूप काळ लागतो.

Hits: 37