सुविचार - २

Written by Suresh Ranade

माणसाचं मन मोठं विचित्र असतं. प्रेम आणि अहंकार, आशा आणि भीती यांचा पाठशिवणीचा खेळ तिथं अष्टौप्रहर चालतो. तो खेळ कधी संपत नाही आणि माणसाचं दु:ख कधी कमी होत नाही.

प्रेम हा जुगार आहे. माणसाचा जीव घेणारा जुगार आहे.

देशभक्ताचं रक्त म्हणजे स्वातंत्र्य-वृक्षाचे बीजच होय.

माणूस जर स्वत:च किड्याप्रमाणे राहू लागला, तर त्याने दुसर्‍याने आपल्याला तुडविले म्हणून कुरकुर करत बसू नये.

बुध्दी आणि भावना यांचा समन्वय म्हणजेच विवेक.

जो मूळचाच सद्गुणी असतो, त्यावर दुर्गुणाचा काहीही परिणाम होत नाही.

जीभ ही तीन इंच लांबीची खरी! पण तिच्यात सहा फूट माणसाला मारण्याचे सामर्थ्य असते.

धावत्या पाण्याला अचूक मार्ग सापडतो.

अत्तर तयार व्हायला फुलं सुगंधी असावी लागतात.

जितकी माणसं तितकी दु:खं! काही दु:ख उघड उघड दाखविता येतात. काही काळजात खोल खोल लपवावी लागतात.

भावना बुध्दीपेक्षा अधिक हट्टी असते. युगायुगांचे संस्कार तिच्या कणाकणात भिनलेले असतात.

म्हातारपण व मृत्यू यांच्या वेगवान प्रवाहात वाहत जाणार्‍या जीवांना धर्म हा दीपगृहासारखा आहे. धर्माचरणानेच उत्तम प्रतिष्ठा व सद्गती लाभते.

जखमांची भरपाई न्यायाने करा: निष्ठुरतेची भरपाई प्रेमाने करा.

नीतीचा खून समाजाला पाहवत नाही! पण माणसाचा खून तो हसतमुखाने पाहतो. माणसासाठी नीती असते. नीतीसाठी माणूस नसतो.

प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद विशेष होय.

मनुष्याच्या आत्म्याला पंख आहेत: शरीराला नाहीत. त्या शरीरानं पृथ्वीवरच चाललं पाहिजे. खडेकाटे, खाचखळगे, जीवजिवाणू हा सारा जीवनाचा भाग मानून त्यानं जगलं पाहिजे.

लग्न हा करार नसून संस्कार आहे.

संसाराच्या नौकेला नवरा शिडासारखा तर बायको सुकाणूसारखी असते.

निसर्ग जितका कोमल तितकाच क्रूर आहे.

कुठल्याही संकटसमयी मनुष्य आपल्या ध्येयापासून ढळला तर तो जिवंत असून मेल्याप्रमाणे आहे.

पाणी पर्वतात राहू शकत नाही, त्याचप्रमाणे सूडाची भावना थोर पुरूषाच्या हृदयात राहू शकत नाही.

मनुष्याची मुद्रा म्हणजे त्याचा जीवनग्रंथ. जीवनाच्या अनेक अनुभवाच्या रेषा उमटलेल्या असतात. काही रेषा अस्पष्ट तर काही खोल असतात.

गौरव हा पडण्यात नाही; पडून उठण्यात आहे.

चालीरीती म्हणजे सद्गुणांच्या पडछाया.

परिस्थितीच्या अधीन होण्यापेक्षा परिस्थितीलाच आपल्या इच्छेप्रमाणे वाकविले पाहिजे. निदान तसा प्रयत्न तरी केला पाहिजे.

जीवन ही लढाई आहे, जीवन हा यज्ञ आहे, जीवन हा सागर आहे. प्रीति आणि पराक्रम हेच जीवनाचे डोळे !

जगातील वाईट माणसं खाण्याकरिता जगतात आणि चांगली माणसं जगण्यासाठी खातात.

सत्य हे ताकातील लोण्यासारखे असते, खाली ढकलले तरी ते थोड्याच वेळात पृष्ठभागावर येऊन तरंगते.

अहंकार व लोभ हे माणसाच्या नव्व्याण्णव टक्के दु:खाचे कारण आहेत.

विचार हा जनक आणि शब्द हा त्याचा पुत्र.

राखेच्या ढिगार्‍याखाली ठिणगी विझून जावी तसं अनेकातलं देवत्व हळू हळू निस्तेज होत जातं.

देवाने एक दरवाजा बंद केला, तरी तो हजारो दरवाजे उघडतो.

सद्गुणाकरिता नेसलेली चिंधीदेखील बादशाही थाटाची बनते.

याचना हे आयुष्यातलं सर्वात अवघड वक्तृत्व आहे.

जीवनाचे मुखवटे तेवढे दर पिढीला बदलतात, पण त्याचा आत्मा एकच असतो.

तोंडातून बाहेर न पडलेल्या शब्दांवर आपली सत्ता असते. तोंडातून शब्द बाहेर पडले की त्यांची तुमच्यावर सत्ता चालते.

मागितल्याशिवाय मिळणारी गोष्ट दुधाप्रमाणे असते. मागितल्यानंतर मिळणारी गोष्ट जलासमान असते आणि बळजबरी करून लाभते ती रक्तासमान असते.

काळासारखा धन्वंतरी दुसरा कोणी नाही. दुभंगलेले हृदय कसे जोडावे आणि वठलेले झाड कसे पालवावे, हे त्याला कळत असते.

दंभ म्हणजे दुर्गुणांनी सद्गुणांना दिलेला मान होय.

सर्व काही गेल्यावर आपल्याजवळ जे काही उरते त्याला अनुभव म्हणतात.

आत्म्याची सुधारणा हा सर्व सुधारणांचा आत्मा आहे.

जे नंतर चांगले वाटते ते कृत्य `नैतिक' आणि जे कृत्य नंतर दु:खकारक ठरते ते `अनैतिक'.

पृथ्वीतलावरील दु:खे ही जीवनात नसतात, तर ती दु:खे संकुचित दृष्टीने पाहणार्‍या मानवाच्या मनात असतात.

हेतू, परिणाम आणि स्वरूप ही तिन्ही पाहून कर्माची योग्यता ठरवावी.

दुष्टाससुध्दा शक्ती असू शकते आणि तो मोहक स्वरूप धारण करू शकतो.

आपण जे सत्य शोधीत आहो, ते या जगात आहे. अगदी आपल्यापाशीच आहे. पण ते आपल्याला दिसत नाही, कधीही दिसणार नाही. त्याच्या सुवासानं धुंद होऊन ते धुंडून काढण्याकरिता धावत सुटता, याचंच
नाव जीवन !

लहान मुलांचं सुखदु:खाचं जग किती चिमणं असतं. जणू काही चिमणीचं घरटंच ! मात्र त्या घरातल्या कापसाला मुलांच्या दृष्टीनं सिंहासनापेक्षा अधिक महत्व असते.

खरं काव्य प्रणयाच्या पहिल्या फुलोर्‍यात नाही. ते संसारात, त्या फुलांच्या निर्माल्यात आहे. ते सुखदु:खांच्या संमिश्र अश्रूत आहे.

शंभर गोष्टी बोलण्यापेक्षा एक गोष्ट प्रत्यक्षात आणणारा श्रेष्ठ होय.

आयुष्याच्या लढाईत पुष्कळ वेळा नको असलेल्या अनेक तहांवर माणसाला सही करावी लागते.

सेवा जवळून, आदर दुरून आणि ज्ञान आतून असावे.

Hits: 24