मराठीची गौरवगाथा

Written by Suresh Ranade
परभाषेतहि व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी
मायमराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका
भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे
गुलामभाषिक होऊनि अपुल्या प्रगतीचे शिर कापु नका
कवि कुसुमाग्रज ( स्वातंत्र्यदेवीची विनवणी )  

नको पप्पा - मम्मी आई - बाबा म्हणा
वात्सल्याच्या खुणा शब्दोशब्दी
धन्यवाद म्हणा नको थँक्यू थँक्यू
थोडे थोडे रांगू मराठीत
कवि किशोर पाठक - प्रकाशनविश्व २००१

जैसी हरळांमाजीं रत्नकिळा । कीं रत्नांमाजीं हिरा निळा ।
तैसी भाषांमाजीं चोखळा । भाषा मराठी ।।१।।
जैसी पुष्पांमाजीं पुष्पमोगरी । कीं परिमळांमाजीं कस्तुरी।
तैसी भाषांमाजी साजिरी। मराठिया ।।२।।
पखियांमध्ये मयूरू । रूखियांमध्ये कल्पतरू ।
भाषांमध्ये मानू थोरू । मराठियेसी ।। ३।।
- फादर स्टीफन्स


रत्नजडित अभंग । ओवी अमृताची सखी ।
चारी वर्णातून फिरे । सरस्वतीची पालखी ।।
कवि कुसुमाग्रज (मराठी माती)

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच वस्त्रे यत्न करू ।
शब्दचि अमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका ।।
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव, शब्देचि गौरव पूजा करू ।।
- संत तुकाराम

जगामाजि भाषा अनेका अनेक
परिश्रेष्ठ ती मातृभाषा असे
तिचा मान सन्मान वा स्थान घेण्या
जगी या कुणी अन्य भाषा नसे
तशातून शास्त्रे कला ज्ञानपूर्णा
महाशक्तिशाली मराठी असे
शिकाया जगाची कुणी अन्य भाषा
गणा मातृभाषाच किल्ली असे ।।..।।
मराठी असे आमुची मायबोली,
तिला राज्य का? विश्वभाषा करु
जगातील विद्या तशी सर्व शास्त्रे
तिच्यामाजि आणोन आम्ही भरु
पुन्हा पेटवू स्वाभिमानास आम्ही
पुन्हा एकदा शौर्य धैर्या धरुं
मराठीस तारु, स्वदेशास तारु
सुखी विश्व होईल ऐसे करु ।।..।।
- प्र. ग. सहस्त्रबुध्द

साय मी खातो । मराठीच्या दुधाची ।
मी कुणाचा उंबरा झिजवू कशाला ? ।। - कवि सुरेश भट  
{mospagebreak}
गिरिजा कीर
माता आणि मातृभूमी यांचा विसर पडू देऊ नका. ती तुमची दैवते आहेत.
न. चिं. केळकर
ग्रंथाइतका प्रांजळ आणि निष्कपटी गुरू दुसरा मिळणार नाही
बाळासाहेब भारदे
ग्रंथसंपत्तीवरून त्या समाजसंस्कृतीचे निदान होते.
महात्मा गांधी
पाश्चात्य विज्ञान आणि विचार यांच्यात डोकावून पाहाण्यासाठी इंग्रजी ही एक उघडी खिडकी आहे, असे मी मानतो. त्यासाठी समाजातील एक वर्ग मी राखून ठेवू इच्छितो. त्याच्यामार्फत त्यांनी पश्चिमेविषयी मिळविलेले ज्ञान भारतीय भाषांच्याद्वारे मी सर्वत्र पसरवू इच्छितो. परंतु भारतीय बालकांवर बोजा टाकावा आणि परकीय माध्यमाच्या द्वारे त्याच्या मेंदूचा विकास घडविण्याची अपेक्षा बाळगून त्याच्या बाल्यसुलभ उत्साहाची खच्ची करावी ही गोष्ट मला नामंजूरच आहे. आज ज्या कृत्रिम परिस्थितीत आपल्याला शिक्षण दिले जात आहे ती निर्माण करण्यास जे जबाबदार आहेत, त्यांच्याकडून ते मोठे पापकृत्य घडले आहे असे माझे स्पष्ट मत आहे. जगात अशी परिस्थिती कोठेही पहावयास मिळावयाची नाही. यामुळे राष्ट्राचे केवढे नुकसान झाले आहे याची कल्पना आपल्याला करता येणे शक्य नाही परंतु मूक आणि दलित अशा लाखो लोकांचा माझा नित्य जवळून संबंध येत असल्याने त्या हानीची कल्पना मला आहे.
इंग्रजीच्या ज्ञानावाचूनही भारतीय मनाचा आत्यंतिक विकास होऊ शकला पाहिजे. इंग्रजीचे ज्ञान नसले तर सुधारलेल्या समाजात आपला प्रवेश होऊ शकणार नाही अशी आपल्या मुलामुलींची समजूत होण्यास मी प्रोत्साहन देणे म्हणजे भारतीय पुरूषार्थाचा नाश करणे होय. ही कल्पनाच मला अत्यंत लाजीरवाणी व असह्य होते. इंग्रजीच्या या व्यामोहातून मुक्त होणे स्वराज्यासाठी आवश्यक तत्व आहे.
लो. टिळक
राष्ट्रास परकी भाषेत शिक्षण देणे म्हणजे त्याची खच्ची करण्यासारखे आहे. स्वभाषेची अभिवृद्धी व उत्कर्ष हे स्वराष्ट्राच्या उन्नतीचे एक प्रमुख साधन आहे.नाडीवरून ज्याप्रमाणे शरीरातील रोगाची किंवा स्वास्थ्याची परीक्षा होते तद्वतच भाषेवरून राष्ट्राची बरीवाईट स्थिती तज्ञ लोक तेंव्हाच ताडतात. भाषा हे एक राष्ट्रीयत्वाचे अंग असून भाषावृद्धी हे देशाच्या स्वातंत्र्याचे बीज आहे. भाषा हे हत्यार आहे आणि हे हत्यार जो तयार करून देतो त्याचे राष्ट्रावर काही लहानसहान उपकार नाहीत. भाषेची वाढ व्हावयाची ती विद्वत्तेच्या, युक्तीच्या आणि लोकमताच्या जोरावरच झाली पाहिजे. सरकारच्या जोरावर होऊन उपयोगी नाही. एखाद्या तळयात सभोवारच्या वस्तूंचे जसे प्रतिबिंब पडते, त्याप्रमाणे प्रत्येक देशातील लोकांच्या आचारविचारांचे, धर्माचे, नीतीचे, तत्वज्ञानाचे व व्यापाराचे आणि समाजस्थितीचे चित्र त्यांच्या भाषेत उतरलेले असते. कोणत्याही भाषेतील ग्रंथसंग्रह वाढविण्याचे काम ती भाषा बोलणार्‍या लोकांच्या अंगी असणारा उत्साह आणि काही विशिष्ठ हेतूकरिता खटपट करण्याची बुद्धी ही जागृत असल्याखेरीज होत नाही. स्वर्गापेक्षा मी चांगल्या पुस्तकांचे स्वागत करीन. कारण पुस्तक जिथे असेल तिथे स्वर्ग निर्माण होईल.
Hits: 73